
भाजपाची हार..हिशेब चूकविते झाले कार्यकर्ते आणि मतदार
आघाडीची फडणवीस विरोधी एकजूट ठरली यशस्वी
पदवीधर निवडणूक:अभिजित वंजारी यांनी केला १८७१० मतांनी संदीप जोशी यांचा पराभव
भाजप गोटात सामसून:गड गेला आणि पत ही गेली
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ३ डिसेंबर: नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणूकीचा बहुप्रतिक्षित आणि सर्व उमेदवारांसोबतच मतदारांची देखील ‘दिल की धडकन’ वाढवणारा निकाल अखेर तब्बल दीड दिवसांनी जाहीर झाला.आघाडीचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांचा १८७१० मतांनी पराभव केला.अर्थात हा पराभव धक्कादायक असे म्हणता येणार नाही याला अनेक कारणे आहेत.
काल सकाळी ८ वा.पासून मानकापूर क्रिडा संकूलात मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली.प्रारंभी टपाल पत्रिकेसह एकूण मतदान असलेल्या १ लाख ३२ हजार ९२८ मतपत्रिका एकत्रित करण्याची प्रक्रिया पार पडली.यानंतर नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील मत पेट्यांची तसेच पोस्टल मतांची सरमिसळ पूर्ण झाली. २८ टेबलवर प्रत्येकी १ हजार मतांची मोजणी करण्यात आली. काल दुपारी ३ वा.पासून मतमोजणीला सुरवात झाली.मात्र पहील्या फेरीत कोणालाही मतांचा कोटा गाठता आला नसल्याने मध्यरात्री दुस-या पसंतीची मते मोजण्याची सुरवात झाली. या निवडणूकीसाठी ६० हजार ७४७ मतांचा कोटा ठरवण्यात आला होता.पहील्या फेरीपासूनच वंजारी यांनी बढत कायम ठेवली होती.तिस-या फेरीपर्यंत वंजारी यांनी जोशी यांच्यापेक्षा ९६११ मतांची बढत घेतली होती.
दुस-या फेरीच्या मतमोजणीत वंजारी यांना ११,४९७ मते मिळाली तर संदीप जोशी यांना ९,८५ मते मिळाली,तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांच्याकडे एकूण ९, ६११ मतांची आघाडी.होती.वंजारी याना प्रथम पसंतीक्रमाची एकूण ३५, ५०९ मते, तर भाजपचे संदीप जोशी यांना २५, ८९८ मते मिळाली .पहाटे ४ थ्या फेरीच्या मतमोजणीला सुरवात झाली.अखेर…आज दुपारी विभागीय अायुक्त डॉ.संजीव कुमार यांनी काँग्रेसचे उमेदवार यांना विजयी घोषित करुन प्रमाणपत्र बहाल केले.मतमोजणी स्थळावरुन संदीप जोशी यांनी भल्या पहाटेच मतमोजणीचा कल बघून उदास चेह-याने निघून जाणे पसंद केले.तर दुसरीकडे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काल पहील्याच फेरीत वंजारी यांनी घेतलेल्या मतांच्या बढतीपासून ढोल-ताशे वाजवण्यास सुरवात केली होती.
या निवडणूकीमध्ये १७ व्या एलिमिनेशन फेरीनंतर कोटा पूर्ण केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले.१७ व्या एलिमिनिनेशन फेरीनंतर अभिजित वंजारी यांना ६१ हजार ७०१ तर भारतीय जनता पक्षाचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते मिळाली.
फडणवीसांच्या पराकोटीच्या विरोधात आघाडीच्या एकजूटीचा विजय-
हा विजय सहज किवा सोपानसून आघाडीतील सर्व घटकपक्ष्ांनी एकजुटीने व एकदिलाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घडवून आणलेला विजय आहे.संदीप जोशी यांची हार म्हणजे पर्यायाने फडणवीस यांचाच पराजय,या खुणशीतूनच काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते हे एकजूट होऊन लढले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाकडे आघाडीने दिलेले लक्ष् व केलेले नियोजन यामुळे वंजारी यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.
अर्थात प्रा.अनिल सोले यांनाच भाजपने नागपूर विभागातून पुन्हा जरी तिकीट दिली असती तरी आघाडीचे नेते असेच एकदिलाने लढले असते,असे ठामपणे सांगितले जात आहे कारण या नेत्यांचे लक्ष्य ‘उमेदवार’ नसून फडणवीस हेच होते,यात आता दूमत राहीले नाही.एवढेच की सोले यांची उमेदवारी असती तर ब्राम्हण विरुद्ध ओबीसी अशी छूपी लढत लढल्या गेली नसती.निवडणूकीच्या या ‘जातीयवादी’ स्तरापर्यंत छूपा प्रचार ग्रामीण भागात पोहोचला नसता,असे मात्र बोलले जात आहे.संदीप जोशी यांना सवर्ण जातीचे असणे त्यात फडणवीस यांच्या अतिशय जवळचे असणे भोवले,असाच कल लक्ष्ात येत आहे.
आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर व करोनाच्या काळातील ही पहीलीच निवडणूक होती,यात तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या संपूर्ण मागील पाच वर्षांचा फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारभाराचा वचपा एकदिलाने काढला,असे आता बोलले जात आहे.अर्थात संदीप जोशी हे मात्र आघाडीच्या एकदिलाने लढलेल्या निवडणूकीत चांगलेच बळी पडले,महापौर पद हे देखील त्यांच्याकडे आता अल्पकाळच असणार आहे,तत्पूर्वी आमदार होऊन विधान परिषद गाठण्याचे स्वप्न मात्र त्यांचे भंगले,आपल्या राजकीय प्रवासाचा त्यांना पुन्हा नव्याने विचार करावा लागणार आहे,गडकरी यांचा गड सोडून फडणवीस यांच्या विश्वासातले व मर्जीतले असणे त्यांना किती महागात पडले,या निवडणूकीतून हे सिद्ध झाले,अशी चर्चा आहे.
ज्या पद्धतीने फडणवीस यांनी गडकरी यांच्याशी संवाद न साधता संदीप जोशी यांची उमेदवारी प्रा.अनिल सोले यांचे तिकीट कापून घोषित केली ते कार्यकर्त्या यांच्यासोबतच सुशिक्षित मतदार यांनाही दुखावणारे होते.
गडकरी यांनी नुकतेच २९ ता.ला भट सभागृहात पूर्व विदर्भ पदवीधर मेळाव्याच्या मंचावरुन अंहकर आणि माज याचा उन्माद जनता उतरवल्याशिवाय राहत नाही,असा टोला हाणला होता,त्यांचे हे शब्द सभागृहात अनेकांना नि:शब्द करुन गेलेत.अर्थात लगेच गडकरी यांनी ,हे मी मंचावरील कोणासाठी बोलत नाही बरं,अशी पुश्ती जोडली मात्र,कार्यकर्त्यांपर्यंत जे पोहोचायचे होते ते पोहोचले होते.फडणवीस हे नुकतेच मंच सोडून इतर कार्यक्रमाला निघून गेले होते.भाजपचा गड राहीला असल्याचा उन्माद आणि गुर्मीच या निवडणूकीत कार्यकर्ता आणि मतदारांनी उतरवली असे आता बोलले जात आहे.
शेवटी गडकरी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे,फडणवीस यांची सातत्याने गडकरी यांची महाराष्ट्रातील राजकारणातील अवहेलना कार्यकर्ता हा मुकाट्याने बघत व सहन करीत होता.शेवटी मतपेटीतून हा संपूर्ण आक्रोश एकदाचा कार्यकर्त्यांचा ही बाहेर पडला.
मुंढे फॅक्टरची चर्चा ‘सत्ताधीश‘ने आधीच केली होती.ग्राऊंड रिएलिटीवर एक मोठा वर्ग हा मुंढे यांच्यावरील प्रेम व आदरमुळे संदीप जोशी यांच्यावर चिडून होता.ज्या पद्धतीने नागपूरातून मुंढेंना घालवण्यात आले त्याबद्दल अद्यापही अनेक उच्च विद्याभूषित पदवीधर मतदारांमध्ये संदीप जोशी यांच्या विरोधात तसाही रोष होता,तो देखील या मतपेटीतून बाहेर पडला,असेच म्हणावे लागेल.करोनाच्या काळात महापाैर म्हणून जनतेच्या मनात जोशी यांची ठसलेली निष्क्रियता हा देखील फॅक्टर त्यांच्या विरोधात मतदानातून गेला,असे अनेकांचे म्हणने आहे.
गेल्याच वर्षी उन्हाळ्यात सातवा वेतन आयोगाप्रमाणे मनपाच्या कर्मचारी व अधिकारी यांची वेतन स्लीप देखील तयार झाली होती मात्र फडणवीस यांनी फक्त नागपूर महानगरपालिका वगळता ती इतर मनपात लागू केली,फडणवीस विरोधात हा देखील संताप अनेक अधिकारी व कर्मचा-यांच्या मनात खदखदत होताच,त्याचा देखील परिणाम भाजप विरोधात मतदानावर झाला असल्याचे बोलल्या जात आहे.या पार्श्वभूमीवर पुढल्या वर्षी जानेवारीत होणा-या मनपाच्या निवडणूकीत भाजपला मोठा फटका बसणार असल्याचे भाकीत वर्तवल्या जात आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर ॲड.अभिजित वंजारी यांचे यश मात्र ठलकपणे उठून दिसले कारण त्यांनी फडणवीस यांना त्यांच्याच होम-पीच वर चारही खाने चित केले,ते ही शांत व संयमीपणाची खेळी करुन.त्यांनी कुठेही आक्रस्ताळेपणाने प्रचार केला नाही,आपले मुद्दे मतदारांसमोर नेमकेपणाने मांडले,भाजपवर चिडून असलेल्या पदवीधर मतदारांनी वंजारी यांना भरभरुन मत दिल्यानेच पहील्याच फेरीपासून वंजारी यांनी लीड घेतली होती.‘विकास’राहीला बाजूला फडणवीस यांना त्यांचाच उन्माद आणि माज त्यांच्याच होम-पीचवर किती महागात पडला,अशीच चर्चा आता अनेक दिवस रंगणार आहे,यात दुमत नाही.
जोशी यांनाही लक्ष् णीय मते-
भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी देखील या निवडणूकीत लक्ष् णीय मते प्राप्त केली,हे विसरता येणार नाही,आघाडी झाली नसती तर निर्विवादपणे यश हे भाजपचेच होते.काँग्रेसचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांना ६१ हजार ७०१ मते मिळाली असली तरी संदीप जोशी यांनी देखील ४२ हजार ९९१ मते मिळवत ही लढत किती चुरशीची होती हे दाखवून दिले.एकीकडे एकमेव भाजप पक्ष् तर दुसरीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना ही एकजूट होऊन लढली.भंडारा,गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात तर राष्ट्रवादीने आपली संपूर्ण ताकद झोकून मतदारांना बाहेर काढले,त्याचे यशही त्यांना मिळाले.याशिवाय संदीप जोशी यांची उमेदवारी ब्राम्हण वर्सेस ओबीसी करण्यात देखील आघाडीला यश मिळाले,हे देखील विसरता येत नाही.फडणवीस यांच्यासाठी त्यांच्याच मतदार संघात या पुढील निवडणूका मात्र त्यांना वाटेल तेवढ्या सोप्या राहील्या नाहीत…हा संदेश फडणवीस यांना उभ्या महाराष्ट्रात पोहोचविण्यात मात्र आघाडीतील पक्ष् यशस्वी झालेत.
फक्त पदवीधरसाठी एकज़ूट की मनपासाठी देखील होणार आघाडी?
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत आश्चर्यकारक एकजूट दाखवून यश खेचून आणण्यात यशस्वी ठरलेली आघाडीतील तिन्ही पक्ष् हे फक्त पदवीधरपुरतीच एकजूट झाली होती की पुढील वर्षी जानेवरी महीन्यात होणा-या नागपूर महानगरपालिकेची निवडणूक देखीलअशीच एकदिलाने लढणार आहे?असा प्रश्न आता कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे!गेल्या तीन टर्ममध्ये म्हणजे जवळपास चौदा वर्षांपासून मनपात भाजपचीच एकहाती सत्ता आहे.या काळात मनपा अक्ष् रश:कंगाल झाली,असा आरोप या पक्ष्ावर केला जात आहे.कधी नव्हे ते जनतेच्या हिताचे ‘पाणी‘ देखील ओसीडब्ल्यूसारख्या खासगी संस्थेला भाजपने विकले आणि जनतेवर भुर्दंड बसवला.३०० कोटींच्या वर कोटेशन असलेले सिमेंट रस्ते यात झालेला भ्रष्टाचार,स्ट्रीट लाईट्स,स्मार्ट सिटीचे प्रकल्प,मेट्रो इ.अश्या अनेक प्रकल्पात भाजपने भ्रष्टाचाराचा जो आरोप झाला,त्या विरोधात आघाडीतील तिन्ही पक्ष्ांनी या पुढील सर्व निवडणूका आता एकत्रित व एकदिलानेच लढायला हवी,असे आता उघडपणे बोलल्या जात आहे,पदवीधर निवडणूकीच्या निकालाने कार्यकर्त्यांच्या अपेक्ष्ा वाढल्या आहेत.वंजारी यांना विधान परिषदेत पोहोचवल्यानंतर मनपावर आघाडीचा तिरंगा फडकविण्याची आकांक्ष्ा आता कार्यकर्त्यांमध्ये खोलवर जागृत झालेली आढळते.
ईव्हीएम भाजपचाच,बॅलेट पेपर लोकशाहीचा-
पदवीधर निवडणूक ही सर्वस्वी बॅलेट पेपरवर लढण्यात आली,यात कोणत्याही प्रकारे मतांमध्ये फेरफार करणे शक्य नाही,हीच निवडणूक भाजपच्या आवडत्या ईव्हीएमद्वारे लढल्या गेली असती तर वंजारी यांना पडणारे प्रत्येक चौथे मत हे भाजपच्याच उमेदवाराच्या खात्यात जमा झाले असते,असे आता संतापाने कार्यकर्ते सांगत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतात जी संवैधानिक लोकशाही अपेक्षित होती,ती ईव्हीएमद्वारे कधीही प्रस्थापित होऊ शकत नाही,प्रत्येक भारतीयाचे प्रत्येक मत हे बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच मोजले गेले पाहीजे,अशी अपेक्षा देखील आता व्यक्त केली जात आहे.
नुकतेच बिहारमध्ये निवडणूका पार पडल्या.बिहारमध्ये देखील ईव्हीएम मॅनेज करण्यात आल्या असल्याची ओरड झाली आहे.देशातील सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन सर्वस्वी अवैज्ञानिक व तांत्रिक अश्या ईव्हीएम मशीनवर मतदाराचे मत न तपासता बॅलेट पेपरवर मताची खरी किंमत मोजण्यासाठी ईव्हीएम पद्धत रद्द करण्याची केंद्राला सूचना करावी,अशी मागणी अनेक मतदारांची आहे,पदवीधर ही निवडणूक ईव्हीएमने लढल्या गेली असता वंजारी यांना विजय मिळवताच आला नसता,असेही ठामपणे बोलले जात आहे.
ड्रम्प/बायडेन यांच्या निवडणूकीशी तुलना!
पदवीधर निवडणूकीत एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतदार होते.या सर्व मतांची मोजणी करता करता तब्बल दिड दिवस खर्ची पडला.मत मोजणीची प्रक्रिया काल सकाळी ८ वा.पासूनच मानकापूरच्या क्रिडा संकूलात सुरु झाली होती मात्र इतर सर्व सोपस्कार पार पाडता-पाडता दुपारी ३ नंतर प्रत्यक्ष् मतमोजणीला सुरवात झाली.पहील्याच फेरीच्या निकालाला चक्क रात्र उजाडली,पहील्या फेरीत आघाडी घेऊनसुद्धा कोटा पूर्ण न करता आल्याने दुस-या क्रमांकाची पसंतीची मते मोजण्यास सुरवात झाली,त्यालाही शुक्रवारची पहाट उजाडली,एकूण १७ व्या फेरीपर्यंत मतमोजीणी प्रक्रिया पोहोचली,परिणामी नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची तुलना चक्क अमेरिकेतील डोनाल्ड ट्र्म्प/ज्यो बायडेन यांच्या निवडणूकीशी सोशल मिडीयावर केली जाऊ लागली.एवढ्या प्रदीर्घ काळानंतर देखील अमेरिकेत बायडेन यांना अध्यक्ष् पदाची सूत्रे हातात घेणे जमले नाही,नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघाची मतमोजणी देखील त्याच दिशेने जात असल्याचे मिम्स सोशल मिडीयावर कालपासून चांगलेच व्हायरल झालेत….!
थोडक्यात ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी गड ही गेला व पत ही गेली,अशी आता ठरली आहे,असेच म्हणावे लागेल.

आमचे चॅनल subscribe करा