आज ‘मी,स्वरा आणि ते दोघं’चा प्रयोग
नागपूर,ता.१८ मार्च २०२३: १९८४ मध्ये ‘धूमधडाका’हा सुपरहिट चित्रपट आला व १९८९ मध्ये लग्न केले,त्या दरम्यान मी ३५ मराठी सिनेमे ५ ते ६ हिंदी सिनेमे, व मालिका केल्या यानंतर मी १४ वर्षांची गॅप दिली .शेवटचा चित्रपट केला ‘माझा छकूला’हिंदी मध्ये ‘.किंग अंकल’ आणि तेंदूलकरांचं नाटक ’श्रीमंत‘ व एक मालिका ‘सर्कस प्रेमाची ’केल्यानंतर, माझा मुलगा झाल्यानंतर मी थांबले.आयुष्यात मी थांबत थांबत करिअर केलं.चौदा वर्षांनंतर मी पुन्हा रंगभूमीपासून सुरवात केली.मी खूप भाग्यवान आहे माझी सेकंड इनिंग मला खूपच छान मिळाली,’अग बाई सासू बाई’ सारख नाटक मिळालं,‘’मी स्वरा आणि ते दोघं’ ‘सारख्या नाटकामध्ये मंजुषा रानडेची भूमिका तर कोणालाही हेवा वाटेल,ती साकारायला मिळत आहे,सुरवातीला जेव्हा आपण या क्षेत्रात काम करतो तेव्हा अनेक जबाबदा-या असतात,घर घेतलं आहे तर त्याचे हप्ते भरायचे असतात,काही गोष्टी आपल्याला स्वीकारायला लागतात पैशांसाठी,भूमिकांसाठी, हे सगळं प्रेशर असतं.आता आजी आजोबा झालो आहोत.मुलांना वाढवताना आई-वडीलांवर जो प्रेशर असतो ते आजी आजोबा असताना नसतो,म्हणूनच नातवडांना आपण ‘दुधावरची साय‘म्हणतो,आता मला काम करताना कसलंही प्रेशर नाही आहे.काम करण्याचा निखळ आनंद आणि फक्त आनंद एवढाच मी अनुभव घेत असून, आयुष्याची ही सेकेंड इनिंग एन्जॉय करत असल्याचे सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांनी सांगितले.
त्या हनुमान गल्ली येथील हॉटेल सनस्टार येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होता.आज दिनांक १८ मार्च रोजी रात्री ९ वाजता देशपांडे सभागृहात आदित्य मोडक लिखित,नितीश पाटणकार दिग्दिर्शित,चंद्रकात लोकरे निर्मित ‘मी,स्वरा आणि ते दोघं‘नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला असून यानिमित्त नाटकाच्या चमूने पत्रकारांसोबत संवाद साधला.
या वेळी बोलताना त्या म्हणाल्या,की डेली सोप करताना एक-एक वर्ष सोबत काम करावं लागतं त्यावेळी ती माणसे तो प्रोजेक्ट आवडणं फार गरजेचं असतं.या नाटकात देखील मला मनासाखी भूमिका आणि निर्माते दिग्दर्शक आवडले असल्याचे निवेदिता यांनी सांगितले.
हे नाटक आपल्या जोडीदाराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोण उलगडण्याचा प्रयत्न करतो.आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर भेटणारी व्यक्ती आणि त्यांच्यासोबत जुळणारे नाते यावर हे नाट्य भाष्य करतं.आपल्यावर मनापासून नि:स्वार्थ प्रेम करणारी माणसे सापडायला मोठ्य भाग्य लागतं.अशी व्यक्ती प्रत्येकाला भेटतेच असे नाही आणि भेटलीच तर वयाच्या कोणत्या टप्प्यावर भेटेल याचा नेम नसतो.पण समोरच्याने आपल्यावर केलेल्या प्रेमाला ओळखून त्याचा आदर केला तर ते नातं अधिकच बहरतं.त्याप्रमाणे नात्यात एकमेकांना समजून घेण्याची तयारी असली तर ते तुटण्याचा प्रश्न ही उद् भवत नाही.‘मी,स्वरा आणि ते दोघं‘हे नात्यांकडे पर्यायाने जोडीदाराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोण देणारे नाटक असल्याचे निवेदिता सांगतात.
नाटकातील स्वरा(रश्मी अनपट)ही शिकली सवरलेली ,चांगल्या कुटुंबात संगोपन झालेली व स्वत:च्या पायावर उभी असणारी मुलगी आहे.वडील गेल्यानंतर तिचं आई(निवेदिता सराफ)हिच्यासोबतच बॉण्डिंग खूप संवेदनशील असतं.वैयक्तिक आयुष्यात स्वरा कोणाचंही प्रेम मिळवण्यात कमनशीबीच असते मात्र दुसरीकडे स्वराचे वडील मिस्टर रानडे गेल्यानंतर तिची आई नव्याने आयुष्याकडे बघत असते.संयोगाने तिचा महाविद्यालयीन मित्र जो तिचा कॉजेज जिवनातील ‘क्रश’असतो तो यशवंत पाटील(विजय पटवर्धन)तिला पुन्हा भेटतो.याच वेळी स्वराच्या ऑफिसमधला मित्र कपिल(सुयश टिळक) नव्याने स्वराच्या जीवनात प्रेमाचा अंकूल फूलवितो.या सगळ्या नातेसंबंधात मंजुषाला स्वरासोबत स्वत:च्या आयुष्याची घडी ही नीट बसवायची असते.पुढे या चौघांच्या आयुष्यात काय घडतं?हे या नाटकात प्रेक्षकांनी बघण्यासारखं आहे.
करोनासारख्या महाभयंकर त्रासदीनंतर हे पहीले व्यवसायिक नाटक असल्याचे ते सांगतात ज्याला सोलापूर,इंदूर,नाशिक इत्यादी सारख्या शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला कारण करोनानंतर इतर सर्व क्षेत्रासारखीच नाटकाची देखील आर्थिक घडी पूर्णत:विस्कळीत झाली असल्याचे त्या सांगतात.विदर्भात आता हे नाटक घेऊन आलो आहोत,खात्री आहे विदर्भात देखील नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना नितीन पाटणकर म्हणाला की,हे दोन पिढ्यांच्या वैचारिक भूमिकेबद्दलच नाटक आहे.आताची पिढी ही कोणत्याही नात्याविषयी काय विचार करते त्याच बरोबर जुन्या पिढीचाही विचार या नाटकात मांडण्यात आला आहे.हे नाटक कोणीही ‘जज‘ करायला जाऊ नये तर या नाटकात सकारात्मकता शोधायला नक्की या.
लग्नाच्या बाबतीत आणखी किती दशकांपर्यत मुली कुटुंबियांना खुश करण्यासाठी मुक्तपणे व्यक्त होणार नाही?या नाटकात नवीन- जुने मतमतांतरे यांचा संयोग असल्याचे तो म्हणाला.
हे नाटक बघताना कोणाच्याही घरात डोकावून बघितल्यानंतर कसं वाटतं, काय चाललं असावं?आई मुलीमधला संवाद असेल,सुरवातीला खुप अश्या रिएक्शन येतात की फार कॅज्यूअल जातंय,पण का नसावी कॅज्यूअल मांडणी?असा प्रश्न निवेदिता करतात.प्रत्येक वेळीला नाटकाची सुरवात ‘एक होता राजा एक होती राणी’,अशीच अपेक्षा का असावी?आता आपण बरेच प्रगल्भ झालो आहोत,नाटक बघण्याकरिता किवा चित्रपट बघण्या करिता.सुरवातीपासून हे नाटक अतिशय साधं आहे मात्र हे नाटक जेव्हा निणर्याप्रत येतं तेव्हा प्रेक्षकांना जो एक धक्का बसतो,बाप रे हे पण होऊ शकतं का?सुरवातीचा साधेपणा नसेल तर तो धक्का ही बसणार नाही,असे त्या सांगतात.
या नाटकातील प्रत्येक पात्राला एक पूर्णता मिळाली आहे जी मला देखील खूप भावली असे त्या सांगतात. मी नाटकाच्या सुरवातीला माझा एक विचार घेऊन सुरवात करते पण नाटक संपतं त्यात माझ्यात काही बदल असेल,कदाचित नवीन पिढीकडून मी काही नवीन गोष्ट शिकले असले,किवा माझ्या मित्राकडून शिकले असेल जो ब-याच वर्षानी मंजूषाला भेटला असतो जो तिचा कॉलेजमधला मित्र असतो.एकेकाळी तो तिचा क्रश होता मात्र आता ते पुन्हा एकत्रित सहजीवनाचा विचार करतात आहेत.त्यामुळे असेल, त्याच्या विचारामुळे असेल तो जो बदल आहे ,तो जो जीवनप्रवास आहे तो खूप छान आहे .या नाटकातली भूमिका खूप छान आहे, ती मी खूप एन्जॉय करते.कुठेतरी कन्फर्ट झोनच्या बाहेरची ही भूमिका आहे,म्हणूनच मला ती भूमिका करायला खूप मजा येते.
कुठल्याही गोष्टीचा प्रेशर न घेता एक दिग्दर्शक म्हणून आणि एक लेखक म्हणून त्यांचा जो अप्रोच आहे मला त्याचे फार कौतूक वाटत असल्याचे निवेदिता सांगतात.सुयशने खूप अप्रतिम काम केलं आहे या नाटकात,ही त्याच्यासाठीही एकदम वेगळी भूमिका असल्याचं मला वाटलं मात्र हा ख-या जीवनात देखील नाटकाच्या भूमिकेसारखाच असल्याची कोटी निवदिता यांनी केली.रश्मीने खूप छान काम केलं असून आमच्या भूमिका वेगळ्या आहेत.जसं मुलीनी वागायला हवं तसं आई वागतेय आणि आईने जसं वागायला हवं तसं मुलगी वागतेय अशी आमची भूमिका आहे.
नुकतेच मला जो पुरस्कार मिळाला ते यश माझ्या एकटीचं नसून संपूर्ण चमूचं ते सहकार्य असल्याचेही त्या म्हणाल्या.चारच पात्र आहे नाटकात आणि चारही जणांचे वेगवेगळे स्वभाव आहेत.चारही पात्रे एकत्रित आल्यानंतर त्याचं कोलार्ज कसं निर्माण होतं ते हे नाटक आहे,नुसतं नाटक म्हणून नव्हे तर महत्वाचा विषय असल्यामुळेच आवर्जून वैदर्भियांनी हे नाटक बघावे असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
काही टॅबू विषय असतात आपल्या संस्कृतीमध्ये त्याच्याककडे आपण सकारात्मकतेने बघत नाही आणि ते त्या वयातसुद्धा का टॅबू असावेत.कोणत्याही वयात प्रत्येक माणसला आनंदी राहण्याचा हक्क आहे.विशेष: स्त्रियांच्या बाबतीत.मी माझा विचार करते तेव्हा मी काही तरी संस्कृतीच्या बाहेरचं करतेय किवा चुकीचं करतेय,असं दडपण तिच्यावर असतं,का म्हणून तिने स्वत:चा विचार करायचा नाही?आपण विमानात बसतो तेव्हा आपल्याला सूचना मिळते की विमानातील प्राणवायू कमी झाल्यास सर्वात आधी स्वत:चा मास्क लावा आणि मग दुस-याचा लावा.तसेच कुटुंबाचं ही आहे,स्त्री तर आनंदी असेल तर कुटुंबही आंनदी राहील,तेच कुठेतरी हे नाटक सांगतंंय,दर्शवतंय म्हणूनच हे नाटक करायला मला खूप आवडलं असल्याचे त्या सांगतात.
बंगलोरमध्ये नाटकाच्या सादरीकरणानंतर जितका तरुणांचा प्रतिसाद मिळाला तितकाच वयाने ज्येष्ठ असणा-यांचाही अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्या म्हणाल्या.यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत आणि या नाटकाचे आणखी खूप प्रयोग करण्याची ईच्छा आहे,यासाठी प्रसार-प्रचार माध्यमांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी बोलताना रश्मी अनपट म्हणाली की नोकरी करणारी मुलगी दिवसातले आठ दहा तास आपल्या कार्यालयात घालवित असते.याच कार्यालयात मला एक मित्र भेटतो.त्यामुळेच घरच्यांबरोबर आपलं जे बॉण्डिंग असंत तेच कार्यालयीन मित्रासोबत देखील तयार होतं आणि ब-याचदा आपल्या चेह-यावरुन त्याला कळतं की मनात काय घालमेल चालली आहे.नाटकातील स्वराला वाटतं कि ही माझी वैयक्तीक बाब आहे, मात्र कितीही टाळलं तरी खोदून खोदून विचारल्यानंतर ख-या मित्राला आपल्या मनातली घालमेल समजून घेण्यात यश येतच आणि तिचं ही मन हलकं होतं,तसंच कपिल आणि स्वरामधलं नातं या नाटकात असल्याचे रश्मी सांगते.
याप्रसंगी भविष्यात पुन्हा अशोक सराफ यांच्यासोबत भूमिका करणार का?या प्रश्नावर बोलताना आम्ही दोघांनी एकत्रित ‘सारखं छातीत दूखतंय’हे यशस्वी नाटक केलं होतं.पुन्हा लवकरच मी आणि अशोक एका नाटकाची तयारी करीत आहोत ते रंगभूमीवर कधी येईल याविषयी सांगता येणार नाही,असे त्या म्हणाल्या.
लिव्ह इन रिलेशनशिप या नात्याकडे कसे बघता?याविषयी छेडले असता लिव्ह ईन रिलेशनशिप वाईट असल्याचे मला वाटत नाही असे त्या म्हणाल्या.या प्रकराचा निर्णय हा पूर्णत:वैयक्तिक असतो.त्या व्यक्तीची जडणघडण कशी आहे,त्यावर हे अवलंबून आहे.उद्या माझ्या मुलानेही तसा निर्णय घेतल्यास हरकत नाही,अस मत निवेदिता यांनी व्यक्त केलं.
आशयघन व अभिनयासाठी आवर्जून हे नाटक बघण्याचे आवाहन श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीचे समीर पंडीत यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विजय पटवर्धन,अभिनेते सुयश टिळक,युवा दिग्दर्शक नितीश पाटणकर यांची उपस्थिती होती.
…………………………….

आमचे चॅनल subscribe करा