Homeनागपूर न्यूजआघाडी सरकार कोत्या मनाची! निमंत्रण पत्रिकेत माजी मुख्यमंत्र्यांचे नाव लहान अक्षरात

आघाडी सरकार कोत्या मनाची! निमंत्रण पत्रिकेत माजी मुख्यमंत्र्यांचे नाव लहान अक्षरात

Advertisements

भाजप शहराध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी:समृद्धि महामार्गाच्या उद् घाटानाचीही झाली घाई:धर्मपाल मेश्राम यांचा घणाघात

नव्या पोलिस भवनाचे उद्या होणार उद् घाटन:गडकरी, उपमुख्यमंत्री,गृहमंत्री प्रमुख पाहूणे

नागपूर,ता.२८ एप्रिल २०२२: सिव्हिल लाईन्समधील सुसज्ज पोलिस मुख्यालयाचे निर्माणकार्य पूर्ण होऊन उद्या शुक्रवार दि. २९ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता या मुख्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद् घाटन होणार आहे मात्र उद् घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव लहान अक्षरात लिहण्यात आले असून त्यांचा नामोल्लेख उपस्थित मान्यवरांच्या नामावलीत करण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी ही निमंत्रण पत्रिका बघता आघाडी सरकारच्या कोत्या मनाचे दर्शन यावरुन घडते अशी अप्रत्यक्ष टिका केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ साली या मुख्यालयासाठी ११० कोटी रुपयांची मंजुरी प्रदान केली होती हे विशेष!राज्य पोलिस दलाच्या इमारतींपैकी सर्वाधिक सुसज्जित सात मजली इमारत बांधण्यात आली असून उद्या या इमारतीचे लोकापर्ण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असणार आहेत. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,उर्जामंत्री नितीन राऊत,पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार,राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.निमंत्रण पत्रिकेत सन्माननीय उपस्थितीमध्ये सर्वप्रथम खासदार विकास महात्मे,कृपाल तुमाने यांच्यानंतर फडणवीस यांचा नामोल्लेख करण्यात आल्याने शहर भाजप नेते यांनी आघाडी सरकारवर सडकून टिका केली.

२०१८ मध्ये फडणवीस यांच्याच हस्ते या पोलिस भवनाचे भूमिपूजन करण्यात आले होते.चार एकर जागेवर निर्मित या पोलिस भवनासाठी ११० कोटी खर्च झाले आहेत.पोलिस भवनाचे दोन भागात विभाजन करण्यात आले असून ’ए’विंगमध्ये पोलिस आयुक्तालय तर ’बी’विंगमध्ये नागपूर ग्रामीण पोलिसचे अधीक्षक कार्यालय असणार आहे.या सात मजली इमारतीचे चटई क्षेत्र १.६० लाख चौरस फूट असून परिमंडळाचे पाच पोलिस उपायुक्त वगळता सर्वच पोलिस उपायुक्तांचे कार्यालय एकाच ठिकाणी आले आहे.

नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणेंवर शरसंधान साधित मुख्यमंत्री यांचा उल्लेख एकेरी नावाने करने योग्य नसल्याची टिका केली होती.मुख्यमंत्री पद ही एक संस्था असते अशी कानटोचणी त्यांनी केली होती मात्र त्यांच्याच सारिपाटावरील खेळीतून राज्यात जी महाविकासआघाडी सरकार साकारल्या गेली त्याच सरकारच्या कार्यकाळात नागपूरात माजी मुख्यमंत्र्याचा नामोल्लेख लहान अक्षरात केला जात असेल व विकास कार्याचे श्रेय देखील दिले जात नसेल तर ‘इतरांना सांगावे ज्ञान आपण कोरडे पाषाण’हीच उक्ती सार्थ ठरत असल्याची टिका आता होत आहे.

२०२० मध्ये नागपूरात एका मेट्रो महामार्गाच्या लोकापर्ण सोहळ्यात उर्जामंत्री नितीन राऊत यांचा देखील नामोल्लेख निमंत्रण पत्रिकेत अश्‍याच पद्धतीने केल्या गेल्यामुळे गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांनी मंचावरुन भाषण देताना भाजपच्या या कृतीचा चांगलाच समाचार घेतला होता.राजकारणात श्रेयवादाची लढाई ही पुरातन असून ’ज्यांच्या हाती सत्तेची दोरी त्यांचीच चालणार मुजोरी’असा नवा पायंडा हल्लीच्या काळात पडलेला आढळून येतो.

काळ बदलला व राज्यात सत्तांतर देखील घडले त्यामुळेच दटके यांनी नेमक्या याच उक्तीवर व वृत्तीवर प्रहार करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ साली जवळपास ११० कोटी रुपये मंजूर करुन नागपूरात हे सुसज्ज असे पोलिस मुख्यालयाच्या निर्माणकार्याला गती दिल्याची आठवण करुन दिली.नागपूर हे एक असे शहर आहे ज्या शहरात विकासकामांमध्ये कुठल्याच राजकीय पक्षाच्या नेत्याने भेदाभेद पाळला नाही,असं ते म्हणाले.इतकं अद्यावत पोलिस मुख्यालय झालं त्यासाठी फडणवीस, नागपूर पोलिस आयुक्त व सहका-यांचे अभिनंदन करतानाच नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भात असे एकमेव अद्यावत पोलिस मुख्यालय निर्माण झाले आहे याचा आनंदच वाटतो मात्र त्या मुख्यालयाच्या उद् घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव अतिशय लहान अक्षरात ते ही इतर उस्थितांच्या नावाच्या यादीत लिहण्यात आल्याने या पत्रिकेच्या विषयाचा त्यामुळेच मी निषेध करतो,असे ते म्हणाले.महाविकास आघाडी सरकारने विकासकामांचे जे काही श्रेय घ्यायचे आहे ते घ्यावं मात्र ज्यांच्या पुढाकारातून आज हे सुसज्ज पोलिस मुख्यालय उभारले गेले आहे त्यांचा विशेष उल्लेख करायला हवा होता मात्र त्यांचे नाव लहान अक्षरात टाकून महाविकास आघाडी सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडवले असल्याची अप्रत्यक्ष टिका दटकेंनी केली.

याचीच ‘रि’ओढत भाजप महामंत्री धर्मपाल मेश्राम यांनी देखील आघाडी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले.भाजपने केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याची आघाडी सरकारला जी घाई झालेली दिसते त्याचेच एक उदाहरण समृद्धि महामार्ग देखील असल्याचे ते म्हणाले.नागपूर-मुंबई समृद्धि महामार्गाच्या नमनालाच म्हणजे लोकापर्णाच्या आठवडाभर आधीच आर्क मोडल्याची घटना घडली.आता ओव्हरपासच्या आराखड्यात बदल करुन येत्या दीड महिन्यात हेच काम करण्यात येणार आहे.फडणवीस सरकारच्या कार्यकाळात जाहीर समृद्धि महामार्ग हा राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे बांधण्यात येत आहे.नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजारपर्यंत २१० किलोमीटर लांबीच्या पहील्या टप्प्यातील मार्गाचे लोकापर्ण २ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते.मात्र,या अपघातामुळे आर्कचे नुकसान झाल्याने कार्यक्रम टळला.समृद्धि महामार्गावर शिवमडका येथे महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर ओव्हरपासचा काही भाग कोसळल्याने उद् घाटन सोहळा स्थगित करावा लागला होता.

धर्मपाल मेश्राम यांनी पोलिस भवनाच्या उद् घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीस यांचा लहान अक्षरातील नामोल्लेखावरुन आघाडी सरकारवर टिका करतानाच समृद्धि महामार्गावरील अपघाताचा ‘आरसा’निमंत्रण पत्रिका रचियेतांना दाखवला.

Latest बातम्या