Homeनागपूर न्यूजआघाडीची ‘रंगीत तालिम’ धराशायी

आघाडीची ‘रंगीत तालिम’ धराशायी

Advertisements

आमदारांचा असंतोष मतांमध्ये परिवर्तित झाला: फडणवीस

काँग्रेसला पराभवाचा धक्का:चंद्रकांत हंडोरेंचा पराभव

भाजपची राज्यसभेनंतर विधान परिषदेतही विजयाची पताका:भाजपचे पाचही उमेदवार विजयी

फडणवीस राजकारणातील ‘चाणक्यच’:उद्या महाल येथील भाजप कार्यालयात जल्लोष

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २० जून: राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणूकीकडे (assembly election) अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.राज्यसभेच्या निवडणूकीच्या विजयानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेच कोणतीही उसंत न घेता, दहा दिवसांवर ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीत लक्ष घातले.राज्यसभेसारखीच त्यांची ‘चाणक्य नीती’यशस्वी ठरली आणि आघाडीतील काँग्रेसच्या पहील्या पसंतीच्या उमेदवाराला, चंद्रकांत हंडोरे यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

या निवडणूकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले असून १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते.प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी २६ मतांचा कोटा ठरविण्यात आला होता.सर्वात मोठी चुरस ही भाजपच्या पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाड व काँग्रेसचे दुस-या पसंतीचे उमेदवार भाई जगताप यांच्यात होती मात्र प्रत्यक्ष निकाल हा काँग्रेस व पर्यायाने आघाडीसाठीही धक्कादायक ठरला व हंडोरे यांना पहील्या पसंदीची एकूण २० मते मिळाल्यानंतरही मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने दुस-्या पसंदीची मते मोजण्यात आली यात काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी २६ मतांचा कोटा पूर्ण करीत बाजी मारली.हंडोरे यांना दुस-्या पसंतीची एकूण २३ मते पडली.

भाजपचे प्रवीण दरेकर यांना २९,श्रीकांत भारतीय यांना ३०,राम शिंदे यांना ३०,उमा खापरे यांना २७ तर प्रसाद लाड यांना २८ मते पडलीत तर राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांना २६ तर एकनाथ खडसे यांना २९ मते मिळाली.या निवडणूकीत खडसे यांना भाजप, वरिष्ठ सभागृहात पाेहाचू देणार नसल्याचीच चर्चा होती व त्याच अनुषंगाने भाजप व्यूहरचना करीत असल्याची देखील वल्गना झाली मात्र प्रत्यक्षात भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ‘सेफ झोन’देत काँग्रेसच्या उमेदवाराचा ‘गेम’केला.

शिवसेनेचे दोन्ही उमेदवार रामराजे निंबाळकर २८ मते व आमश्‍या पडावी यांनी पहील्या पसंदीची २६ मते घेऊन विधान परिषदेत जाण्याचा मार्ग सुकर केला मात्र ‘आघाडी’म्हणून पुन्हा एकदा हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या मतांची साथ मिळवू शकले नाहीत हेच या निकालाने सिद्ध केले.भाजप जवळपास आघाडी व अपक्ष मिळून २१ मते फोडण्यास यशस्वी झाला,हे आघाडीचे अपयश ठलकपणे पुन्हा एकदा समोर आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक,अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारला.तुरुंगात असलेला कैदी हा दोषी ठरल्यानंतर शिक्षा भाेगणारा असो,खटला सुरु असलेल्या प्रकरणातील असो किवा गुन्ह्याचा तपास सुरु असलेल्या प्रकरणातील असो,सर्वांनाच कोणत्याही मतदानात सहभाग घेण्यासाठी कलम ६२(४)अन्वये आडकाठी असल्याचे, कायद्याचा अन्वयार्थ लक्षात घेतल्यानंतर स्पष्ट होतं,असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जामदार यांनी आपल्या निर्णयात स्पष्ट केले हाेते,त्यामुळे राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणूकीत देखील अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदान करता आले नाही व याचे दूरगामी परिणाम निवडणूकीच्या‘यश-अपयशात’ उमटले.राज्यसभेत शिवसेनेचा उमेदवार,सुहास कांदे यांचे मत बाद झाल्यानंतर अवघ्या एका मताने पराभूत झाले होते.यावेळी भाजपने(bjp) काँग्रेसच्या उमेदवाराला खिंडीत पकडले.

(छायाचित्र-भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला होता)

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे २८८ पैकी २८५ जणांचेच मतदान झाले.भाजप आमदारांची संख्या १०६ असून त्यांच्या ४ उमेदवारांसाठी २६ मतांच्या कोट्याप्रमाणे १०४ मतेच त्यांच्याजवळ होती.त्यांना ८ अपक्षांचा पाठींबा होता मात्र भाजपच्या पहिल्या ४ उमेदवारांना २६ चा कोटा पक्षाकडून दिल्या जाण्याची शक्यता धूसरच होती व आज भाजपच्या पाचही उमेदवारांनी प्रवीण दरेकर २९,श्रीकांत भारतीय ३०,राम शिंदे ३० उमा खापरे २७ व प्रसाद लाड हे २८ मते घेऊन विजयी झाले.

विशेष म्हणजे प्रसाद लाड या आपल्या पाचव्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी २० मंताची बेगमी भाजपला करावी लागणार होती व ती त्यांनी लीलया साधली.लाड यांनी दुस-या पसंदीची २८ मते घेऊन काँग्रेसच्या हंडोरे यांचे वरिष्ठ सभागृहात जाण्याचे स्वप्न भंग केले.
परिणामी आघाडीतील पक्षांकडून मतदानाची रंगीत तालीम ही फक्त ‘तालीमी‘पुरतीच मर्यादित राहीलीप्रत्यक्ष नाट्यगृहात वेगळेच नाट्य सादर झाले! राज्यसभा निवडणूकीप्रमाणे विधान परिषद निवडणूकीत कोणतीही गफलत होऊ नये,यासाठी शिवसेनेकडून शनिवारी आमदारांची मतदानसंबधी थेट रंगीत तालीमच घेण्यात आली होती.पवईच्या ‘वेस्ट इन’ हॉटेलमध्ये ही तालीम पार पडली मात्र ‘आघाडीतील तालीम’ ही आपापल्या पक्षापुरतीच मर्यादित होती,हे निकालाने सिद्ध केले व आघाडी म्हणून प्रचंड मोठी नामुष्की तिन्ही पक्षांवर ओढवली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या सगळ्या दिग्गजांच्या ‘रणनीती’समोर देवेंद्र फडणवीस यांची ‘चाणक्य नीती‘बेजोड ठरली,असेच आता म्हणावे लागेल.

राज्य विधीमंडळात अपक्ष व छोटे-मोठे पक्ष यांची १५ मते होती.यातील बहूतांश मते मिळवण्यात भाजप यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले.कोणत्याही निवडणूकीत ‘विजय’हा महत्वाचा असतो व प्रत्येक राजकीय पक्ष विजय मिळवण्यासाठी साम,दाम,दंड,भेदाची रणनीती अंगिकारतो,राज्यसभे पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणूकीतही ‘अर्थगंगेचे‘पाट वाहीले असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत असले तरी अखेर ‘जो जिता वही सिंकदर’उक्तीप्रमाणे सत्तेच्या या सारिपाटात जो जिंकतो त्याच्या सर्व उणिवा धवून निघत असतात, त्यामुळे आता काँग्रेसला आपल्या पराभवाचे खापर विरोधी पक्षावर फोडण्या ऐवजी आघाडीतील पक्षांनी स्वत:चे उमेदवार जिंकून आणण्यासाठी ठरवलेला वाढीव मतांचा कोटा याचे समीक्षण केल्यास योग्य ठरेल.

(छायाचित्र-भाजपसाठी एक-एक मत महत्वाचे असल्यानेच पुण्याहून लक्ष्मण जगताप ॲम्ब्यूलेंसमध्ये मतदानासाठी मुंबईत रवाना होताना)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रिय यंत्रणांचा आमदारांवर दबाव आणल्या जात असल्याचा गंभीर आरोप काल केला होता.विधान परिषदेवर पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपला २२ मते लागणार आहेत.ती जमवणे भाजपला शक्य नसल्याने केंद्रिय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा पटोले यांचा आरोप म्हणजे ‘पराभवाच्या भीतीतून व्यक्त होणारा अंदाज’याच सदरात आता मोडल्या जाईल.भाजपने फोडलेली २१ मते हे केंद्रिय तपास यंत्रणेच्या भीतीतूनच फूटली,या शंकेला अर्थ उरला नाही.

विधान परिषद निवडणूकीत एक-एक मत मिळवणे महत्वाचे असल्यानेच भाजपने अपक्ष व छोट्या पक्षांच्या आमदारांसोबत भेटीगाठीवर भर दिला तर दुसरीकडे आघाडीतील पक्षांनी, घटक पक्षांच्या प्रमुखांना भेटून त्यांची मते वळवण्याला प्राधान्य दिले होते.भाजप नेते प्रवीण दरेकर व गिरीश महाजन यांनी लोकलवारी करीत विरारमध्ये बहूजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली,तर काँग्रेसचे भाई जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.हितेंद्र ठाकूर यांच्या बविआची ३ मते होती.या मतांवर आघाडी व भाजप अशा दोघांचीही नजर होती मात्र या तीन मतांची ‘मेहरनजर’निवडणूकीत कोणाच्या बाजूने वळली हे निकालाने सिद्ध केले.

राज्यात तीन प्रमुख पक्षांची एकहाती सत्ता असताना फडणवीस यांनी एकहाती इतकी मते फाेडून यश खेचून आणले,यामुळे राजकीय क्षेत्रातील त्यांचा दरारा आणखी वाढला.यामुळेच आघाडी सरकारच्या विरोधात अधिक आक्रमक होत, फडणवीस यांनी निवडणूकीच्या निकालानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, फूटलेली मते हा तुमचा कयास असून सत्यता फक्त आम्हाला माहिती असल्याचे सूचित केले.

Maharashtra Mlc Election Face Off Between Bjp Mva As 11 Candidates In Fray For 10 Council Seats - Maharashtra Mlc Election: महाराष्ट्र विधान परिषद चुनाव में 10 सीटों पर 11 उम्मीदवार, क्या

आघाडीतील प्रचंड नाराजी,समन्वयाचा अभाव,आपसी विश्‍वास नसल्यानेच आघाडीतील मते ही सद् सद् विवेकबुद्धिने आम्हाला मिळाली असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्याप्रकारे नवा भारत घडवित आहेत,महाराष्ट्र राज्य त्यांच्या पाठीशी उभा आहे.हा निकाल म्हणजे ‘नवीन परिवर्तनाची नांदी’असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला.हा निकाल म्हणजे आघाडी सरकार विरोधातील असंतोष बाहेर आल्याचे द्योतक आहे.या पुढेही हा संघर्ष सुरु राहणार.चार ऐवजी आमचे पाच आमदार निवडून आले,आमची एक जागा वाढली असल्याचे ते म्हणाले.

राज्यसभा निवडणूकीत आम्हाला १२३ मते पडली तर या निवडणूकीत आम्हाला १३४ मते मिळाली.या निवडणूकीत सर्वाधिक मते ही भाजपच्या उमेदवारांना मिळाली आहे.या सरकारचा ‘काऊंटडाऊन’अगदी पहिल्या दिवसापासूनच सुरु झाला होता.आमचा संघर्ष जनतेकरिता आहे सत्तेसाठी नाही अशी पुश्‍ती ही त्यांनी जोडली.या दोन्ही निवडणूकीतून आघाडीतील असंतोष जनतेसमोर आला असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्या महाल येथील भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष-
उद्या सकाळी नागपूरातील टिळक पुतळ्या जवळील महाल येथील भाजपच्या कार्यालयात सकाळी १० वाजता विजयाचा जल्लोष साजरा होणार असल्याचे भाजप जनसंपर्क पदाधिका-याने कळवले अाहे.

Latest बातम्या