गुप्ता कोल वॉशरिजच्या अवैध गोरखधंद्यामुळे शेतक-यांच्या हजारो हेक्टर जमीनीचा पोत बिघडला:गावकरी व शेतकरी संकटात
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाची भूमिका संशयास्पद
कोळसा धुतल्याने कोळश्याच्या गुणवत्तेचा -हास,महाजनकोचा अहवाल तरीही कोळसा धुतल्या जातोय
महाजनकोचे काही अधिकारी व सत्ताधारी यांचे कोळशाच्या दलालीत हात काळे
६ तारखेला कोर्टाच्या सुनावणीला राहणार हजर:न्यायालयानेही प्रदुषण आणि भ्रष्टाचाराचे सज्ञान घ्यावे:प्रशांत पवार यांची मागणी
ॲड.उकेंकडे सीडी नव्हती माझ्याकडे सीडी म्हणून ईडीला भीत नाही!
नागपूर,ता.२ मार्च २०२३: महा मिनरल मायनींग व बेनेफिकेशन प्रा.लि. या कंपनीची कोल वॉशरी मौजा-एसाबा,ता.पारशिवनी,जि.नागपूर येथे कार्यरत असून सर्व शासकीय नियमांचे उल्लंघन करुन कोल वॉशरी चालविण्यात येत आहे.या कोल वॉशरीजमुळे आजूबाजूच्या परिसरातील शेकडो शेतक-यांच्या शेतजमीनींचा पोत बिघडला असून, येथील रहीवाशी व शेतकरी वर्ग सातत्याने प्रदुषणाचा सामना करीत आहे.या कंपनीच्या विरोधात वारंवार आंदोलन करीत आहेत मात्र, हे आंदोलन दडपण्यासाठी या कोल वॉशरीजचे मालक गुप्ता यांनी कोर्टाचा आधार घेतला असून ,शेतकरी,गावकरी तसेच या आंदोलनाला साथ देणारे ‘जय जवान जय किसान संघटना’ यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली असून,कोर्टाने या सर्वांना नोटीस बजावली असल्याची माहिती आज गुरुवार दिनांक २ मार्च रोजी बजाज नगर येथील ‘जय जवान जय किसान‘संघटनेच्या कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी पत्र परिषदेत दिली.
याप्रकरणी बोलताना त्यांनी सांगितले की,कोर्टाच्या आदेशानुसार ते येत्या ६ मार्च रोजी कोर्टात हजर होणार आहेत मात्र, कोर्टाने देखील पराकोटीच्या भ्रष्टाचाराचे व प्रदुषणाचे सज्ञान घेण्याची खरी गरज असल्याचे ते म्हणाले.सर्वात महत्वाचे म्हणजे या हजारो शेतकरी व गावक-यांना उधवस्त करण्यापासून रोखण्यासाठी जी शासकीय यंत्रणा कार्यरत आहे त्या महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाची भूमिका या कंपनीविषयीची संश्यास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.
या कोल वॉशरीजला सुरवातीला प्रदुषण महामंडळाने नोटीस बजावत प्रदुषण नियंत्रणाबाबत ही कंपनी किमान २२ ते २३ निकष पूर्ण करीत नसल्याने त्वरित कोळसा धुण्याचे काम बंद करण्याचे आदेश दिले असतानाही नंतर ‘वरुन’आलेल्या राजकीय दबावातून प्रदुषण नियंत्रण महामंडळाने यानंतर एवढ्या गंभीर बाबीविषयी चुप्पी साधली!
शासनाच्या यंत्रणाच या काेल वॉशरीज कंपनीच्या भ्रष्ट कारभाराविषयी निष्क्रिीय झाल्याने त्या गावातील हजारो शेतकरी व गावक-यांचा आवाज होण्यासाठी आमची संघटना मैदानात उतरली,गेल्या दोन वर्षांपासून या कोल वॉशरीजच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सातत्याने पत्र परिषदा घेत असून, राज्य तसेच केंद्रीयस्तरावर वारंवार पुरावे देऊनसुद्धा या कोल वॉशरी कंपनीवर कोणाची इतकी ‘मेहरबानी’आहे,हे जनते समोर आले पाहिजे.
जिल्हाधिकारी यांनीसुद्धा आपले डोळे झाकून घेतले आहे.या गावातील शेतकरी व गावकरी वर्गाला त्यांनी प्रदुषणाच्या हलाकीत जिवन जगण्यास बाध्य करणा-या या कंपनीला तुरंत बंद करण्याची कारवाई केली पाहिजे मात्र प्रदुषण करणा-या व शासनाच्या कोट्यावधीचे नुकसान करणा-या,भ्रष्ट व्यवहार करणा-या कंपनीनेच कोर्टात जाऊन गावक-यांनी,सरपंचांनी व शेतक-यांनी त्यांच्या नुकसानाबद्दल कुठल्याही प्रकाराची दाद मागू नये व त्यांना आंदोलनापासून थांबवावे अशी मागणी कोर्टात केली!
हा प्रकार म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’असा असून न्यायालयात जाऊन संरक्षण मागणे हा कंपनीच्या षडयंत्राचाच भाग असल्याचा आरोप याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केला.या केसमध्ये ‘जवान जवान जय किसान संघटनेलाही’ प्रतिवादी करण्यात आले असून येत्या ६ मार्च रोजी स्वत: कोर्टात हजर राहणार असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.
काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या गुप्ता कोल वॉशरीजलाच पुन्हा कोळसा धुण्याचे काम दिले गेले,या मागे कोणाकोणाचे साटेलोटे आहेत हे जगजाहीर आहे.महाजनकोच्याच अहवालात कोळसा धुतल्याने त्याची गुणवत्ता कमी होत असल्याचे नमूद असतानाही कोट्यावधींचा हा गौडबंगाल अबाधितरित्या कश्यासाठी,कोणा-कोणालाला फायदा पोहोचविण्यासाठी सुरु आहे?असा सवाल करीत, येत्या गुढीपाडव्यानंतर या कपंनीच्या विरोधातले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
गुप्ता यांनी खरे तर प्रदुषण नियंत्रण महामंडळाला प्रतिवादी करायला हवे होते मात्र ते आंदोलन करणा-यांना प्रतिवादी करीत आहे.संपूर्ण भारतात गुप्ता यांची एकमेव ही अशी कोल वॉशरी आहे जी प्रदुषण महामंडळाच्या नियमांचा भंग करुन देखील सुरुच आहे.नुकतेच सोशल मिडीयामध्ये या गावातील एक ‘पांढरा कुत्रा काळा झाला’हे वृत्त चांगलेच व्हायरल झाले होते,यावरुन या गावांमधील प्रदुषणाच्या पातळीचे व पिडीतांच्या जगण्यातील हतबलतेचे स्वरुप लक्षात येते,असे पवार म्हणाले.
मूळात हा विषय राजकारणाचा नसून प्रदुषणाचा असल्याचे त्यांनी सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना,उर्जामंत्री कोणताही असो,कोणत्याही पक्षाच्या सरकारमधील असो त्यांनी या २८ ते २९ हजार कोटींच्या कोल वॉशरीजच्या महाघोटाळ्याकडे सोयीस्करपणे दूर्लक्ष केले असल्याचा अाराेप त्यांनी केला.आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत कोल वॉशरीजचा हा महाघोटाळा पोहोचवला होता,त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनाही या बाबीकडे लक्ष घालण्यास व कंपनीचा कारभार बघून येण्याची सूचना केली होती मात्र,दानवे या भागात फिरकलेही नाही,अशी टिका प्रशांत पवार यांनी केली.माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे देखील हा विषय उचलण्यास का घाबरतात?असा प्रश्न पवार यांनी केला.
मी पूंजीपतींना घाबरणारा नाही,असे त्यांनी सांगितले असता ॲड.सतीश उके हे देखील सत्ताधा-यांना घाबरत नसल्यानेच सक्त वसुली संचनालय(ईडी)कडून उके बंधूंना अटक झाली व आजतागत त्यांची मुंबईतील कारागृहातून सुटका झाली नसल्याकडे लक्ष वेधले असता,उके यांच्याकडे ‘सीडी‘नव्हती,आमच्याकडे सीडी असल्याचे सूचक विधान त्यांनी केले,तसेही आम्ही केंद्रिय यंत्रणांना घाबरत नसल्याचे ते म्हणाले.उके यांचा विषय वेगळा होता हा भ्रष्टाचाराचा विषय असल्याचे ते म्हणाले.
उघडपणे नाव छापा-
याप्रसंगी बोलताना त्यांनी पत्रकारांनाच आव्हान केले व कंपनीची बाजू मांडताना व माझ्या विरोधात वृत्त प्रसिद्ध करताना माझ्या नावाचा उल्लेख करीत नाहीत,त्यांनी असे करु नये,उघडपणे माझे नाव छापून बातमी प्रसिद्ध करण्याचे आव्हान त्यांनी केले.ही बाब पत्रकारितेला शोभणारी बाब नसल्याचे ते म्हणाले.मी जनतेचे मुद्दे मांडतो,आम्ही ब्लॅक मेलिंग करीत नाही,पत्रकारांचे हातपाय जोडायला ही जात नाही,महामेट्रोचे घोटाळे सलग नऊ वर्ष पत्र परिषदा घेऊन मांडले,लवकरच महामेट्रो व जी-२० मधील महाभ्रष्टाचाराविरोधात पत्र परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

आमचे चॅनल subscribe करा