
निवडणूक आयोगाने शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला
नागपूर,ता. ८ ऑक्टोबर २०२२: शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार
आहे. ती शिवसेना आम्ही पुढे घेऊन जात आहोत अशा थापा मारून अली बाबा आणि चाळीस चोरांच्या टोळीने ‘भाजप’च्या खंजिराचा वापर करून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा खून पाडला हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे,अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.
निवडणूक आयोगाने आज सायंकाळी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवले.आयोगाने उद्धव ठाकरे व शिंदे गटाला सोमवार दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ पर्यंत आपापले निवडणूक चिन्ह सादर करण्यास सांगितले असून दोन्ही गट निवडणूक आयोगाद्वारे मंजूर चिन्हांपैकी आपापल्या आवडीप्रमाणे कोणतेही चिन्ह निवडू शकतात,असे त्यांना सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे निवडणूक आयोगाद्वारे शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यामुळे अंधेरी पूर्व विधान सभेच्या पोट निवडणूकीत ठाकरे गट व शिंदे गट दोघांनाही धनुष्य बाण या चिन्हाचा आता वापर करता येणार नाही.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणकीसाठी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्याला मिळावे या शिंदे गटाने केलेल्या मागणीवर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला आज,शनिवारी दुपारी २ पर्यंत आपले म्हणने मांडण्याचे निर्देश शुक्रवारी एका पत्राद्वारे दिले होते.ठाकरे गटाकडून वेळेत उत्तर न आल्यास धनुष्यबाण चिन्हाविषयी आयोगाला योग्य तो निर्णय घ्यावा लागेले,असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले होते.
पक्षावर अजूनही आमचे वर्चस्व आहे,हे सांगतानाच सविस्तर कागदपत्रे सादर करण्यासाठी आपल्याला किमान १५ ते २० दिवसांचा वेळ मिळावा,अशी माणगी ठाकरे गटाने केली होती.मात्र ३ ऑक्टोबर रोजी अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, शिंदे गटाच्या वतीने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळावे,अशी मागणी करणारे पत्र ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला दिले होते.
शिंदे गटाचे वकील चिराग शहा यांनी त्याच दिवशी या पत्राची प्रत ठाकरे गटाला ईमेल केली होती,याचा उल्लेख निवडणूक आयोगाने शुक्रवारच्या पत्रात केला होता.
आजवर दोनवेळा मुदतवाढ मागणा-या ठाकरे गटाने शुक्रवारी प्रथमच आपले प्राथमिक लेखी निवेदन आयोगासमोर सादर केले.शिंदे गटाची कागदपत्रे अद्याप मिळालेली नाहीत,अशी तक्रार करत ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडली.त्यासाठी ठाकरे गटाला शुक्रवारची शेवटची मुदत होती.निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपण्याचा आत दुपारी ४ वाजता ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगाकडे दस्तावेज सादर केला.
ठाकरे गटाने धनुष्यबाण चिन्हाची मागणी करणा-या शिंदे गटाच्या मागणीवरील प्रतिसादासह २९ सप्टेंबर रोजी मागितलेला दस्तावेज सादर करावा,असे निवडणूक आयोगाने या पत्रात म्हटले होते.
निवडणूक आयोगापुढे ४ ऑक्टोबर रोजी सादर केलेल्या दाव्यानुसार शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार,लोकसभेतील १९ पैकी १२ खासदार,१४४ पदाधिकारी,११ राज्यप्रमुखांचे समर्थन लाभल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.याशिवाय १ लाख ६६ हजार ७६४ प्राथमिक सदस्यांची प्रतिज्ञापत्रे शिंदे गटाने सादर केली असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची १८ जुलै रोजी बैठक होऊन त्यात पक्षप्रमुखपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
तर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील २८७ पैकी १८० सदस्यांचे आपल्याला समर्थन असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.ठाकरे गटाकडे १५ आमदार व लोकसभेतील ७ खासदार,राज्यसभेतील ३ सदस्य असून १० लाख कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात येत असल्याचे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.
मात्र,आजच्या घडामोडी नंतर व निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे मात्र ती शिवसेना आम्ही पुढे नेत असल्याची वल्गना अली बाबा व चाळीस चोरांच्या टोळीने, भाजपाच्या खंजिराचा वापर करुन बाळासाहेबांच्या शिवसेनेचा खून पाडला असल्याची जहाल प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली.

आमचे चॅनल subscribe करा