
जिल्हा प्रमुखांसह ३९ पदाधिकारी,५०० कार्यकर्त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश
कल्पना ही केली नसेल असे आघाडीतले नेते लवकरच भाजपमध्ये येणार:बावणकुळे यांचा सूचक इशारा
देशाचे नेतृत्व जे करतात त्या हिंदूत्ववादी मोदींच्या पक्षात यायचे होते:जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांचा खुलासा
लवकरच अमरावती जिल्ह्यात पाच हजार कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेशकर्ते होणार
नागपूर,ता.८ सप्टेंबर २०२२: ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीला स्पष्ट बहूमत दिले होते.भाजपचे १०५ व शिवसेनेचे ५८ आमदार निवडून आले होते.असे असताना मुख्यमंत्री पदावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला सत्तेचे ‘अस्मान’ दाखवून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत ’महाविकासआघाडी’सरकारची स्थापना केली.गेली अडीच वर्षे आघाडी सरकारने राज्यात कारभार ही हाकला मात्र शिवसेनेचाच ढाण्या वाघ एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ‘न भूतो ना भविष्यती’असे फार मोठे खिंडार पाडले व शिवसेनेचे ३९ व अपक्ष १० आमदार घेऊन ‘गुवाहटी’ गाठली.ठाकरे सरकार गडगडले व ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
३ जुलै २०२२ रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड तर ४ जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत बहूमत ही सिद्ध केले.यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची संपूर्ण राज्यात जी दाणादाण झाली ती शब्दातीत असून, विदर्भात देखील ठाकरेंच्या सेनेला आता भाजपने फार मोठे खिंडार पाडले असून, एक दोन नव्हे तर अमरावती जिल्ह्यातील ३९ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या नेतृत्वाखाली, नागपूरातील धंतोली येथील पक्ष कार्यालयात भाजपात प्रवेश केला.यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश वानखेडे तसेच उपजिल्हाप्रमुख नितीन गुडधे पाटील यांनी पक्ष प्रवेश करुन अमरावती जिल्ह्यात ठाकरे सेनेला फार मोठे खिंडार पाडले.
याप्रसंगी बोलताना बावणकुळे म्हणाले,की आश्चर्यचकीत व्हाल असा पक्ष प्रवेश येत्या काळात भाजपमध्ये तुम्हाला बघायला मिळेल! कल्पना ही केली नसेल अश्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.यावेळी त्यांचा सूचक इशारा आघाडीतील तिन्ही पक्षांकडे होता,हे विशेष.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एकीकडे देश हा सर्वकष भारत,विश्वगुरु बनण्याकडे वाटचाल करीत असताना उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्राला रसातळाला नेले.मुख्यमंत्री पदाच्या १८ महिने तर ते मंत्रालयात फिरकलेच नाहीत.
विदर्भाच्या विकासासाठी असलेले विदर्भ वैधानिक मंडळ ज्यांनी बंद पाडले त्यांच्या सोबत विदर्भातील कार्यकर्ता कसा राहील असे सांगून बावनकुळे म्हणाले, मागील अडीच वर्षाच्या काळात शिवसेनेसह कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काम करता येत नव्हते. ज्या कार्यकर्त्यांना शेवटच्या घटकाचा विकास हवा होता, त्यांच्या सरकारकडून अपेक्षा होत्या. मात्र १८ महिने मुख्यमंत्री मंत्रालयात आले नाही. राज्याच्या जनतेला उपलब्ध झाले नाहीत. यामुळे राज्याचा विकास थांबला होता. अशा पक्षात कार्यकर्ते कसे टिकणार?ज्या जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य आहे, अशा ठिकाणी राष्ट्रवादीचा किंवा कॉंग्रेसचा पालकमंत्री नियुक्त केला व तो दमदाटी करीत असेल तर अशा पक्षात कार्यकर्ते कसे राहतील? असाही उलट प्रश्न करीत, हिंदुत्वासाठी काम करणारे कार्यकर्ते हिंदुत्ववादी पक्षात येत आहेत, असे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात फडणवीस यांनी कधीही जातीपातीचे किवा धर्माचे राजकारण केले नाही.सर्वच धर्म व जातींच्या समाजासाठी त्यांनी यशस्वीपणे काम केले.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी सारखे विकासात्मक नेतृत्व या पक्षाला लाभले आहे. ओबीसी आरक्षणाचाही बट्ट्याबाेळ ठाकरे सरकारने केला.ओबीसींचे आरक्षण शिंदे-फडणवीस सरकारने परत मिळवले.त्यामुळे ठाकरे सेनेतील या कार्यकर्त्यांनी लोकाभिमुख असणा-या भाजपमध्ये प्रवेश केला,असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधान सभेच्या निवडणूकांनंतर जो धोका भाजपला दिला,त्याची परतफेड २०२४ मध्ये राज्यातील जनताच करेल.२०२४ च्या निवडणूकीत फक्त काही लोक सोडून उद्धव तसेच आदित्य ठाकरेंकडे पदाधिकारी व कार्यकर्ते नसणार आहेत कारण ठाकरे गटातील कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात भाजप तसेच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेत आहेत.
पुढच्या काळात फक्त ठाकरे यांच्या गटालाच नव्हे तर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला विधान सभेची निवडणूक लढवायला उमेदवार देखील मिळणार नाही,अश्या शब्दात बावणकुळे यांनी आघाडीतील राजकीय पक्षांना डिवचले.
अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजपमध्ये झाल्याने मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास नाही झाला का?या प्रश्नावर बोलताना,भाजपमध्ये कार्यकर्ता ‘मी’म्हणून येत नाही तर पक्ष म्हणून येतो.पद नव्हे तर राष्ट्रासाठी येतो,असे उत्तर बावणकुळे यांनी दिले.राजेश वानखेडे हे देखील पदासाठी भाजपमध्ये आले नाहीत मात्र भाजपमध्ये त्यांच्यासह सर्वांना सन्मान मिळेल,अशी ग्वाही बावणकुळे यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप युतीविषयी छेडले असता,राज ठाकरे सहा दिवसांच्या दौ-यांवर विदर्भात येत आहेत मात्र प्रत्येक पक्षाला राज्यात संघटना वाढवण्याचा अधिकार आहे.हा त्यांचा प्रश्न आहे,असे सांगून प्रश्न टोलवला.
राजेश वानखेडे यांना,ते मूळचे शिवसैनिक आहेत मग त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश न घेता भाजपमध्ये येणे का पसंद केले?असा प्रश्न केला असता,देशाचे नेतृत्व जे करीत आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हिंदूत्वासाठी ते, जे करीत आहे ते बघून आम्ही भाजपमध्ये येण्याचा पर्याय निवडला,असे उत्तर त्यांनी दिले. देशासाठी काम करायचे असेल तर भाजपा प्रवेशाशिवाय पर्याय नाही, असे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. देशाचे नेते पंतप्रधान नरेद्र मोदी व उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेऊन हा प्रवेश झाला आहे,असे बावणकुळे म्हणाले.
एकीकडे भाजप हा, आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष हे विकासविरोधी असल्याचा शंखनाद करतात दूसरीकडे त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करतात,या विसंगतीबाबत विचारले असता ,१८ महिने ज्या सरकारचा मुख्यमंत्री मंत्रालयातच येत नव्हता,त्यांनी नेमेलेले पालकमंत्रीच आघाडीतील पक्षातील कार्यकर्त्यांनाच दमदाटी करतात,ज्यांची विचारधारा,धाेरणेच सर्वस्वी वेगळी आहेत,व फक्त एका मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीसाठी संपूर्ण शिवसेनाच ज्यांनी दावणीला बांधली अश्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दूसरा पर्याय तरी काय असणार?उद्धव ठाकरे यांचा आता ‘पक्ष’राहीलेला नसून ‘गट’झाला आहे,असा टोला ही बावणकुळे यांनी हाणला.
हा छोटेखानी कार्यक्रम असून लवकरच भव्य अश्या सोहळ्यात राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील ५ हजार कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार प्रताप अडसड, प्रवक्ता शिवरायजी कुळकर्णी, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष जयंत डेहनकर, प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम, नितीन धांडे, डॉ. प्रणय कुळकर्णी, गजानन कोल्हे, निलेश श्रीखंडे यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे यांनी सातत्याने उपेक्षा केली: राजेश वानखेडे
अडीच वर्षांपूर्वी महाविकासआघाडीचे सरकार राज्यात आले,त्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले मात्र सातत्याने त्यांच्याकडे काम घेऊन गेलो असताना एक ही काम त्यांनी मार्गी लावले नाही.आमचा पक्ष हिंदूत्ववादी असताना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हेच म्हणत होते की राष्ट्रवादी व काँग्रेससोबत काम कसं करायचं?सर्वांनी मिळून अनेक वेळा आपल्या भावना उद्धव ठाकरेंना कळवल्या होत्या की आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही मात्र त्यांनी कधीही कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या नाहीत.त्यामुळेच पक्षाचं काम करायचं असेल,शेतक-यांचं,सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम करायचं असेल तर आपल्याला सरकारच्या सोबत जावं लागेल व बावणकुळे साहेब तसेच फडणवीस यांच्यावर विश्वास ठेऊन आज आम्ही सर्वांनी हा पक्ष प्रवेश केला.
यासोबतच २०१९ मध्ये जे महाविकासआघाडीचे सरकार आले,त्या वेळी मी १०० पत्र उद्धव ठाकरेंना दिले.भेटीसाठी वेळ ही मागितला पण त्यांनी एकदाही मला वेळ दिली नाही मात्र जिल्हा प्रमुखांच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंचे हेच म्हणने होते तुम्ही पालकमंत्र्यांसोबत ’जमवून’घ्या.काँग्रेसच्या मंत्र्यांशी,पालकमंत्र्यांशी आम्ही कसं जमवून घेणार?आम्ही हिंदूत्वावादी पक्ष आहोत आणि हिंदूत्ववादी पक्षातच जाण्याचा आज आम्ही निर्णय घेतला.
– वानखेडे यांचा राजकीय प्रवास
ठाकरे गटाचे अमरावती जिल्हा शिवसेना प्रमुख राजेश वानखडे यांनी तिवसा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनाकडून कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. ६६ हजार मते मिळविणाऱ्या वानखडे यांना फारच कमी मतांनी पराभव झाला. शिक्षण संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन गुडधे पाटील यांच्यासह पंचायत समिती व बाजार समिती सभापतींसह सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली. वानखडे यांना लोकसभा संयोजक तर पाटील यांना शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले.
– शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजपा प्रवेश
उपजिल्हाप्रमुख प्रदीप गौरखेडे, तिवसा तालुका प्रमुख आशिष निस्ताने, तिवसा शहराध्यक्ष अनिकेत वानखडे, तिवसा उपतालुका प्रमुख दिनेश लांडगे, संजय विधळे, भातकुली उपतालुका प्रमुख अमरदीप तेलखेड, मोर्शी उपतालुका प्रमुख सोपान निस्ताने, भातकुली पंसचे उपसभापती अरविंद अकोलकर, संजय देशमुख, अनिल पाथरे, सुधीर गोंडसे, अतुल देशमुख, चेतन वानखडे, प्रवीण बडकस, विवेक खाडे, श्रीधर देशमुख, सुनील तालन, दीपक कमळापुरे, गजानन राऊत, पंकज धोटे, मंगेश काळमेघ, विजय रेडे, संजय पिंगळे, विजय भुयार, प्रकाश अटाळकर, सतीश बोबडे, अनंत धंदर, पवन लुंगे, नंदकिशोर काळे, नितीन पुंडकर, प्रवीण नवले, एकनाथ गावंडे, अतुल मोहोड यांनी प्रवेश घेतला.

आमचे चॅनल subscribe करा