Homeनागपूर न्यूजअतिवृष्टिमुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर एक लक्ष रुपये मोबदला द्या

अतिवृष्टिमुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर एक लक्ष रुपये मोबदला द्या

Advertisements

सुनील केदार यांची मागणी:गावोगावी वेदना देणारे चित्र

एकत्रित लढा द्यायचा आहे:राजकारण करायचं नाही

राख तलावाची दूर्घटना मानवनिर्मितच

नागपूर,(Nagpur)ता.२४ जुलै २०२२: गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टिमुळे झालेल्या शेतक-यांच्या नुकसानीची तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, याची पाहणी करण्यासाठी फिरत आहोत.सूर्य प्रकाशात करण्यात आलेल्या या पाहणीचे चित्र गावोगावी वदेना देणारे  आहे.चोवीस तासात पासष्ट मिलीलिटर पाऊस पडल्यास शासनाद्वारे अतिवृष्टि समजली जाते,येथे तर १२ ते १८ जुलै दरम्यान अडीशसे मिलीलिटर पाऊस एका दिवसात कोसळला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक तालुक्यांमध्ये ग्रामस्थांचे व शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असून राज्य शासनाने त्वरित एक लक्ष प्रति हेक्टरी मदत शेतक-यांना करावी,अशी मागणी माजी क्रीडा मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar)यांनी आज सायंकाळी ७ वाजता प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्र परिषदेत केली.

याप्रसंगी बोलताना केदार म्हणाले,की प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये अतिवृष्टिची पाहणी करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले असून केदार यांच्या अध्यक्षतेखाली वरील सर्व समिती सदस्यांनी नागपूर जिल्ह्यातील ,कोटोल,कळमेश्‍वर,सावनेर,पारशिवनी,रामटेक,नागपूर(ग्रामीण) मधील कामठी,मौदा,कुही,भिवापूर,उमरेड,हिंगणा भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. पाहणी दौ-यात शेतक-यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आढळले.सोयाबीन,कापुस,धान,तुर,ऊस,फळबागा व भाजीपाला पार उधवस्त झाले असून, अनेक गावांमध्ये ग्रामस्थांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. आम्हाला लोकं हात धरुन घेऊन जात होते व उधवस्त झालेली शेते व घरे दाखवित होते.आज या ग्रामस्थांना व शेतक-यांना शासनाच्या मदतीची निकडीची गरज असून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तातडीने या ग्रामस्थांना घरकुलांचा लाभ देण्यात यावा,अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

अनेक लोक पुरात वाहून गेलेत,विज पडून अनेकांना अपंगत्वही आले,शेतक-यांची पाळीव जनावरे पुरात वाहून गेली त्यामुळेच मृत्यू पावलेल्या जनावरांच्या संबंधित शेतक-यांना, राज्य शासनाने तातडीने आज आर्थिक मोबदला देण्याची गरज आहे. पुरामुळे वारवांर बाधित होणा-या पाणी पुरवठा योजनेच्या विहीरी सुरक्षीत ठिकाणी घेण्यात यावा,अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेले रस्ते,मो-या व पुलांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने नव्याने बांधकाम व दुरुस्तीसाठी मंजुरी देत तातडीने निधी मंजूर करावा,अशी मागणी त्यांनी केली.

शाळा,अंगणवाडीच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी देखील ताडीने निधी उपलब्ध करुन द्यावा.जिल्हा परिषदेचा लघु सिंचन तलाव,मामा तलाव,स्थानिकस्तर विभागाच्या सर्व अधिनस्त असलेले सिंचन बंधारे,नाला खोली व सरळीकरण,शेतक-यांच्या शेतातील सिंचन विहीरी व विद्युत खांब,गावातील विद्युत खांब,नहर दुरुस्ती,कुही तालुक्यातील देवळी(खुर्द) मामा सिंचन तलाव,नागपूर(ग्रामीण)तालुक्यातील जुना पानी तसेच कामठी तालुक्यातील कवठा येथील राखेचे बांध फुटलेले असून, त्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीने अर्थ सहाय्य करण्याची मागणी करीत,संबंधीत बांधांचे दुरुस्तीकरिता देखील तातडीने विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा,अशी मागणी केदार यांनी केली.

खरिप हंगामातील झालेल्या पिकांचे नुकसान झालेल्या या शेतक-यांना आता दुबार पेरणीकरीता व रब्बी हंगामाकरिता बियाणे व खतांचा मोफत पुरवठा करण्यात यावा तसेच नागपूर जिल्ह्यात सरसकट मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली.

अनेक गावात परिस्थिती खूप विदारक आहे.पारशिवनी येथील नाहर या आदिवासी गावातील जो नाला वाहत येतो त्याने या अतिवृष्टीमुळे चक्क आपला पाट वळवून शेतातील उभी पिके लोळवली.केळवद पुढे राजबासा गावात तर नाल्यातून वाहलेल्या पूरामुळे किमान साठ ते सत्तर एकर जमीनीचाच खड्डा केला.प्रत्येक तालुक्यात गरीबांची घरे जमीनदोस्त झाली. रामटेक तालुक्यातील पवनी या गावात तर मातीची घरे जागीच बसली.

लोकांमध्ये भयंकर आक्रोश आहे.अजुनही अनेक जिल्ह्यातील घरांमध्ये पाणी शिरले आहे.जेवणाची व्यवस्था आजही उपलब्ध नव्हती.ही अतिशय दूर्देवी आपत्ती असून राज्य शासनाने सर्व कामे बाजूला सारुन पंचनाम्यांची वाट न बघता मायनस विड्रा करुन मदतीची सूचना अधिका-यांना द्यावी.

आमच्या समितीने तयार केलेला अहवाल हा प्राथमिक स्वरुपाचा असल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामीण भागात चालण्यासाठी देखील रस्ते उरलेले नाहीत.ज्याप्रमाणे करोना महामारीचा सामना सर्वांनी एकत्रित येऊन केला होता त्याचप्रमाणे या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देखील सर्वांनी एकत्रित लढा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सागितले.

आम्हाला यात चुका काढायच्या नाहीत,दोषारोपण करायचे नाही,राजकारण ही करायचं नाही.तातडीने अतिवृष्टीने उधवस्त झालेल्या ग्रामीण भागातील पाणी पुरवठा सुर करा.चार दिवस विहीरी या पाण्याखालीच होत्या त्यामुळे विहीरींमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला आहे.विजेच्या मीटरची अवस्थाही वाईट आहे.

शेतक-यांना रबीचा हंगाम सुखद करण्यासाठी सप्टेंबर पूर्वी नाले,बंधारे,रस्ते,जल संधारणे पुन्हा उभी करावी.भाेगरी गावात सिमेंटचे स्ट्रक्चर उभे करण्यात आले होते,अतिवृष्टीमुळे त्याला धक्का ही लागला नाही मात्र पाण्याच्या प्रवाहाने त्याच्या बाजूने धक्का देत, तेथून गावागावात आणि शेताशेतांमध्ये पाणी शिरले.

पुन्हा एकदा शेतक-यांच्या फळबागा पुर्नजिवित झाल्या पाहिजे.खरडून गेलेली शेती पुन्हा सुपीक झाली पाहिजे.महात्मा फुले योजनेतून शासनाने तातडीने यासाठी अनुदान द्यावे.अनेक गावात ट्रांसफॉर्मर अजूनही पाण्यातच आहे.अनेक ठिकाणी वीजेचे खांबच वाहून गेले आहेत.ही नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे नियम बाजूला ठेऊन आधी तातडीने ग्रामस्थांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

महाविकास आघाडीच्या कार्यकाळातही पश्‍चिम महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती कोसळली होती.त्यावेळी नियम बाजूला ठेऊन आधी तातडीने आपत्तीग्रस्तांना मदत देण्यात आली होती,असे त्यांनी सांगितले.

काेराडी औष्णिक केंद्राचा राख बंधारा या मुळे ग्रामस्थांवर जे संकट ओढवले ते नैसर्गिक नसून ते मानवनिर्मित असल्याची टिका याप्रसंगी केदार यांनी केली.त्यांनी राख बंधा-याच्या सुरक्षेत निष्काळजीपणा केला.या बंधा-यांला सर्पोटिंग स्ट्रेन्थ नव्हती.हा सपशेल तांत्रिक निष्काळजीपणा असल्याचे ते म्हणाले.त्यांच्या या निष्काळजीपणामुळे हजारो हेक्टर जमीन ही राखेच्या पाण्याखाली गेली.ग्रामस्थांचा जीव वाचला हे त्यांचे सुदैवच होते.ऐन वेळी सरपंचांनी गावक-यांना सावध केले अन्यथा अनर्थ घडले असते.

आता ग्रामीण भागातील नाल्यांची अधिकतम पाणी वाहून नेण्याची क्षमता संपली आहे.सप्टेंबरमध्ये पुन्हा शेतक-यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तसेच राज्य शासनाला भेटणार,आज फक्त प्राथमिक दौरा केला आहे,विधान सभेत यावर येत्या सत्रात मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाकडे फक्त दोन महिन्यांचा कालावधी असून रब्बीच्या हंगामा आधी कोलमडून पडलेला शेतकरी पुन्हा उभा करा.आम्हाला सर्वांना या नैसर्गिक आपत्तीच्या विरोधात एकतित्र लढा द्यायचा आहे.यात आम्हाला राजकारण करायचं नाही.ब्रेकिंग न्यूज किवा वृत्तपत्रांची हेड लाईन होण्यासाठी आम्ही भूमिका मांडणार नाही.शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या आपत्तीग्रस्ताला मिळावा,यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे.नैसर्गिक आपत्तीसंबंधी शासनाचा अध्यादेश आहे.राज्य आणि केंद्राचे नियम आहेत,त्या नियमां पलीकडे जाऊन मदत व्हावी,अशी भूमिका नव्या सरकारकडे मांडणार असल्याचे केदार म्हणाले.

लवकरच नागपूर शहरातही दौरा करणार असून अतिवृष्टीचा मागोवा घेऊ.ग्रामीण भागातील दौ-यात सर्व पदाधिकारी,जिल्हा परिषद तसेच ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी एकत्रितपणे दौरा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाच दिवसांपूर्वी आपत्तीग्रस्त भागांचा दौरा केला मात्र पाच दिवस उलटून देखील अद्याप आपत्तीग्रस्तांना मदत मिळाली नाही,याकडे लक्ष वेधले असता, ही चिडायची वेळ नाही,यंत्रणांनी हालचाल करावी,असे उत्तर त्यांनी दिले.

पावसाळ्या पूर्वी आपत्ती व्यवस्थापणाचे प्रशासनाचे दावे फोल ठरलेत का?यावर बोलताना, अडीचशे मिलीलिटर पाऊस एका दिवसात कोसळतोय त्यामुळे कितीही पूर्व तयारी केली तरी ती पुरेशी नसतेच त्यामुळेच झालेल्या नुकसानीला तातडीने मदत झाली पाहिजे,असे केदार उत्तरले.आम्हीच सरपंचांना सांगितले पंचनाम्याची वाट बघत बसू नका,स्वत: तहसीलदारांकडे जा आणि नोंदणी नोंदवा अशी सूचना केली असल्याचे केदार म्हणाले.

शेतक-यांचा खरीप हंगाम तर ९० टक्के संपला आहे.कापूस गेला,संत्रा बागांनाही आता मोहोर येणार नाही.भाजी पाला तर जवळ जवळ सपाट झाल आहे.हा शेकडो लोकांचा जीवन-मरणाचा विषय आहे.राख बंधारा ही सर्वस्वी मानवी चूक होती तरी देखील यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी होरपळला गेला आहे.

त्यामुळेच नैसर्गिक असो किवा मानवनिर्मित,आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवा असे आवाहन केदार यांनी राज्य शासनाला केले.

यावेळी नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक,माजी आमदार राजु पारवे,माजी आमदार विरेंद्र जगताप,वामनराव कासावार,हरी मोहोड,रविंद्र दरेकर,जिल्हा परिषद अध्यक्ष रश्‍मी बर्वे तसेच पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.

Latest बातम्या