
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घेतली भेट
आदित्य ठाकरेंनी पुन्हा समजून घेतला अजनीवनचा विषय:तब्बल दीड तास पर्यावरणवाद्यांशी चर्चा
’
मी पुन्हा येईन’दिले आश्वासन:जूनमध्ये घेणार नागपूरात पर्यावरणीय परिषद
कोराडी थर्मल पावर व पेंच येथील टायगर कॅपिटलमधील ‘गूगल डो’ च्या विषयावरही गंभभर चर्चा
‘जो पर्यावरण की बात करेगा वो ही अब नागपूर पर राज करेगा’:पर्यावरणवाद्यांची घोषणा
अडीच लाख मतांनी प्रस्थापितांना हरविण्याची ऐकू आली कुजबुज!
नागपूर,ता.२२ मे २०२३: ‘अजनीवन’हा विषय पर्यावरणवाद्यांसोबतच नागपूरकरांच्याही जिव्हाळ्याचा झाला आहे,कारण या प्रकल्पात नागपूर शहरातील अगदी मध्य भागात असलेला व नागपूरसारख्या अतिशय प्रदुषित शहराच्या श्रेणीत असणा-या शहरासाठी एकमेव उरलेला साठ हजार झाडांचा हरित पट्टा, जो नागपूरकरांसाठी फूफ्फूसाचे काम करतो अश्या अजनीवनातील तब्बल ५० ते ६० हजार डोलदार वृक्षांची कत्तल अजनी इंटर मॉडेल स्टेशन या प्रकल्पासाठी, बळी जाणार असल्याने नागपूरातील अनेक पर्यावरणवादी यांनी राजकारण्यांच्या मनमर्जीप्रमाणे शहराच्या पर्यावरणावर होणा-या क्रूरतम बलात्कारा विरोधात एकवटून,, मोठा न्यायालयीन लढा उभारला.त्याममुळे काही काळ प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आल्याचा आभास, माध्यमांमध्ये निर्माण करण्यात आला मात्र राज्यात गेल्या वर्षी जून मध्ये सत्ताबदल होताच व महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिंदे-फडणवीस यांची सत्ता येताच, मागच्या दारातून पुन्हा ‘नव्या’ नावाने जूनाच प्रकल्प तातडीने पुर्नजिवित करण्यात आला.
विशेष म्हणजे या प्रकल्पातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध बघता माघार घेतली असली तरी, यावेळी रेल्वे विभागाद्वारे जुनाच प्रकल्प नव्याने राबविण्याचा घाट घातला गेला व याचेच परिणाम म्हणजे रात्रीच्या अंधारात गेल्या काही महिन्यांपासून अजनीतील जुनी ऐतिहासिक रेल्वे क्वार्टस पाडण्यासोबतच, दोनशेच्या वर झाडे कापण्याचा सपाटा रेल्वेच्या कंत्राटदारांनी लावताच, पुन्हा एकदा ‘सेव्ह अजनी’मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली व सध्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या झाडांच्या कत्तलीवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
मात्र,आज नागपूरात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच ‘सेव्ह अजनीवन’मोहिमेतील पर्यावरणवाद्यांनी, आदित्य ठाकरे यांची हॉटेल रेडीसन ब्ल्यू येथे दुपारी अडीच वाजता भेट घेतली.तब्बल दीड तास या भेटीत पर्यावरणवाद्यांनी अजनीवनासोबतच कोराडी येथे प्रस्तावित १३२० मेगावॉट्सच्या थर्मल पॉवर प्लान्ट तसेच पेंचच्या टायगर कॅपिटल क्षेत्रातील वन संपदेमध्ये होणा-या खाणीच्या उत्खननासंबधी घालण्यात आलेला घाट इत्यादी बाबत सखोल चर्चा केली.
आदित्य ठाकरे यांनी अतिशय गांर्भीयाने पर्यावरणवाद्यांनी सादर केलेल्या संपूर्ण कागदपत्रांचे निरीक्षण केले.५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस असतो.जूनच्याच शेवटच्या आठवड्यात नागपूरातच पर्यावरणीय परिषद घेण्याचे त्यांनी आश्वासन यावेळी ‘सेव्ह अजनीवन’च्या पर्यावरणप्रेमींना दिले व ‘मी पुन्हा येईन’चा वेगळा असा पुर्नप्रत्यय पर्यावरणवाद्यांना आला, या परिषदेत पर्यावरण तज्ज्ञांसोबतच नागपूरकर सर्वसामान्य नागरिकांनी मोकळेपणाने आपापली मते मांडण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी ठेवला.
विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री असताना अजनीवनातील ५० ते ६० हजार झाडे नष्ट करणा-या या प्रकल्पाच्या विरोधात पर्यावरणवाद्यांनी त्यांची भेट घेतली असता, त्यावेळी देखील ठाकरे यांनी सकारात्मक पाऊले उचलून या प्रस्तावाला मान्यता देण्यात येणार नसल्याचे आश्वासन पर्यावरणवाद्यांना दिले होते.आदित्य ठाकरे यांनी मेट्रोसाठी आरे कारशेडची जागा घेण्यास व त्या ठिकाणी असणारी दोन हजार झाडे तोडण्याचा विरोधात मुंबईत जनआंदोलन पेटवले होते.अजनीवन येथे तर फक्त एका प्रकल्पासाठी तब्बल ६० हजारच्या जवळपास झाडांचा बळी जाणार आहे.विशेष म्हणजे राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतरण झाले व २१ जुलैच्या बैठकीत शिंदे सरकारने आरे कारशेडवरील स्थगिती उठवली,हे विशेष!
नागपूरात देखील अजनीवन बचाव मोहिमेला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन देत आंदोलन पेटवले होते.मात्र,पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा हा महत्वाचा ब्रिटीश कालीन पूल तोडून अजनी इंटर मॉडलसाठी तब्बल ४४६ एकरची जमीन संपादित करण्याचा डीपीआर गेल्या तीन वर्षात तयार झाला!यात मध्यवर्ती कारागृहासह नीरीची जागा देखील संपादित करण्याचा घाट घालण्यात आला .मात्र,अजनी इंटरमॉडल स्टेशनसाठी जगभरात फक्त ४५ एकर जागा संपादित झाली असताना व एवढ्याच जागेवर अत्याधूनिक स्टेशन निर्माण झाले असताना, नागपूरात मात्र शहरातील मध्यवर्ती व अतिशय मोक्याची अशी एकूण ४४५ एकर जाागा संपादित करण्याचा नकाशा मंजूर झाला!या विरोधात अजनीवन बचाव मोहीम तीव्र होताच व हा वाद उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पाहोचताच हा प्रकल्प रद्द करणार असल्याची घोषणा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीच केली.
महाविकासआघाडीची सरकार असताना मागील वर्षी १३ फेब्रुवरी २०२२ मध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नागपूरला आले असता अजनी बचाव कृती समितीने त्यांची भेट घेऊन नागपूर शहराच्या पर्यावरणाची, या प्रकल्पामुळे होणारी अपरिमित हानी याचा आलेख मांडला असता पर्यावरणाला जपून प्रकल्प होणार असेल तरच प्रकल्पाला मान्यतेचा सूर आदित्य ठाकरेंनी आवळला होता.
त्यांचा हाच सूर ऐकून,मागील वर्षी ३ सप्टेंबर २०२२ रोजी गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अजनी रेल्वे स्थानकावरील उड्डाण पूल आठ पदरी करण्याचा सुधारित आराखडा सादर केला.यावर १७८ कोटी अपेक्षीत खर्च दर्शविण्यात आला होता.यानंतरही अजनीवन बचाव कृती समितीतर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली व केंद्र सरकारने रेल्वे लाईनच्या आजूबाजूच्या जमीनीचा वापर करण्याची मुभा दिली असताना, अजनी रेल्वे स्टेशनच्या विकासाच्या नावाखाली आसपासची तब्बल ४४५ एकर जागेचाच डीपीआर तयार झाला!यात मध्यवर्ती कारागृहासह नीरी,मेडीकल,पाटबंधारे विभागासह अनेक शासकीय कार्यालय तसेच हेरिटेज श्रेणीत मोडणा-या रेल्वे वसाहतींचा समावेश होता.

या प्रकल्पाला २०२१ पासूनच सेव्ह अजनीवनच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला होता.हा विरोध बघता साढे बाराशे कोटींचा हा प्रकल्पच एसीसी लिमिटेड या कंत्राटदाराने गुंडाळण्याची तयारी ही केली होती.यावर नाराज होत गडकरी यांनी हा प्रकल्प हरितउर्जेचा आदर्श म्हणून विकसित केला जाणार असून,तीन लाखांवर प्रवासी त्याचा रोज लाभ घेणार असल्याचे सांगितले.अजनीवनासाठी पर्यावरणवाद्यांचा अपप्रचार,कोर्टकचेरी आणि राज्यस्तरावरील प्रशासकीय उदासिनतेमुळे प्रकल्पात अनावश्यक वेळ खर्ची झाल्याचे सांगून, आपली नाराजी उघडपणे महाविकासआघाडी सरकारच्या कार्यकाळात गडकरी यांनी व्यक्त केली होती.
परिवहन सुविधा राबविताना पर्यावरणाची हानि होणार नसल्याची ग्वाही देत,एका झाडाच्या मोबदल्यात दहा झाडे लावण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकल्पात सुबाभूळ सारख्या निरुपयोगी झाडांचीच संख्या जास्त असल्याचे सांगण्यात आले.अजनी येथील प्रस्तावित इंटर मॉडल स्टेशनमुळे बाधित होणा-या वृक्षांच्या मोबदल्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून २५ हजार वृक्ष लावण्यात येतील.पाच हजार वृक्षांचे प्रतिरोपण करण्या येईल असा देखील दावा करण्यात आला.
गेल्या तीन वर्षांपासून आयएमएसवर काम चालले होते.केंद्राकडून गडकरी यांनी १३०० कोटी रुपये आणले मात्र मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड हाेणार असल्याने हा प्रकल्प खापरीमध्ये घेऊन जाण्यात यावा,त्या ठिकाणी या प्रकल्पाची जास्त गरज असल्याचे सांगत, अभ्यासपूर्ण व संपूर्ण नकाशासह पर्यावरणवाद्यांनी पत्रकार परिषदांमध्ये सादरीकरण केले.अजनी येथील इंटर मॉडेल स्टेशन विकसित करण्यासाठी जी झाडे कमी केली जातील,त्यापेक्षा पाच पट अधिक व उभी असलेली झाडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शंकरपूर येथील वन विभागाच्या जमिनीवर लावणार असल्याचे देखील गडकरी यांनी घोषणा केली.मात्र,संपूर्ण शहरभर महामेट्रोने जे जाळे विणले व त्यासाठी ज्या हजारो झाडांचा बळी गेला,मेट्रोचा देखील झाडांच्या पुर्नप्रत्यारोपणचा दावा अयशस्वी झाला असून, मेट्रोने पुर्नप्रत्यारोपित केलेले एक ही झाड आज जिवंत नसल्याचा दावा अजनीवन बचाव कृती समितीने न्यायालयात सादर केला.
दोनशे वर्ष जुनी असणारी व नागपूरच्या मातीला व भू-जलाची पातळीला धरुन असणारी ६० हजारच्या जवळपास झाडे ही अजनी इंटर मॉडल स्टेशनसाठी भुईसपाट झाल्यास, येणा-या काळात नागपूरात पाण्यासाठी जो हाहाकार माजेल त्याची कल्पना ही करता येणार नाही,असे पर्यावरणवाद्यांचे म्हणने आहे.
अजनीवन येथील वृक्षतोडी विरोधात नागपूर सिटीझन्स फोरमच्या सदस्यांनी देखील तीव्र आक्षेप मनपाच्या उद्यान विभागाचे अधीक्षक व वृक्ष अधिका-यांकडे नोंदवला.अभिजित झा,अमित बांदूरकर,प्रतीक बैरागी,अभिजित सिंह चंदेल,वैभव शिंदे -पाटील आदी सदस्यांनी आपल्या आक्षेपामध्ये प्राणवायूच्या नैसर्गिक स्त्रोतांचे होणारे नुकसान,सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे,मनपाने झाडांच्या संख्येविषयी सविस्तर माहिती लपवणे,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची सातत्याने लपवाछपवीची भूमिका व वृक्षारोपण व वृक्ष प्रत्यारोपणासंदर्भातील पूर्व इतिहास,पर्यावरणीय मूल्यांकन न होणे,वृक्षांच्या ५६ प्रजाती व पक्ष्यांंचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणे,अशा विविध मुद्दांवर प्रश्न उपस्थित केले होते.
मूळात ‘पुनर्नवा‘ संस्थेच्या सर्वेक्षणात अजनीवन येथील विकासकामांसाठी होणा-या वृक्षतोडीमध्ये सुमारे ६० देशी प्रजातींची झाडे तोडली जाणार असून या ६० प्रजाती तर कायमच्या नष्ट होतीलच मात्र त्याशिवाय अनेक वर्षे जुनी आणि स्थानिक हवामानाशी निगडित वृक्ष संपदा तोडून विदेशी प्रजातींची झाडे लावण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला.पुनर्नवा संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात अजनीवनच्या समृद्ध जैवविविधतेबद्दल सखोल माहिती समोर आली.या प्रकल्पात बळी जाणारी हजारो वृक्षे ही अनेक वर्षांपासून धूळ,आवाज आणि कार्बडायऑक्साईडमुळे होणारे प्रदुषण थांबविण्यात मदत करीत आहेत.अजनीवन परिसरात सापडणा-या ६० प्रजातींपैकी ४१ प्रजाती या पूर्णपणे स्थानिक आहेत.यामध्ये शिरीष,कडूलिंब,,पिंपळ,शिसवी,आंबा,चिंच,रिठा,बाभूळ,जंगली बदाम,काशिद,उंबर,आवळा,काटेसावरी,पारिजातक शेवगा,बिहाडा नीलगिरी,करंज,सप्तपर्णी आदी अनेक प्रजातींचा समावेश आहे,असे या सर्वेक्षणात नमूद आहे.संपूर्ण वाढीच्या या झाडांचे आच्छादनही तयार झाले आहे.असे असताना त्यांचा समूळ नाश करुन त्यांच्या ठिकाणी विदेशी प्रजातींच्या वृक्षांचे रोपण याला देखील पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. नागपूर महानगरपालिकेतर्फे गेल्या दहा वर्षांपासून वृक्ष गणनाच झाली नसून या प्रकल्पासाठी नेमक्या किती हजार झाडांचा बळी जाणार याबाबत राजकीय दबावात लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप करीत, हा देखील मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्यात आला.
विशेष म्हणजे गडकरी यांनी नुकतेच गेल्याच महिन्यात १५ एप्रिल २०२३ रोजी अजनी येथील दुहेरी सहापदरी केबल स्टेड उड्डाणपूलासह सहा पुलांचे भूमिपूजन आणि तितक्याच पुलांच्या लोकापर्ण सोहळ्यात मध्यवर्ती कारागृहाची जागा द्या,आम्ही जागतिक दर्जाचे मार्केट उभारु,अशी घोषणा केली होती,यावर देखील पर्यावरणवाद्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत,मध्यवर्ती कारागृह हे कामठी येथील शंभर एकर जागेवर स्थलांतरित करण्याचा घाट रचला जात असून,कारागृहाच्या जागेवरील हजारो झाडे नष्ट करुन नागपूरचे खासदार काय बांधणार?तर अत्याधूनिक मार्केट,पंचतारांकित हॉटेल्स,बस डेपो,विरुंगळा केंद्र,पार्किंग,यासाठी केंद्रिय रस्ते निधीतून १२०० कोटी मंजूर झाले असल्याचेही गडकरी सांगतात.एकीकडे शहरातील मॉल्स ओस पडत चालली आहेत,हॉटेल व्यवसायही तोट्यात सुरु आहे,करोनाने संपूर्ण जगासह नागपूर शहराला देखील हादरवून सोडले आहे.लाखो लोकांचे रोजगार बुडाले आहेत,ज्या रेल्वे स्थानकाच्या विकासाचा अट्टहास भविष्यातील वाहतूकीचा विचार करुन लादला जात आहे ,करोना काळात मे २०२१ मध्ये नागपूर शहराची ऑक्सीजनची गरज पूर्ण करण्यासाठी ओडिशामधून हवाई मार्गाने टँकर पाठवून रेल्वेने नागपूरात आणले जात होते,याचा विसर गडकरी यांना कसा पडला?असा प्रश्न पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला.
करोना काळात कोविड रुग्णांना प्राणवायूच्या पुरवठ्याचे आदेश पुढाकार घेऊन गडकरी यांनीच दिले होते.त्यामुळेच एवढी मोठी जागतिक त्रासदी भोगल्यानंतर अजनीवनसारख्या प्रकल्पा ऐवजी गोरगरीबांसाठी अत्याधूनिक रुग्णालये उभारण्या ऐवजी किवा ज्या मेडीकलच्या मर्यादित वार्डात शेकडो डॉक्टरांनी हजारो रुग्णांचा करोना काळात जीव वाचवला त्या मेडीकल रुग्णालयाचीच मर्यादा वाढविण्या ऐवजी अजनीवन प्रकल्पासाठी मेडीकलचीच जागा घेण्याचा सूचना गडकरी यांनी देणे म्हणजे अत्यंत दूर्देवी असल्याची खंत पर्यावरणवादी व्यक्त करतात.
आज आदित्य ठाकरे यांच्याजवळ अजनीवन या शिवाय कोराडी येथे येऊ घातलेल्या १३२० मेगावॉट्स यूनिटच्या प्रकल्पाविषयी देखील सविस्तर माहिती लीना बुधे यांनी दिली.आधीच २००० व २५०० मेगावॉट्सच्या वीज निर्मितीनंतर निर्माण झालेल्या दहा लाख टन राखेच्या प्रश्नानी कोराडी परिसरातील शेतकरी हा उधवस्त झाला असताना व कोराडी येथील औष्णिक उर्जेच्या प्रदुषणाने आता नागपूर शहराला देखील कवेत घेतले असताना १३२० मेगावॉट्सचा प्रकल्प सुरु करने हा नागपूरसह विदर्भालाच कर्करोगाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवणारा असल्याचे त्यांनी सांगितले. जुलै महिन्यात खापरखेडा येथील औष्णिक वीज प्रकल्पातील साठवण्यात आलेल्या राखेचा तलाव फूटल्याने जी भयंकर परिस्थती शेकडो शेतक-यांवर उद् भवली व हजारो हेक्टर शेती कशी राखेखाली बुडाली,याचे सविस्तर दस्तावेज लीना बुधे यांनी आदित्य ठाकरेंना दाखवले.
याशिवाय पेंच येथे प्रस्तावित ‘गुगल डो’प्रकल्पाची देखील माहिती आदित्य ठाकरे यांना देण्यात आली.हा परिसर टायगर कॅपिटल म्हणून विख्यात असताना या ठिकाणी उत्खननासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.यामुळे नागपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पेंच नदीच नव्हे तर संपूर्ण वन संपदाच या उत्खननातून नष्ट होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंना देण्यात आली.विशेष म्हणजे या खाणीत शिंदे गटातील एका वैदर्भिय खासदाराच्या मूलाचीच भागीदारी असल्याचे देखील बोलले जात आहे!
आदित्य ठाकरेंनी अतिशय गांर्भीयाने पर्यावरणवाद्यांचे हे सगळे विषय समजून घेतले व येत्या अधिवेशनात या सर्व मुद्दांना विधान सभेत उपस्थित करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.हे सर्व मुद्दे मला व्हाॅट्स ॲपवर पाठवा,अशी सूचना देखील आदित्य ठाकरे यांनी दिली.
याप्रसंगी श्रीकांत देशपांडे या पर्यावरणप्रेमीच्या डोळ्यात अश्रू तरळले,तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्यांना धीर दिला.नागपूर व विदर्भाच्या पर्यावरण रक्षणाची ते निश्चित काळजी वाहतील,असे आश्वासन त्यांनी दिले.
‘सत्ताधीश‘ने खास पर्यावरणवाद्यांना या विषयी बोलते केले असता,२०२४ मध्ये राजकीय दिशा नेमकी कुठे जातेय?असा प्रश्न केला असता,२०२४ मध्ये जो पक्ष पर्यावरणाचा विषय आपल्या अजेंडावर प्रामुख्याने घेईल त्या पक्षासोबत आम्ही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमचा विरोध विकासाला नसून विनाशाला आहे.आम्हाला नागपूरच्या तापमानाचा विचार करने क्रमप्राप्त आहे.आधीच सिमेंट रोड व तलावांची झालेली अपरिमित हानि यामुळे नागपूर शहराचे जे तापमान वाढले आहे,त्यात अश्या वृक्षांच्या बळींमुळे आणखी भरच पडणार आहे,पर्यावरणाला कोणतीही हानि न पोहोचवता शाश्वत विकासाचे प्रकल्प आणले तर त्याचे आम्ही स्वागतच करु,मात्र पर्यावरणाला नुकसान करणा-यांना आम्हा तरुणांची मते मिळणार नाही,असे ते सांगतात.
दुस-या शब्दात,आता अति झालं,२०२४ मध्ये ‘जो पर्यावरण की बात करेगा वो ही नागपूर पर राज करेगा‘असा आमचा नारा असून एकीकडे सी-२० च्या समारोपीय परिषदेत गडकरी हे नैतिकता,अर्थव्यवस्था व पर्यावरण हे समाजाचे तीन स्तंभ असल्याचे सांगतात,दूसरीकडे मात्र नागपूर शहरात असे प्रकल्प आणत आहेत ज्यामुळे शहरातील तलाव असो किवा हरित पट्टे,समूळ नष्ट केली जात आहेत.ज्याप्रमाणे दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण घातक पातळीवर पोहोचतं व तेथील न्यायालयालाच लॉकडाऊनची सूचना करावी लागते,नागपूरचा श्वास आम्ही असा घूसमटू देणार नाही.त्यासाठी प्रदीर्घ अशी न्यायालयीन लढाई लढण्याचा आमचा निर्धार पक्का आहे,असेही ते सांगतात.
विशेष म्हणजे यावेळी अडीच लाखांच्या फरकाने प्रस्थापितांना हरवायचे,असा देखील सूर कानात नकळत ऐकू आला!
शिष्टमंडळात लीना बुधे,अनुसूया काळे-छाबराणी,शुभांगी पडोळे,शरद पालीवाल,श्रीकांत देशपांडे,जयदीप दास,प्राची,संदीप पथे,कुणाल मोर्यरोहन आरस्पुरे,ॲड.स्मिता सिंगलकर आदींचा सहभाग होता.
आदित्य ठाकरे यांनी आज कोराडी तसेच पारशिवनी भागाचा देखील दौरा केला.याप्रसंगी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे देखील होते.
…………………………………………………………….

आमचे चॅनल subscribe करा