Homeनागपूर न्यूजअचलपूर,अमरावती दंगलीमागील सत्य शोधण्यासाठी मैत्री परिवाराची 'सत्यशोधन' समिती

अचलपूर,अमरावती दंगलीमागील सत्य शोधण्यासाठी मैत्री परिवाराची ‘सत्यशोधन’ समिती

Advertisements

संजय भेंडे यांची पत्र परिषदेत माहिती:अहवालाचा उपयोग सरकार व पोलिस प्रशासनाला:भेंडे यांचा दावा

नागपूर,ता.३० एप्रिल २०२२: अमरावतीत नोव्हेंबर महिन्यात १२ व १३ तारखेला जातीय दंगली उसळल्या त्याच धर्तीवर नुकतेच १७ एप्रिल रोजी अचलपूरमध्ये दंगल उफाळून आली.काल परवा जालन्यासारख्या शहरात काँग्रेसशासित राजस्थानमधून आणन्यात आलेला मोठा शस्त्रसाठा सापडला.जवळपास ६० तलवारी शस्त्रसाठ्यात सापडल्या. नुकतेच नांदेडमध्ये देखील असाच शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला.हा शस्त्रसाठा कोणी व कुठल्या हेतूने राजस्थानमधून महाराष्ट्रात आणला?हे अद्याप महाराष्ट्र पोलिसांनी स्पष्ट केले नाही.अमरावती व अचलपूर येथे झालेल्या जातीय दंगलीची संपूर्ण पार्श्वभूमी व दंगलीमागील सत्य, मैत्री परिवाराच्या सत्यशोधन समितीतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती आज शनिवार दि.३० एप्रिल रोजी प्रेस क्लब येथे मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्र परिषदेत दिली.

याप्रसंगी भेंडे म्हणाले,की १२ नोव्हेंबर २०२१ रोजी अमरावतीला रझा अकादमीने मोर्चा काढला.या मोर्च्यात ४० हजार लोक जमा झाले.हा मोर्चा एकाएकी हिंसक झाला आणि मोर्चेक-यांनी दगडफेक,लृटपाट आणि हिंसा घडवून आणली.अनेक निरपराध नागरिकांच्या रोजी-रोटीची दूकाने जाळण्यात व लृटण्यात आली.या हिंसेची प्रतिक्रिया १३ नोव्हेंबर रोजी अमरावतीत उमटली.तिलाही हिंसक वळण लागले.या दंगलीनंतर महाविकासआघाडी सरकारने दोन्ही बाजूने अटकसत्र चालवले.ही दंगल पूर्वनियोजित होती का?अमरावती हेच दंगलीचे केंद्र कसे?दंगलखोरांच्या पाठीशी नेमके कोण होते?याच दंगलीची ‘पुनरावृत्ती‘अचलपुरात का घडली?अमरावती असो किवा अचलपुर दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव एकाएकी एकत्र कसा येतो?अशा असंख्य बाबींची उकल ही सत्यशोधन समिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अचलपुरातील दंगल ही अतिशय क्षुल्लक कारणावरुन झाली.तेथील ऐतिहासिक परकोटांवर नेहमीच वेगवेगळ्या सण-उत्सवानिमित्त वेगवेगळे जाती,धर्म,समुदायातील लोक आपापला झेंडा लावतात.यावेळी हनुमान जयंतीनिमित्त भगवा झेंडा लावल्याने दंगल उसळली.तो झेंडा काढून पायदळी तुडविण्यात आला.हिंदू-मुस्लिम जातीय तनाव निर्माण होण्याचे नेमके कारण काय आहे?या मागे राष्ट्रविघातक शक्तींचा हात आहे का?या सारख्या ज्वलंत प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी मैत्री परिवार संस्थेने एका सत्यशोधन समितीचे गठन केले असून समितीत पत्रकार,न्यायव्यवस्था,पोलिस खाते,सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रात कार्याचा मोठा अनुभव असलेल्या तटस्थ सदस्यांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ही समिती २,३ व ४ मे रोजी अचलपूर व अमरावतीचा दौरा करणार असून या घटनांमागील ‘सत्य’उजागर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

सत्यशोधन समितीचा निष्कर्ष अहवाल, सरकार तसेच पोलिस यंत्रणेला देखील उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.समाजात सामाजिक सोहार्द सुदृढ रहावा हा या मागचा प्रामाणिक हेतू असल्याचे सांगून, अमरावती व अचलपुरमध्ये कोणाला काही महत्वपूर्ण माहिती,या समितीसमोर ठेवायची असल्यास त्यांनी निर्भयपणे समितीसोबत संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

या समितीमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत उदय निरगुडकर हे अध्यक्षस्थानी राहणार असून निवृत्त न्यायाधीश मिरा खडक्कार,सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी अनिल बोबडे,वरिष्ठ पत्रकार गजानन जानभोर,अमरावतीचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.प्रदीप महल्ले,अमरावती येथील एका दैनिकाचे संपादक विलास मराठे तसेच नागपूरातील सुप्रसिद्ध पत्रकार प्रविण मुधोळकर सदस्य म्हणून सत्यशोधन करणार आहेत,अशी माहिती त्यांनी दिली.

एका प्रश्‍नाच्या उत्तरात ,अचलपुर येथील दंगलीत पोलिसांनी अनेकांना अटक केली,मध्यरात्री दोन,अडीच वाजता सर्वसाधारण नागरिकांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली,तरुणाईला ताब्यात घेतले त्यांना तुडवत मारत पोलिस ठाण्यात आणले.ही सर्व १८,१९,२० वर्षांची मुले आहेत.त्यांच्यावर पहील्या दिवशी दंगलीत सहभागी असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला मात्र दोनच दिवसांनी त्यांना जामीन मिळू नये याकरिता इतर गंभीर कलमा लावण्यात आल्या.ऐतिहासिक परकोटावर आतापर्यंत वेगवेगळे समुदायाचे झेंडे लागत होते,हा प्रघात तिथे कायम होता मात्र हनुमान जयंतीच्या दिवशी दंगल उसळली,३५३ ची कलम देखील या कोवळ्या तरुणांवर लावण्यात आली असल्याचे भेंडे यांनी सांगितले.अचानक पोलिसांना तो परकोट ऐतिहासिक व हॅरिटेज असल्याचे आठवले!अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

एका प्रश्‍नावर बोलताना पुण्यात आपल्या मुलीच्या शैक्ष णिक प्रवेश प्रक्रियेसाठी गेलेल्या अभय माथणे या तरुणाला पुण्यावरुन अटक करुन अचलपुरला आणण्यात आले.खासगी कारमध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबाला अचलपूरच्या वेशीपर्यंत आणण्यात आले,अचलपुर येताच पोलिसांच्या गाडीत बसवून माथणे यांना घेऊन जाण्यात आले,यावेळी त्यांची पत्नी व मुलगी ज्यांना वाहन चालविता येत नाही,एकटे सोडून देण्यात आले,माथणे हे अद्याप पोलिसांच्या कस्टडीमध्ये असल्याची माहिती भेंडे यांनी दिली.

अशी सत्यशोधन समिती स्थापन करण्याचा खासगी संस्थेला हक्क आहे का?सरकार यावर बंदी घालू शकते का?या प्रश्‍नावर बोलताना कोणत्याही कायद्याने सरकार समितीला थांबवू शकत नसल्याचे ते म्हणाले.समजा सरकारने समितीचे काम थांबवले तर आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा त्यांनी दिला.समाजातील सामाजिक सोहार्द टिकून राहण्यासाठी समिती काम करणार असल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली.गेल्या वर्षी १२ व १३ नोव्हेंबर रोजी दंगली घडल्या आज ३० एप्रिल आली मात्र सरकारने अद्याप दंगलीमागील कारणमिमांसा शोधली नाही अशी टिका त्यांनी याप्रसंगी केली.

भीमा कोरेगावमध्ये देखील दंगल घडली होती ,त्या दंगलीतील सत्य शोधण्यासाठी अश्‍या स्वरुपाची समिती का स्थापन करण्यात आली नाही?या प्रश्‍नावर बोलताना त्या घटनेवर देखील अशीच समिती स्थापित झाली आहे.सामाजिक संस्थांनीच पुढे होऊन भीमा कोरेगावला भेटी दिल्या.अश्‍या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच समितीचा अभ्यास उपयोगी पडत असल्याचे सांगून अश्‍या सत्यशोधन समितीमुळेच त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यास यश मिळाले,असे ते म्हणाले.

तुमच्या समितीत मुस्लिम समुदायाचा एक ही सदस्य का नाही?या प्रश्‍नावर बोलताना, आमच्या संस्थेला तशी गरज वाटली नाही,समितीच्या कार्यकक्षेच्याही काही मर्यादा असतात,असे उत्तर त्यांनी दिले.

पत्र परिषदेत मैत्री परिवाराचे प्रमोद पेंडके व इतर सदस्य उपस्थित होते.

Latest बातम्या