शाेभायात्रेत पोलिस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांची दडपशाही:तात्काळ निलंबन करा
प्रांतमंत्री अमोल ठाकरे यांची मागणी
विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाजासोबत:ठाकरे यांचा सरकारलाही इशारा
नागपूर,ता.८ सप्टेंबर २०२६: गेल्या चाळीस वर्षांपासून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची कृष्ण जन्माष्टमीची शोभायात्रा वर्धा रोड येथील गोरक्षण मंदिरातून निघत आहे.हाच विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस देखील आहे.मात्र,आजपर्यंत कोणत्याही पोलिस ठाण्यातील कोणत्याही पोलिस अधिका-यांना शोभायात्रेतील वाहन-रथांना नोटीस देण्याची गरज वाटली नाही.प्रथमच बर्डी पोलिस ठाण्याच्या उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांनी जुन्या शत्रूत्व भावनेतून रविवारी निघालेल्या भव्य शोभा यात्रेला नुसते अडवूनच ठेवले नाही तर शोभायात्रे पूर्वीच प्रत्येक वाहन रथाच्या संचालकांना नोटीसी दिल्या. पोलिसांची ही दडपशाही खपवून घेणार नसल्याचा इशारा आज पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री अमोल ठाकरे यांनी दिला.
ही शोभायात्रा धंतोली,सीताबर्डी व गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जात असते.धंतोली व गणेशपेठ पोलिसांनी आमच्या ६०-६५ वाहन रथांवर कोणताही आक्षेप घेतला नाही मात्र,सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांनी मुद्दामून बर्डीवरील मजिदी समोर रथयात्रा अडवली.स्वत:च्या मोबाईलने रथ वाहनावरील डीजेचे डेसिबल मोजले व वाहनाची किल्ली काढून घेतली.आवाजाचे डेसिबल यंत्राने मोजावे,सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणताही पोलिस अधिकारी वैयक्तिक मोबाईलने वाहनांवर कारवाई करु शकत नाही.असे असतानाही अन्नपूर्णा सिंग यांनी नियमांचे उल्लंघन करुन, बर्डीसारख्या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी रथयात्रा अडवून ठेवली.कार्यकर्त्यांसोबत धक्काबुक्की केली व बघून घेण्याची धमकी दिली,असा आरोप पत्रकार परिषदेत अमोल ठाकरे यांनी केला.
अन्नपूर्णा सिंग या जेव्हा परिमंडळ-५ च्या उपायुक्त होत्या त्यावेळी ईद झाल्यानंतर त्या परिसरात गोंवशाची हाडे मोठ्या प्रमाणात सापडली होती.विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने यावर दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आंदोलन केले मात्र,अन्नपूर्णा सिंग यांनी दोषींवर कोणतीही कारवाई केली नाही.यानंतर आमचे आंदोलन तीव्र झाल्याने त्यांची बदली परिमंडळ-२ मध्ये करण्यात आली.याच गोष्टीचा राग त्यांच्या मनात होता व आमची शोभायात्रा निघणार असल्याने, पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून त्यांनी शोभा यात्रा सुरु होण्या पूर्वीच सर्व वाहन रथ चालकांना नोटीसी पाठवल्या,असे ठाकरे यांनी सांगितले.
गेल्या चाळीस वर्षात हे पहिल्यांदाज घडले की शोभा यात्रा सुरु होण्या पूर्वीच वाहन रथाच्या संचालकांना नोटीस पाठवून सामाजिक सोहार्द् बिघडवल्यास कारवाई करण्याचा इशारा नोटीसीत देण्यात आला.सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षीय वाहन रथालाही अशी नोटीस पाठवण्यात आली.या वाहन रथावर भारतमातेची झांकी होती.संघाची स्थापना ज्या नागपूरात झाली त्याच शहरात संघाच्याच शताब्दी वर्षीय वाहन रथाला पोलिस उपायुक्त नोटीस बजावतात,ही अतिशय निंदनीय बाब असून,जो संघ जगभरात आपल्या देशप्रेम,समता,बंधूभावसाठी ओळखल्या जातो त्याच संघटनेच्या वाहन रथाला नोटीस देण्याची बाब अत्यंत शरमेची असल्याचे ठाकरे म्हणाले.
ही संपूर्ण कृती अन्नपूर्णा सिंग यांनी सूडाच्या भावनेतून केली असल्याचा अारोप करीत,नुकतीच नागपूरात ठिकठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम झाला,त्या कार्यक्रमात काही सत्ताधारी आमदारांनी डीजेच्या मर्यादा ओलांडल्या,लेझर लाईट्सचाही मोठ्या प्रमाणात वापर केला,त्यांच्यावर पोलिसांनी काय कारवाई केली?ते सत्ताधारी आहेत म्हणून पोलिसांची हिंमत झाली नाही का?असा सवाल त्यांनी केला.
मूळात,ईद झाल्यानंतर हिंदूंचे सण तोंडावर आल्यानंतरच डीजे बंदीचे फर्मान का?असा सवाल त्यांनी केला.१ जानेवरीपासून सगळ्या धर्माच्या सगळ्या सणांमधील डीजे बंदीचे आम्ही स्वागत करतो,असे ठाकरे म्हणाले.ईदच्या संदलमध्ये औरंगजेब,टिपू सुल्तानविषयीचे नारे पोलिसांना ऐकू आले नाहीत का?नेमके विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेतील वाहन रथांना सामाजिक सलोखा बिघडवल्यास कठोर कारवाईची नोटीस पाठविण्या मागे काय औचित्य होते?असा सवाल ठाकरेंनी केला.
न्यायालयाने दिलेले डीजेच्या आवाजा बद्दलचे निर्देश हे देखील आम्ही मान्य करतो.मात्र,हिंदूंच्या सणासुदीच्या काळातील बंदी योग्य नसून या मुद्दावर विश्व हिंदू परिषद हिंदूंसोबत असल्याचे ते म्हणाले.
आमची मागणी सरकारला मान्य करावीच लागेल.अन्नपूर्णा सिंग यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,शोभा यात्रेतील वाहन रथाच्या चालकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे अशी मागणी करत,आम्ही लवकरच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देखील निवेदन देणार असल्याचे ठाकरे म्हणाले.अन्यथा विश्व हिंदू परिषद तीव्र आंदोलन सुरु करेल असा इशारा देखील त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ.हेमंत जांभेकर,प्रांत मंत्री प्रशांत तितरे,प्रांत प्रचार प्रमुख निरंजन रिसालदार,महानगर महामंत्री राजू पवनारकर,नीलकांत गुप्ता,बजरंग दल नागपूर महानगर संयोजक शुभम अरखेल आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ.हेमंत जांभेकर,प्रांत मंत्री प्रशांत तितरे,प्रांत प्रचार प्रमुख निरंजन रिसालदार,महानगर महामंत्री राजू पवनारकर,नीलकांत गुप्ता,बजरंग दल नागपूर महानगर संयोजक शुभम अरखेल आदी उपस्थित होते.
(बातमीशी संबधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
……………………………………