आषाढी वारीवरुन बापटांच्या ‘वाचाळ जल्पाक’वरुन नागपूरात संती गणेश मंडळ संयोजक संजय चिंचोलेंची तीव्र नाराजी
बापटांची मानसिकता ‘जिहादी!’हिंदू धर्मियांची मागावी माफी:चिंचोले यांची मागणी
नागपूर,ता.८ सप्टेंबर २०२६: पुण्यातील डीजे फेम विद्यानंद बापट सध्या सर्वच वृत्तपत्रांच्या प्रमुख मथळ्यांसह, विविध वृत्त वाहिन्या व समाज माध्यमांवर ‘छाये हूये है’.दहीहंडीसह गणेशोत्सवात डीजेचा कर्णककर्श आवाजाच्या विरोधात बापट सर्वच माध्यम क्षेत्रात बौद्धिक लढाई लढत आहेत मात्र,त्यांची ही बौद्धिक व तार्किक लढाई बघता-बघता आता हिंदूंचे सण व हिंदू धर्म व पंरपरेवर घसरल्याने नागपूरातील संती गणेश मंडळाचे संयोजक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय चिंचोले यांनी बापटांना मर्यादेत राहण्याचा इशारा दिला असून ,हिंदू धर्मावर व हिंदू सण-पंरपरेवर बोलणे बापटांनी न सोडल्यास,कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
(छायाचित्र : संजय चिंचोले)
पुणे महानगरपालिकेच्या बैठकीत विद्यानंद बापटांनी डीजे व ध्वनि प्रदुषण,नागरिकांना होणारा त्रास,वाहतूक कोंडी इत्यादी मुद्दांवर बोलण्यास सुरवात केली.यानंतर त्यांना भर बैठकीतून बाहेर काढण्यात आले.या कृतीचा उलट बापटांना फायदाच झाला,ते प्रसिद्धीच्या झोतात आले.त्यांनी विविध माध्यमांना प्रतिक्रिया देताना हा मुद्दा रेटून धरला.त्यांचा हा मुद्दा योग्य असून केवळ पुणेकरच नव्हे तर नागपूरकरातील विविध गणेश मंडळांनी देखील तो मान्य केला मात्र,आता बापटांनी चक्क आषाढी,कार्तिकी एकादशींच्या शेकडो वर्षांची परंपरा असणा-या पंढरपूरची वारी यांनाच लक्ष करुन आपले नास्तिक ,बौद्धिक ज्ञान पाजळले जे मुळीच समर्थनीय नाही,असे चिंचोले यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या भक्ती, संतपरंपरा आणि वारकरी संप्रदायाची अत्यंत महत्त्वाची धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आहे. दरवर्षी लाखो वारकरी संतांच्या पालख्या घेऊन पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे पायी प्रवास करतात.
बॅण्ड बाजे नको,ढोल ताशे नको,सार्वजनिक रस्त्यांवरुन एक ही हिंदूंचा धार्मिक सण साजरा होऊ नये,हे त्यांचे म्हणने अतिरेकी असल्याचे चिंचोले सांगतात.गणेशोत्सव हा वर्षातून फक्त दहा दिवसांसाठी साजरा होणारा सण असून हिंदूंच्या आस्थेचा तो ‘मूळारंभ’ आहे.हजारो लाेकांना रोजगार देणा-या आणि हिंदू धर्मियांमध्ये उत्साह,श्रद्धा व चैतन्य फूंकणा-या गणेशोत्सवासाठी बापट यांचे विचार अतिशय निंदनीय व तितकेच नास्तिक असल्याची जहाल टिका चिंचोले करतात.
लाखो भक्त गणेशोत्सवाची वर्षभर आतुरतेने वाट बघतात. या उत्सवातून समाज प्रबोधन होतं.सामाजिक समरसता साधली जाते.कथाकथन होतं,लहान मुलांचे शिबिर,भागवत,वाद विवाद स्पर्धा होतात. गणेशोत्सव म्हणजे केवळ डीजे नाही तर भविष्यातील सत्वशील नागरिक या उत्सवातून निर्माण होतात.हा उत्सव केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरातील अनेक देशात साजरा होतो.मूळात डीजेची सुरवात पुण्यातूनच झाली.तिथून ते वेड उपराजधानीत झिरपले.गणेशोत्सवात वाद्यांचा गजर,बॅण्ड,ढोल-ताशे याची सुरवात पुण्यात झाली आहे.आता नागपूरात अनेक ढोल-ताश्यांचे पथक वर्षभर सराव करुन गणेशोत्सवाची,शिवजंयतीची वाट पाहत असतात.याशिवाय चाळीसगांव,मंगलदीप,समर्थ इत्यादी अनेक लोकप्रिय व नावाजलेले बॅण्ड पथक यांनी बापटांच्या घरा पुढे जाऊन वाजवावे का?बापट त्यांना रोजी-रोटी देणार आहे का?असा सवाल चिंचोले करतात.
बापट तर छत्रपती शिवजंयतीवर देखील भरभरुन बोलू लागलेत.हिंदवी स्वराज्याचा जन्मच ज्या छत्रपतींमुळे झाला,त्यांची जयंती महाराष्ट्रात साजरी होणार नाही तर कुठे होणार?याचे उत्तर वाचाळवीर बापट देणार का?पूर्वीचा काळ आता राहीला आहे का?पूर्वी लग्न समारंभ लहानश्या देवळातही होत असे.आजच्या काळात लग्न समारंभाला इव्हेंटचे स्वरुप प्राप्त झाले आहे.बापटांना पुन्हा लोकांना अठराव्या शतकात घेऊन जायचे आहे का?बापट हे प्रत्येक विरोधाला इंग्रजी पुस्तकातील उता-यांचा आधार देतात,त्यांन महाराष्ट्रातील संतांचे विचार माहिती नाहीत का?संताच्या वचनातून बापटांना काहीच बोध घ्यावासा वाटत नाही का?
भारत हा देशच उत्सवप्रिय देश आहे.२६ जानेवरी,१५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणानिमित्त विदेशी पाहूणे समारंभाला हजर असतात.बापट ते देखील रोखणार का?असा बोचरा सवाल चिंचोले करतात. ध्वनि प्रदुषणाचा मुद्दा घेऊन इंडिया गेटवरील तोफांची सलामी रोखणार की लढाऊ विमानांची प्रात्यक्ष्के रोखणार?
१४४ वर्षांनंतर महाकुंभचा योग जुळून अाला,प्रयागराजमध्ये ६० कोटी भाविकांनी स्नान केले.हा शासकीय आकडा आहे.हे ६० कोटी भाविक मूर्ख आहेत का?बापट एकमेव शहाणे आहेत का?वसंत पंचमीला शेगांवची वारी करणारे लाखो भाविक हे मूर्ख आणि बापट एकमेव अतिशहाणे,असे होऊ शकत नाही.बापटांनी डीजे विषयी बोलावे,हिंदू धर्म-परंपरांवर घसरु नये.या देशातील ९९.९९ टक्के हिंदू हा अास्तिक आहे.मूळात पुण्यात गणेश विसर्जनाला लाखो भाविक आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी तीन-तीन दिवस हातात जेवणाचा डबा घेऊन रस्त्यावर असतात.बापट या श्रद्धेला व भक्तीभावाला कोणत्या इंग्रजी पुस्तकांतील संदर्भ देणार?गणेशोत्सव हा पुणे,मुंबई व नागपूरात प्रमुख सण झाला असून नागपूरात जवळपास १३०० गणेश मंडळ या उत्सवासाठी पुढाकार घेतात,गणेशोत्सव वगैरे पूर्णपणे बंद करावे असा सल्ला देणा-या बापटांनी आपली बुद्धी त्या विघ्नहर्ताच्या चरणी अर्पित करावी,असा सल्ला देखील संजय चिंचोले बापटांना देतात.
सर्व शहरातून हा वारी मार्ग हद्दपार करुन बाह्य वळण सहा पदरी मार्गाने(िरंग रोड)या वारी काढाव्या,असा सल्ला देणारे बापट कोण होतात?शतकांची परंपरा दीडशहाणे बापट काही शब्दांच्या बुडबुड्यांनी संपवणार का?पुण्यातील दगडू शेठ गणपतीचा उत्सव पुण्या बाहेर साजरा ोणार का किंवा नागपूरच्या टेकडी गणपतीचा उत्सव गिट्टी खदान मध्ये साजरा होऊ शकतो का?यावर कहर म्हणजे,तबला पेटी ढोलक घेऊन बाल गंधर्व सभागृहात उत्सव साजरा करण्याचा अनाहूत सल्ला देणा-या बापटांनी सांगावे,ढोल-ताशे सभागृहात वाजवू शकतो का?असा सवाल चिंचोले करतात.
बापटांना केवळ पुण्यातील काही माध्यमकर्मी व काही हजार पुणेकरांचा पाठींबा आहे.५० लाख पुणेकर हे बापटांच्या हिंदू धर्म विध्वंसक’ विचारांचे समर्थक नाहीत.लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाला १३२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे.एखादा बापट ही लोकचळवळ झालेली पंरपरा कायमची बंद करु शकत नाही.मूळात गणेश मंडळांना हा उत्सव उभा करण्या मागे किती परिश्रम खर्ची पाडावे लागतात,याचा अंदाजही बापटांना येऊ शकत नाही.सर्व मंडळांना अनेक परवानग्या घ्यावा लागतात.पोलिस विभाग,अग्निशमन विभाग,मनपा प्रशासन,वाहतूक विभाग,यातही मनपाला जागेचे भाडे देखील भरावे लागतात.याशिवाय देखावे,नेपथ्य,मूर्ती,सजावट,मंच,रोषणाई,ध्वनिक्षेपक,संगीत,गणेशाचे आगमन-विसर्जनातील शेकडो आकर्षक वाहने,इत्यादीतून हजारो रोजगार उभे राहतात.गणेशोत्सव म्हणजे फक्त डीजे नाही,असे चिंचोले सांगतात.इतकंच नव्हे तर करोनाच्या त्रासदीत संती गणेशमंडळाने वीस लाखांपर्यंतची मोलाची मदत गरजूंना केली होती.यावरुन गणेश मंडळांची सामाजिक बांधिलकी देखील दिसून पडते,असे चिंचोले म्हणाले.
डीजेच्या ५०-५५ डेसिबलपर्यंतच्या आवाजाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने देखील दिली आहे.त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना न्यायालय व शासन,प्रशासनाच्या नियमानुसार उत्सव साजरे करण्याची मुभा आहे आम्ही नियमात राहूनच उत्सव साजरे करु,मात्र,हिंदूंच्या सर्वच सण-पंरपरेविषयी बापटांनी आता पोपटपंची बंद करावी अन्यथा कायेदशीर कारवाईला सामोरे जाण्यास सज्ज राहावे,असा इशारा संजय चिंचोले यांनी दिला.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh Official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)