Homeनागपूर न्यूजजिल्हाधिकारी यांची तातडीने बैठक घेणारा तो मोठा नेता कोण?

जिल्हाधिकारी यांची तातडीने बैठक घेणारा तो मोठा नेता कोण?

उनगाव गावक-यांचा प्रश्‍न:स्पंज लोह कारखान्यामुळे गावकरी उधवस्त

२५० वर्ष पुरातन हनुमान मंदिरही पडले ओस
ना-हरकत प्रमाणपत्रावर सरपंच व सचिवाची खोटी सही !
कंपनी बंद न केल्यास आठ दिवसांनंतर तीव्र आंदोलन छेडणार:अवंतिका लेकुरवाळे यांचा इशारा
नागपूर,ता.२२ एप्रिल २०२६: कामठी तालुक्यातील नेरी(उनगाव)येथील ग्रामपंचायतीने परिसरातील ‘सुनील फेरो ॲण्ड एनर्जी प्रा.लि.‘या खासगी उर्जा कंपनीद्वारे होणा-या प्रदुषणामुळे आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या आठ दिवसांत ही कंपनीने बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.आशिष नचरानी रायपूर,असे कंपनीच्या मालकाचे नाव आहे.या कंपनीच्या मालकाने स्वत: पर्यावरणाची अपरिमित हानी होत असल्याचे मान्य करुन कंपनी बंद केली होती मात्र,पडद्या मागे सूत्रे हलली,एका मोठ्या नेत्याने जिल्हाधिकारीसोबत बैठक घेतली आणि गावक-यांचा विरोध झुगारुन कंपनी मालकाने पुन्हा कंपनी सुरु केल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे कामठी शहराचे आमदार आहेत,हे विशेष.
नेरी(उनगाव)येथील ग्रामस्थांनी आणि शेतक-यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायतीकडे या कंपनीविरोधात लेखी तक्रार केली होती.ही कंपनी स्पंज लोह (Sponge Iron)चे उत्पादन करते.स्पंज लोह म्हणजे लोहखनिजापासून (Iron Ore)थेट प्रक्रियेद्वारे तयार केलेले एक प्रकारचे लोखंड आहे,जे सच्छिद्र असतात व कोळसा किंवा नैसर्गिक वायू वापरुन लोह धातूच्या थेट क्षपणातून ( Direct Reduction)बनवले जातात.याचा मुख्य उपयोग पोलाद तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून केला जातो.मात्र,या कंपनीतून निघणा-या धूरामुळे गेल्या नोव्हेंबर महिन्यांपासून परिसरातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
इतकंच नव्हे तर ग्रामस्थांना श्‍वसनाचा विकार जडला व आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण झाले.लहान-लहान चिमुकल्यांना वारंवार खोकला होऊ लागला व तो अनेक औषधोपचारानंतर देखील बरा होत नाही.या प्रदुषणामुळे गावक-यांच्या एकमेव पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील प्रदूषित झाले.गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतच प्रदूषित धूर मिसळत असल्याने, वायु प्रदूषणासोबतच जलप्रदुषणाचेही फार मोठे संकट गावकरी व शेतक-यांसमोर उभे ठाकले.
ग्रामपंचायतीने शेतक-यांच्या या पत्राची दखल घेतकंपनीला कडक शब्दात पत्र पाठवले.नियमानुसार कोणत्याही प्रदूषण निर्माण करणा-या कंपनी या गावापासून दीड-दोन किलोमीटर अंतरावर असणे बंधनकारक असताना ही कंपनी अवघी २०० ते २५० मीटर अंतरावर असून गावक-यांसाठी जणू मृत्यूची यमदूतच बनली आहे.
ही कंपनी समस्त गावक-यांचे श्रद्धास्थान असणा-या ‘क’तीर्थ क्षेत्रात येणारे २५० वर्ष पुरातन हनुमान  मंदिराला अगदी लागून आहे.पूर्वी या मंदिरात भाविक नवस फेडण्यास येत असत व मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाप्रसाद तयार केला जात असे.मात्र,कंपनीच्या प्रदुषणामुळे अन्न शिजवताना त्यात अवघ्या पाच मिनिटातच काळेशार घटक मिसळतात व अन्न व पाण्यावर काळ्या धुळीचा थर साचतो.परिणामी,येथे भाविकांची गर्दी व महाप्रसादाचा आंनद सगळं काही ओसरलं आहे.हे मंदिर आता ओसाड पडले आहे.
गावक-यांनी आपली कैफियत पत्रकार परिषदेत मांडताना,जर आमच्या मुलां-बाळांना किंवा आम्हा गावक-यांच्या जीवाला या कंपनीमुळे निर्माण झालेला धोका कंपनीने लक्षात घेऊन कारवाई केली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडल्या जाईल,असा इशारा कंपनीला दिला आहे.२ मार्च २०२६  रोजी कामठीच्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब यावले यांनी कंपनीने प्रदुषणाबाबत तात्काळ कारवाई करावी व कंपनीमुळे गावामध्ये प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी व कंपनीकडून केलेल्या कारवाहीची माहिती या कार्यालयाला त्वरित कळवावी असे पत्र दिले.मात्र,दीड महिन्यांचा कालावधी उलटून देखील कंपनीने याचे कोणतेही उत्तर पाठवले नसल्याचे गावकरी सांगतात.
विकासासाठी उद्योग आवश्‍यक आहेत हे मान्य आहे मात्र ते कुठे असायला हवेत याचे देखील काही नियम असतात.हे नियम ढाब्यावर बसवून कामठी तालुक्यातील मौजा उनगाव येथील कंपनी चालवली जात असेल व त्याचा गावक-यांना जर त्रास होत असेल अशा वेळी गावकरी यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहात नाही आणि अशाच प्रकारची परिस्थिती गावक-यांवर आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अवंतिका लेकुरवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मूळात सुनील फेरो ही कपंनी अवैधरित्या व अनाधिकृतरित्या सुरु असल्याचा धक्कादायक आरोप लेकुरवाळे यांनी केला!ही स्पंज आयरन उत्पादीत करणारी कंपनी रेड कॅटगिरीमध्ये म्हणजे सर्वाधिक जोखिमेच्या श्रेणीत येते.ही कंपनी उनगावला १० वर्षांआधी ‘चिंतेश्‍वर स्टील प्लान्टच्या’ नावाने नरेश सोनी चालवत होते.२०२२ पर्यंत त्यांनी ती कंपनी चालवली.२०२२ मध्ये अशाच प्रकारे गावक-यांनी उठाव केला व ती कंपनी बंद झाली.अधिकृतरित्या ती स्टील कंपनी अद्याप कोणालाही चालविण्यास देण्यात आलेली नाही हे माहितीच्या अधिकारातून पुढे आले.कागदोपत्री त्याचं नाव सात-बारावर बदललेलं नाही,परंतू मागील वर्षी नोव्हेंबर २०२५ पासून ही कंपनी सुनील फेरो नावानेपुन्हा सुरु केली.
मात्र,पर्यावरण अधिनियम १९८६ ,वायू प्रदूषण निवारण व नियंत्रण कायदा १९८१,जल प्रदुषण नियंत्रण अधिनियम १९७५ याच्यासोबत महाराष्ट्र प्रदुषण मंडळ आणि आताचा २०१६ मध्ये या अधिनियमांत झालेली सुधारणा,हे सगळे कायदे बघितलेत तर या कायद्याच्या नियमानुसार अश्‍या प्रकारची एक रेड श्रेणीतली कंपनी अगदी गावाच्या आत कशी सुरु केली जाते?
अश्‍या रेड श्रेणतीतील कंपनीपासून नदीचं अंतर किमान ५०० मीटर ते १ किलोमीटरपर्यंतचे असायला हवे असा नियम असतानाही,ही कंपनी नदीपासून अवघी ५० मीटरवर आहे! नियमानुसार अश्‍या रेड श्रेणीतील कंपनीपासून जिल्हा परिषदेची शाळा २ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत असायला हवी मात्र,ही कंपनी अवघी १०० ते १५० मीटर जिल्हा परिषदेच्या शाळेपासून अंतरावर आहे!
हा संपूर्ण भाग कृषि क्षेत्र असून या गावातील संपूर्ण गावक-यांची उपजिविका ही कृषिवरच निर्भर आहे.उपजिविकेसाठी इतर कोणतेही व्यवसाय या गावात नाही.
प्रदुषण मंडळ गांधारीच्या भूमिकेत!
या रेड श्रेणीत मोडणा-या कंपनीला महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने ‘गांधारी ’होऊन चुकीचे पर्यावरणीय प्रमाणपत्र बहाल केले असल्याचा आरोप अवंतिका लेकुरवाळे करतात.याशिवाय ‘कसेंन टू ऑपरेट’हे देखील चुकीचे प्रमाणपत्र या कंपनीला देण्यात आले आहे.मूळात कोणत्याही कंपनीला काम सुरु करण्यापूर्वी गावतील ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक आहे,जे या कंपनीला मिळालेले नाही.
कंपनीने मिळवले ग्रामपंचायतीचे खोटे प्रमाणपत्र!
कोणत्याही कपंनीला कोणत्याही गावात काम सुरु करण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागतात.’सुनील फेरो ॲण्ड एनर्जी ‘या कंपनीने उनगाव ग्रामपंचायतीचे खोटे प्रमाणपत्र मिळवले,असा धक्कादायक आरोप पत्रकार परिषदेत अवंतिका लेकुरवाळे यांनी केला.२०२४ मध्ये उनगाव ग्रामपंचायतीमध्ये जे सचिव पदावर नव्हते,त्यांच्या सहीनिशी या कंपनीने खोटे प्रमाणपत्र मिळवले.२२ नोव्हेंबर २०२४ रोजी सरंपंच अरुण आखरे व सचिव संगीता भोळे यांच्या नावानिशी व सहीनिशी या कंपनीने ना-हरकत प्रमाणपत्र मिळवले जेव्हा की संगीता भोळे या २०२२ मध्येच ग्रामपंचायतीतून गेल्या व २०२३ अरुण आखरे यांचे पद गेलं.२०२३ पासून सरपंच सुजाता पाटील व त्यांची कार्यकारीणी ग्रामपंचायतीमध्ये पदावर आहेत.याचा अर्थ २०२४ मध्ये ग्रामपंचायतीमध्ये जे पदावरच नव्हते त्यांच्या सही व नावानिशी सुनील फेरो ही कंपनी ना-हरकत प्रमाणपत्र कसे मिळवू शकते?असा सवाल लेकुरवाळे करतात.
गावक-यांनी शासनाच्या प्रत्येक विभागाकडे तळमळीने अर्ज केले.यात तहसीलदार,बीडीओ सगळेच आले.गावक-यांच्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाने देखील गावाचे सर्वेक्षण केले.प्राथमिक आरोग्य केंद्रानेही ही कंपनी प्रदूषित करीत असलेले लहान-लहान धुळीचे कण ज्यात लोहकण मिसळलेले आहेत ते आरोग्यासाठी घातक आहेत.शेती,जनावरे,गावक-यांचे आरोग्य धोक्यात असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिले.यावर कहर म्हणले गावक-यांसाठी एकमेव पिण्याच्या पाण्याच्या टाकीत देखील ते धुळीकण मिसळत आहेत.गावकरी ऑरोचे पाणी विकत घेऊन पिऊ शकत नाहीत.यामुळे देखील त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.जनावरांच्या पोटातही ते प्रदुषित पाणी जात आहे,त्यांच्या दूधातून ते धुळीकण माणसांच्या पोटात पोहोचत आहेत.
कृषि विभागाने देखील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा अहवाल दिला आहे.ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर(बीडीओ)यांनी देखील सर्वेक्षण करुन त्यांच्या अहवालात अतिशय धोकादायक परिस्थिती असल्याचा उल्लेख केला आहे.त्यांनी कंपनी मालकाला पत्र ही दिलं की तीन दिवसांच्या आत कंपनी बंद केली पाहिजे.
खासदार श्‍यामकुमार बर्वे यांच्या मार्गदर्शनातही एक बैठक घेण्यात आली.कंपनीच्या मालकांना ती सगळी परिस्थिती दाखवण्यात आली.त्यांनी देखील हे कबूल केले की हे सगळे भयावह आहे आणि त्यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला.त्यांनी लिखितमध्ये दिलं की जोपर्यंत कपंनीत प्रदुषणाच्या अनुषंगाने सुधार होत नाही तोपर्यंत कपंनी बंद ठेवण्यात येईल.
यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे एक बैठक झाली.ती कंपनी स्वत:हून सुरु करुन टाकली.गावक-यांनी जेव्हा कंपनी मालकाला याची विचारणा केली तेव्हा त्याने धमकी दिली,‘कोण काय करु शकतो ते आम्ही पाहून घेऊ!’ही कंपनी कामठी तालुक्यात येत आहे.कामठीचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे असून ते राज्याचे महसूल मंत्री देखील आहेत.आता गावक-यांनी कुठे न्याय मागायचा?पालकमंत्र्यांना दोन महिन्यांपूर्वीच सरपंच सुजाता पाटील यांनी पत्र दिले आहे मात्र,अद्याप त्यावर महसूल मंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संपूर्ण गाव पुन्हा एकदा त्यांची भेट घेणार असल्याचे लेकुरवाळे यांनी सांगितले कारण हा त्यांच्या मतदारसंघाचा प्रश्‍न आहे.
गावकरी जेव्हा तहसीलदार,महसूल अधिका-यांकडे दाद मागतात तेव्हा ते ‘मग महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने कंपनीला परवानगी का दिली?आम्ही काही करु शकत नाही’असे उत्तर गावक-यांना देतात.महसूलची जागा त्यांची असताना किमान त्यांना प्रदुषणाचे नियम पाळण्यासाठी पत्र ते पाठवू शकतात मात्र,ते असे करत नाहीत.गावाच्या विकासासठी कंपनी आहे की कंपनीसाठी गाव वेठीस धरले जात आहे?असा सवाल लेकुरवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
परिणामी,त्रस्थ गावक-यांनी नवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांच्याकडे एक पत्र दिले असून, येत्या आठ दिवसात त्यांनी खासदार श्‍यामकुमार बर्वे,कंपनीचे संचालक,व्यवस्थापक तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हा प्रश्‍न निकाली लावण्यात येईल असे आश्‍वासन दिले असल्याचे लेकुरवाळे यांनी सांगितले.त्या मोठ्या नेत्याने तुमच्यासोबत बैठक घेऊन कंपनी सुरु करण्यास हिरवा कंदिल दाखवला का?असा प्रश्‍न लेकुरवाळे यांनी जिल्हाधिकारी यांना केला असता,त्यांनी बैठक घेतली नसून ते मला भेटण्यासाठी आले होते,असे उत्तर जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी दिले!
संपूर्ण गावक-यांचा हा निर्धार आहे जोपर्यंत कंपनी बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,असा इशारा याप्रसंगी गावक-यांनी दिला.२४ एप्रिल रोजी ग्रामसभा ठेवण्यात आली असून त्या सभेत कंपनी बंद करण्याचा व ज्या अज्ञात लोकांनी कपंनीला ग्रामपंचायतीचे बोगस प्रमाणपत्र दिले त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करणार असल्याचा प्रस्ताव पारित करणार असल्याचे सरपंच सुजाता पाटील यांनी सांगितले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………….
Advertisements

Latest बातम्या