Homeब्रेकिंग न्यूजनागपूरात इथेनॉल पेटले...

नागपूरात इथेनॉल पेटले…

Advertisements
गडकरी वाड्यावर युवक काँग्रसेचा धडक मोर्चा

भाजप युवा मोर्चाचे चोख प्रत्युत्तर

दिल्लीत ई-२० विरोधात केजरीवालही उतरले मैदानात
ई-२० जनता पार्टीला हवा सामान्य पेट्रोलचाही विकल्प
नागपूर,ता.३ ऑगस्ट २०२६: केंद्र सरकारच्या ई-२० इथेनॉल मिश्रित इंधन धोरणाविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज ३ ऑगस्ट रोजी नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थावर(महाल परिसर)मोर्चा काढून जोरदार निदर्शने व घेराव आंदोलन केले.
चिटणीस पार्क ते गडकरी वाडापर्यंत,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात हा धडक मोर्चा निघाला.आंदोलक गडकरी वाड्याकडे जात असताना पोलिसांनी बॅरिकेट्स लावून त्यांना रोखले तसेच काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
ई-२० इंधनामुळे जुन्या गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याचा व मायलेज कमी होत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.२९ जुलै रोजी संसदेत या धोरणाबाबत दिलेल्या लेखी उत्तरामुळे ग्राहकांच्या शंकांचे निरसन झाले नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
या मोर्चाची सुरवात दुपारी १ वाजता चिटणीस पार्क चौकातून झाली.यानंतर युवक काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला.‘नीट‘पेपर फुटीवरुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता गडकरी यांच्या विरुद्ध विरोधक आक्रमक झाले आहेत.
समाज माध्यमांवर देखील ‘ई-२० जनता पार्टी‘सोबत बघता बघता लाखो फॉलोवर्स जुळले.प्रधान यांच्या विरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी‘ने आक्रमक आंदोलन केल्यानंतर आता गडकरी यांच्या विरोधात रस्त्यावरची लढाई सुरु झाली असून, नागपूरातही आज इथेनॉल पेटले.युवक काँग्रेसच्या आंदोलनामुळे काही वेळ तनावाचे वातावारण निर्माण झाले.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गडकरी यांच्या निवासस्थानाच्या मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

या आंदोलनात गडकरींच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.कार्यकर्त्यांच्या हातात अनेक फलके होती.आंदोलनकर्त्यांनी गडकरी यांच्या घराकडे कूच करताच पोलिसांनी तातडीने धरपकड करण्यास सुरवात केली.

गडकरी यांनी इथेनॉल मिश्रित इंधनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.त्यांनी गोरगरीबांचे नुकसान केले आहे.मध्यमवर्गीयांचेही गाड्यांच्या नुकसानीतून कंबरडे मोडले असल्याने या विरोधात आमचे आंदोलन असल्याचे युवक काँग्रेस आंदोलनकर्ते यांनी माध्यमांना सांगितले.
यासोबतच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते थेट पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढले.आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व गडकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ई-२० इंधन धोरणाविरोधात राजधानी दिल्लीतील काही संघटनांनी सुरु केलेल्या आंदोलनाची व्याप्ती आता महाराष्ट्राच्या उपराजधानीपर्यंतही पोहोचली.गडकरी हे इथेनॉल मिश्रित इंधनाचे सातत्याने समर्थन करीत आले आहे.देशाच्या सर्वोच्च न्यायालयात देखील केंद्र सरकारतर्फे शपथपत्रावर इथेनॉल मिश्रित इंधनाचे फायदे सादर करण्यात आले आहेत.
इथेनॉलमुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल,शेतक-यांना ऊस व अन्य पिकांपासून अतिरिक्त उत्पन्न मिळेल आणि प्रदुषणात घट होईल,असा त्यांचा दावा राहिला आहे.मात्र,ई-२० धोरणामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना किती अडचणींचा सामना करावा लागत आहे,यावरील हजारो व्हिडीयोज समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
छोट्या-छोट्या रिल्समधून गडकरी यांच्यावर शरसंधान साधले जात आहे.
जर कोणत्याच गाड्यांना ई-२० मुळे काहीच नुकसान होत नाही तर कंपन्यांनी ई-२० गाड्यांची निर्मिती केलीच कशाला?इथेनॉल पेट्रोलमध्ये वीस टक्के मिसळल्यानंतरही पेट्रोलचे दर ग्राहकांसाठी कमी का होत नाही?जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलचा दर घसरुन देखील भारतातील वाहनधारकांना पेट्रोलचे चढे दरच का भरावे लागत आहे?सरकारने आताच संसदेत बीएस-३ गाड्यांवर वर परिणाम होऊ शकतो,अशी कबुलीच दिली आहे,त्याचे काय? सर्वात महत्वाचे म्हणजे पेट्रोलियम पदार्थांवर भारत सरकार म्हणजे केंद्र शासन व राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र शासन किती सेस आकारतेय हे घोषित का करीत नाही?इथेनॉल आपण काय किमतीत घेतो आहोत हे वाहनधारकांपासून का लपवून ठेवले जात आहे?साध्या(भेसळरहीत) पेट्रोलचा पर्याय ग्राहकांसाठी का खुला नाही?असे अनेक प्रश्‍ने केंद्र सरकारला विचारली जात असून,शेवटी भेसळ ही भेसळच असते आणि त्याचे दुष्परिणाम वाहनधारकांना भरुन द्यावे लागत असल्याची मोठी तक्रार ई-२० जनता पार्टीच्या इन्सटाग्रामवर उमटली आहे.
देशभरात लाखो ग्राहकांच्या गाड्या ई-२० पेट्रोलमुळे खराब होत आहेत.त्या गाड्या इथेनॉल ई-२० कम्फर्टेबल जरी असल्या तरी इथेनॉल जे पाणी ॲबझर्ब करीत आहे त्या पाण्यामुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याचा दावा केला जात आहे.
समाज माध्यमांवरील हा वरील लढा आता थेट रस्त्यावर उतरला असून ई-२० ईंधना विरोधात नागपूरसह राज्याच्या इतर भागात या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे.
युवक काँग्रेसच्या या आंदोलनाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चा देखील मैदानात उतरला व गडकरी यांच्या वाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन जन्म घ्यावे लागतील,असा इशारा त्यांनी दिला.
गडकरी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत,इथेनॉल मिश्रित इंधन निर्णयाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.तरी देखील त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत.ज्या गडकरींनी नागपूर शहराचा इतका विकास केला,ज्यांनी फक्त नागपूरच नव्हे तर देशाच्या विकासात इतका मोठा हातभार लावला आहे,त्यांची प्रतिमा खराब करण्याचे हे षडयंत्र असल्याचे भाजप आंदोलकांनी माध्यमांना सांगितले.
‘देश का नेता कैसा हो..नितीन जी जैसा हो’सारखे जोरदार नारे याप्रसंगी भाजप युवा माेर्च्याच्या कार्यकर्त्यांनी दिले.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक बंडू राऊत यांनीदेखील हा विषय पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित असून गडकरी यांचा या विषयाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.याशिवाय जगभरातील १३ देशांनी ई-२० मिश्रित इंधन स्वीकारले असून त्या देशांमध्ये कोणतीही समस्या उद् भवली नाही.गडकरी हे फक्त नागपूरातच नव्हे तर संपूर्ण देशात आदरणीय आहेत.आमच्या भाजप युवा मोर्च्याने गेल्या पंचवीस वर्षांपासून काँग्रेसच्या घरात घूसून आंदोलने केली आहेत.नुकतेच भाजप युवा मोर्च्याने देवडिया भवनात घूसून आंदोलन केले,फक्त त्या कार्यालयाचे फाटक तोडणे शिल्लक होते,इतके जबरदस्त आंदोलन आम्ही केले असल्याचे बंडू राऊत म्हणाले.
नागपूरच नव्हे तर आता आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी देखील केंद्र सरकारच्या ई-२० इथेनॉल मिश्रित धाेरणाविरोधात दिल्लीत आक्रमक आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनांतर्गत केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जुन्या वाहनांवर सक्तीने हे इंधन लादल्याचा अारोप केला आहे.
२०२३ पूर्वी उत्पादित केलेल्या ३० कोटींहून अधिक गाड्यांचे इंजिन आणि सुटे भाग,जसे की फ्युएल पंप इत्यादी या ई-२० पेट्रोलमुळे लवकर खराब होत असून ,मायलेजही घटल्याचा आंदोलकांचा दावा आहे.ई-२० सोबतच १०० टक्के शुद्ध पेट्रोलची विक्रीही सुरु ठेवावी व ई-२० मिश्रित पेट्रोलच्या सक्तीचे धोरण तात्काळ मागे घेण्यात यावे,अशी त्यांची मागणी आहे.
महत्वाचे म्हणजे आम आदमी पक्षातर्फे ऑनलाईन याचिकेवर दोन लाखांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्ष-या गोळा करण्यात आल्या असून,हे धोरण मागे घेण्यासाठी केंद्र सरकारवर तीव्र दबाव टाकला जात आहे.
(नागपूरातील आंदोलनाच्या बातमीशी संबंधित व्हिीडीयोज Sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
……………………………………………..

Latest बातम्या