Homeनागपूर मनपादयाशंकर तिवारीचे नाव काढून टाका!

दयाशंकर तिवारीचे नाव काढून टाका!

मनपा सभेच्या दालनातून…

डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)
नागपूर,ता.२२ एप्रिल २०२६: भाजपचे नगरसेवक प्रदीप पोहोणे यांनी आज मनपाच्या सर्वसाधारण सभेत कचरा संकलन करणा-या बी.व्हीजी कंपनीच्या गाडीने ५१ वर्षीय  सिमा ज्ञानेश्‍वर चरडे यांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. मृतकाची कोणतीही चूक नसताना,कंपनीच्या वाहनचालकाने गैरजबाबदार व निष्काळजी पद्धतीने वाहन चालवून सिमा यांचा जीव घेतला.,त्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाईची मागणी केली.याच घटनेची रि-ओढून काँग्रेसचे नगरसेवक वसीम खान यांनी प्रभाग क्र.८ मधील टिमकी येथे याच कंपनीची कचरा गाडी रिव्हर्स घेत असताना,गाडीत कचरा टाकायला आलेल्या महिलेचा कसा जीव घेतला,या घटनेची माहिती सभागृहाला देत माजी महापौर व विद्यमान शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकारातून मृतकाच्या कुटूंबियांना चार लाख रुपये भरपाई मिळवून दिली.असा उल्लेख करताच, सत्ता पक्ष नेते बाल्या बोरकर यांनी ताडकन उठून,’दयाशंकर तिवारी यांचे नाव कामकाजातून काढून टाका’,असे वाक्य उच्चारले.
यावर आभा पांडे,वसीम खानसह विरोधी पक्षाचे काही नगरसेवक यांनी आक्षेप घेत,त्यांनी इतके चांगले काम केले तर त्याची माहिती सभागृहाला द्यायची नाही का?असा आक्षेप घेतला,यावर ‘मला तुमचे काही ऐकायचे नाही’अश्‍या शब्दात बाल्या बोरकर यांनी दरडावले व दयाशंकर तिवारींचे नाव कामकाजातून काढून टाकण्यास महापौर व प्रशासनास बाध्य केले!
याच विषयावर नगरसेवक सचिन नाईक,शैलेश पांडे,दिव्या धुरडे यांनी त्यांच्या प्रभागातील मोकाट जनावरे व त्यांच्यामुळे झालेले अपघात या विषयाला हात घातला.रेबीज झालेल्या म्हशीने कशाप्रकारे महाल भागात एका वृद्धाचा जीव घेतला,याचा घटनाक्रमच मांडण्यात आला.दिव्या धुरडे यांनी देखील त्यांच्या प्रभागात मोकाट जनावरांनी शाळेतून चिमूकलीला घेऊन येणा-या महिलेवर अचानक हल्ला केला,नागरिकांनी धावून तिचा जीव वाचवला मात्र,तिला आयसीयूत भर्ती करावे लागले,मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाईचा विषय देखील छेडण्यात आला.यावर ‘प्रश्‍न कोणता आहे?कोणता विषय चालला आहे?असा संताप व्यक्त करुन हा विषय इथेच थांबविण्याची सूचना(विनंती नाही) महापौरांना बाल्या बोरकरांनी केली!यावर चर्चा झडत असतानाच प्रदीप पाेहोणे हातातील कागद दाखवून बाल्या बोरकर यांच्याजवळ आले व त्यांना काहीतरी सांगण्याचा, कदाचित विषयाचे गांर्भीर्य सांगण्याचा प्रयत्न करु लागले.
भाजप नगरसेवक संजय बालपांडे यांनी विविध रस्त्यांवर भरणारा आठवडी बाजाराचा विषय गांर्भीयाने सभागृहात मांडला.यावर विविध प्रभागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील कैफियत मांडण्यास सुरवात केली.महापौर सर्वांच्या भावना लक्षपूर्वक ऐकून घेत होत्या व हातानेच त्यांनी संजय बालपांडे यांना थांबण्याचा इशारा केला.यावर बाल्या बोरकर यांनी महापौरांना सूचना केली,‘पहले त्या नगरसेवकाला बोलू द्या,बोल रे!’
मूळात सभागृह कोण चालवत आहे?सदनाचा नियम काय आहे?सभागृहात महापौरांपेक्षा सत्ता पक्ष नेत्याचे पद आणि अधिकार मोठे आहेत का?महापौरांना सरळ निर्देश देण्याचा अधिकार सत्ता पक्ष नेते बाल्या बोरकरांना आहे का?असा प्रश्‍न २० मार्च व आज २२ एप्रिल २०२६ च्या सर्वसाधारण सभेचा एकंदरित ‘नूर’बघता उपस्थित झाला आहे.
सभागृहात अतिक्रमणाच्या मुद्दावर चर्चा होत असताना,मध्येच उठून यावर मनपा आयुक्त डॉ.विपीन इटनकर यांनी निवेदन करावे,असा सरळ ‘हूकूमच’ बाल्या बोरकरांनी सोडला!यानंतर महापौर नीता ठाकरेंनी मनपा आयुक्तांना या विषयावर निवेदन देण्याची सूचना केली!
भाजप नगरसेवक पिंटू झलके यांनी आज ‘राईट टू सर्विस एक्ट’वर लक्षवेधी मांडली,यावरही बाल्या बोरकर यांनी महापौरांना,‘आता लक्षवेधी घेऊन टाका’अशी सूचना केली!
एकदा तर ते चक्क डायसवर चढून गेले व महापौरांच्या कानात काहीतरी सूचना केली व खाली उतरले!
सत्ताधारी भाजपची, मनपाची सत्ता एकहाती घेण्याची ही चौथी टर्म आहे.जानेवरी २०२६ मध्ये पार पडलेल्या मनपा निवडणूकीतही भाजपचे १०५ सदस्य निवडून आले.नागपूरकर जनतेने भाजपच्या महापौर मायाताई इवनाते,अर्चना डेहनकर, अनिल सोले,प्रवीण दटके,नंदा जिचकार,संदीप जोशी ते दयाशंकर तिवारींचा असा वेगवेगळा कार्यकाळ बघितला आहे.सत्ता पक्ष नेते म्हणून अनेक दिग्गजांनी सभागृह गाजवले मात्र, सभागृहात महापौरांवर वर्चस्व गाजविणारे बाल्या बोरकर यांचीच सध्या नगरसेवक व पत्रकार जगतात चर्चा सुरु आहे…!
………………………………….
Advertisements

Latest बातम्या