फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजखरात- शिंदेंमधील ११७ कॉल्स महत्वहीन:संजय निरुपम

खरात- शिंदेंमधील ११७ कॉल्स महत्वहीन:संजय निरुपम

बारामतीत काँग्रेस पराभूत होणार: निरुपम यांचा दावा

उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते येणार मूळ शिवसेनेत!
भाजप आमच्यासाठी आव्हान नाही सहयोगी
१९९६ नंतर पुन्हा एकदा पक्षासाठी नागपूरची राजकीय भूमी करणार सज्ज
३३ टक्के महिलांच्या राजकीय आरक्षणाला पक्षाचे समर्थन
प्रेस क्लबमध्ये साधला पत्रकारांसोबत संवाद
नागपूर,ता.६ एप्रिल २०२६: सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेला भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरात सोबत ११७ वेळा फोनवर संभाषण झाल्याचा आरोप केला आहे.मात्र,कोणत्याही नेत्याचे कोणत्याही धार्मिक बाबांसोबत असे कॉल्स हे अनौपचारिक असतात,त्यामुळेच दमानिया जो दावा करतात त्याला काहीही महत्व नसल्याचे विधान आज शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी प्रेस क्लबमध्ये केले. पत्रकारांसोबत ‘मिट द प्रेस’उपक्रमाअंतर्गत त्यांनी मनमोकळा संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,अश्‍या धार्मिक व अध्यात्मिक बाबांपासून केवळ नेत्यानीच नव्हे तर सर्वांनीच सावध राहण्याची गरज आहे.असे बाबा हे संपूर्ण मानवतेवरच कलंक असतात.त्यांचे आंर्तबाह्य वर्तन हे फार वेगळं असतं.बाह्य रुपावरुन त्यांच्या अंतर्गत जीवनात काय चाललं आहे हे कोणालाही ओळखता येत नाही.बंद खोलीत तो काय कृत्य करीत होता,हे कोणालाही माहिती नसतं.उलट अश्‍या बाबांचाच प्रयत्न असतो मोठमोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा.राजकीय नेत्यांच्या प्रभावाचा फायदा घेण्यासाठीच असे बाबा लोकं आधी त्यांच्या चेल्यांना नेत्यांकडे पाठवित असतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आसाराम बापूंचा आर्शिवाद घेण्यासाठी आले होते,याचा अर्थ त्यांनाही आसाराम बापूचे कृत्य माहिती होते,असं नाही.एकनाथ शिंदेंना खरातने शिवलिंग पूजेसाठी आमंत्रित केले होते.
ज्या ठिकाणी हिंदू धर्म,अध्यात्म व सनातन धर्माची गोष्ट येते तिथे नेता हा त्या पूजा विधीला सन्मान देतात,हे स्वाभाविक आहे.त्यांच्यासाठी असे बाबांची फक्त एक ‘फेस व्हेल्यू’असते,त्यांच्या कृतीची त्यांना माहिती नसते.मात्र,दमानियांचे शिंदेंवरील आरोप हे निरर्थक असून ,त्यांच्यापर्यंत कॉल्स डिटेल्सचा सीडीआर पोहोचून कोणीतरी त्यांचा राजकारणासाठी वापर करीत असल्याचा आरोप याप्रसंगी निरुपम यांनी केला.दमानियांसोबत माझा देखील खूप चांगला मैत्र बंध आहे.त्यामुळेच माझा त्यांना हा सल्ला आहे,त्यांनी कोणाच्याही हातचे खेळणे होऊ नये,असे निरुपम म्हणाले.
‘ऑपरेशन टायगर’याबाबत त्यांना छेडले असता,हे शीर्षक आमचे नसून माध्यमांनीच दिले असल्याचे ते म्हणाले.२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गठबंधनात निवडणूक लढली असतानाही निकाल लागल्यानंतर राजकीय गद्दारी केली.त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे होते मात्र,त्यांच्या या महत्वाकांक्षेतून त्यांच्याच पक्षाचे खूप नुकसान झाले.त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही,हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर ज्या काँग्रेसच्या विरोधात होते,मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याचसोबतच सत्ता स्थापित केली.परिणामी,अनेक निष्ठावंतांची घुसमट पक्षात होत होती,त्याचा परिणाम २०२२ च्या जून महिन्यातील पक्ष फूटीत झाला व एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदार बाहेर पडले.यानंतरच ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरु झाली की ठाकरे गटातील उर्वरित खासदार व आमदार हे देखील शिंदे गटात सहभागी होत आहेत.मूळात २०२२ नंतर उद्धव ठाकरेंनी पक्ष सावरण्यासाठी काय केले?असा प्रश्‍न उपस्थित करीत,ठाकरे आपला पक्ष सांभाळू शकले नाही,जे शरद पवार व काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत गठबंधनात गेले ते देखील आज वेगवेगळे निवडणूक लढत आहेत,अशी टिका निरुपम यांनी केली.
‘संविधान खतरे में’चा खोटा नेरेटीव्ह याचा फायदा त्यांना लोकसभेत झाला असला तरी २०२४ च्या नोव्हेंबरमधील विधान सभेच्या निवडणूकीत तो यशस्वी होऊ शकला नाही.उलट त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदा,महानगरपालिका,नगर पंचायतीच्या निवडणूका पार पडल्या,त्यातही उद्धव ठाकरे पक्षाची दाणादाण झाली.ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत होते,उद्धव ठाकरे हे घरात बसले होते,असा टोला त्यांनी हाणला.उद्धव ठाकरे यांनी फक्त मुंबई मनपाच्या निवडणूकीत रस घेतला त्यातही त्यांना यश मिळाले नाही व ते शून्यावर बाद झाले.त्यामुळेच त्यांच्यासोबत असलेल्या तथाकथित निष्ठावंतांचे राजकीय भविष्य अंधारात आले व ते आमच्यासोबत येण्यासाठी तळमळून राहीले.त्या निष्ठावंतांपैकी अनेकांनी भाजप व आमच्यासोबत संपर्क साधला असून यात खासदार,आमदार,नगरसेवक सगळ्याचांच समावेश आहे.हे उद्धव ठाकरेंच्या निष्क्रियतेचा व राजकीय  शून्यतेचा परिपाक असल्याचा घणाघात निरुपम यांनी केला.एकमेव मुंबईतील दोन-तीन आमदार सोडल्यास इतर सगळे आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.
महिला आरक्षणाविषयी विचारले असता, २०२४ मध्ये केंद्र सरकारने हे विधेयक आणले असता आमच्या पक्षाने याचे समर्थन केल्याचे ते म्हणाले.२०२९ च्या निवडणूकी पूर्वीच ३३ टक्के महिलांना राजकीय आरक्षण लागू होण्यासाठीच संसदेचे विशेष सत्र येत्या १६ एप्रिलपासून केंद्र सरकारने बोलावले आहे कारण जनगणनेला बराच वेळ लागणार आहे.त्यामुळे २०११ च्याच जनगणनेची आकडेवारी गृहीत धरुन महिला आरक्षण लागू करणार असल्याने लोकसभेच्या किमान ७२ जागा वाढणार असून विधानसभा सदस्यांची संख्या देखील ४२२ होईल.आज संपूर्ण जगात महिला या पुरुषांच्या बरोबरीने देश घडवत आहे,देशाच्या प्रगतीत हातभार लावत आहेत.त्यामुळेच आता राजकारणात देखील महिला शक्तींचा पुढाकार असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
बारामतीच्या निवडणूकीत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभा केला,याकडे त्यांचे लक्ष वेधले असता,महाराष्ट्राला एक समृद्ध राजकीय परंपरा राहीली असल्याचे ते म्हणाले.कोणत्याही पक्षाच्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला तेव्हा त्या ठिकाणची निवडणूक बिनविरोधच होत होती.अजित पवारांच्या मृत्यूनंतर महायुतीने एकमताने निर्णय घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र,काँग्रेसने आमचे आवाहन अस्वीकृत केले व पक्षाचा उमेदवार उभा केला.बारामतीत काँग्रेसचा ‘न भूतो ना भविष्यती’असा पराभव होणार असल्याचा दावा याप्रसंगी त्यांनी केला.काँग्रेससारख्या परिपक्व राजकीय पक्षाची ही भूमिका अनाकलनीय असल्याचा टोला त्यांनी हाणला.‘काँग्रेस अब सटिया गई है‘काँग्रेस अलीकडे कोणतीही योग्य भूमिका घेताना दिसून पडत नाही,सतत राजकारणाच्या चक्करमध्ये पडलेली आढळून येते,अशी बोचरी टिका त्यांनी केली.
दोन्ही शिवसेना एकत्रित होईल का?या प्रश्‍नावर असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी सांगितले.शिंदे सेना ही दिवसरात्र झटत असून भाजपचा स्वत:चा जनाधार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत एकत्रित येणे यात औचित्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर मनपात शिंदे सेनेला उमेदवार देखील भाजपमधून आयात करावे लागले,याकडे लक्ष वेधले असता,असे फक्त दोन ते तीन टक्केच घडले असल्याचा खुलासा त्यांनी केला.भाजपकडे चांगले कार्यकर्ते होते, ज्यांच्या जिंकण्याची हमी होती त्यामुळे आम्ही आमच्या पक्षचिन्हावर त्यांना उमेदवारी दिली.विधानसभेत देखील शिंदे पक्षाचे काही आमदार हे मूळ भाजपचे आहेत.भाजपने जो प्रस्ताव आमच्या पुढे ठेवला त्याचे आम्ही आधी मूल्यांकन केले व त्यानंतर हा निर्णय घेतला,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.
अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनामागे कटकारस्थानाची शंका,याविषयी विचारले असता,तो निव्वळ अपघातच होता,असे ठाम मत त्यांनी मांडले.सुनेत्रा वहीनींनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली त्यानुसार फडणवीस यांनी केंद्राकडे सीबीआय चौकशीचे पत्र लिहले.सीबीआयसारख्या तपासयंत्रणा मेरिटवर चौकशी करीत असते.चौकशीतून तथ्य समोर येतीलच,असे ते म्हणाले.
भाजपची एक प्रतिमा आहे की ती ज्या-ज्या राज्यात प्रादेशिक पक्षांसोबत युती करते हळूहळू ते प्रादेशिक पक्ष कमकुवत होऊन नामशेष होतात,बिहार याचे उत्तम उदाहरण आहे,तुम्हाला शिंदेंनी ऐन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्याच नागपूर शहरात व नागपूर जिल्ह्यत पक्ष बांधणीची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली असून,नागपूर शहर व जिल्ह्यात मजबूत असलेल्या भाजपच्या आव्हानाकडे कसे बघता?या प्रश्‍नावर बोलताना,आम्हाला भाजपचे कोणतेही आव्हान नसून भाजप आमचा सहकारी पक्ष असल्याचे ते म्हणाले.राजकारणात प्रत्येक पक्षाला स्वत:चा विस्तार करण्याची संधी असते.राहीला प्रश्‍न बिहारच्या नितीश कुमार यांचा तर भाजप व नितीश कुमार यांच्या जेडीयूला समसमानच जागा बिहारमध्ये मिळाल्या असून, भाजपमुळे नितीश कुमारांचा पक्ष संपला नाही.कोणताही राजकीय पक्ष हा स्वत:च्या कारणांमुळे संपत असतो त्यात भाजपचं योगदान नसतं.मूळात आम्ही मजबूत झालो तर हे भाजपच्याच फायद्याचे आहे,असा दावा त्यांनी केला.भाजपला ताकद येण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला मजबुती येणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी संजय निरुपम यांच्यासोबतच्या १९९६ पासून पत्रकारितेतील मैत्रीचा उल्लेख केला.ही मैत्री चार दशकांची असल्याचे ते म्हणाले.निरुपम यांनी नागपूरातून १९९६ पासून आपली पत्रकारितेची कारर्कीर्द सुरु केली असल्याचे सांगितले.त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी निरुपम यांना नागपूर व रामटेकचा प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती.नागपूर व रामटेकमधील शिवसेनेसाठी राजकीय असलेली बंजर जमीन उपजाऊ करण्याची सूचना बाळासाहेब ठाकरेंनी निरुपम यांना केली.त्यावेळी खासदार म्हणून मिळालेल्या २ कोटींचा फंड ही बंजर जमीन शिवसेनेसाठी उपजाऊ करण्यासाठी खर्च केल्याचे निरुपम यांनी सांगितले.याचे फळ ही १९९९ मध्ये मिळाले व नागपूर जिल्ह्यातून शिवसेनेचा पहीला खासदार संसदेत गेला.यानंतर शिवसेनेचे आमदार देखील नागपूर जिल्ह्यातून निवडून आलेत.मनपात शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले तर जिल्हा परिषदेतही आम्ही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे ते म्हणाले.आता ३० वर्षांनंतर शिवसेनेने पुन्हा माझ्यावर नागपूर लोकसभा क्षेत्राचा प्रभारी म्हणून तीच जबाबदारी सोपवली असल्याचे ते म्हणाले.या बंजर राजकीय जमीनीवर मी उभी केलेली रोपे शिवसेना नावाचा वटवृक्ष झाला आहे.आता माझा प्रयत्न पुन्हा या जमीनीवर बीजारोपण करण्याचा असणार आहे.मी नागपूरातून पुन्हा नव्या पारीला सुरवात करत आहे.याप्रसंगी त्यांनी आमदार आशिष जयसवाल यांचीही स्तुती केली.१९९८ साली आशिष जयसवाल हे खूप कमी मतांनी पराभूत झाले होते.मात्र,त्यानंतर ते स्वत:च्या कर्तृत्वातून विजयी झाले.कार्यकर्त्यांना,नेत्यांना स्वत:ची क्षमता सिद्ध करावी लागते.विजय-पराभव हे दुय्यम असतात,मतदारांशी जुळून राहणे महत्वाचं असतं.निरपेक्ष राहून पक्षासाठी सतत काम करत राहावं लागतं.एका नव्या शिवसेनेची चांगली उपस्थिती नागपूरच्या राजकीय पटलावर उभी करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या