Homeनागपूर न्यूजसंतुलित, सर्वांगीण, गतिमान महाराष्ट्राच्या दिशेने घेऊन जाणारा अर्थसंकल्प : ॲड. धर्मपाल मेश्राम

संतुलित, सर्वांगीण, गतिमान महाराष्ट्राच्या दिशेने घेऊन जाणारा अर्थसंकल्प : ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर,ता.६ मार्च २०२६: शेतकरी, मजूर, युवा, विद्यार्थी, महिला या सर्वांच्या कल्याणासाठी अनेक मार्ग खुले करून संतुलित, सर्वांगीण, गतिमान विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला, अशी प्रतिक्रिया माजी नगसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री पदावरून वित्तमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला असून याबद्दल मेश्राम यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले व सर्वसमावेशी अर्थसंकल्पाबाबत त्यांचे आभार मानले.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीला २०० वर्ष पूर्ण होत असताना त्यासाठी विशेष निधीची तरतूद, संत गाडगेबाबा यांच्या १५०व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने ‘संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट’ विकसित करण्याची तरतूद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, जिल्हा रायगड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सोयीसुविधांकरिता विकास आराखडा तयार करण्याची तरतूद करून महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतींचे हे विशेष वर्ष लक्षात घेता सन २०२६-२७ हे वर्ष ‘सामाजिक समता व समरसता वर्ष’ म्हणून साजरा करण्याचा घेण्यात आलेला निर्णय सामाजिक न्यायची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना २ लक्ष रुपयांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त आहे.
अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता २३ हजार १५० कोटी रुपये एवढा भरीव निधी देऊन श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने समाजातील सर्व घटकांच्या विकासाचे व्हिजन पुढे ठेवले आहे. अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारेही अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती, आदिवासी, कातकरी, कोलाम, माडीया या आदिम जमाती तसेच पारधी समाज, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेजद्वारे या सर्व समुदायांना विकसित महाराष्ट्रामध्ये सक्षमतेने योगदान देण्यास बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशीही प्रतिक्रिया ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.

………………………………………..
Advertisements

Latest बातम्या