फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइम ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून दोन कोटींची खंडणी मागणारा पत्रकार अटकेत

 ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून दोन कोटींची खंडणी मागणारा पत्रकार अटकेत

नागपूर,ता.१९ डिसेंबर २०२५: तहसिल पाेलिस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या एका फिर्यादीने सात पुरुष तसेच चार महिलांच्या विरोधात दोन कोटींच्या खंडणीची तक्रार नोंदवली असून यात ’नागपूर टूडे’ या डिजिटल माध्यमासाठी क्राईम बिट सांभाळणा-या ज्येष्ठ पत्रकार रविकांत कांबळे याचा देखील समावेश आहे. दिनांक ५ सप्टेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान आरोपींनी फिर्यादीकडून वेळोवेळी खंडणी वसूल केली.महत्वाचे म्हणजे या पूर्वी देखील ’हनीट्रॅप’च्या गुन्ह्यासाठीच कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून गडचिरोली पोलिसांनी त्याला अटक केली होती.सध्या आरोपी पत्रकार कांबळे जामीनावर बाहेर आहे.
फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार अश्‍विन विनोद धनविजय,वय ३९ वर्षे,राहणार अजनी,नागपूर,नितीन सुखदेव कांबळे,वय ३८ वर्षे.रा.अजनी,कुणाल प्रकाश पुरी,वय ४२ वर्षे,रा.अजनी,रितेश उर्फ पप्पु मनोहर दुरुगकर वय वर्षे ४९ वर्षे,रा.हुडकेश्‍वर.आशिष मधुकर काकडे,वय ३६ वर्षे,रा.गोंदिया,अविनाश हेमराज साखरे,वय ३५ वर्षे रा.गोंदिया तसेच पत्रकार रविकांत कांबळे,रा.नागपूर तसेच इतर चार महिला आरोपी यांच्यासोबत संगणमत करुन,फिर्यादीचे खाजगी चित्रीकरण करुन,नमूद चित्रिकरण सार्वजनिक करण्याची धमकी देऊन फिर्यादी कडून ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात १,७८,००० रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली.
इतकंच नव्हे तर फिर्यादीला आणखी दोन कोटींची मागणी करण्यात आली!
फिर्यादी यांनी गुन्हेशाखा सहा.पोलिस आयुक्त कार्यालय येथे फिर्याद मांडली.दोन कोटी रुपयांच्या मागणीची तडजोड करीत, अंती ६० लाख रुपये देण्याचे ठरले.
आरोपींना रंगेहात जेरबंद करण्यासाठी गुन्हेशाखेचे अभिजित पाटील,सहा.पो.आयुक्त यांनी गुन्हेशाखा घरफोडी विरोधी पथकाची एक चमू तयार केली व आरोपींनी बोलावलेल्या एका हॉटलमध्ये काल दिनांक १८ डिसेंबर रोजी फिर्यादीला ६० लाख रुपयांपैकी ३ लाख रुपये घेऊन पाठवले.आरोपी अश्‍विन धनविजय,नितीन कांबळे तसेच कुणाल पुरी यांनी फिर्यादीजवळ असलेले ३ लाख रुपये न स्वीकारता,पूर्ण ६० लाख रुपयांची मागणी केली,याच वेळी गुन्हेशाखेच्या चमूने त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या इतर साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले.आरोपींकडून एकूण रोख १,५०० रु. व वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण १ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तहसील पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक पल्लवी गोसावी यांनी अारोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८(२),६१(२),३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल तसेच सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)वसंत परदेशी,पोलिस उपायुक्त(डिटेक्शन)राहुल माकणीकर,सहायक पोलिस आयुक्त अभिजित पाटील(गुन्हेशाखा)यांच्यासह दिलीप चंदन,नितीन चुलपार,नितीन तिवारी,गणेश बरडे,प्रविण रोडे,श्रीकांत उईके,प्रशांत गभणे,सुधीर पवार व अमन राऊत यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली.
गडचिरोली अभियंता ‘हनीट्रॅप’प्रकरणातही कांबळेंवर गुन्हा-
दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीतील एका सहायक अभियंत्याला ’हनीट्रॅप’मध्ये अडकवून दहा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी रविकांत कांबळेंवर गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी कांबळेंसह तिघांना ५ फेब्रुवरी २०२४ रोजी पोलिस कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात रवानगी केली होती.पत्रकार रविकांत कांबळे याच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह चित्रफिती आढळ्याने चौकशीसाठी कांबळेला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते.
हनीट्रॅप करणा-या चार जणांच्या टोळीला २९ जानेवरी २०२४ रोजी गडचिरोली गुन्हे शाखेने नागपूर येथे पकडले होते.यात पोलिस शिपाई सुशील गवई,रोहित अहिर व इशानी यांचा समावेश आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर तिघांनाही चंद्रपूर जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले तर रविकांत कांबळे याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले.या घटनेत रविकांत कांबळे हा मुख्य सूत्रधार होता तर महिला आरोपी फरार झाली होती.
२९ जानेवरी २०२४ रोजी गडचिरोलीतील एका शासकीय अभियंताने दिलेल्या तक्रारीनंतर गडचिरोली पोलिसांनी रविकांत कांबळेला नागपूरातून अटक केली होती.जामीनावर बाहेर आल्यानंतर देखील ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून बक्कळ पैसा कमविण्याचा हव्यास गुन्हेगारी वृत्तीच्या पत्रकारांचा संपला नसल्याची ही घटना सिद्ध करते.‘नागपूर टूडे’च्या मालकांनी गडचिरोली खंडणी प्रकरणानंतर रविकांत कांबळे याची हकालपट्टी केली होती मात्र,प्रकरण शांत होताच पुन्हा कामावर रुजू करुन घेतल्याने अनेक शंकाना पेव फूटले आहे.
महत्वाचे म्हणजे क्राईम रिर्पोटर रविकांत कांबळे यांना इंडो एशियन मिडीया फाऊंडेशन,व्हॉईस इंडिया टी.व्ही,वर्ल्ड अलाईंस ऑफ बुद्धिस्ट तसेच बी.ए.टी टॅम्पल यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जून २०२४ रोजी उत्कृष्ट पत्रकारितेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.गडचिरोली हनीटॅपच्या घटनेनंतर देखील वरील सामाजिक संघटनांना आरोपी पत्रकारांला उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार द्यावासा वाटला,यातून पत्रकारितेची झालेली अवमानना व पराकोटीची विटंबनाच ठलकपणे अधोरेखित होते.
‘खंडणीखोर’ पत्रकारितेत-
हल्ली नागपूरातील पत्रकारिता गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांसाठी बक्कळ पैसा कमविण्याचे सोपे साधन झाली आहे.अनेकदा तुरुंगात वारी करुन ओलेले कथित पत्रकार हे उजळ माथ्याने इतर पत्रकारांच्या बरोबरीने विविध पत्रकार परिषदेत वावरताना दिसून पडतात.याचे त्यांना कोणतेही वैषम्यही वाटत नाही.नागपूरातील प्रेस क्लबसारख्या प्रतिष्ठित संस्थेने अशाच एका तुरुंगवारी करुन आलेल्या महिला पत्रकारावर सुरवातीला प्रेस क्लब व पत्रकार भवनात येण्यास बंदी घातली नंतर व्यवसायिक गणिते जोडण्यासाठी ‘बाईज्जत’तिला आमंत्रण देऊन बोलावण्याची किमया साधली.शहरातील खंडणीखोर व गुन्हेगारी वृत्तीच्या कथित पत्रकारांना प्रेस क्लबसारखी संस्थाच अशी मतलबी वागणूक देत असेल ,तर राजकीय पक्षांना अश्‍या कथित पत्रकारांवर बंदी घालण्याची गरज ती काय असणार?असा रोख सवाल पत्रकार जगतात विचारला जातो.
यात फक्त डिजिटल माध्यमाचे तथाकथित पत्रकार नसून प्रिंट मिडीयाचे देखील महाभागांचा समावेश आहे.गेल्या वर्षी एका हिंदी दैनिकाच्या मुख्य वार्ताहाराला पोलिसांनी खंडणी घेताना रंगेहात पकडून कारागृहात डांबले होते.आरटीओच्या एका दलालाच्या तक्रारीवरुन त्या वार्ताहारावर कारवाई झाली होती मात्र,भास्कराचे तेज पाजळून त्या वार्ताहराची हकालपट्टी करण्या ऐवजी जामिनावर सुटून आल्यावर त्या वृत्तपत्राच्या मालकाने त्याची बदली पश्‍चिम महाराष्ट्रात केली…..!परिणामी,काही पत्रकार आणि वृत्तपत्रांचे मालक यांची खंडणीच्या घटनांमध्ये अभद्र युती असल्याची कुजबुज पत्रकारितेच्या जगतात ऐकू येते.अवघ्या काही वर्षात पत्रकारितेतून मोठमोठी आलिशान घरे बांधणा-या कथित पत्रकारांची ‘संख्या’ या ‘नग्न ’सत्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरते…!
…………………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या