फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपागडकरींनी ओसीडब्ल्यूला ‘ही’शिक्षा केली असती तर?

गडकरींनी ओसीडब्ल्यूला ‘ही’शिक्षा केली असती तर?

Advertisements
एका महिन्यानंतर येणा-या पावसात गडकरींच्या बैठकांमधील सूचनाही धूवून निघणार:नागरिकांचा आराेप

ओसीडब्ल्यू गडकरींचे ‘सृजन’
नागपूर,ता.२३ मे २०२५:  शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये ओसीडब्ल्यू(ऑरेंज सिटी वॉटर्स)ने एका महिन्याच्या आत सुधारणा करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल,असा सज्जड दम केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी नुकतेच १९ मे रोजी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ओसीडब्ल्यू या खासगी कपंनीच्या अधिका-यांना दिला.मात्र,२०१२ पासून आपला कारभार न सुधारु शकणा-या या कंपनीला आणखी एका महिन्याचा वेळ देण्या मागे,तोंडावर आलेला पावसाळा हा उद्देश्‍य होता का?असा सरळ सवाल करीत,गडकरी यांनी या अतिशय मुजोर कंपनीला आपला संपूर्णत:बिघडलेला कारभार सुधारण्यासाठी एका महिन्याचा आणखी वेळ देण्या ऐवजी रणरणत्या उन्हाळ्यात नागपूरकरांच्या तोंडचे पाणी पळवणा-या या कंपनीच्या जबाबदार अधिका-यांना तात्काळ निलंबित का केले नाही?किमान,एक वर्ष या कंपनीला नागपूरकरांच्या कष्टाच्या कराच्या पैशातून पैसे मिळणार नाही,असा काही दंड का नाही ठोठावला?असा सवाल केला जात आहे.
कंपनीला महिन्याचे कोट्यावधी मिळणार नाही तर कंपनीचा गाडा ते कसा हाकतील?परिणामी,कंपनीचे बेजबाबदार अधिकारी हे कामाला तरी लागले असते मात्र,असे घडले नाही.गडकरी यांनी आणखी एका महिन्याची मुदत देऊन नागपूरकरांची बोळवण केल्याचा आरोप केला जात आहे.मूळात ओसीडब्ल्यू या खासगी कंपनीला नागपूरकरांच्या डोक्यावर बसविण्याची संकल्पना ही गडकरी यांचीच असून,सुरवातीला हा पायलट प्रोजेक्ट फक्त धरमपेठ भागापुरती मर्यादित होता.या झोनमध्ये ओसीडब्ल्यूला सुरळीत तसेच स्वच्छ पाणी पुरवठा,पाण्याची नासाडी थांबवणे,अवैध नळ कनेक्शन शोधून काढणे इत्यादीसाठी करार करण्यात आला होता.
त्याकाळी काँग्रेसचे सरकार केंद्रात व राज्यात होते.जयराम रेड्डी हे अर्बन डेव्हलपमेंट मंत्री होती.जेएनएनयूआरएम अंतर्गत या योजनेची सुरवात काँग्रेसने केली होती मात्र,देशातील कोणतेही शहर ही खासगी पाणी पुरवठ्याची योजना स्वीकारण्याचे धाडस करीत नव्हते.परंतु,गडकरी यांनी २००७ साली हे धाडस नागपूरसाठी केले!धरमपेठ भागात ही योजना यशस्वी झाल्यानंतर ती संपूर्ण शहरात लागू करण्यात आली आणि बघता-बघता स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नागपूर महानगरपालिकेकडून पाणी पुरवठ्याचे काम काढून घेत ती एका खासगी कंपनीला ‘कायदेशीररित्या‘सुपुर्द करण्यात आली!अर्थात,केंद्रातील काँग्रेसी सरकारने हमी दिली होती की नागपूर शहरात ही योजना यशस्वी झाल्यानंतर देशातील इतर शहरातही ती लागू करण्यात येईल मात्र,आजपर्यंत देशातील एका ही महानगरपालिकेने ती स्वीकारलेली नाही!
धरमपेठ झोनमध्ये ही संकल्पना यशस्वी झाल्यानंतर ती संपूर्ण नागपूर शहरासाठी लागू होणार होती.ही संकल्पना निश्‍चितच स्तुत्य होती मात्र,कंपनीचा कारभार हाकणारे अधिकारी,त्यांचा बेजवाबदारपणा,पाण्यासारख्या मूलभूत प्रश्‍नाविषयीचे गांर्भीर्य ,मनपा आयुक्तांनी वारंवार ठोठावला दंड याचे अनेक सुरस किस्से नागपूरकरांना आता इतक्या वर्षात मुखोद्गद झाले आहे.१३ सप्टेंबर २०२४ रोजी ओसीडब्ल्यूवर मनपाने शेवटचा ३० कोटींचा दंड ठोठावला होता मात्र,या खासगी कंपनीचा कारभार तरी देखील सुधारला नाही.अनियमित पाणी पुरवठा,दूषित पाणी पुरवठ्याच्यासारख्या गंभीर तक्रारींची दखल अखेर केंद्रीय मंत्र्यांना घ्यावीच लागली.
सिंगापूरसारख्या देशात प्रत्येक घरामध्ये दोन नळाचे कनेक्शन असून एका नळातून पिण्याचे शुद्ध पाणी तर दुस-या नळातून दैनदिन वापराचं पाणी येतं.नागपूरात सिंगापूरसारखी व्यवस्था राबविण्यासाठी पुढाकार न घेता एका सर्वस्वी खासगी कपंनीला नागपूरचे पाणी जणू विकण्यात आले व ओसीडब्ल्यूला महिन्या काठी कोट्यावधी रुपये देऊन नागपूरकरांच्या डोक्यावर आणून बसवण्यात आले.याच मनपाने २०२३-२०२४ मध्ये प्रति यूनिट पाण्याचा दर १७.६६ वरुन १०.८१ केला असून आता तर ओसीडब्ल्यूचा कारभार बघता हाच दर प्रति यूनिट ८.४७ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे,हे विशेष. मनपासोबत करार झाल्यावर सुरवातीला हाच दर ५ रुपये प्रति युनिट होता! नंतर तो ९ रुपये झाला नंतर ११ रुपये झाला!दूसरीकडे ओसीडब्ल्यूसोबत झालेल्या करारानुसार दरवर्षी नागपूरकर नागरिकांवर ५ टक्के पाणी कर वाढत असून करोना काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता,नागपूरकर दर वर्षी हा वाढीव दर मनपा व ओसीडब्ल्यूला देत आहेत.७५० एमएलडी पाण्याचा पुरवठा नागपूर शहराला दररोज होत असून,तरी देखील नागपूरचे अनेक भाग भर उन्हाळ्यात तहानलेलेच आहेत तर अनेक भागात अत्यंत दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे,त्यामुळेच हे पाणी नेमकं कुठे-कुठे मुरतंय?याचा शोध तहानलेले व दूषित पाणी पिणारे नागपूरकर आता घेत आहेत.
ओसीडब्ल्यू खासगी कंपनी शहराच्या पाणी पुरवठासाठी जेव्हा गडकरी यांच्या पुढाकारातून नागपूर मनपाच्या मानगुटीवर बसली त्यावेळी फ्रांसची कंपनी व्हेवोलियो तसेच मूळ नागपूरची कंपनी विश्‍वराज इन्फ्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ओसीडब्ल्यू (ऑरेंज सिटी वॉटर्स) या नावाने या कंपनीचे कामकाज सुरु झाले होते.नागपूरची स्थानिक कंपनीचा या योजनेत सहभाग असावा असा आग्रह गडकरी यांच्याच होता व करारात या अटीचा समावेश देखील करण्यात आला असल्याने, विश्‍वराज इन्फ्रोसोबत व्हेवोलियो कंपनी संयुक्तरित्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात काम करीत होती.
मात्र,अचानक दोन वर्षांपूर्वी विश्‍वराज इन्फ्रोने हा करार मोडीत काढून, या परियोजनेतून आपले अंग काढून घेतले.यानंतर ओसीडब्ल्यूचा डोलारा ,उपराजधानीचा पाण्याचा डोलारा सांभाळून घेताना वारंवार कोसळताना दिसून पडत आहे ! या मागील कारण,विश्‍वराज इन्फ्रोने अनेक अनुभवी अधिकारी या परियोजनेत जोडून ठेवले होते जे व्हेवोलियाने गलेलठ्ठ पगाराची बाब पुढे करुन तसेच कंपनीच्या अंतर्गत कुरघोडीतून अनेक अनुभवी अधिका-यांना बाहेरचा रस्ता दाखवला!गेल्या दोन वर्षांपासूनच ओसीडब्ल्यूच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाऊस पडत आहे कारण व्हेवोलिया कंपनीने अनेक अनुभवी अधिका-यांच्या जागी, बिहार सारख्या राज्यातून हिंदी भाषिक अधिका-यांचा व कर्मचा-यांच्या भरणा केला ज्यांना नागपूर उपराजधानीच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित कोणत्याही प्रश्‍नांचे मूलभूत ज्ञान नाही! ओसीडब्ल्यूच्या बहूदा सर्वच झोन कार्यालयात सर्वाधिक बिहारी अधिकारी व कर्मचारी आढळून येतात!अनेक अननुभवी अभियंते व ट्रेनी स्टाफ सर्व झोनमध्ये दिसून पडतो,त्यामुळेच गडकरी यांच्या अल्टीमेटमनंतर गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार असल्याची वल्गना ही कंपनी करते ,त्यावेळी तंत्रज्ञान जरी प्रगत असलं तरी ते हाताळणारे हात किती अनुभवी आहेत?हा मूलभूत प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो.
गडकरी यांनी ओसीडब्ल्यूच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्यानंतर, कपंनीने त्यावर उपाययोजना शोधल्याचा दावा केला आहे!शहराला मुबलक पाणी पुरवठा होत असताना देखील अनेक भागात योग्य व्यवस्थापना अभावी नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे.उन्हाळ्यात तर प्रत्येकाच्या घरात किमान दोन-दोन कुलर सुरु असतात त्यामुळे पाण्याची मागणी ही वाढते.ज्यांच्या घरी विहीर,बोरवेल सारखी पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही ते संपूर्णपणे मनपाच्या पाण्यावर निर्भर असतात,अश्‍यावेळी पाण्याचा ठणठणात  त्यांच्या राेषात भर घालतो,लोकप्रतिनिधींवर नागरिक संताप व्यक्त करतात.गडकरींनी कान टोचल्यानंतर, ओसीडबल्यूने पाणी पुरवठा सुधारण्यासाठी डिजीटल ट्विन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याचा दावा केला आहे.या अत्याधूनिक तंत्रज्ञानाद्वारे शहराच्या संपूर्ण जलवाहिनींचे एकत्रित व वास्तव वेळेची माहिती देणारा डिजीटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आले असून,याद्वारे पाण्याची गळती शोधण्यात येणार असून तात्काळ दुरुस्तीही करण्यात येणार असल्याचा दावा ओसीडबल्यूने केला.पाण्याची गुणवत्ता यावरही देखरेख ठेवण्यास मदत होणार असल्याचे सांगून या तंत्रज्ञानाच्या आधारावर अधिक जलद प्रतिसाद देणे शक्य होणार असल्याचे ही कंपनी सांगते.तसेच पाण्याची मागणी बघता त्यादृष्टिने पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि दीर्घकालीन नियोजन करण्याचे प्रयत्न कंपनीकडून करण्यात येणार असल्याची मखलाशी देखील कंपनीने केली आहे.
थोडक्यात,अश्‍या अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीची गरज नागपूरात इतक्या दशकाच्या कारभारानंतर ओसीडब्ल्यूला का वाटली नाही?एका महिन्यानंतर जेव्हा गडकरी पुन्हा आढावा बैठक घेतील त्यावेळी नागपूरात धो-धाे पाऊस बरसलेला असेल व नागपूरकरांना पाण्याची आज इतकी निकड  देखील भासणार नाही,‘तेरी भी चूप,मेरी भी चूप’सारखा कारभार पुन्हा एकदा उजागिरीने सुरु राहील,जी खासगी कंपनी १३ वर्ष काही करु शकली नाही ती एका महिन्यात काय दिव्य करणार?पाण्यासारख्या अतिशय मूलभूत गरजेच्या संदर्भात त्यामुळेच गडकरी यांनी ओसीडबल्यूच्या अधिका-यांसोबत दोन बैठकीत,एक त्यांच्या निवासस्थानावर व दूसरी मनपाच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीतील निर्णयांवर,दिलेल्या आदेशांवर म्हणूनच नागपूरकर नाराजी व्यक्त करीत आहेत.
गडकरी यांनी सरळ या कंपनीचा करार रद्द करायचा होता किवा किमान त्यांची देणी थांबवायला हवी होती,अशी प्रभावी अंमलबजावणी झाली असती तर कपंनीचा कारभार निश्‍चितच सुधारण्यास वाव होता,अन्यथा ‘वांझोट्या’ बैठकीतून नागपूरकरांच्या प्रश्‍नांचे निराकरण होणे शक्य नसल्याचा आरोप शहरातील अनेक भुक्तभोगी करतात.
(वाचा उद्याच्या बातमी ’चोवीस बाय सात’परियोजनेची सुरस कथा)
………………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या