फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजपारडी पूल की मृत्यूचा सापळा!

पारडी पूल की मृत्यूचा सापळा!

Advertisements

३५ अपघात, २० जखमी २२ मृत्यूमुखी 
नागपूर,ता.७ जानेवरी २०२५: नागपूरातील विकासाचं सर्वोकृष्ट मॉडल म्हणून पारडी उड्डाणपूलाकडे पाहीलं जातं मात्र,या पुलाचे बांधकाम तब्बल दहा वर्षे रखडल्याने वाहतूक कोंडीसह शेकडो अपघातांना हा पूल निमंत्रण देणारा ठरला.वाहतूक विभागाने या ठिकाणी लावलेल्या फलकावरील आकडे बघितल्यास सर्वसामान्य वाहनधारक नागपूरकरांसाठी, पारडीचा पूल दूसरा ‘मृत्यूलोक’ ठरल्याचे निर्दशनास येतं.या पुलाची निर्मिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे.              .
नागपूरातील विकास गंगेतील सर्वात गमतीचा भाग म्हणजे ९ वर्षांनंतरही पारडी पुलाचा फक्त काही भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता!१८ सप्टेंबर २०२३ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाची पाहणी केल्यानंतर या पुलाचा काही भाग वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१४ मध्ये या पुलाचे भूमिपूजन झाले हाते. ६४९ कोटीच्या या प्रकल्पांतर्गत एकूण ६ किलोमीटरचा उड्डाण पूल,१४ किलोमीटर ४ लेनचा रस्ता,दोन रेल्वे अंडरब्रिज,नाग नदीवर दोन पूल आणि २२ बसशेड तयार करण्याचे प्रस्तावित होते.मात्र,९ वर्षात विविध अडचणींमुळे या पुलाचे काम इतके रखडले की…या पुलाची निर्मिती सर्वसामान्य नागपूरकरांसाठी मृत्यूचा सापळाच ठरली असून,यातील एच.बी.टाऊन चौक हा सर्वाधिक भयकंपित करणारा ब्लॅक स्पॉट आज ही ठरत आहे!
या ठिकाणी  ३५ अपघात होऊन २२ जण मृत्यूमुखी पडले तर २० जण हे जखमी झाल्याचा फलकच या चौकात वाहतूक शाखेने लाऊन ठेवला आहे. २२ मृत्यू ते ही एकाच चौकात, हा आकडा निश्‍चितच नागपूरकरांना भयकंपित करणारा आहे.याशिवाय लहान मोठे अपघात यांची काही गिनतीच नसल्याचे येथील स्थानिक सांगतात.
महत्वाचे म्हणजे या पुलाची डिझाईन अनेक वेळा बदलण्यात आली.या पूलाची बांधणी इतकी चित्रविचित्र आहे की जगातील कोणताही वास्तूविशारद(आर्किटेक्ट)अशी डिझाईन निर्माण करु शकणार नाही.परिणामी,या पूलाचे येथील स्थानिकांनी ‘भूल भुलैया चौक’असे नामकरण केले असून (बातमीच्या शेवटी यूट्यूबवरील संबंधित व्हिडीयो उपलब्ध आहे) भूल भुलैया चित्रपटाच्या निर्मात्याने या चौकात येऊन भूल भुलैया भाग-३ चित्रपटाचे चित्रिकरण करावे,असा उपहासात्मक सल्ला ते देतात.
इतकंच नव्हे तर  कळमना परिसरातील उड्डाणपूलाचा गर्डर कोसळण्याची घटना देखील या पूलावर घडली होती.ऑक्टोबर २०२१ मध्ये घडलेल्या या घटनेची उच्चस्तरीय चौकशी देखील झाली.देशातील पुलांचे नामांकित तज्ज्ञ विनय गुप्ता,आर.के.गुप्ता व एस.के.शर्मा यांच्या समितीने प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी देखील केली होती.या पुलाची डिझाईन ही तपासली.मात्र,याबाबतचा अहवाल अद्याप नागपूरकरांना कळलाच नाही,ना विरोधकांना नागपूरकरांच्या सुरक्षतेशी संबंधित असणा-या या मुद्दाचा मागोवा घेण्याची गरज वाटली नाही!
नुकतेच २४ डिसेंबर २०२४ रोजी बुटीबोरी उड्डाणपुलाच्या ११ पिलर्सला तडे गेल्याची घटना समोर आली. लोकार्पण झाल्यानंतर अवघ्या साढे तीन वर्षात या पुलाच्या पिलरला तडे गेल्याने त्या ठिकाणाहून काँक्रिट कोसळल्याने सर्वाधिक वर्दळीचा हा राष्ट्रीय महामार्गच आतापर्यंत वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.या पुलाची निर्मिती देखील गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेच केली आहे,हे विशेष!
 एकीकडे पारडी पूल निर्मितीची शोकांतिका घडत असताना,पारडी मार्केटमध्ये रेस्टारंट फूड कोर्ट उभारणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी आमदार कृष्णा खोपडे,टेकचंद सावरकर,नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त डॉ.अभिजित चौधरी,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक आशिष असाटी,मेट्रोचे संचालक(प्रकल्प)राजीव त्यागी, एनएचएआयचे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत त्यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानी बैठक घेतली.पारडी येथील उड्डाणपुलाचा भाग म्हणून शेजारच्या जागेवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भाजी व मटन मार्केट उभारणार असून या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली मात्र,मूळात पारडी पूल हाच एकीकडे वाहनधारकांना मृत्यूचा सापळा ठरला असताना यात गडकरी यांचा विभाग आता उड्डाणपूलाचा भाग म्हणून या जागेवर भाजी व मटण मार्केट उभारणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टिने यावर स्थानिक पारडीवासियांनी आश्‍चर्य व्यक्त करीत आहे.
पारडी-भांडेवाडी परिसरातील इतर आरक्षणे वगळून येथे वातानुकूलित मार्केट उभारण्यासाठी ५ एप्रिल २०२२ रोजी देखील गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक झाली .राज्याच्या नगर विकास विभागाने यास मंजुरी प्रदान केली असून सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च यावर केला जाणार होता.गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत पारडी-भांडेवाडी येथे अत्याधुनिक बाजारपेठ उभारण्याचे जाहीर केले होते.या जागेवरील सर्व आरक्षणे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती पूर्व नागपूराचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले होते.पारडी-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर बाजार भरत असल्याने अनेक अपघातात होत असल्याचे कारण सांगण्यात आले मात्र,याच दरम्यान पारडी उड्डाणपूलाच्या निर्मितीत लागलेला अक्षम्य वेळ यामुळे एच.बी.टाऊन चौकात झालेले अनेक अपघात यामुळे देखील पारडी पूल चांगलाच चर्चेत आला.
या भूल भुलैया चौकातून वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करतात. चहूबाजूंनी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढल्याने ध्वनि प्रदुषण व वायू प्रदुषनाने उच्चांक गाठला असल्याचे येथील स्थानिक सांगतात.वाहनांचा इतका कर्णकर्कश आवाज असतो की दोन व्यक्ती हे आपापसात बोलू  देखील शकत नाही आणि ही स्थिती संपूर्ण दिवसभरच असते असे येथील स्थानिक सांगतात.फार मोठा फेरा मारुन जाण्या ऐवजी सर्रास राँग साईडने दुचाकी दामटवली जाते,(‘सत्ताधीश’ने ही हा प्रसंग अचूक कॅमरामध्ये कैद केला)जीवावर उदार होऊन या चौकाशी प्रदक्ष्णा घातली जाते,पूलाखालील मधला मोकळा मार्ग हा देखील अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे,या मोकळ्या मार्गातून सर्रास दूस-या बाजूला वाहनधारक आपली वाहने दामटताना दिसून पडतात. याशिवाय अतिशय रहदारीचा रस्ता असताना देखील खड्डयाने भरलेल्या रस्त्यांमुळे, उंचबळणा-या खड्ड्यातून मार्ग काढत असताना,वाहनधारकांच्या उरल्या सुरल्या सहनशीलता देखील पारडी पूल अंत बघत असतो.
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा निर्माण करणा-या ‘महारेल’ या स्वतंत्र्य कंपनीकडून येत्या काळात २०० पुलांचे काम राज्यात पूर्ण करुन घेण्यात येईल अशी घोषणा केली.महाराष्ट्र शासन व याच महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(महारेल)यांच्या माध्यमातून भट सभागृहासमोरील पूलाचे बांधकाम नागपूरात होत आहे मात्र,या संपूर्ण मार्गावर रुंदीचे अंतर हे कमी-अधिक असून जागतिक स्तराच्या ‘वर्ल्ड क्लास’ सुरेश भट सभागृहासमोरील या पुलामुळे झालेल्या अतिशय चिंचोळ्या मार्गामुळे (वर्ल्ड क्लास) सुरेश भट सभागृह‘थर्ड क्लास’सुविधेचे करुन टाकले असल्याची टिका सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात उमटलेली दिसून पडते.महारेलद्वारा निर्मित या पुलामुळे सभागृहातील कार्यक्रम सुटल्यानंतर बाहेर निघणारी गर्दी ही पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी व या मार्गावरुन जाणा-या वाहनधारकांसाठी जीवघेणी ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात,देशातील नागपूर हे एकमेव असे शहर आहे जिथे नागपूर महानगरपालिका,नागपूर सुधार प्रन्यास,एनएमआरडीए,महामेट्रो,महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅरपोरेशन(एमएसआयडीसी),गडकरी यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अशी सात विकास प्राधिकरणे एकसाथ विकासाची विविध प्रकल्प एकाच शहरात करताना आढळत आहेत.यातील एमएसआयडीसी हे प्राधिकरण तर महामेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षीत यांच्यासाठी खास निर्मिला गेला असल्याची चर्चा आहे.गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट मेट्रो हा वास्तवतेत उतरविण्यात दीक्षीत यांचा फार मोठा वाटा असल्याने ते गडकरी यांच्या फार जवळचे अधिकारी समजले जातात.
या सर्व(अशाश्‍वत) विकासकामांच्या आणि विकास संस्थांच्या ‘सर्कशीत’ मात्र,नागपूरकरांचा ‘जोकर’झाला असून’जीना यहां मरना यहां,इसके सिवा जाना कहां!’विकासाच्या नावावर मृत्यू,अपघात,प्रदुषण,पर्यावरणाचा अतोनात -हास हेच नागपूरकरांचे प्राक्तन झाले आहे,अशी खंत ही समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात उमटलेली दिसून पडते.
याच सर्व धामधुमीत नागपूरात कोट्यावधींच्या आणखी दोन पुलांची घोषणा गडकरी यांनी केली आहे!
………………………………………………..
(या बातमी संबंधित व्हिडीयोज बातमीच्या शेवटी शेअर झालेल्या यूट्यूब लिंक ओपन करुन बघता येईल)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या