फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममाझ्या मुलांवरील बलात्काराचा आरोप 'षडयंत्र':आईचा टाहो

माझ्या मुलांवरील बलात्काराचा आरोप ‘षडयंत्र’:आईचा टाहो

Advertisements

बलात्कार पिडीता जन्मठेपेच्या अरोपींची मावस बहीण हा योगायोग कसा?

सामुहिक बलात्काराचा आरोप गंभीर निष्पक्ष तपासाची गरज:ज्वाला धोटे

नागपूर,ता.२७ एप्रिल २०२२: एखाद्या पोलिस ठाण्यात बलात्कार किवा सामुहिक बलात्काराची फियार्द नोंदवताच त्याची बातमी होते,झाडून पूसून सगळीच माध्यमे ती प्रसिद्ध करतात मात्र नागपूरात घडलेल्या जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सामुहिक बलात्काराची फिर्याद याला घटनांचे आणि योगायोगाचे अनेक कंगारे आढळतात परिणामी ऋषिल वय वर्षे १९ आणि रक्ष्त खोब्रागडे वय वर्षे २१ या दोन तरुणांना सामुहिक बलात्काराच्या अारोपात झालेली अटक हा पिडीतेने आपल्या मावस भावांचा घेतलेला ‘सूड’असल्याचा आरोप, आरोपींची आई यांनी केला असून २५ ऑगस्ट २०२० रोजी याच पिडीतेच्या मावस भावानी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केला होता,त्या आरोपात नुकतीच चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली असून एकाच आठवड्यात आता जन्मठेप झालेल्या आरोपींच्या मावस बहीणीने ऋषिल व रक्ष्त वर इतर एका आरोपीसह सामुहिक बलात्काराचा आरोप केला, हे कुभांड फक्त सूड घेण्यासाठी रचण्यात आल्याचा टाहो या दोन्ही तरुणांच्या आईने फोडला आहे.

महत्वाचे म्हणजे आधी पिडीतेने जरीपटका पोलिस ठाण्यात जाऊन फक्त एकेकाळी तिचा प्रियकर असणारा यश कांबळे वय वर्षे १८ याच्याच विरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात बलात्कारची तक्रार नोंदवली होती मात्र काही तासातच तिने बयाण बदलले व ऋषिल व रक्ष्ति यांनी देखील तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले,कोर्टातून दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळवली,आता त्यांना न्यायालयात नेले जातील,तेथून त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात होईल,मग ते कधी सूटून बाहेर येतील?त्यांच्यावर सूड उगवण्यात आला आहे हे मी कसे सिद्ध करु?साधं कॅटरिंगचं काम करणारी,नवरा नसलेली मी तीन मुलांची आई कुठे-कुठे,कोणाकोणाशी आणि किती लढू?असा टाहो या दोन्ही तरुणांच्या आईने फोडला.

२५ ऑगस्ट २०२० मध्ये ऐन लॉकडाऊनच्या काळात सायंकाळी ६.३० वाजता यश मेश्राम नावाच्या मुलाने नारा गवाच्या पुढे गंगोत्री लेनच्या पुढे सुनसान जागेवर अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घेऊन जाऊन,त्या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलीसोबत  शारिरीक संबंध प्रस्थापित केले मात्र त्याच वेळी अनित बोलके,रितीक मोहीले व अभिनेश देशभरतार यांनी त्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केला,पोक्सो कायद्यांतर्गत नुकतेच या चारही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १४ वर्षीय अल्पवयीन पिडीतेसोबत ही घटना घडल्यानंतर तब्बल एका महिन्याने पुन्हा या चारही अरोपींनी त्या अल्पवयीन मुलीला एकांतात चलण्यासाठी दमदाटी केली त्यावेळी घाबरुन पिडीतेने ही बाब आपल्या आईला सांगितली व घटनेच्या एका महिन्यानंतर जरीपटका पोलिस ठाण्यात चारही अरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल होता हे विशेष.

मात्र या चारही आराेपींना जन्मठेप होताच एकाच वस्तीत राहणारे आरोपीच्या कुटुंबियांनी ऋषिल व रक्ष्तच्या आईला,तुझ्या ही दोन्ही मुलांना लवकरच कायमचे गजाआड करु,असा दम दिला असल्याचे या दोन्ही तरुणांच्या आईचे म्हणने आहे.आरोपींच्या मावस बहीणीने अर्थात अल्पवयीन १७ वर्षीय पिडीतेने जरीपटका पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत तिने जो दिवस,दिनांक व वेळ नोंदवली आहे त्यावेळी मोठा मुलगा रक्ष्त हा एका रुग्णालयात होता तर धाकटा भाऊ ऋषिल हा एका दूकानात बसला होता,मात्र पोलिसांनी केवळ पिडीतेच्या बयाणावर गुन्हा नोंदवून त्वरित दोन्ही भावांना अटक केली,त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपसावे,रुग्णालयातील अनेक जण साक्ष देण्यास तयार आहेत त्यावेळी मोठा मुलगा हा रुग्णालयात होता,तर धाकटा हा दूकानात बसला होता याची साक्ष देण्यास संपूर्ण इंदाेरा वस्ती देण्यास तयार असल्याचा आर्जव या दोन्ही तरुणांची आई माध्यमांकडे करीत आहे.

पोलिसांनी दोन्ही मुलांचे कपडे घरुन मागवले ते ही आम्ही पोलिस ठाण्यात नेऊन दिले.ते कपडे न्यायालयात सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र जिने बलात्काराचा अारोप केला त्या पिडीतेनेच सांगावे असे अघटीत घडताना माझ्या मुलांनी कोणत्या रंगाचे कपडे घातले होते,तेच कपडे मी ठाण्यात नेऊन देते मात्र पोलिसांनी फक्त घरुन कपडे आणण्याचे सांगितल्याने आम्ही दोन्ही मुलांचे कपडे पोलिस ठाण्यात पोहोचवून आलो.

भारतीय संस्कारात ही गोष्ट तरी स्वीकार्य आहे का की दोघे सख्खे भाऊ एखाद्या मुलीवर एकमेकांसमाेरच अत्याचार करतील?अजून तरी भारतीय समाज इतका पुढारलेला नाही की इतकी खासगी बाब दोघे भाऊ एकमेकांसमोर करतील असे देखील वस्तीवाल्यांचे म्हणने आहे.हे दोन्ही तरुण खूप साध्या स्वभावाचे असून वडील नसल्याने आईचा आधार बनून आईला कष्टाने दोन पैसे कमविण्यात मदत करतात मात्र त्यांच्या कुटूंबात अघटित घडले त्यावेळी हे दोन्ही भाऊ देखील कोसळले,बलात्काराची भयाणता स्वत:च्याच घरात अनुभवणारे तरुण इतर कोणा मुलीसोबत असे कृत्य करु शकतील का?असा सवाल आता वस्तीतील नागरिक विचारत आहेत.

ज्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने फिर्याद नोंदवली आहे ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून तिची व यश कांबळे याची एकाच वस्तीत राहत असल्याने ओळख झाली.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.यश हा मजुरीची कामे करतो.दोघेही २०२० पासूनच संबंधात होते.दरम्यान मुलीचे दूसरीकडे सूत जुळले,त्यातून दोघांचेही भांडणे होऊ लागली.मुलीसोबतच्या अंतरंग क्षणाची चित्रफित व्हायरल करण्याची धमकी यश पिडीतेला देत होता.याच चित्रफितीच्या आधारे ऋषिल व रक्ष्तने देखील अत्याचार केल्याचा अारोप पिडीतेने केला आहे.

प्रसार-प्रचार माध्यमांमध्ये अल्पवयीन मुलीसोबत सामुहिक बलात्काराची बातमी चांगलीच व्हायरल झाली मात्र त्या मागील सत्य जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नसल्याचा टाहो या आईने फोडला.अद्याप संपूर्ण भविष्य दोन्ही मुलांचं घडायचं आहे,लवकरच मोठा मुलगा गाडी शिकून टॅम्पोवर काम करणार होता.एक स्वयपाक खोली व एक एकच लहानशी खोली असणा-या छोट्याशा घरात वडील नसलेल्या या दोन्ही तरुणांनी चांगल्या भविष्याचे स्वप्न बघितले होते.याच खोलित भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देदिप्यमान छायाचित्रे लागली आहेत.रोज सकाळी उठून कष्टाची भाकर मिळवणे याच विवंचनेत असणारे दोघे भाऊ हे फक्त आरोपी यश कांबळेचे मित्र होते केवळ या एका सबबीखाली त्यांची ही नावे बलात्का-यांमध्ये गोवण्यात आल्याने एका आईने हातपाय गाळले असल्याचे या तरुणांची मोठी आई सांगते.

एक तथाकथित महिला स्वयंसेवी व पत्रकार हिची सुरवातीपासूनची भूमिका या संपूर्ण घटनेत ही आरोपींना वाचवण्यासाठीची होती.२०२० साली जेव्हा आम्ही चारही आरोपींच्या विरुद्ध तक्रार देण्यास गेलो होतो तेव्हा ती स्वयंसेवी महिला पोलिसांनाच आरोपींविरोधात गुन्हा न नोंदवण्यासाठी दमदाटी करीत होती.आम्हालाही बघून घेईल अशी धमकी ती देत होती,एका फार मोठ्या माजी मंत्र्यांची ती ‘खास’असल्याने आम्हाला कायदेशीर न्यायापासून वंचित ठेवण्यासाठी तिने भरपूर प्रयत्न केले मात्र गुन्ह्याची गंभीरता बघता जरीपटका पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी ताबडतोब आरोपींना अटक केली.त्यांना जामीन मिळू नये यासाठी आम्ही स्वत: पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो,त्यांनी स्वत: जरीपटका पोलिसांना फोन करुन या गुन्ह्यात चारही आरोपींना न्यायालयातून जामीन मिळू नये असे आदेश दिले होते,पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळेच आज ते चारही आरोपी कायमचे गजाआड झालेत मात्र आता त्याचाच सूड उगवण्यासाठी माझ्या दोन्ही निरपराध मुलांना पिडीता गोवत असल्याचा आरोप या तरुणांची आई करीत आहे.

थोडक्यात अलीकडच्या काळात ‘बलात्कार’ या शब्द आणि कृती मागील गांर्भीर्याची दखल न घेता किती सहजनेते या शब्दाचा वापर केला जातो हे दररोज वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने वाचून सुजाण वाचकांच्याही लक्षात येतं.कोणतेतरी इप्सित साधण्यासाठी एवढा गंभीर आरोप करण्याची सध्या राजकीय वर्तुळात देखील टूम निघालेली दिसतेय.भाजपचे नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक यांच्यावर तर २७ वर्षांनंतर त्यांच्या दुस-या पत्नीने बलात्काराचा आरोप केला व त्यांच्या मुलाला पित्याकडून सर्व कायदेशीर अधिकार मिळावे(कारण मुलाला आधीच नाईक यांनी स्वत:चे नाव दिले आहे)यासाठी त्या माध्यमांसमोर आल्या असल्याची वल्गना त्यांनी केली.त्यांचा हा आरोप ऐकून महाराष्ट्रील स्त्री वर्गाला हसावे की रडावे?हेच उमजले नाही.शिवसेनेच्या एका माजी मंत्र्यांवर अवघ्या २४ वर्षीय स्वजातीच्या तरुणीच्या आत्महत्या किंबहूना हत्येचा आरोप लागलेला अवघ्या महाराष्ट्रानेच बघितला.नाईक यांनी तर त्या महिलेला घर दिले,तिचे बाळंतपणही विदेशात केले,ज्या बाबींवर फक्त नाईक यांच्या पत्नीचाच अधिकार होता त्या बाबींमध्ये या दुस-या स्त्रीला वाटेकरी बनवले आणि अचानक २७ वर्षांनंतर जगाच्या नजरेत दुस-या पत्नीचा मान असणा-या या महिलेने चक्क नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवावा!हे अनेकांच्या पचनी पडले नाही,परिणामी नागपूरातील इंदाेरासारख्या एखाद्या वस्तीत एखादी पिडीत जेव्हा दोन तरुणांनाही बलात्काराच्या आरोपात गोवते तेव्हा या शब्दाची ‘दाहकता’ अधिकच तीव्र असते.

बलात्कार’ हा फक्त एक शब्द नसून संपूर्ण स्त्री वर्गासाठी ती एक वेदनादायी पिडा,एक अभिशाप आहे.अनेक कोवळ्या वयांचे जीव गेलेत या कृतीमुळे,अनेक तरुणीं या सुखरुप घरी पोहोचल्याच नाही,अश्‍यावेळी फक्त आपल्या भावाचा सूड उगवण्यासाठी दोन तरुणांचे संपूर्ण आयुष्य हे न केलेल्या गुन्ह्यासाठी दाव वर लागत असेल तर स्त्री वर्गानीच एका निराधार आईसाठी पुढे येण्याची गरज आहे.

तपास निष्पक्ष व्हावा:ज्वाला धोटे(अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा)
या प्रकरणात आरोपी दोन्ही तरुणांच्या आईने माझ्याशी संपर्क साधला.त्यांची मुले ही निरपराध आहेत असे त्या सांगतात.जर फक्त सूड उगवण्यासाठी जर या दोन्ही भावांवर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा नोंदवला जात असेल तर जरीपटका पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करने गरजेचे आहे.खरा दोषी गजाआड होने गरजेचे आहे मात्र निरपराध तरुणांना शिक्षा होता कामा नये.शंभर अपराधी सुटले तरी चालतील मात्र एखाद्या निरपराधाला शिक्षा होता कामा नये हे कायद्याच सांगतो.पोलिसांनी या दोन्ही भावांचे मोबाईलचे लोकेशन ट्रेस करावे,ते घटनेच्यावेळी खरंच घटनास्थळी उपस्थित होते की त्यांची आई सांगते त्याप्रमाणे मोठा भाऊ रुग्णालयात आणि धाकटा हा एका दूकानात बसला होता.आजच्या तांत्रिक युगात टेक्नॉलोजी एवढी अद्यावत झाली आहे की पोलिसांना खरे कोण आणि खोटे कोण हे उघड करण्यास वेळ लागत नाही.पोलिसांवर देखील एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे शहर सांभाळताना खूप ताण पडत असतो अशावेळी फक्त सूड उगवण्यासाठी गुन्हे नोंदवले जात असल्यास पोलिसांनी यावर देखील कठोर पाऊले उचलावी.दोन्ही बाजूने योग्य तो तपास करुन न्याय द्यावा.पिडीतेला देखील न्याय मिळायला हवा,निदोषांना देखील शिक्षा होता कामा नये.पिडीता ही १७ वर्षीय अल्पवयीन असल्याने पोक्सोसारख्या गंभीर कलमा या तरुणांवर लागल्या आहेत.यामुळे त्यांचे आयुष्यच अंधारात जाऊ शकणार आहे.पिडीतेने आधी फक्त एकाच आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवला मात्र यानंतर तिने या दोन्ही भावांवर देखील गुन्हा दाखल केला त्यामुळे संशयाला वाव मिळतो.मिडीया किवा कोणत्याही तथाकथित स्वयंसेवी महिलांच्या दबावात येऊन पोलिसांनी कारवाई करु नये.हा दोन तरुणांच्या भविष्याचा प्रश्‍न आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या