Homeनागपूर न्यूजकंदील पेटले अन् बत्ती गुल....

कंदील पेटले अन् बत्ती गुल….

Advertisements

जनरेटरने तारले अन्यथा आवाजही झाला असता बंद:आंदोलनस्थळी चर्चा

नागपूर,ता. २४ एप्रिल २०२२: राज्यातील भारनियमनाच्या विरोधात आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी संविधान चौकात रविवार.दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता भारतीय जनता पक्षातर्फे ’कंदील’आंदोलन करण्यात आले मात्र आंदोलन सुरु होताच पोलवरील सर्व लाईट्स बंद झाल्या विशेष म्हणजे भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी आंदोलन समाप्त झाल्याची घोषणा करताच क्षणाधार्त लाईट्सचा लख्ख ’उजेड’ पडला,परिणामी भाजपचे कंदील पेटजाच उर्जा मंत्र्यांनी बत्ती गुल केल्याची चर्चा आंदोलनस्थळी चांगलीच रंगली.

माजी उर्जामंत्री व आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात राज्य सरकार विशेष:उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात जोरदार नारे निदर्शनांची सुरवात होताच कधीही लोप न पावणारी संविधान चौकातील बत्ती अचानक गुल झाली,यावेळी संजय भेंडे यांचे भाषण सुरु असतानाच बत्ती गुल झाली,परिणामी भेंडे यांनी उर्जा मंत्र्यांवर तोंडसुख घेत आमचा आवाज दाबण्यासाठी संविधान चौकातील दिवे घालवण्यात आल्याची कोटी केली.‘सरकारी‘बत्ती गुल होताच भाजपचे कंदील जोमाने पेटले.

जनरेटरवर साऊंड सिस्टीम असल्याने किमान भाजप आंदोलनकारी नेत्यांचा आवाज मात्र उर्जा मंत्री स्वत:च्या शहरात दाबू शकले नाहीत.जवळपास एक तास अंधारातच प्रचंड नारेबाजी,घोषणा व आघाडी सरकारचा धिक्कार झाला.

भारनियमन बंद केले नाही तर आघाडी सरकारच्या प्रत्येक मंत्र्याच्या घरी कंदील देण्याचा इशारा देण्यात आला.भाजपचे चंद्रशेखर बावणकुळे,प्रवीण दटके,जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये,आमदार कृष्णा खोपडे,मोहन मते आदींनी प्रखरतेने आपली मते मांडली.उर्जा मंत्र्यांनी ऐन आंदोलनाच्या ‘वेळी’ व आंदोलनाच्या ’स्थळी’ बत्ती गुल केल्याने वक्त्यांना आणखीनच जोश चढला.शब्दांना धार चढली.यावेळी भारनियमनामुळे शेतकरीच नव्हे तर आरोग्य व्यवस्था देखील कशी कोलमडली आहे हे दाखविण्यासाठी आंदोलनस्थळी टेम्पोमध्ये प्रतिकात्मकरित्या ’रुग्ण’आणण्यात आला.ज्याचे ह्दय कार्यकर्ते जोरजोरात दाबत होते.एकीकडे सरकारी कार्यालयांकडे हजारो कोटींची थकबाकी असताना सामान्य ग्राहकांची ५०० रुपयांसाठी वीज कापली जात आहे.कोळशाची टंचाई,ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवण्यात आलेली वीजनिर्मिती संयत्रे,वीजेची मागणी कमी असतानाच देखभाल दुरुस्तीकडे उर्जा मंत्र्यांनी केलेले दुर्लक्ष,ग्राहकांवर लादण्यात आलेला अधिकचा अधिभार,सुरक्षा ठेवीच्या नावाखाली वीज ग्राहकांची होणारी लृट इ.अश्‍या अनेक प्रश्‍नांवर भाजपने आघाडी सरकारवर विशेष: उर्जा मंत्र्यांवर आगपाखड केली.

उर्जा मंत्र्यांनी ऐन आंदोलनाच्या वेळीच अचानक बत्तीच गुल केल्याने ख-या अर्थाने भारनियमनचा झटका दाखवित फक्त कंदीलांच्या प्रकाशातच आपले आंदोलन तडीस न्यावे लागल्याची चर्चा आंदोलनस्थळी रंगली.

‘सत्ताधीश’ने यावेळी संविधान चौकात गेल्या ५२ दिवसांपासून आंदोलन करीत असणा-या अर्धसैनिक बलाच्या विद्यार्थ्यांना ‘बत्ती गुल’बाबत विचारणा केली असता अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी जे उत्तर दिले ते पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या पदाला व कार्याला न शोभणारेच होते.देश असो किवा राज्य,विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी अश्‍या पातळीवर उतरणे कितपत योग्य आहे,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोरच देशातील भावी पिढीला तरी आपण कोणता आदर्श देत आहोत?याचाही विचार करायला हवा,असेच आता म्हणावे लागेल.

 

 

 

 

Latest बातम्या