Homeनागपूर न्यूजभाजप आमदाराची जीभ घसरली....

भाजप आमदाराची जीभ घसरली….

Advertisements

भाजप आमदाराने शिवसेना खासदाराला म्हटले ’भडवा!

नागपूर,ता.२४ एप्रिल २०२२: असे म्हणतात राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किवा मित्र नसतो,एकेकाळचे शत्रू सत्तेसाठी मित्र बनू शकतात तर कायमचे शत्रू हे देखील सत्ताकारणासाठी मित्र बनल्याचे उदाहरण जगात कुठेही शोधण्याची गरज नसून, पुरोगामी महाराष्ट्राचेच उदाहरण आता जगभराला दिल्या जात आहे,कोणीही कल्पना केली नव्हती अश्‍या देवदुर्लभ घडामोडी २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात विधान सभेच्या निवडणूका ओटोपल्यानंतर, प्रत्यक्ष राजकारणाच्या सारीपाटावर घडताना अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेने बघितल्या.एकेकाळचे कायमची शत्रू असणारी काँग्रेस व त्याच काँग्रेसमधून फूटून निघालेली त्याच विचारसरणीच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाराष्ट्रातील शिवसेनासारखा कट्टर हिंदूत्वावादी पक्ष सत्तेसाठी गटबंधन करेल हे २०१९ पूर्वी कुण्या ज्योतिषानेही सांगितले असते तरी कोणाचा विश्‍वास बसला नसता मात्र हे ‘अभूतपूर्व सत्ताकारण’महाराष्ट्रात घडले,त्यामुळेच राजकारणात कधीही,काहीही घडू शकतं हे माहिती असताना देखील एका पक्षाचे राजकारणी दुस-या पक्षातील नेत्याला जेव्हा पातळी सोडून शिव्याश्राप देतात तेव्हा त्याची ‘बातमी’होत असते.

अशीच एक बाब आज संविधान चौकात आघाडी सरकार तसेच उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात भारतीय जनतापक्षातर्फे करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात घडली.याप्रसंगी भाजपचे आमदार मोहन मते यांनी शिवसेनेवर प्रहार करताना शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना चक्क ’भडवा’अशी शिवी दिली!बोलण्याच्या आणि संतापाच्या ओघात जरी मते हे बोलून गेले तरी यावेळी ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारले गेले होते ते माजी उर्जामंत्री व विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे,शहराध्यक्ष प्रवीण दटके,जिल्हाध्यक्ष गजभिये आदींचे चेहरे मात्र बघण्यासारखे झाले होते.भाजपने आज रविवार दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता संविधान चौकात महाविकासआघाडीच्या विरोधात राज्यातील भारनियमन,वाढीव अनामत रक्कम,वीज कनेक्शन तोडणे,वीज ग्राहकांवर अधिभाराचा भुर्दंड इ.मुद्दांवर ’कंदील’आंदोलन केले,यावेळी आमदार कृष्णा खापेडे,गजभिये,माजी महापौर दयाशंकर तिवारी आदी नेत्यांच्या भाषणानंतर दटके यांनी आ.मते यांना बोलण्याची संधी दिली.

मात्र बोलण्याच्या ओघात मते यांची जीभ घसरली.२०१९ च्या विधान सभेच्या निवडणूकीत भाजप-सेना हे युती करुन लढले,महाराष्ट्राच्या जनतेने या दोन्ही पक्षाल स्पष्ट बहूमत दिले असल्याचे ते म्हणाले. हे स्पष्ट बहूमत देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्याला बघून दिले होते,मात्र शिवसेनेच्या मनात बेईमानी होती आणि या बेईमानांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केली मात्र गेल्या अडीच वर्षांपासून करोनाचा काळ असो किवा बांधावर जाऊन शेतक-यांना कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं ते पूर्ण करु शकले नाही,या राज्यात आज ज्या पद्धतीचं राजकारण आहे ते बघता शिवसेनेचं हे सरकार खरंच जनतेसोबत आहे की संजय राऊतसारख्या भडव्यासोबत आहे…..!अशी मतेंची जीभ घसरली.

याप्रसंगी मते यांनी राऊतांची ’औकात’देखील काढली,हिंमत असेल तर भाजपच्या एखाद्या तरी माणसासमोर वन टू वन ये,लढ आणि तू आपली लायकी बघून घे,असे आव्हान देत यानंतर मते यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे वळवला,ठाकरे यांना ’घरकोंबडा’मुख्यमंत्री अशी उपमा देत हा मुख्यमंत्री तर दीड वर्ष मंत्रालयातसुद्धा आला नसल्याची टिका त्यांनी केली.

शिवसेनेचे खासदार सजंय राऊत यांनी देखील नुकतेच मुंबईतील पत्र परिषदेत चक्क शिवराळ भाषा वापरत भाजपचे माजी आमदार किरीट सोमैय्यांसाठी शिव्यांची लाखोळी वाहीलेली अवघ्या महाराष्ट्राने बघितले होते,आज भाजपच्या आमदाराने देखील शिवसेनेवर प्रहार करताना भाषेची मर्यादा ओलांडल्याने लवकरच मते यांचा ’सोमैय्या’होणार असल्याची चर्चा आंदोलनस्थळी रंगली.

२०१४ मध्ये भाजप-सेनेची २० वर्ष जुनी युती तुटल्यानंतर दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले,त्यावेळी सोमैय्या यांनी शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचारांच्या आरोपांची झडी लावली होती आणि सेनेच्या ’हिटलिस्ट’वर आले,मात्र त्यांच्या दूर्देवाने २०१९ ची निवडणूक हे दोन्ही पक्ष युती करुन लढले भाजपला १०५ तर सेनेने ५८ जागा जिंकल्या मात्र या निवडणूकीत सेनेने सोमैय्या यांचा वचपा काढत त्यांना उमेदवारीच मिळू दिली नाही.निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी ‘मातोश्री’चं मन वळवण्याचं प्रयत्न केला होता मात्र ज्या सोमैय्यांनी त्यांना पळता भुई सोडली नव्हती त्यांना काहीही करुन विधीमंडळात प्रवेश न देण्याचा निर्धार ‘मातोश्री’ने व्यक्त केला,अखेरच्या क्षणी सोमैय्यांना डावलून भाजपने दुस-याला उमेदवारी दिली.

२०१९ च्या निवडणूकीत मात्र युतीला स्पष्ट बहूमत मिळाले तरी सरकार स्थापन होऊ शकली नाही आणि सोमैय्यांना पुन्हा एकदा सेनेवर चाल करुन जाण्याची सुवर्ण संधी भाजपतर्फे उपलब्ध झाली.

हल्ली महाराष्ट्रसारख्या ‘सुसंस्कृत’ समजल्या जाणा-या राज्यात राजकारणाची जी पातळी घसरलेली दिसतेय,आक्रस्ताळेपणा,आक्रमकपणाला ऊत आलेला दिसतोय त्यात आता भाजपच्या आमदाराचीही भर पडली असून सार्वजनिक जिवनात वावरणारे हे लोकप्रतिनिधी,जनतेचे कैवारी मूळात किती सामान्य कुवतीचे असतात याचा प्रत्यय जनता घेतच आहे.

मते यांनी राऊतांवर आज जरी शरसंधान साधले असले तरी भविष्यात पुन्हा भाजप-सेनेची युती झाल्यास ‘हिशेब’चुकता करण्यास सेना विसरत नाही,हे सोमैय्या यांच्या उदाहरणावरुन तरी आमदार माेहन मतेंनी सिख घ्यायला हवी होती,अशीच चर्चा आंदोलनास्थळी रंगली होती.

Latest बातम्या