

नागपूरकर कॉंग्रेस नेते कोल्हापूरात तळ ठोकून
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी उद्या मतदान:१६ एप्रिल रोजी मतमोजणी
‘मतदारांचं ठरलंय’काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना प्रचंड बहूमताने करणार विजयी
आघाडी एकसंघ:भाजपचा डाव उलटा पडणार
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.११ एप्रिल २०२२: अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारतोफा काल सायंकाळी शांत झाल्या.उद्या मंगळवार दि.१२ एप्रिल रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे मात्र नागपूकरचे काँग्रेस श्रेष्ठी गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरात तळ ठोकून आहेत.काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे काेरोनामुळे देहवासन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या धर्मपत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली असून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये जे काँग्रेसचे उमेदवार होते त्या सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.या पूर्वी राज्यात पार पडलेल्या पंढरपूरची पोटनिवडणूक भाजपने जिंकली तर नांदेड-देगलूरची जागा काँग्रेसने राखली होती,कोल्हापूरची पोटनिवडणूक ही राज्यात होणारी तिसरी पोटनिवडणूक असून अवघ्या राज्याचे आता, ही तिसरी लढत कोण जिंकतो?याकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना एकदिलाने आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यासाठी लढत असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.नांदेड-देगलूरची निवडणूक ६० हजारांच्या मताधिक्याने काँग्रेसने जिंकली होती तोच इतिहास पुन्हा घडणार असल्याचे लोंढे यांनी खास ’सत्ताधीश’शी बोलताना सांगितले.उत्तर कोल्हापूर हे पूर्ण काँग्रेसमय आहे.नुकतीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा या मतदारसंघात झाली तेव्हा बाहेरुन भाडेत्रू कार्यकर्त्यांनी भरलेल्या १७५ गाड्या भाजपला सभास्थळी आणाव्या लागल्या यावरुन या मतदारसंघातील मतदारांच्या ‘मूडचा’ अंदाज तुम्ही घेऊ शकता,असे लोंढे यांनी सांगितले.
गेल्या निवडणूकीत जो उमेदवार काँग्रेसचा होता तो आता भाजपचा उमेदवार आहे याने काही फरक पडला का?या प्रश्नावर बोलताना ’कार्यकर्ता पक्ष सोडतो याचा अर्थ मतदार थोडी पक्ष सोडतात’असे उत्तर त्यांनी दिले.काँग्रेसचा मतदार हा विचारधारेशी एवढा एकनिष्ठ असतो की तो काहीही झाले तरी भाजपला मतदान करीत नाही.
कोल्हापूरातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मुन्ना महाडीक यांनी चक्क महिलांचाच अपमान केला.’महिला कुठे बाहेर निघतात?महिला बाहेर निघून काम करीत असतात का?अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली होती,महिलांच्या कार्यकर्तृत्वाला दुय्यम लेखणा-या भाजप नेत्याच्या या मानसिकतेवर देखील महिला मतदारांचा रोष असल्याचे लोंढे म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत महिलांना हळदी-कूंकूवासाठी बोलावण्यात आले.पूजा राहणार आहे असे सांगितल्याने मोठ्या प्रमाणात महिला जमा झाल्या मात्र या ठिकाणी पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करताच महिलांनी पदरातले वाण फेकून दिले.या घटनेवरुन देखील भाजपवरचा रोष दिसून पडतो,असे लोंढे म्हणाले.
फडणवीस यांनी आपल्या प्रचारात पुन्हा एकदा धर्म आणि हिंदूत्वालाच हात घातला.३७० कलम,काश्मीर फाईल्स हा त्यांचा भाषणाचा व प्रचाराचा रोख होता मात्र विकासाच्या मुद्दावर ते काहीच बोलले नाहीत.
रामनवमीनिमित्त श्रीरामाचे मोठमोठे कटआउट्स लावण्यात आले.चंद्रकांत दादा पाटील पाच वर्ष कोल्हापूरचे पालकमंत्री होते,त्या वेळी का उत्साहात रामनवमी मोठमोठे कटआऊट्स लाऊन साजरी केली नाही?हा प्रश्न मतदारांनाही पडला आहे.
‘वेगळा जाहीरनामा’चा ढोल भाजप बडवित आहे मात्र पंचगंगा शुद्ध करण्यावाचून त्यांना आतापर्यंत कोणी रोखले होते?असा सवाल लोंढे करतात.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या मतदारांना उद्देशून जे संबोधन केले तो ’बुस्टर डोज’होता.हे खरे आहे या विधानसभेचे पाच वेळा शिवसेनेच्या आमदारांनी प्रतिनिधित्व केले.यावेळी देखील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे, ही जागा शिवसेनेसाठी सुटावी म्हणून आग्रही होते मात्र स्वत: उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीमध्ये बोलावून त्यांची नाराजी दूर केली.यानंतर त्यांनी त्यांच्या घरी शिवसैनिकांच्या बैठका घेतल्या.त्या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने सहभागी झालेत.उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत असून ‘त्यांचा आदेश अंतिम आदेश’शिवसैनिक मानत असतो,त्यामुळे फडणवीस यांनी ’कोल्हापुरात शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही’हा जो ‘हवाई-ईमला’बांधला आहे तो हवेतच धराशायी होणार असल्याचे अतुल लोंढे दावा करतात.
आघाडीत प्रचंड समन्वय असून काँग्रेसचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शेवटच्या सभेत मतदारांना जे आव्हानात्मक भाषण केले आहे त्याचा देखील प्रभाव उद्याचा मतदानावर निश्चितच होणार असल्याचे ते सांगतात.
भाजप या पोटनिवडणूकीतील पराभवाला इतकी घाबरली आहे की पैश्यांनी मतदारांना प्रलोभन देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.मंगळवार पेठेतील पद्मावती परिसरातील भाजपच्या माजी नगरसेविका सुनंदा मोहिते यांच्या कार्यालयातून रोख पैशाची पाकिटे,मतदारांची यादी व भाजपची प्रचार पत्रके सापडली आहेत.दसरा चौकातही पैसे वाटपाचा खेळ उघड झाला आहे.एखादी पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते मात्र भाजपचा पराभव करुन आघाडीच्या महिला उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला असून उद्याचे मतदान ही फक्त ‘औपचारिकताच’असल्याचा दावा अतुल लोंढे यांनी केला.

आमचे चॅनल subscribe करा