Homeनागपूर न्यूजज्वाला धोटे यांची वाटचाल खासदारकीकडे!

ज्वाला धोटे यांची वाटचाल खासदारकीकडे!

Advertisements

सर्वच पक्षातून ज्वाला धोटेंचं स्वागत:योग्य वेळी निर्णय जाहीर करणार

विदर्भाचे सगळे जिल्हे हे जाबुंतराव धोटेंचीच कर्मभूमी:११ वर्ष खासदार असणा-या धोटेंच्या मुलीला खासदारकी का मिळू नये?धोटे यांचा सवाल

घराणेशाही ही राजकीय पक्षांचीच मक्तेदारी नाही:राष्ट्रवादीला मात्र कायमचा रामराम

नागपूर,ता.४ मार्च २०२२ :ऐन गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी पक्षाच्या धडाडीच्या तोफ,अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी राष्ट्रवादीला शेवटचा रामराम करुन पक्षत्याग केला.राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असताना देखील ज्वाला धोटे यांनी पक्षाचे जोखड खांद्यावरुन काढून फेकण्याची जिगर दाखवली.गेल्या ९ महिन्यांपासून या पक्षात त्यांची जी घुसमट झाली ते बघता त्यांनी पक्ष सोडण्याची तयारी काही महिन्यांपूर्वीच केली होती,हे त्यांच्या विधानांवरुन लक्षात येत होतं.शहरातील बहूचर्चित वस्ती गंगा-जमुना पोलिस आयुक्तां अमितेश कुमार यांनी बंदिस्त केली,सख्त पोलिस पहारा लावला,कलम १४४ लागू केले.वारांगनांच्या घरांवर नोटीसा चिटकवल्या,सभ्य समजाचा वारांगणांना पाठींबा नसल्याने त्यांची आर्थिक,मानसिक व भावनिक कुचंबना बघता ज्वाला धोटे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या मात्र मुंबईत त्यांच्याच राष्ट्रवादीच्या गृहखात्याच्या मंत्रालयापर्यंत व गृृृृृृृृृृृृृृृृृृृहमंत्र्यांपर्यंत त्यांचा आवज पोहोचून देखील प्रभावी कारवाई झालीच नाही.नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरुद्ध तर त्यांनी उघडपणे दंड थोपटले.अमितेश कुमार यांचे सासरे कश्‍याप्रकारे आघाडी सरकारची थट्टा सोशल मिडीयावर करतात याची ब्लू-प्रिंटच त्यांनी माध्यमांसमोर प्रदर्शित केली.याविरोधात त्यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली मात्र कारवाई शून्यच.

मुंबईचे गृहखाते ज्वाला धोटे यांच्या लढ्याला गांर्भीयाने घेण्याच्या मूडमध्ये नव्हती व कोणत्याही स्वाभिमानी माणसाला त्यामुळे अशी घुसमट सहन करने शक्य नव्हते.परिणरामी त्यांनी राष्ट्रवादीला हजार बोल लाऊन पक्ष त्याग केला. याबाबत कोणालाही आश्‍चर्य ही वाटलं नाही मात्र राजकारणात भविष्यातील त्यांची वाटचाल आता नेमकी काय असणार आहे? याबाबत चर्चेला आता उधाण आले आहे. २०२४ मध्ये त्यांचा सरळ खासदारकी लढण्याचा मानस असल्याची जोरदार चर्चा आहे.विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हे कुण्या एका शहरापूरते मर्यादीत नव्हते तर विदर्भातील सर्वच ११ जिल्ह्यांमध्ये त्यांचा प्रभाव होता.११ वर्ष ते अपक्ष खासदार राहीले होते.आता त्यांची ही लेक उपराजधानीतील आपला राजकीय व सामाजिक वसा अधिक विस्तृत करण्यासाठी, दिल्लीतील संसदेत जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.ज्वाला धोटे यांनी पक्ष त्याग करताच भाजप,शिवसेनासह काँग्रेस अश्‍या सर्वच पक्षाचे पदाधिकारी त्यांना दूरध्वनिकरुन पक्षात येण्याचे निमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे.धोटे यांचा कल भारतीय जनता पक्षाकडे असल्याची देखील चर्चा आहे कारण पक्ष त्याग करताना त्यांनी महाविकासआघाडीला ज्या पद्धतीने धारेवर धरले ते बघता पुन्हा आघाडीतील तिन्ही पक्षातील एका पक्षात त्या प्रवेश करतील असे वाटत नाही मात्र जाबुंवंतराव धोटे यांनी एकेकाळी राष्ट्रीय काँग्रेसला देशात जिवनदान देताना विदर्भातून १८ आमदार निवडून दिले.१९८० मध्ये मात्र शरद पवार यांनी यातील काटोल मधील आमदार मुकुंद मानकर यांना फोडले.एका रात्रीत ते गायब झाले,त्यांनी शरद पवार यांच्या बाजूने मतदान केले व राज्यातील सरकार कोसळली.ही सल शेवटपर्यंत विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या मनाला सलत राहीली.त्यामुळे राष्ट्रवादीचा पक्षत्याग करुन त्याच काटोलमधून विद्यमान क्रीडा मंत्री यांच्या सहाय्याने त्या खासदारकीच्या रिगंणात उतरु शकतात,अशी शक्यता वर्तविली जात आहे.

सत्ताकारण व राजकारणासाठी शरद पवारांना फोडाफोडीची ही सवय तेव्हापासूनच असल्याचे ज्वाला धोटे नेहमीच उल्लेखित करतात.परिणामी पक्ष त्याग करताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व त्यांच्या धोरणांवर चांगलेच तोंडसुख घेतल्याचं दिसून पडलं.८० टक्के राजकारण व २० टक्के समाजकारण शरद पवारांचे हे बोलवचन निव्वळ थोतांड असल्याची टिका त्यांनी केली होती.शरद पवारांचे हे धोरण फक्त निवडणूकांमध्ये जनतेला आकर्षित करण्यापूरतीच मर्यादीत आहे.एखाद्या निवडणूक अजेंडाप्रमाणे ते हे वाक्य वापरतात.हा पक्ष फक्त धनदांडग्यांचा पक्ष आहे.यांना लढवैय्ये नेतृत्व नको आहे.फक्त वसूली एजेंट व कलेक्शन एजेंट हवे आहेत.या पक्षाची अन्यायग्रस्त,पिडीत शोषितांना न्याय देण्याची मानसिकताच नाही.या पक्षाचे गृहमंत्री मूकबधिर आहेत.निर्णय घेण्याचे धाडस त्यांच्यात नाही.गंगा-जमुना ज्या पोलिस आयुक्तांनी सील केली,निकीता चौधरीच्या हत्येला आत्महत्येचा रंग दिला,मकोकाच्या फरारी आरोपीसोबत पालकमंत्र्यांचा मूलगा,सून खुलेआम देश-विदेशांची वारी करतात त्याचे सर्व पुरावे देऊनही जे गप्पच बसतात,अश्‍या तीन चाकी ऑटो सरकारकडून आता न्यायाची अपेक्षा संपली असा संताप त्यांनी व्यक्त केला होता. नागपूरात जेव्हा या पक्षाच्या कार्यालयाचे कूलूपही उघडले नव्हते तेव्हापासून त्यांनी राष्ट्रवादीला उभारी दिल्याचे पत्र परिषदेत सांगितले.वडीलांची शिकवणच आहे ’संकटाचे सोबती बना’शहरात पक्ष बळकट केला,पक्षाची मान ताठ केली.मात्र राष्ट्रवादीत प्रवेश ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक नसून गुन्हाच होता अशी हताशा देखील त्या व्यक्त करतात.

नुकतेच १८ मार्च रोजी होळीच्या दिवशी नागपूरात काँग्रेसचे माजी महापौर पांडूरंग हिवरकर यांची कॉलर एक पोलिस शिपाई पकडतो,त्यांच्या मुलाला अक्षय हिवरकरला जनावरासारखे पोलिस ठाण्यात बदडले जाते,त्याचे पाय साखळीने बांधून जनावरासारखे त्याला ओढत आणल्या जातं.पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे एक बाप म्हणून ते टाहो फोडतात,हा काय नंगा नाच सुरु आहे?असा प्रश्‍न करतात तेव्हा पालकमंत्री म्हणतात ’सीपी मेरा सुनता नही!’

ॲड.सतीश उके यांच्यावर जुनी प्रकरणे उकरुन इडीची कारवाई होते.फडणवीस खुलेअाम सांगतात उकेंवर नागपूर पाेलिस व महाराष्ट्र पोलिसांच्या इडीकडे केलेल्या तक्रारीनंतर कारवाई झाली आणि आघाडी सरकारचे गृहमंत्री हे ‘देख तमाशा देख’बघत बसतात?राष्ट्रवादी पक्षाची कृती आणि धोरण यात जमीन असमानाचा फरक आहे.मुख्यमंत्री हे तर फक्त मुंबईचे मुख्ययमंत्री आहेत,उपमुख्यमंत्री हे पुणे-बारामतीचेच उपमुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भूमिका तर ‘नरोवा कुंजरवा’आहे.संपूर्ण विदर्भच या आघाडी सरकारने वा-यावर सोडला,साधन संपन्नतेने समृद्ध हा आमचा विदर्भ,वैभवशाली,विद्वानांचा हा विदर्भ,६६ आमदारांचा हा विदर्भ आता ‘विध्वंसक विदर्भ‘ करुन टाकला आहे.विदर्भातील ११ सूतगिरण्या बंद पाडल्या.कर्जबाजारी आघाडी सरकारची इतकी औकात नाही ते विदर्भाचा अनुशेष कधी तरी भरुन काढू शकतील,विदर्भाची जनता मेली काय अन् जगली काय?याचे कोणतेही साेयरसूतक आघाडी सरकारला नाही.त्यामुळे केंद्राने आघाडी सरकार बर्खास्त करुन राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची खळबळजनक मागणी देखील ज्वाला धोटे यांनी त्यांच्या पत्र परिषदेत केली होती.

पालकमंत्री तर आपल्या पत्नी सुमेधा राऊत यांच्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासची १२ हजार चौ.फूटांची जागा देण्यासाठी प्रन्याला चक्क पत्र लिहण्याचे धाडस करतात!आपल्या वैयक्तीक फायद्यासाठी मंत्री पदाचा दुरुपयोग करतात?पालकमंत्र्यांना गंगा-जमुनातील उपाशी मरत असणा-या वारांगणा दिसत नाहीत?पालकमंत्र्यांसारखा दूसरा डकैत नसल्याची कठोर टिका ज्वाला धोटे यांनी केली होती.

शिवसेनेलाही आडेहात घेत संजय राऊतांवर धोटे यांनी आगपाखड करीत, संजय राऊत उके यांच्या अटकेनंतर मिश्‍किलपणे आता नाना पटोले यांची देखील वेळ येऊ शकते असे सांगतात?भाजपवर आगपाखड करीत राहणारे संजय राऊत यांनी ॲड.उके यांनी त्यांना दिलेल्या पुराव्यांचे अाधी काय केले?हे जनतेला सांगावे,असे आव्हान त्यांनी केले.महाराष्ट्राची तपास यंत्रणा या लोणचे घालण्यासाठी आहेत का?केंद्राच्या दबावतंत्राला प्रत्यूत्तर का दिले जात नाही?कोणी हात बांधले?कर्मांनी हात बांधलेत का?इडी,सीबीआयच्या भीतीने फाटलेल्या चढ्ढ्या झाकण्यासाठीच सगळी पळापळ सुरु आहे,आघाडी सरकार ही जनतेची सरकार नाहीच तर स्वत:ला तुरुंगात जावे लागू नये या भितीने ‘घाबरलेले’सरकारल असल्याची जहरी टिका धोटे यांनी केली होती.

तीन पक्षांनी मिळून जनतेसाठी नाही तर आपापल्या काळ्या कृत्यांच्या संरक्षणासाठी स्थापन केलेली सरकार आहे.एकीकडे जांबुवतराव धोटेंनी त्यांना चालून आलेल्या उपमुख्यमंत्री पदाला लाथ मारली,इंदिरा गांधी यांनी देऊ केलेल्या संरक्षण मंत्री पदाला नकार दिला,धोटेंची ही कन्या म्हणूनच सत्तेत तिचा पक्ष असतानाही पक्ष सोडण्याचे धाडस दाखवू शकते,असे धोटे म्हणाल्या होत्या.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तृतीयपंथियांच्या अधिकारांवर संसदेत बोलतात,नागपूरातील वारांगनां या नागरिक नाहीत का?राज्यात सर्वच ठिकाणी देहव्यापार करणा-या वस्त्या सुरळीत सुरु आहेत मग फक्त नागपूरातच वारांगणांची वस्ती का नको?शरद पवार हे तर दिवसरात्र भाजपच्या विरोधात बोलत असतात,इतकं बोलतात की त्यांच्या तोंडातले पाणी ही सुखत नाही,केंद्राच्या धाेरणांविरुद्ध,शेतकरी कायद्यांविरुद्ध,वाढती महागाईविरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलन करा असे ते पक्ष कार्यकर्त्यांना आदेश देतात मात्र नागपूरात येताच ते सार्वजनिक मंचावरुन गडकरी यांची स्तुती करतात!एकीकडे भाजपला शिव्या दूसरीकडे भाजपचेच गडकरी यांच्यासारखा दूसरा विकासपुरुष शरद पवारांना दिसत नाही!भाजपचा दूसरा कोणताच मंत्री कामे करीतच नाही का?वरुन विरोध,आतून धागेदोरे जुळलेले.यांना विदर्भात कोणतंही नेतृत्व पुढे आलेले चालत नाही.वेळोवेळी त्यामुळेच माझी व्यथा मी माध्यमांसमोर मांडली.गृहमंत्री तुमचेच,सत्ता तुमचीच,असे टोमणे ही ऐकले मात्र विष पचवण्याची देखील एक मर्यादा असते.ती मर्यादा आता संपली आहे.

यामुळेच राष्ट्रवादी नावाचा ‘भ्रष्टवादी’ पक्ष मी सोडतेय,अर्बन सेलच्या सर्व पदाधिका-यांसह हा विभागच मी बर्खास्त केला असे सांगत, भविष्याच्या उदरात काय दडलं आहे ते भविष्यातच कळेल,अद्याप दोन वर्षांचा अवधी आहे विधानसभा व लोकसभेच्या निवडणूकीसाठी,असा सूचक इशारा देखील ज्वाला धोटे यांनी दिला होता.

एकदा चटका लागला आहे,भविष्यात अशी चूक होणार नाही,जनतेच्या प्रश्‍नांवर जो पक्ष साथ देईल तेव्हा त्या पक्षात जाण्याचा विचार करु,माझ्या राजकीय भविष्याची इतर कोणीही काळजी करु नये,असा दम देखील ज्वाला धोटे यांनी दिला होता.आपल्या पत्र परिषदेत ज्वाला धोटे यांनी शरद पवारांचा डीएनए पाठीत खंजिर खूपसण्याचाच असल्याकडे बोट दाखवले हाेते.जांबुवंतराव धोटे यांचे अत्यंत विश्‍वासू आमदारांपैकी असणारे मुकुंद मानकर रातोरात सुनील शिंदे यांच्यामार्फत फितूर झाले,गायब झाले.पवारांनी धूर्त खेळी केली,गोटी फिट केली व तख्ता पालट केला.अश्‍या या राष्ट्रवादीसोबत दहा वर्षे महाराष्ट्रात आघाडी करुन काँग्रेस रसातळात गेली असल्याची टिका देखील त्या करतात.मनसेचे राज ठाकरे हे शरद पवारांबाबत जे बोलले ते योग्यच असल्याचा निर्वाळा देखील त्या देतात.शरद पवार हे जाती-पातीचे राजकारण करुनच राजकारणाची पोळी शेकत असतात हे सत्यच असल्याचे ज्वाला धोटे सांगतात.

अश्‍या या पक्षाचा त्याग करुन या पुढे आमदारकी नव्हे तर आता खासदारकीच लढायची असल्याचा मानस त्यांचा असल्याची चर्चा आहे.विदर्भातून कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षातून किवा आपल्या वडीलांसारखाच अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक त्या लढतात,याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.

Latest बातम्या