
नागपूर,ता.२५ मार्च २०२२ : काेविडच्या काळातले दिवस हे विदारकच होते मात्र याच काळात शोध पत्रकारितेचेही महत्व उमटले.महाराष्ट्र सरकारने कोविड संदर्भातली संपूर्ण पारदर्शता पाळली,मृतकांच्या आकड्यांबाबत खरेपणा जपला,विरोधी पक्षाने मात्र फक्त राजकारण केलं.मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिस खात्याबाबत संपूर्ण देशात अविश्वासहर्ता पेरली.सुशांत सिंह आत्महत्येचं अखेर काय झालं?आर्यन खानच्या अम्ली पदार्थांच्या प्रकरणात काय घडलं?गुजरातसारख्या राज्यातील समुद्री बेटांवर अम्ली पदार्थाचे कंटेनरच्या कंटेनर सापडतात तरी देशात चर्चाही होत नाही,महाराष्ट्रात मात्र एक पूडी अम्ली पदार्थ सापडताच महाराष्ट्रातील जनताच जणू नशेडी आणि गंजेडी आहे असे चित्र रंगविण्यात आले.जो ‘पोलिस’ बनून फिरत होता तोच अखेर संशयाच्या भोव-यात सापडला.महाराष्ट्रात सूडाच्या राजकारणातून मंत्र्यांच्या,नेत्यांच्या विरोधात केंद्रिय तपास यंत्रणा या ज्या पद्धतीने काम करीत आहेत, ते बघता येत्या काळात सीबीआय,ईडी,आयकर विभाग यासारख्या तपास यंत्रणांचे सत्य देखील बाहेर येतील,या संस्थांची विश्वासहर्ता जपण्यासाठी आणि केंद्रात विरोधक असल्याने आम्हीच हे करणार असे विधान शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.
त्या आज प्रेस क्लब येथे ‘पत्रकारांशी संवाद’ या उपक्रमात बोलत होत्या.याप्रसंगी मंचावर संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रियंका म्हणाल्या,की आज देशा समोर दररोज वाढणारी महागाई,बेरोजगारी,धार्मिक कट्टरता,भावी पिढीचं भवितव्य,महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न यासारखे ज्वलंत प्रश्न असताना हेतुपुरस्सर देशाचे लक्ष मुद्दांवरुन भटकविले जात आहे.केंद्रिय तपास यंत्रणा तर कशासाठी बनवल्या गेल्या,त्यांचा मूळ उद्देश्य काय?हेच विस्मरणात गेले आहे.ज्यांनी जनतेच्या पैश्यांची लृट केली,बेकायदेशीरपणे काळा पैसा जमवला ते शाधून काढण्यासाठी या तपास यंत्रणा निर्मित झाल्या मात्र अलीकडे या नोकरशाही संस्थाच कमजोर झाल्याचे दिसून पडंतय.यांनी जर सरकारचा अजेंडा चालवला नाही तर संबंधित अधिका-यांना त्यांच्या नोकरीचे देखील वांदे होतील,अशी परिस्थिती आहे.ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टिने अतिशय हानिकारक बाब असून सत्ता कोणाचीही असो,पुढे हाच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे.ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्याच राज्यात या केंद्रिय तपास यंत्रणा सर्वाधिक कार्यशील असल्याचे दिसून पडतंय,असे त्यांनी सांगितले.
सुशांत सिंह राजपूत यांची स्वीय सहायक मृतक दिशा सालियान यांच्या पालकांनी तर आता राष्ट्रपतीपर्यंत धाव घेतली आहे.त्यांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे त्यांच्या एकुलत्या एक मृतक मुलीबाबत राजकीयस्तरावर जे काही चालले आहे कृपया ते थांबवा नाही तर आता आम्हीच स्वत:ला संपवून घेऊ!विरोधकांना विराेध करण्याचा संपूर्ण अधिकार आहे मात्र निदान खोटे आरोप तरी करु नका,येणा-या पिढीसाठी आपण आज कोणती विश्वासहर्ता आणि तपास संस्था संपवतोय याचा तरी विचार करा,असे आवाहन त्यांनी केले.
विदर्भ दौ-यात शिवसेनेविषयी तुम्हाला नेमके काय गवसले?या प्रश्नाबाबत बोलताना, २५ वर्षे आम्ही युतीत होतो.आम्ही युती पूर्ण नैतिकतेने जपली.शिवसैनिक मनापासून काम करीत होते मात्र युतीतील भारतीय जनता पक्षाने आपला नैतिक धर्म पाळला नाही त्यामुळे विदर्भात आम्ही माघारलो.त्यांच्यात गडात येऊन आता त्यांनाच आम्ही आव्हान देऊ,ही आता आमची जबाबदारी असून येणा-या काळातील सर्व स्थानिक पातळीवरील व राज्य पातळीवरील निवडणूका आम्ही पूर्ण जोश आणि होशमध्ये लढणार असल्याचे त्या म्हणाल्या.
शिवसेनेत सर्वोच्च पातळीवर महिला या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत,या प्रश्नावर बोलताना आम्ही आधी जमिनीस्तरावर महिलांना मजबूत करु तेव्हाच नेतृत्वस्तरावर त्या सक्षम होऊ शकतील.याच उद्देशाने आम्ही ‘प्रथम ती’हा उपक्रम आणला,असे त्यांनी सांगितले.
निवडणूका संपताच पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडत असल्याकडे लक्ष वेधले असता,‘निवडणूक संपली सवलत संपली’निवडणूकीच्या काळात गेले चार महिने १८० डॉलर प्रति बॅरल कच्च्या तेलाचे भाव गेले असतानाही केंद्र सरकारने देशात भाव वाढवले नाही आता ते १०० डॉलरपर्यंत प्रति बॅरल भाव घसरले असताना देखील केंद्र सरकार सातत्याने भाववाढ करीत आहे त्यात भरीस भर सेझ,विविध करांचा बोजा ही देशातील जनतेवर टाकल्या जात आहे.
समाज माध्यमांविषयी प्रश्न विचारला असता यात दाेन गोष्टी असल्याचे त्या म्हणाल्या. समाज माध्यमांना मोठ्या प्रमाणात फंडिंग कोण करतोय?आज भाजप हाच देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक श्रीमंत राजकीय पक्ष झाला आहे.पीएम केअर फंडचा हिशेब शेवटपर्यंत लागलाच नाही.‘धन और बल’ यांचा उपयोग करुन माईण्ड सेट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.एकच एक गोष्ट तोपर्यंत दाखवली जाते जोपर्यंत बघणा-यांचा माईण्ड सेट होत नाही,रशियाने हाच प्रयोग अमेरिकेच्या निवडणूकीत छुप्या पद्धतीने केला होता अाणि डोनाल्ड ट्रम्प निवडून आले होते.
प.बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोगताई गावात नुकतेच तीन महिला दोन लहान मुलांसह आठ जणांना अमानुष मारहाण करुन जिवंत पेटवण्यात आले,या घटनेविषयी विचारले असता ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना असल्याचे त्या म्हणाल्या.मुख्यमंत्री ममता बेनर्जी या सक्षम आहेत ते योग्य तपास करतील व दोषींना शिक्षा मिळेल असे प्रियंका यांनी सांगितले.
काश्मीर पंडितांबाबत बोलताना मीच हा मुद्दा संसदेत आपल्या भाषणात उपस्थित केला असल्याचे त्यांनी सांगितले.पंडितांच्या पलायनाविषयी नक्की बोला मात्र हे स्थलांतर होत होतं त्यावेळी व नंतरचे ३२ वर्ष गप्प का राहीलात?या देशात एकमेव हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी त्या वेळी काश्मीरी पंडितांच्या बाजूने आवाज उठवला एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दोन टक्के राखीव जागा ठेवल्या,देशात असं एका ही राज्याने केलं नाही.आता केंद्र सरकार सांगतेय त्यांनी ३ हजार रोजगार दिले,एक हजार देखील रोजगार कोणाला मिळाले नाहीत.काश्मीर पंडितांच्या समस्येवर बोलतात मात्र न्याय मिळाला का?त्यांच्या पुर्नवसनासाठी कोणतीही सुरक्ष्त जागा सांगितली का? जिथे ते कोणत्याही भितीशिवाय जगू शकतील.त्यांच्या घावांवरही फक्त राजकारण केले जात असल्याची टिका त्यांनी केली.
फोन टॅपिंग,पेन ड्राईव्ह मुद्दांवर बोलताना हे सर्व छेडछाड करुन केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.महाराष्ट्राच्या जनतेला सर्व कळतंय काय चालत आहे ते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत गोरेगाव येथे लवकरच ३०० आमदारांसाठी कायस्वरुपी घरे बांधण्याची घोषणा केली याबाबत विचारले असता सगळेच आमदार हे काही करोडपती नसतात,मुंबईसारख्या शहरात जनतेला आमदारांसोबत भेटण्यासाठी देखील जागा नसते.ही राज्य सरकारचीच जबाबदारी आहे आमदारांना मुंबईत थांबणे,राहणे यासाठी घर उपलब्ध करुन देने.हा अवास्तव खर्च नसल्याचे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रात ८९३२ शेतक-यांनी आत्महत्या केली यातील सर्वाधिक आत्महत्या या विदर्भातील शेतक-यांच्या आहेत,शिवसेनेची भूमिका याबाबत काय आहे?यावर बोलताना हा विषय देखील दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगून, आत्महत्या या काही गेल्या तीन वर्षातच होत नसून अनेक वर्षांपासून हे दृष्टचक्र सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही शेतक-यांवरील कराचा बोजा उतरवला,कर्ज माफीचे धोरण राबवले.शेतक-यांना कर्ज वाटप केले जात आहे.शेतक-यांनी देखील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.हा विषय संवेदनशील असून शेतक-यांच्या नावाने राजकारण केले जाऊ नये.शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा ही देखील फसवी असून हे घडायला अनेक वर्षांचा काळखंड लागणार आहे. विदर्भासाठी शिवसेनेचे धोरण ठरलेले आहे,ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करु,असे त्या म्हणाल्या
नवाब मलिक यांच्या प्रश्नावर बोलताना,त्यांचा राजीनामा कशाला घेणार?जो सिंघम क्रॉप बनून प्रसिद्ध झाला तो ‘अजेंडाधारी’होता हे सिद्ध झाले,असे समीर वानखेडे यांचे नाव न घेता प्रियंका म्हणाल्या.एकीकडे उत्तर प्रदेशात लखीमपूरमध्ये ज्याच्या वर संपूर्ण देशाच्याच कायदा व सुव्यवस्थेची जबावदारी आहे ते केंद्रिय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टैनी यांच्या मुलानेच शेतकरी आंदोलनातील शेतक-यांना आपल्या जीपखाली चिरडले,स्वत: उत्तर प्रदेशच्या या घटनेची चौकशी करणा-या विशेष तपास यंत्रणेने(एसआयटी)यात तथ्य असल्याचा अहवाल दिला मात्र तरीही गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही,मग नवाब मलिकांना तर खोट्या आरोपांखाली फसवण्यात आले आहे,त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे प्रियंका यांनी सांगितले.
वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांना देखील सूड भावनेतूनच लक्ष्य केल्याचे त्या म्हणाल्या.यावरुनच भाजप ही किती असुरक्षीत आहे हे सिद्ध होतं.एका महिलेच्या मागे ते इडीचा ससेमिरा लावतात.त्या निर्दोष आहेत हे येणारा काळच सांगेल.गवळी यांच्यावर भाजपने नसून शिवसेनेच्या उपप्रमुखांनीच आरोप केला असल्याचे प्रदीप मैत्र यांनी सांगितले असता,सत्य समोर येईलच असे सांगून हा प्रश्न प्रियंका चतुर्वेदी यांनी टोलवून दिला.
पंजाबमधील नवनिर्वाचित मान सरकारने आमदारांची पेंशन रद्द करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातही असं घडेल का?यावर बोलताना पंजाब सरकारचा हा निर्णय दु:खदायी असल्याचे त्या म्हणाल्या.आमदार पाच वर्ष जनतेची सेवा करतात,यानंतर त्यांना उत्पन्नाचे साधन नसते अश्यावेळी त्यांना पेंशनपासून वंचित ठेवणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भात फक्त गोरेवाडा प्राणि संग्रहालयाच्या नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित राहीले,विदर्भात जर त्यांना भक्कम पाय रोवायचे असेल तर विदर्भात ते कधी दौरे करणार आहेत?यावर बोलताना मुख्यमंत्र्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून त्यांना यथायोग्य आरामाची सूचना वैद्यकीय चमूने केली असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या तरी त्यांना प्रवास टाळायला सांगण्यात आले आहे मात्र त्यांच्या ऐवजी आम्ही सगळे आहोत ना,आम्हीच मुख्यमंत्र्यांचा आवाज आहोत,विदर्भाविषयीच्या धोरणात कोणतीही कमतरता नसणार,असे आश्वासन त्यांनी दिले.
महाराष्ट्रातील दोन मंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक हे तुरुंगात आहेत,तपास यंत्रणांकडे त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच ते आज तुरुंगात आहेत असं वाटत नाही का?यावर बोलताना याचे उत्तर तुम्हीच तुमच्या अंतरआत्म्याला विचारा, जे घडतंय ते योग्य आहे का?असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.रिया चक्रवर्तीसारख्या महिलेला अटक केली मात्र सबळ पुरावेच नव्हते शेवटी त्यांची सूटका करावी लागली,तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचे त्या म्हणाल्या.
महाविकासआघाडीमुळे भाजपच्या तंबूत खलबली असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दररोज तारखा सांगत असतात हे सरकार कधी पडेल मात्र आमचं गठबंधन मजबुत असल्याचे त्यांनी सांगितले.
एका प्रश्नाच्या उत्तरात हिंदूत्व आणि विकास या दोन वेगवेगळ्या बाबी नसल्याचे त्या म्हणाल्या.
उत्तरप्रदेशाच्या निवडणूकीत शिवसेनेची अमानत रक्कमही जप्त झाली यावर हसून फक्त आमचीच नव्हे तर काँग्रेसचे नाव न घेता एका राष्ट्रीय पक्षाची देखील झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तुम्ही तर आमच्या प्रयत्नांसाठी दाद दिली पाहिजे,शिवसेनेने उत्तर प्रदेशात निवडणूक लढण्याचा प्रयत्न तर केला.गोवामध्येही आम्ही लढलो तर सही.येत्या डिसेंबरमध्ये गुजरातच्या निवडणूका देखील शिवसेना लढणार असल्याचे त्या म्हणाल्या.एक दिवस असा ही येईल जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देशाचे पंतप्रधान राहतील,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राजकारणाव्यतिरिक्त झोमॅटो सारख्या खासगी कपंनीच्या धोरणावर प्रश्न विचारला असता १० मिनिटात घरपोच सेवा देण्याचे या कपंनीचे धोरण योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या.यावर मीच प्रश्न उचलला आहे.देशातील कामगारांना या खासगी कंपनीचे धोरण हानिकारक ठरतील तर आम्ही ते होऊ देणार नाही,या देशात कोणतेही धोरण हे कामगारांच्या हिताच्या विरोधात होणा नाही असे त्यांनी ठणकावले.

आमचे चॅनल subscribe करा