Homeनागपूर न्यूज‘अतिरेकी‘ विकासामुळे नागपूरकर 'र्निवस्त्र' तरीही आम्हीच ‘माफिया!’पर्यावरणवाद्यांचा उद्रेग

‘अतिरेकी‘ विकासामुळे नागपूरकर ‘र्निवस्त्र’ तरीही आम्हीच ‘माफिया!’पर्यावरणवाद्यांचा उद्रेग

Advertisements

ज्येष्ठ पत्रकाराचे विधान अशोभनीय:कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

भूमाफियापेक्षा पर्यावरण माफिया होणे श्रेयस्कर:पर्यावरणवाद्यांची भूमिका

नागपूर,ता.१९ फेब्रुवारी २०२२: शहरात सध्या अजनी परिसरात प्रस्तावित इंटर मॉडले स्टेशनच्या(आयएमएस)मुद्दावरुन चांगलच वातातवरण तापलं आहे. त्यात या प्रकल्पाचे जनक केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच झाडांच्या प्रश्‍नावरुन एवढ्या कोर्टकचे-या होत असतील तर हा प्रकल्पच रद्द करतो असे विधान केले,ते एका वृत्तपत्रात प्रसिद्ध ही झाले,या विधानावरुन शहरतील विविध व्यवसायिक संघटना गडकरी यांच्या एवढेच ‘अस्वस्थ’ झाले व तातडीने त्यांनी पत्र परिषद घेऊन या प्रकल्पाला त्यांच्या संघटनेचा पाठींबा असल्याचे ‘घोषित‘ केले.यानंतर लगेच शहरातील एका ज्येष्ठ पत्रकाराचे, गडकरी यांचेच आणखी एका ड्रीम प्रोजक्ट असणा-या मेट्रोवरील ‘स्तुतीगानपर’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ,शहरातील काही पर्यावरण माफियांमुळे शहराचा विकास खुंटत असल्याचे वादग्रस्त विधान केले.यावर आज शहरातील अनेक पर्यावरणवाद्यांनी तीव्र आक्षेप नोंदवित शहरातील भूमाफियापेक्षा पर्यावरण माफिया होणे कधीही हितकारच असल्याची जहाल टिपण्णी केली.

यावेळी शहरातील विविध व्यवसायिक संघटनांना देखील आडव्या हातावर घेऊन, करोनाच्या काळात जेव्हा नागपूर शहरातील माणसे ही रुग्णालयांसमोर बेड न मिळाल्यामुळे पटापट मरत होती त्यावेळी या व्यवसायिकांच्या संघटनांनी तातडीने ‘एकजुट’ होऊन गरीब,गरजू रुग्णांना मरणाच्या दारातू ओढून आणण्यासाठी काय केले?असा खरमरीत प्रश्‍न आता विचारला जात आहे.अजनी प्रकल्पासाठी एकजुट होऊन पत्र परिषद घेणा-यांचा स्वत:च्या व्यापारापूरती तरी स्वार्थ आहे,आम्ही तर नि:स्वार्थ आहोत,शहरातील एकमेव हिरवळ वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत,त्यासाठी आपल्याच पदरातला पैसा खर्च करुन न्यायालयात कायदेशीर लढाई देत आहोत.मात्र आमच्या लढ्याला न्यायालयात उत्तर देणे शक्य नाही हे कळल्यावर आता काही माध्यमांना व व्यवसायिकांना हाताशी धरुन छुप्या पद्धतीने लढा दिला जात असल्याची टिका त्यांनी केली.

शहरातील एका ज्येष्ठ पत्रकाराने मात्र सर्व मर्यादाच ओलांडल्या,मंत्र्यांना खूश करण्यासाठी आम्हालाच ’माफिया ’ ठरवले, मंत्र्यांचे फक्त पाय धुण्याचेच उरले होते.पत्रकारांकडून दोन्ही बाजू निरपेक्षपणे वाचकांसमोर मांडणे अपेक्षीत आहे आणि हीच या नोबल प्रोफेशनची नैतिकता देखील आहे.गडकरी हे प्रत्येक भाषणात ठासून सांगतात त्यांना

पर्यावरणाशी किती प्रेम आहे,ते छत्रपती चौक ते हिंगणा व पुढे पारडीपर्यंत जाऊन झाडांना व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही?हे पाहतात,झाडे वाळलेली दिसताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना झापतात मात्र मनसर ते खवासा रस्त्यावर हायवेसाठी २० हजार झाडे कापण्यात आली होती.निसर्गाने मानवाला दिलेले एक नैसर्गिक जंगलच नष्ट झाले.चौपदरी रस्ते झाले पाहिजे,विकासाला कोणाचाही विरोध नाही मात्र माननीय न्यायालयात हेच प्रकरण गेल्यानंतर गडकरी यांच्याच रस्ते व बांधकाम विभागाला आता ही नष्ट झालेली झाडे कुठे लावणार आहात?असे न्यायालयाने विचारले असता,आमच्याकडे जागाच नसल्याचे सांगून केंद्रिय रस्ते व बांधकाम विभागाने हात वर केले.न्यायालयाच्या आदेशानंतर या विभागाने वन विभागाकडे १ लाख १० हजार झाडे लावण्यासाठी ८ कोटी रुपये जमा केले.वन विभागाने उमरेड मार्गावरील विविध अंडर पास रस्त्यावर नव्याने १ लाख १० हजार झाडांचे रोपण केले मात्र त्यातील आता एक ही झाड जिवंत नाही?गडकरी यांच्या भाषणातील पर्यावरणावरील प्रेम एक वेळ गृहीत जरी धरले तरी वीस हजार झाडे कापण्यापूर्वीच त्या झाडांच्या यशस्वी पुर्नरोपणाची जवाबदारी त्यांच्याच विभागाने मग का झटकली?

Chipko Movement to save Ajni Vann gets good reponse - The Live Nagpur

नुकतेच गडकरी यांनी एका ज्येष्ठ पत्रकाराच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बद्रीनाथ-द्वारका महामार्गावरील २७०० झाडे उपटण्या ऐवजी त्याचे पुर्नरोपण करण्याचे आदेश दिले होते असे सांगितले,अजनीवनच्या प्रकल्पाबाबत देखील ते वारंवार हेच सूचित करतात या झाडांचे यशस्वीपणे पुर्नरोपण केले जाईत,त्यात ही अनेक झाडे ही सुबाभूळ सारखी जंगली व निरुपयोगी झाडे आहेत असे ते ठासून सांगतात. फूटाळ्याच्या प्रकल्पात १६ मजली इमारातीसारख्या कमर्शियल बांधकामासाठी किती एकर जमीनीवरील झाडे नष्ट झाली व ती कोणत्या ठिकाणी पुर्नरोपित करण्यात आली?याची माहिती तर माहितीच्या अधिकारातही मिळत नाही.शहरातील हॅरिटेज तलावांची तर वाट लागलीच आहे उरलेसुरले वन केंद्रिय मंत्र्यांच्या ‘अतिरेकी विकासापासून‘वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करने म्हणजे ‘माफियागिरी’ झाली का?ते ही एका वरिष्ठ पत्रकाराच्या नजरेत?लाचारी पतकरुन फक्त मुक्ताफळे उधळल्याने येणा-या पिढीचे होणारे नुकसान कधीही भरुन निघणार नाही,येणारी पिढी, ही तुम्हालाही हिशेब विचारणार आहे,असा पराकोटीचा संताप पर्यावरणवादी व्यक्त करतात.

गडकरी यांच्या बोलण्यात इतका कल्पनाविलास व विसंगती असते की एकीकडे ते मेट्रोची भरभरुन स्तुती करतात मात्र देशातील कोणत्या राज्यात मेट्रो नफ्यात चालत आहे याची माहिती देत नाही.आम्हाला ते त्यांच्या भाषणात ‘अल्पसंख्य सुक्ष्म जीव’म्हणून हिणवतात मात्र त्यांच्याच मेट्रोचा प्रकल्प हा तब्बल हजार कोटींनी वाढला तो आता कोणाकडून वसूल केला जाणार आहे याची माहिती ते सांगत नाहीत.आधीच मेट्रोच्या एकूण प्रकल्पाच्या २० टक्के भुर्दंड नागपूरकरांवर बसला आहे, मेट्रोचे पैसे भरुन देण्यासाठी नागपूर मनपाने २०४२ पर्यंत १०० टक्के विकास शुल्क नागपूरकरांवर लादला आहे,आता वाढीव हजार कोटी नागपूरकरांना पुरतं नागडं करुन वसूल केले जाणार आहेत का?असा संताप आता व्यक्त केला जात आहे.

काही पर्यावरणवाद्यांनी, प्रत्येकाची एक वैचारिक पातळी असते असे सांगून काही ‘मंत्री मिडीयाच्या’ पत्रकारांनी आम्हाला कितीही माफिया ठरवले तरी आमचा लढा सत्यासाठी,येणा-या पिढीच्या हक्काच्या प्राणवायुच्या रक्षणासाठी न्यायालयात सुरुच राहणार असल्याचे सांगितले.विकासपुरुषांचा हा अतिरेकी विकास येणा-या निवडणूकीत त्यांच्यावरच ‘बूमरँग’ होणार हे निश्‍चित आहे,असा दावा ते करतात.

गडकरी यांनी फूटाळा तलावाच्या जागेवर जे काही प्रकल्प राबवले त्याला पर्यावरण विभागाची परवानगी होती का?की सर्व बांधकाम अवैध आहेत?वॉटर बॉडीसाठी या देशात काही नियम बनवले आहे.फूटाळ्याच्या प्रकल्पात एक नव्हे तर अनेक नियम पायदळी तुडवण्यात आले हे आम्ही सप्रमाण न्यायालयातही सिद्ध करु.येणा-या काळात फूटाळा हा नामशेष होणार आहे हे नागपूरकरांनी लिहून ठेवावे.फूटाळाचे गतवैभव आता कधीही परत मिळणार नाही,हीच गत अजनीवनसोबत होऊ नये यासाठी आम्ही नि:स्वार्थपणे लढा देत आहोत तर आमच्यावर अशलाघ्य पातळीवरची टिका माध्यामातील ज्येष्ठ मंडळीच करते?

पृथ्वीचं पर्यावरण चक्रच बदललं आहे,नागपूरात काल आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील तूर पार मातीत मिसळली,शेतक-यांचे श्रम आणि पैसा लहरी निसर्गा पुढे कवडीमोल ठरला.प्रत्येक झाड हेच पर्यावरणाचं संरक्षण करु शकतं हे शाळेत जाणा-या शेंबड्या पाेरांना देखील कळतं,झाडे ही माणसांशिवाय जगू शकतात पण माणसे ही झाडांशिवाय जगूच शकत नाही,माणसांना जगवणारा प्राणवायू हा उड्डाण पूल किवा सिमेंट रस्ते किवा लेझर शो देऊ शकत नाही,प्राणवायु फक्त झाडेच देतात,अश्‍यावेळी प्राणवायुवर पुढच्या पिढीचा हक्क असणारी तब्बल ४० हजार झाडे, ती ही शहरातील मधोमध एकमेव उरलेला हिरवा पट्टा कापण्यासाठी,विकासाच्या नावाखाली सिमेंट क्रांक्रिटचे जंगल उभारण्यासाठी,त्यातून पैसा कमविण्यासाठी,कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठीचा अट्टहास योग्य आहे का?असा सवाल आता विचारला जात आहे.

मेट्रोचे सतत गुणगान करणा-या गडकरी यांच्याच पक्षातील नागपूरातील आमदार प्रवीण दटके यांनी मेट्रोला देण्यात येणा-या विकास शुल्क विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आहे.या प्रकल्पासाठी मेट्रोने मनपाकडे ४३४ कोटी रुपयांची मागणी केली आहे मात्र मनपाने आधी ६७ कोटी मेट्रोला दिले असून टीओडी कॉरिडॉरच्या माध्यमातून नागरिकांकडून आधीच २०० कोटींची रक्कम वसूल करण्यात आली आहे याशिवाय मनपाने मेट्रोला अत्यंत मोक्याच्या जागा दिल्या असून त्या जागांची किंमतच एक हजार अठ्यात्तर कोटी रुपयांच्या घरात आहे,याउपर देखील मनपाने २०४२ पर्यंत मेट्रोची देणी फेडण्यासाठी आपल्याच शहराच्या नागरिकांवर १०० टक्के विकास शुल्क आकारले आहे,महत्वाचे म्हणजे २०१६ पासून ही वसूली सुरु आहे,मेट्रोने मनपाकडून प्रकल्पासाठी लाटलेल्या अनेक जागेचा कमर्शियल उपयोग होत आहे,म्हणूनच गडकरींच्या मेट्राेने नागपूरकरांना पुरतं नागडं केले असल्याची आता ओरड होत असताना,अजनीवन येथे पुन्हा असाच पर्यावरणाचा नाश करणारा प्रकल्प राबवण्याचा अट्टहास योग्य आहे का?कधी तरी मागे वळून बघणार आहात की नाही आपले काय चुकले कि फक्त प्रकल्पांना होणारा विरोध बघता ‘काम करावे की नाही’ अशी फसवी खंत व्यक्त करीत राहणार आहात?असा खडा सवाल आता पर्यावरणवाद्यांकडून नागपूर शहराचे प्रतिनिधित्व करणा-या खासदार महोदयांना विचारला जात आहे.

प्रकल्पांचा एवढा अट्टहास की आता पंजाबराव कृषि विद्यापीठाचेच दोन भाग करण्याचा वरीष्ठ पातळीवर घाट रचल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव पर्यावरणवादी मांडतात!नियमाप्रमाणे या विद्यायपीठाच्या नागपूर शहरात ज्या जमिनी आहेत त्या शासकीय असल्यामुळे प्रकल्पांसाठी त्यांचा उपयोग होऊ शकत नाही तर विद्यापीठात जेवढे विद्यार्थ आहेत त्या संख्येनुसार विद्यापीठाला संशोधनासाठी तेवढी हेक्टर जमीन राखीव ठेवणे क्रमप्राप्त आहे.नागपूरात सध्या कृषि विद्यापीठाच्या मोकळ्या भूखंडांवर अनेकांचा ‘डोळा’आहे. त्यामुळेच कृषि विद्यापीठाचे दोन भाग करुन एक अमरावतीला नेल्यास आपोआप नागपूरातील अनेक हेक्टर जमीन कायद्याच्या तावडीतून सूटते,ही जमीन मग आपले ‘कल्पनाविलासी’ प्रकल्प पूर्ण करण्याकरिता उपयोगात आणली जाऊ शकते,कंत्राटदारांच्या उद्धारासोबत आपलीही ‘टक्केवारी’निश्‍चित होऊ शकते,यासाठी आता वरच्या पातळीवर कृषि विद्यापीठाचेच दोन भाग करण्याचा घाट घातल्या जात असल्याचा दावा काही पर्यावरणवादी करीत आहेत. सध्या ‘बॉटनिकल‘ गार्डन हे त्यातीलच एक प्रारंभिक पाऊल असल्याचे सांगितले जात आहे.

असे असले तरी गडकरी यांचा ‘बुलढाणा पॅटर्न’ हा खरोखरंच स्तुती करण्यासारखा असल्याचे ते सांगतात. बुलढाणा पॅटर्न देशासाठी देखील एक आदर्श प्रकल्प ठरला आहे याबाबत वादच नाही.गडकरी यांच्या चांगल्या कामाची स्तुती केलीच पाहिजे. नॅशनल हायवे बनवताना लागणा-या मुरुमसाठी रस्त्यालगतच खोल खड्डे खोदण्यात आले.‘पाणी अडवा पाणी जिरवा’ यशस्वी करुन दाखवले.या पॅटनमुळे त्या भागातील भूजल पातळी देखील वाढली,याचा तेथील शेतक-यांना देखील फायदा झाला.४ लेनचा हा हायवे पाण्याच्या विचार केल्यानेच तेथील नाले,बंधारे कमी खर्चात बांधल्या गेले.गडकरी यांच्या अश्‍या ‘शाश्‍वत‘ विकासाला कोणीही विरोध केला नाही.आमचा देखील विराेध इंटर मॉडेल स्टेशनला किवा प्रकल्पाला मुळीच नाही मात्र तो विकास पर्यावरणाची ‘अपरिमित’ हानि करुन होणार असेल तर अश्‍या अशाश्‍वत विकासाच्या विरोधात आम्ही शेवटपर्य लढा देऊ,असा ठाम निर्धार पर्यावरणवादी व्यक्त करतात.मग आम्हाला ‘माफिया’ ठरवा किवा ’अल्पसंख्यक सुक्ष्म जीवी’ असे उपहासाने संबोधले तरी चालेल.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विश्‍व सतत विकास संमेलनाच्या २१ व्या सत्राला संबोधित करताना गेल्या वीस वर्षांपासून सतत ‘विकास आणि पर्यावरण’ हीच त्यांची प्राथमिकता असल्याचे सांगितले.मग त्यांच्या पक्षाचे नागपूरचे खासदार हे विकास साध्य करतानाच पर्यावरणाचा विचार का करु शकत नाही?असा सवाल विचारला जात आहे.लवकरच आम्ही संपूर्ण कागदपत्रे घेऊन पत्र परिषद घेणार असल्याची माहिती ते देतात.

Latest बातम्या