Homeनागपूर न्यूजनागपूरात पर्यावरणप्रेमींमध्ये ’जी-आर’ची चर्चा

नागपूरात पर्यावरणप्रेमींमध्ये ’जी-आर’ची चर्चा

Advertisements

फूटाला नंतर आता पंजाबराव कृषि विद्यापीठाचे ॲग्रो फॅारेस्ट डिव्हिजन होणार गिळंकृत

फूटालाचा नैसर्गिक स्त्रोत धोक्यात

‘गरज नसलेला विकास’ नागपूरकरांच्या मूळावर

नागपूर,ता. ५ जानेवारी २०२२ : नुकतेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी फूटाळ्याच्या प्रेक्षक गॅलरीतून त्यांच्या जनसंपर्क विभागाच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास’रमणीय’आल्हादाययी फूटाळ्याच्या ‘(उधवस्त)सौंदर्याचा आनंद लृटला.लवकरच फूटाळ्यात ९४ म्युझिकल फाऊंटेन नागपूरकरांच्या आनंदासाठी विविध ताल वाद्यांवर नाचणार,एवढंच नव्हे तर तलावात फ्लोटिंग रेस्टॉरेंटची कल्पना देखील अंमलात आणण्याची सूचना गडकरी यांनी केली.नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांना या फूटाळ्याचे मूळ स्त्रोत असणा-या पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या (पीकेव्ही)च्या १६० एकर वरील हिरवेगार वनराईचे क्षेत्र असणा-या ॲग्रो फॉरेस्ट डिव्हिजन येथे एक हजार कोटींचा बुद्धीस्ट थीम पार्क निर्माण करायचे आहे,असे वृत्तच एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध ही झाले होते,यानंतर नागपूरातील पर्यावरणाचा जो ‘सत्यानाश’ होणार आहे त्यांचा परिणामीची चर्चा नागपूरातील पर्यावरणप्रेमींमध्ये आज चांगलीच रंगली होती.त्यांच्या चर्चेचा रोख ’जी-आर’हाच होता.

जीआर-हा आता राजकीय आखाडा बनला असल्याचे बोलले जात आहे.राऊत यांनी नुकतेच फूटाला येथील बांधकामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.’तेरी भी चूप मेरी भी चूप’ही नीती सध्या राजकीय धुरिणांकडांकडून अवलंबली जात असून,२०० एकरच्या जागेवर वसलेल्या फूटाळ तलावाचे ’गरज नसलेल्या विकासामुळेच’आधीच बट्टयाबोळ झाला असताना आता १६० एकर वर वसलेली वनराई व फूटाळाचा कॅचमेंटच धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

बुद्धिस्ट पार्कसाठी १६० एकर वरील हिरव्यागार वनराईमधील झाडाची एक फांदी देखील कापल्या जाणार नसल्याची ग्वाही दिली जात असली तरी पार्कच्या निर्मितीनंतर त्या ठिकाणी लाखो पर्यटकांचा वावर राहणार आहे,ज्यामुळे तेथील पशु पक्ष्यांच्या,पशु,प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवास धोक्यात येणार आहे.गर्दीमुळे तलावाच्या मूळ इको सिस्टिमवर जो ताण येणार आहे  त्यामुळे फूटाळयाचा मूळ स्त्रोत हा देखील एक दिवस ‘सरस्वती नदीसारखा’ नागपूरच्या नकाश्‍यावरुन गायब होईल यानंतर फूटाळ्यातील लेझर शो सुरु ठेवण्यासाठी नागपूर मनपाला टँकरनी पाणी पुरवठा करावा लागणार असल्याचा संताप व्यक्त केला जात आहेे.

फूटाळ्याचा विकास झाला नसून ‘विद्रुपीकरण’ झाले असल्याची हताशा पर्यावरणवादी व्यक्त करतात.या ठिकाणच्या कमनिर्शयल एनर्जीने या वास्तूमधील सात्विकता संपवली.या ठिकाणी आल्हादायक असे काहीच उरले नसून फक्त पैश्‍यांचा सुगंध दरवळतोय.एक वेळ स्वातंत्र्याची लढाई सोपी होती कारण शत्रू हा परकीय होता,येथे तर आपलीच माणसे आपल्या भावी पिढीचे हितशत्रू झाली असल्याची शाेकमग्नता ते व्यक्त करतात.

पीकेव्हीने एक दशकांपूर्वीच राज्य सरकारकडे त्यांच्या या १६० एकरच्या हिरव्यागार वनराईच्या सुरक्षेसाठी ,सुरक्षा भिंत बांधण्यासाठी ३ कोटींची मागणी केली होती मात्र पर्यावरण हा विषय(ओबीसी आरक्षणासारखा) तोंडी लावण्यापूरतीच महत्वाचा समजला जात असल्याने सरकारने कोट्यावधी रुपये गरज नसलेल्या विकासकामात खर्च केले मात्र पीकेव्हीला वनराईच्या संरक्षणासाठी पैसा दिला नाही.आज अशी सुरक्षा भिंत उभारण्यासाठी जवळपास ८ ते १० कोटींचा खर्च येणार आहे.या मोकळ्या जागेवर चारही बाजूने अतिक्रमणाने कधीचाच विळखा घातला आहे.मध्यतंरी तर एक दर्गा देखील या वनराईच्या आत निर्माण झाली व भाविकांचा उर्स देखील दरवर्षी भरवला जाऊ लागला,हे अतिक्रमण नुकतेच पाडण्यात आले असले तरी अनेकांची ‘नजर’नागपूरच्या मध्यभागी असणा-या या १६० एकरवर पसरलेल्या हिरव्यागार वैभवावर असल्याने,पुढे श्‍वास घ्यायला देखील नागपूरकरांना घरा-घरात ऑक्सीजन प्लान्ट लावावे लागणार असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात.

खरे तर जी-आर चा साधा सोपा अर्थ गव्हर्रमेंट रुल असा जरी होत असला तरी नागपूरातील पर्यावरणवादी या अक्षरांचा उल्लेख दोन राजकीय धुरीणांच्या नामोल्लेखासाठी करताना आढळतात.२०१४ साली राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि नागपूरचा ‘गरज नसलेला विकास’ ज्या ‘नेत्रदिपक’पद्धतीने झाला त्याची जंत्रीच हे पर्यावरणवादी मोठ्यांने वाचून दाखवतात.

सध्या महाराज बाग येथील रस्त्यांवरील हॅरिटेज झाडांची कायदेशीर ’कत्तल’वेगाने सुरु आहे.कारण काय?तर आता ही १५ ते २० झाडे जी ५० वर्ष जुनी आहेत रस्त्यांच्या मधोमध आली आहेत आणि इंडियन रोड काँग्रेसची नियमावली सांगते, रस्त्याच्या मधोमध येणारी झाडे कापा,मात्र हाच रस्ता पूर्वी फक्त वन-वे होता,महाराज बाग कडून विद्यापीठ ग्रंथालयाकडेच जाण्याची मुभा होती,विद्यापीठ ग्रंथालयाकडून विद्यापीठाकडे येण्याची परवानगी नव्हती.मुळात हा रस्ता एकेकाळी फक्त कृषि विद्यापीठ व विद्यापीठ ग्रंथालयाला जोडणारा अंतर्गत रस्ता होता,यावर कृषि विद्यापीठाचीच मालकी होती.२००६ पर्यंत तर या रस्त्यावरील फाटक रात्री बंद केले जात होते.हा रस्ता कृषि विद्यापीठाचे विद्यार्थी,शिक्षक यांच्या अधिकाराचा असून या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी शेतीवर आधारित अभ्यासक्रमाचाच एक भाग होता.२०१४ साली राज्यात भाजपची सत्ता येताच तत्कालीन मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी झीरो माईलकडून सरळ प्रेस क्लबपर्यंत मधला रस्ता निर्माण केला,मग ती वाहतूक महाराज बागकडे वळती केली,यासाठी आधी दोन पदरी असणारा रस्ता नंतर चार पदरी झाला,या रस्त्यावरील पूल हा जोपर्यंत दोन पदरी होता तोपर्यंत या रस्त्यांवरील ५० झाडे ही सुरक्ष्त होती,मात्र पूलच चार पदरी झाल्याने आता ही डोलदार हिरवीकंच व नागपूरची शोभा वाढवणारी झाडेच रस्त्याच्या मधोमध आली व आता निर्ममतेने कायद्याच्या बडग्याखाली ती दररोज तोडली जात असून रस्ता मोकळा केला जात आहे….!

सुरवातीला हा रस्ता मोठा करायचा ठरल्यानंतर २०१५-१६ मध्ये ग्रीन व्हिजल व पर्यावरण प्रेमी श्रीकांत देशपांडे यांनी या ठिकाणची झाडे वाचवण्यासाठी व्यवस्थेसोबत चिवट लढा दिला,त्यामुळे तेथील झाडे वाचली मात्र नंतर हा रस्ता एवढी रहदारी  नसताना ही अचानक चार पदरी झाला आणि पुन्हा एकदा ‘गरज नसलेेल्या विकासकामामुळे’ कंत्राटदारांचे,राजकारण्यांचे तर ’भले’झाले,५० वर्षांपूर्वीची झाडे यांनीच रस्त्याच्या मधोमध ’अतिक्रमण’केल्याच्या गुन्ह्याखाली त्यांना नामशेष होण्याची शिक्षा भाेगावी लागली,या रस्त्यांवरुन जाणा-या किती तरी पिढ्यांपर्यंत शिक्षक,विद्याथी‘,वाटसरु यांना प्राण वायू पुरविणा-या या झाडांना आज आरीच्या घावाने घायाळ करुन त्यांचे पर्यावरणीय पार्थिव गोळा केले जात असल्याचा नजारा दररोज आता, या रस्त्याने जाणारा नागपूरकर उघड्या डोळ्यांनी बघतोय,ज्या पर्यावरणवाद्यांनी ही झाडे एकेकाळी वाचवली होती ती कोणत्या राजकीय कोंबड्यांच्या खुराड्यात जाऊन बसली,याचा आता शोध घेतला जात आहे.

दोन पदरी पूल कोणतीही गरज नसताना चार पदरी करण्यात आला खरे तर तेव्हाच नागपूरच्या पर्यावरणप्रेमींनी विरोधाचा सूर आवळायला हवा होता मात्र सगळेच गप्प बसले.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच जून महिन्यात अर्बन ट्री प्रोटेक्शन कायद्या-२०२१ हा विधी मंडळात पारित केला त्या आधीच या डोलदार झाडांना कापण्याची परवानगी प्राप्त झाली होती,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ज्या ‘पारदर्शितेचा’डिमडिम अख्ख्या जगात वाजवला जातो त्याच पारदर्शितेची साक्ष ही नामोशेष झालेली झाडे आज वाटसरुंना देत आहेत.

या रस्त्यावरचा एक अरुंद पूल मोठा करण्यासाठी कंत्राट देण्यात आला, न वाचल्या जाणा-या वृत्तपत्रात जाहीरात  देऊन इतिकर्तव्यता साधण्यात आली.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनपाच्या उद्यान विभागाकडे प्रस्ताव आला अन्‌ ….हा रस्ता आणि पूल दोन्ही मोठे झाले पण….या रस्त्यावरची शान गेली…कायमची…पुन्हा कधीही अशी डोलदार हिरवेगार वृक्ष या ठिकाणी नागपूरच्या ४७ अंशापर्यंत तापणा-या रणरणत्या उन्हयाळ्यात वाटसरु,पक्षी,प्राणी यांना आश्रय देणार नाही,कृतघ्न  मानव जातीवर त्यांनी आजवर जे उपकार केलेत,प्राणवायू दिला त्याची पररतफेड राजकीय हडेलहप्पीने केली,उरली सुरली कसर मेट्रोने या जागेवरील उर्वरित झाडांच्या बुंध्याखालून जेसीबी मशीनने खोदकाम करुन आपली केबल नेऊन पूर्ण केली.या रस्त्यावरील अनेक झाडे आता अधांतर झाली आहेत.पुलाला लागूनच मेट्रोची जाणारी केबल ही नागपूरच्या ’शाश्‍वत अश्‍या विकासाची साक्ष’देत आहे….!

एकीकडे महापौर दयाशंकर तिवारी हे झाडांवर कु-हाड घालाल तर गजाआड करु अशी घोषणा देत आहे,मनपाचा कर विभाग झाडे जगवा मालमत्ता करात सूट मिळवा,असे आमिष देत आहे,मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. अवैध वृक्षतोड केल्यास पोलिस तक्रार केली जाणार असा दम नागरिकांना देत आहे, दूसरीकडे वैध हॅरिटेज झाडांना अवैध नियमांच्या चौकटीत बसवून कत्तल केली जात आहे मात्र ही कत्तल कायदेशीररित्या होत असल्याने ना महापौर,ना मनपा आयुक्त ना उद्यान विभाग या झांडासाठी अश्रू ढाळणार.

छायाचित्र-महाराज बाग रोडवरील कापण्यात आलेली हॅरिटेज झाडे)

पुढील टप्पा आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चौकापासून तर कॅम्पस कॉलेजपर्यंतच्या उड्डाण पुल निर्मितीनंतर गाठला जाणार आहे.या पुलाची निकडीची गरज ही फूटाळा येथील लेझर शो सुटल्यानंतर लाखोच्या गर्दीच्या सुरळीत वाहतूकीसाठी निर्माण झाली आहे.अनेकांना हा प्रश्‍न पडला होता,या ठिकाणी पुलाची कोणतीही मागणी नसताना का २०० कोटी खर्चून या पुलाची निर्मिती का केली जात आहे?याची निकड फूटाळयावर होणा-या गर्दीला मोकळा रस्ता मिळावा,गर्दीमुळे अपघात टळावे यातून निर्माण झाली असली तरी आज महाराज बागेतील आतला रस्ता जो गर्दीसाठी मोकळा झाला, त्याच रस्त्यावर एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू आणि कायम होणारे अपघात हे नागपूरकरांच्या विस्मरणात गेले नाहीत.

बजाज नगर येथील व्हीआरसीच्या फाटकातून आत गेल्यास तो संपूर्ण रस्ता त्याच विद्यापीठाचा अंतर्गत भाग आहे,कोणालाही दुस-या फाटकातून बाहेर पडण्याची परवानगी नाही मात्र कृषि विद्यापीठ हे सरकारच्या लेखी असे विद्यापीठ आहे ज्यावर या कृषिप्रधान देशात सरकारला देखील पैसा खर्च करण्यास स्वारस्य वाटत नाही.म्हणून महाराष्ट्राच्या उपराजधानीत कृषि विद्यापीठाच्या मोक्यांच्या हजारो एकर जागेची राजकीय लृट सुरु राहू शकते.

म्हणूनच म्हटल्या जात ‘आंघोळीला साबण नाही आणि राजकीय धुरीण हे सुगंधीत पॉण्ड्‌स पावडरचा डबा नागपूरकरांसाठी घेऊन फिरत आहे!’

अशीच वेळ अजनीवनावर देखील येणार आहे,जगभरात फक्त ९६ एकरवर असे रेल्वचे मल्टीमॉडल .हब निर्माण झाले असताना नागपूरात मात्र अजनी रेल्वे स्टेशनचा विकास साधण्यासाठी एकूण ४९६ एकरची जागा अधिग्रहीत करण्यात आली आहे!यात मध्यवर्ती कारागृहापर्यंंतची जागा ही या प्रकल्पाच्या भेट चढणार आहे,रेल्वे कॉलनी,रेल्वे माईन्स शाळा,४० हजारपेक्षा अधिक हॅरिटेज वृक्षांची कत्तल या विकासाच्या भेट चढणार मात्र शेकडो कमर्शियल कॉम्पलेक्सनी हा मध्यवर्ती भाग गजबजून जाणार आहे,अनेक कंत्राटदारांंचा भरभरुन विकास होणार आहे आणि नागपूरकरांनाही हाच ‘सिमेंट कॉक्रिटच्या जंगलाचा हाच शाश्‍वत’विकास हवा आहे,सध्या हा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने पर्यावरणप्रेमीही शांत बसले आहेत.

नागपूर-काटोल फक्त २० मिनिटांचा रस्ता होतोय,या विकासात आम्ही न्हाऊन निघालो मात्र या रस्त्यावरील ५ हजार झाडांची कत्तल सुरु आहे याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नसतेच मुळी.

वाढल्या लोकसंख्येसाठी,रस्ते,उड्डाण पुले,लेझर शो,कमशिर्यल कॉम्पेक्स,मॉल्स,चित्रपट गृहे,स्वीमिंग पूल,मेट्रो याच मूलभूत गरजा राहणार असून,प्राणवायू देणारी झाडे,पक्षी व प्राण्यांसोबतचे सहजीवन,गरज नसलेल्या विकासाच्या श्रेणीत २०१४ पासून आली आणि या ‘दैदिप्यमान’ विकासकामांच्या झंझावातात हजारो मूक झाडे, विकासाच्या चितेवरील ,पार्थिवाखाली जळणा-या लाकडांमध्ये परिवर्तित झाली…होत राहतील….!

Latest बातम्या