Homeनागपूर न्यूजआणि...गडकरींनी आग्रहाने बावणकुळेंना मानायला लावले आभार

आणि…गडकरींनी आग्रहाने बावणकुळेंना मानायला लावले आभार

Advertisements

बावणकुळे गडकरींचे ‘खास’झाले सिद्ध

बावणकुळेंना राजकारणात आणनारे गडकरीच

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१२ डिसेंबर २०२१: खासदार सांस्कृतिक महोत्सव येत्या १७ ते २६ डिसेंबर रोजी नागपूरात पार पडणार आहे,या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी .चिंचभवन जवळील साऊथ मेट्रो स्टेशनच्या सभागृहात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे या कार्यक्रमात प्रास्ताविक सादर करणार होते मात्र ते उशिरा आल्याने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.अनिल सोले यांनी प्रास्ताविक सादर केले,कार्यक्रम समाप्ती नंतर राजेश बागडी हे आभार मानणार होते मात्र मंचावरील गडकरींनी तत्परतेने, बावणकुळे हे आभार मानतील म्हणून सूचना केली व बावणकुळे आभार मानण्यासाठी उठले,यावर बावणकुळे हे गडकरींचे किती ‘खास’आहेत यावर चांगलीच चर्चा रंगली.

महत्वाचे म्हणजे बावणकुळे यांना राजकारणात आनणारे गडकरीच होते. बावणकुळे यांचा जन्म हा कामठी रोडवरील ‘खसाळ ’ गावचा.अतिशय सामान्य कुटुंबात १३ जानेवारी १९६९ साली त्यांचा जन्म झाला.५ भावंडे.बहीण नाहीच.अतिशय बेताची परिस्थिती.कुटुंबात कोणी फार जास्त शिकलेलंही नाही.५-७ एकर शेतजमीन,ती देखील कोरडवाहू.प्राथमिक शिक्षण कोराडी येथील ‘बर्डे’ या मामांच्या घरीच झाले.

बावणकुळे हे सुरवातीपासूनच बुद्धिमान आणि हूशार,कुशाग्र बुद्धिचे.१० वी मध्ये ७८ टक्के मिळवून बोर्डाची परिक्षा उत्तीर्ण झाले.याच दरम्यान १९७० च्या सुमारास कोराडीत पॉवर प्लान्ट आला.यात स्थानिक लोकांची शेती,घरे,जमिनी अधिग्रहीत करण्यात आली.यात बावणकुळे यांची देखील खसाळ गावातील शेती गेली.कोराडीच्या आई जगदंबा मंदिरामधील दिव्यांखाली त्यांनी अभ्यास केला.दिवसा कोराडी मंदिरातील दूकानात ते नोकरी करायचे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांना नव्हती.वडील शेतकरी, आई गृहीणी मात्र नेतृत्व गूण अंगी असल्याने प्रकल्पग्रस्तांसाठी लढा उभारला.त्यांच्या पुर्नवसनासाठी,नोक-यांसाठी संघर्षात उतरले.

नागपूर जिल्ह्यात त्यावेळी ‘छत्रपती सेना’ही मनोहरराव सोनकुसरे यांची संघटना लढा देत होती.त्या संघटनेत बावणकुळे अग्रस्थानी होते. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे राजकारण त्यावेळी नागपूर शहरापूरतीच मर्यादित होते.एकदा ते कोराडीत एका मित्राकडे जेवायला गेले.त्यावेळी गडकरींनी बावणकुळे यांच्यातील संघटनात्मक व नेतृत्व गूण हेरले.गडकरींनी त्यांना भारतीय जनता पक्षात आणले.

भाजपचे शीर्षस्थ नेते व तत्कालीन विरोधी पक्ष नेते गोपीनाथ मुंढे यांची रथयात्रा कोराडी मंदिरासमोरुन गेली त्यावेळी बावणकुळे यांनी त्यांच्या उपस्थितीत १९९५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.कामठी लोकसभेतून विद्यमान तमिलनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे भाजपचे खासदार होते.त्यावेळी प्रकल्पग्रस्तांसाठी बावणकुळे यांनी जबरदस्त आंदोलन पुकारले होते.

अगदी युतीची सरकार राज्यात आली.गोपीनाथ मुंढे उपमुख्यमंत्री होते तरी देखील स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी बावणकुळे यांनी स्वत:च्याच पक्षा विरोधात बंड पुकारले.यामुळे बनवारीलाल पुरोहित,प्रेमलाल पटेल व बावणकुळे यांना अमरावतीच्या तुरुंगात ५ दिवस डांबून ठेवण्यात आले.एकप्रकारे ‘स्वत:च्या सरकारमध्येच बावणकुळे यांनी स्वत: तुरुंगात पाहूणचार घेतला.’

गोपीनाथ मुंढे यांनी मध्यस्थी करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.प्रकल्पग्रस्तांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत जमीनी नाही घेणार असा शब्द ही दिला,यानंतर बावणकुळेंनी आंदोलन मागे घेतले होते. लगेच दुस-याच महिन्यात गोपीनाथ मुंढेंनी दिलेला शब्द पाळला अाणि ५०० प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे ऑर्डर काढले.

त्यावेळी नागपूर जिल्हा हा सर्वस्वी काँग्रेसमय होता.भाजपचे वर्चस्व कुठेही नव्हते.भाजपची मुळे बावणकुळे यांनी ग्रामीण भागात रोवली.त्यावेळी काँग्रेसतर्फे ‘गधा-घोडा’कोणालाही उभे केल्यास हमखास जिंकून येत होते.त्याच वेळी १९९७ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूका घोषित झाल्या. गडकरींनी त्यांना संधी दिली. बावणकुळे यांनी पहिल्यांदा ही निवडणूक लढली.त्यांच्या विरोधात दिग्गज काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचार केला मात्र तरीही २५० मतांनी बावणकुळे निवडून आले.यानंतर बावणकुळे यांनी राजकारणात मागे वळून पाहीले नाही.

.यानंतर पुन्हा २००२ मध्ये जि.प.च्या निवडणूकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराला धूळ चारत अडीच हजार मतांनी विजयाची माळ गळ्यात स्वत:च्या गळ्यात घातली.यावेळी ते जि.प.विरोधी पक्ष नेते ही झाले.२००४ साली विधान सभेच्या निवडणूका घोषित झाल्या.

गडकरी यांनी बावणकुळे यांना उमेदवारी दिली.त्यांच्या विरोधात काँग्रेस व आरपीआय युतीच्या सुलेखा कुंभारे निवडणूकीत उभ्या होत्या.तरीही बावणकुळे यांनी साढे सात हजार मतांनी ही निवडणूक जिंकली. २००९ ची विधान सभा पुन्हा बावणकुळे यांनी ३३ हजार मतांच्या फरकाने जिंकली.प्रत्येक निवडणूकीत त्यांचे मताधिक्य हे वाढतच गेले.

२०१०-२०११ मध्ये ते नागपूर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष झाले.याच काळात त्यांनी जिल्हा परिषदेत एकहाती भाजपची सत्ता आणली.कामठी पंचायत समितीत ‘कमळ’फूलवले.आमदार म्हणूनही २०१२-२०१३-२०१४ या तीन वर्षात विधान सभेत सर्वात जास्त प्रश्‍न विचारण्याची ख्याती बावणकुळेंच्या नावे आहे.

२०१४ सालच्या विधान सभेच्या निवडणूकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज राजेंद्र मुळक यांचा ४५ हजार मतांनी पराभव केला.यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ते उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री झाले.त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात एकाही शेतक-याची वीज कापण्यात आली नाही,हे विशेष!

बावणकुळे यांचे लहानपण हे फार संघर्षातच गेले होते,त्यामुळे त्यांना कास्तकारांच्या व्यथा माहिती होत्या.स्वत:च्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी ऑटो भाडण्याने घेऊनही चालवला.दिवसभरात ऑटोचे भाडे देऊन ५०-१०० रुपये कमाई ते करुनच दाखवायचे.

२०१९ मध्ये मात्र बावणकुळे यांना विधान सभेचे तिकीट मिळाले नाही.लाखांच्या मताधिक्याने दोनशे टक्के निवडून येण्याची शाश्‍वती असताना त्यांना दिल्लीश्‍वारांनी तिकीट नाकारले.त्या वेळी गडकरी यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी दूपारी ३ वाजेपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना तिकीट मिळावी म्हणून पराकोटीचे प्रयत्न केले होते,ते सतत फोनवर दिल्लीश्‍वरांशी संपर्क साधत होते मात्र दिल्लीश्‍वर हे आपल्या निर्णयावर ठाम राहीले.एवढंच नव्हे तर त्यांच्या पत्नीचे किवा मुलाचेही नाव उमेदवारीसाठी पुढे आले मात्र बावणकुळे किवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणालाही विधान सभेची तिकीट मिळाली नाही. ऐनवेळी कामठीमधून टेकचंद सावरकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास भाग पडले.

यानंतर बावणकुळे यांना संघटनेत दुस-या जवाबदा-या सोपवण्यात आल्या.ते प्रदेश सरचिटणीस देखील झाले. मात्र त्यांचे तिकीट का कापले?हे आजही नागपूर जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यासाठी अनाकलनीय प्रश्‍न आहे.मात्र याचा परिणाम ओबीसी मतांवर झाला.
त्याची परिणीती ही जिल्हा परिषदेत क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता येण्यात झाली.एवढंच नव्हे तर पोटनिवडणूका देखील भाजप हरली.२०१४ मध्ये काँग्रेसची परिस्थिती अशी होती की नागपूर जिल्ह्यात फक्त सुनील केदार यांनाच आपली सीट वाचवता आली होती.

अश्‍याप्रकारे बावणकुळे यांना बोट धरुन राजकारणात आणनारे गडकरी हेच होते.आतापर्यंतच्या इतिहासात काँग्रेसच्या सत्तेत सर्व महत्वाची खाती ही पश्‍चिम महाराष्ट्राच्या आमदारांकडेच राहीली मात्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पहील्यांदा उर्जामंत्रालय हे विदर्भाच्या हक्काच्या माणसाकडे आले होते.तीच ‘रि’आघाडी सरकारने देखील ओढली व उर्जा खाते पालकमंत्री नितीन राऊत यांना देऊन विदर्भाकडे हे खाते राहू दिले.

बावणकुळे यांच्यासाठी पक्ष,गडकरी आणि फडणवीस हीच एकमेव ‘निष्ठा’ असल्यानेच विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणूकीत बावकुळे यांना उमेदवारी देण्यात आली.यासाठी गडकरी यांनी दिल्लीश्‍वरांकडे शब्द टाकला असल्याचे बोलले जात आहे.दिल्लीश्‍वरांनी देखील ओबीसी मतदार अणि विदर्भात पक्षाला झालेले नुकसान यांचा अंदाज बांधून यावेळी कोणतेही आलोखे-पिलोखे न घेता बावणकुळे यांना उमेदवारी बहाल केली.

मंगळवार दि.१४ डिसेंबर रोजी स्थानिक मतदार संघाच्या निवडणूकांचा निकाल घोषित होणार आहे,त्यात बावणकुळे हेच विजयी होणार आहेत, हे काँग्रेसच्या गोटात ही अप्रत्यक्षरित्या मान्य करण्यात आले आहे.

आज ज्या तत्परतेने गडकरी यांनी बावणकुळे हेच आभार मानतील अशी सूचना मंचावर केली ते बघता सभागृहातील अनेकांना बावणकुळे यांच्या विषयी गडकरींच्या मनातील विशेष ममत्व स्पष्टपणे जाणवले.

मात्र गडकरींची ही सूचना आणि बावणकुळेंविषयी त्यांचे ममत्व मंचावर उपस्थित एका आमदाराला मुळीच रुचले नाही,आपल्या चेह-यावरचा तिरस्कार लपवण्यात ते शेवटपर्यंत अपयशी ठरले,चाणाक्ष प्रेक्षकांच्या नजरेतून मात्र त्या आमदारांच्या चेह-यावरील हावभाव सूटू शकले नाही.

Latest बातम्या