
काँग्रेसचा अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठींबा
’ये तो होना ही था’आधीच ठरलेलं:विविध चर्चेला उधाण
नागपूर,ता.९ डिसेंबर २०२१ :‘राजकारण’हे भल्या-भल्यांना कोड्यात टाकणारे आहे असे उगाच नाही म्हटल्या जात,राणा भीमदेवी थाटात भारतीय जनता पक्षातून ज्येष्ठ नगरसेवक डॉ.छोटू भोयर यांना काँग्रेसने विधान परिषदेच्या स्थानिक मतदारसंघाची उमेदवारी घोषित केली,त्यांच्या मागे आपले बळ उभे केले अन् बघता-बघता ऐन मतदानाच्या २४ तासांच्या आत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीवरुन पत्र आणतात काय अन्, काँग्रेसवर अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना आपलं ‘संपूर्ण‘समर्थन देण्याची वेळ येते काय अन्, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अवघ्या दहा दिवसात क्रीडा मंत्री सुनील केदार ‘पक्ष’ बाजूला ठेऊन संपूर्ण निवडणूकीची रणनीतीच ‘हायजॅक’करतात काय अन् ,‘घर के ना घाट के‘झालेले काँग्रेसचे ‘अधिकृत’उमेदवार डॉ.छोटू भोयर हे ऐन मतदानाच्या २४ तासांआधी निवडणूक लढणयास आपली ‘असमर्थता’दाखवतात काय,सगळं काही आलबेल,जनतेच्या जनप्रतिधींना गृहीत धरणारं,लोकशाहीची थट्टा करणारं,आपल्या वैयक्तिक स्वार्थ आणि पक्षीय वर्चस्व सिद्ध करणारं राजकारण जेव्हा घडतं किंबहूना घडवल्या जातं तेव्हा ते ‘राजकारण’ नसून राजकारणाचा ‘खेळखंडोबा‘करणाराच ठरतो.
आज दिवसभर उपराजधानीत विधान परिषद या वरिष्ठ सभागृहातील एका आमदारकीसाठी जे काही जलद‘नाट्य’ घडलं ते सर्व ‘पूर्वनियोजित’असल्याचीच चर्चा अधिक आहे.काँग्रेसचे घोषित उमेदवार डॉ.छोटू भोयर यांना देखील हे माहिती होतं, त्यांना अर्ज भरायचा आहे आणि शेवटच्या क्षणी ‘असमर्थता’व्यक्त करुन माघार घ्यायची आहे,अशीही चर्चा ऐकू येत आहे.हा सर्व मेलोड्रामा ‘पूर्वनियाेजित’असल्याचे बोलले जात आहे.
दूसरीकडे ज्या अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना एकूण ६ भाजप,१ बहूजन समाज पक्ष,१ काँग्रेसचे ‘सूचक’ प्राप्त झाले आहे ते अचानक अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा या निवडणूकीत पाठींबा मिळवते झाले!असे चमत्कार एका रात्री घडत नसतात तर ‘सोची समझी रणनीतीनुसार’घडवून आणले जात असतात हे न समजण्या इतपत जनता ही खुळी नसते.
सुरवातीला ही लढत भाजपचे चंद्रशेखर बावणकुळे व काँग्रेसचे छोटू भोयर यांच्यातच रंगेल अशी ‘स्किप्ट’तयार करण्यात आली होती, त्यानुसार ‘चित्रीकरण’देखील झाले.शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवारच्या मागे आपली ‘राष्ट्रीय‘ताकद लावायची आणि भाजपला संभ्रमित करायचे,अशी रणनीती असावी,यासाठीच दोन बलाढ्य उमेदवारांसोबत ,रिंगणात जेव्हा एक अपक्ष उरतो तेव्हा शंकेला भरपूर वाव असतो.
आज सर्वदूर काँग्रेसला अपक्ष उमेदवारला पाठिंबा देण्याची ‘नामुष्की’ओढवली असल्याचा प्रचार-प्रसार झाला मात्र ही नामुष्की ओढवली नसून ‘हेतूपुरस्सर’ओढवून घेण्यात आली असल्याचे अनेक राजकीय धुरिणांचे ठाम मत आहे.रिंगणात जेव्हा एकमेव अपक्ष उमेदवार उरतो,तो ही योगायोगाने काँग्रेसचाच तेव्हा शंकेला वाव मिळणारच.
या संपूर्ण नाट्य संहितेचे लेखक होते ग्रेसचे विदर्भातले ‘बाहूबली’नेते व मंत्री सुनील केदार.चित्रपटातील खलनायक मात्र डॉ.छोटू भोयर न ठरता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच ठरल्याचे सांगितले जात आहे.त्यांच्याकडे फक्त भूमिका वठवण्याचा योग आला कारण लेखक-दिग्दर्शक,निर्माते हे एकमेव केदार होते.त्यांच्या ’उत्कृष्ट’ संहिता लेखनाला साथ मिळाली ती उर्जामंत्री नितीन राऊत व आ.अभिजित वंजारी यांची.
आज हॉटेल सेंटर पॉईंट व राष्ट्रवादीसोबत सदर येथील हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये पार पडलेल्या बैठकीत ही ’त्रयी’मंचावरही उपस्थित होती.भोयर यांचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांना सोबत करणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष आ.विकास ठाकरे यांचा रोलच गेल्या दहा दिवसांपासून घडणा-या या संपूर्ण नाट्यमय घडामोडीरुपी चित्रपटात कुठेही दिसला नाही. त्यांचा रोल मध्येच कापण्यात आला…..!

भोयर यांनी एकीकडे ते निवडणूक लढण्यात ‘असमर्थ’ नाहीत, असे विधान केले दूसरीकडे उर्वरित १२ तासात काँग्रेसचा पाठींबाप्राप्त उमेदवार मंगेश देशमुख यांना जी काही मदत करता येईल ती देऊ केली!भाजपचा ‘पराभव’होणे हे त्यांनी मात्र प्राधान्यक्रम मानलं.माझ्या मागे हटल्याने काँग्रेस एकजूटीने लढत, अपक्षाला विजयी होण्याचा मार्ग मोकळा करीत असेल व भाजपचा पराभव होत असेल तर त्यासाठी अशी माघार घेणेच योग्य होते,अशी ‘कौतुकास्पद’पुष्टि त्यांनी आपल्या माघारीची केली.
दूसरीकडे काल रेडिसन ब्लूयमध्ये तसेच आज हॉटेल सेंटर पॉईंट व तुलीमध्ये पार पडलेल्या आघाडीतील पक्षाच्या ग्रामीण व शहरी मतदारांच्या बैठकीत केदार यांचे भाषण व आत्मविश्वास हे ‘अवर्णातीत’होते,असा आत्मविश्वास मतदानाच्या शेवटच्या घटकेला येत नसतो,अनेक दिवसांच्या तयारीने ‘आत्मसात’ होत असतो,हे कुणी शेंबडं पाेर ही सांगू शकेल.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीवरुन ऐन वेळी उमेदवार बदलल्याचे आज जे पत्र आणले ते भाजपच्या पराभवाची ‘शक्यता’ या एकमेव कारणातून आणले असल्याची चर्चा आहे.
या निवडणूकीत सहली झाल्या,पक्षावरील निष्ठेच्या बाता झाल्या,बैठका,मार्गदर्शन,पक्षाभिमानाची जाणीव ,गटातटाचे राजकारण आणि अखेर ‘पत्र प्रपंच’ही झाला मात्र जे पत्रात आहे तेच मतदान पत्रिकेवर ही उमटणार का?हा प्रश्न मात्र राजकारण्यांना चांगलाच अस्वस्थ करुन जाणारा आहे,याचे उत्तर १४ डिसेंबरच्या मतमोजणीच्या क्लायमॅक्समध्ये जनप्रतिनिधी असणारे मतदार आणि नागरिक दोघांनाही बघायला मिळेल.

आमचे चॅनल subscribe करा