
विधान परिषद निवडणूकीला चढला रंग
राष्ट्रवादी आघाडीसोबतच:दुनेश्वर पेठे
बसप खरंच तटस्थ?एमआयएमचीही नकारघंटा
मतदार आमच्याचसोबत:दोन्ही उमेदवारांचा दावा
नागपूर,ता.७ डिसेंबर २०२१: स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणूकीतील मतदानासाठी अवघे दाेनच दिवस उरले आहेत.येत्या १० डिसेंबर रोजी एकूण ५६० मतदार मतदान करणार आहेत.मतदानाचा कल कोणाकडे झूकला?हे १४ डिसेंबर रोजी पार पडणा-या मतमोजणीनंतरच कळेल मात्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावणकुळे आणि काँग्रेसचे भाजपमधून ‘आयात’केलेले उमेदवार डॉ.छोटू भोयर यांनी विजय त्यांचाच असल्याचे दावे-प्रतिदावे केल्याने या निवडणूकीतील रंगत आता पराकाष्ठाला पोहोचली आहे.
या निवडणूकीत तिसरे अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पूर्वी भाजपचाच पाठींबा असल्याची चर्चा होती कारण त्यांच्या उमेदवारी अर्जावर ६ भाजप सदस्यांचीच सूचक म्हणून नोंद आहे, मात्र गेल्या दहा दिवसात हे चित्र पूर्णत:पालटले व या उमेदवाराला काँग्रेसनेच आता आपले समर्थन दिल्याची वावटळ भाजपकडून उडवण्यात आली.काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार डॉ.छोटू भोयर यांची फसवणूक केली असून त्यांचे फासे त्यांच्यावरच बूमरँग झाले असल्याचा दावा भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली.
तर छोटू भोयर यांनी पराभवाच्या भीतीने भाजप मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप केला.मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो आहे,मीच आघाडीचा उमेदवार आहे,सर्व घटक पक्ष माझ्यासोबत आहेत,भाजपला मतदारांवर विश्वास नाही त्यामुळेच अफवाहाचे पीक ते पेरत असल्याची टिका भोयर यांनी आज माध्यमांकडे केली.
तर दटके यांनी काँग्रेसचा नेमका उमेदवार कोण आहे?छोटू भोयर की मंगेश देशमुख?अशी गुगली टाकली.
उमेदवारी अर्ज भरल्यावर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत छोटू भोयर यांनी विजयाचा गुलाल तेच १४ डिसेंबर रोजी उधळतील, असा दावा केला आहे तर काँग्रेस ही विजयासाठीच निवडणूक लढत असते,असे बोलवचन क्रीडामंत्री सुनील केदार यांनी ऐकवले होते.
भाजपचा पराभव करुन पदवीधर मतदारसंघाच्या विजयाची गोडी काँग्रेसने निवडणूकीत गट-तट विसरुन ‘एकीकरुन’ चाखली असल्याने या ही निवडणूकीत ,त्यांना तोच ‘इतिहास’ दोहरावयाचा आहे, असाच सुरवातीला होरा होता मात्र ‘पडद्या मागे’ काय घडले?कोणाचा दूरध्वनी कोणाला गेला?सत्तेच्या सारिपाटातील सोंगट्या नेमक्या कोणी हलवल्या?याचीच चर्चा असून गेल्या दहा दिवसात काँग्रेसच्या गोटात ’इतना सन्नाटा क्यो है भाई?या सारखेच वातावरण होते.
त्यामुळेच काँग्रेसने छोटू भोयर यांचा ‘गेम ’केल्याची वावटळ उठली.मात्र भोयर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत याचे खंडण करुन, मी सातत्याने ग्रामीण आणि शहरी मतदरांच्या भेटीगाठी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.पुन्हा एकदा विजय‘ माझाच ’ असल्याचा दावा त्यांनी केला.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी ‘मुक्त कंठाने’भोयर यांची प्रशंसा केली आणि त्यांच्यासारखा उमेदवार दूसरा काेणी असूच शकत नसल्याची ’पावती’दिली!भोयर हे अतिशय मेहनती उमेदवार असून विजयासाठी ग्रामीण भाग त्यांनी पिंजून काढला असल्याचे सांगितले.सुरवातीला आमची ‘नाराजी ’होती मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासोबत आज दुपारी २ वाजता उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या घरी बैठक पार पडल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत नाना पटोले यांनी आमची ‘समजूत ’ काढली असल्याचे त्यांनी सांगितले.शेवटी आमचा पक्ष हा एकच विचारधारा असलेला असून गांधी,नेहरुंची परंपरा मानणारा आहे.त्यामुळेच काहीही झाले तरी भाजपसोबत जाणार नसल्याचे सांगून, आमचा राष्ट्रवादी पक्ष आघाडीच्या उमेदवाराच्या मागे भक्कमपणे उभा असून भोयर यांनाच आमचा पाठींबा असल्याचा ‘दावा’त्यांनी केला.
दूसरीकडे बहूजन समाजवादी पक्षाचे ११ सदस्य तसेच एमआयएमचे मतदारही हे तटस्थ राहण्यावर ‘ठाम’असल्याचे ‘दर्शवित’आहेत, त्यामुळेच १४ डिसेंबरच्या मतमोजणीनंतर दोन्ही पक्षाचे, जिंकण्याचे दावे-प्रतिदावे किती खरे किती खोटे होते हे स्पष्ट होईल.

आमचे चॅनल subscribe करा