Homeनागपूर न्यूजअखेर...बावणकुळे यांना ‘सब्र का फल मिठा’

अखेर…बावणकुळे यांना ‘सब्र का फल मिठा’

Advertisements

विधान परिषदेसाठी भाजपकडून बावणकुळे यांना तिकीट

नागपूर,ता. १९ नोव्हेंबर: बहूप्रतिक्षीत अश्‍या नावाची घोषणा अखेर आज भारतीय जनता पक्षाकडून झाली.माजी उर्जामंत्री व शहराचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना पक्षाकडून, येत्या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी अखेर उमेदवारी जाहीर झाली असून आता त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी घोषित करणार याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

नुकतेच आ.गिरीश व्यास यांच्या सहा वर्षांच्या कामाच्या प्रगती पर्व अहवाल पुस्तकाच्या विमोचनप्रसंगी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा व्यास यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचा सूचक इशारा दिला होता.्त्यावेळी पक्षातर्फे विक्की कुकरेजा,संजय बंगाले,अविनाश ठाकरे यांची ही नावे चर्चेत आली होती मात्र आज बावणकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कुकरेजा,अविनाश ठाकरे व बंगाले यांना अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थेच्याच निवडणूकीत जवाबदारी निभावयची असल्याचे सिद्ध झाले.

व्यास यांच्या समारंभात बावणकुळे यांनी व्यास यांचे अभिनंदन करताना ते फार नशीबवान असल्याचा उल्लेख केला कारण ते अविरोध विधान परिषदेत निवडून गेले होते,२०१५ च्या निवडणूकीत त्यांच्या विरोधातील उमेदवार काँग्रेसने मागे घेतला होता.व्यास यांना प्रचारासाठी कोणासमोर हात जोडावे लागले नसल्याचे ते म्हणाले होते.गडकरी व फडणवीस हे व्यास यांच्या पाठीशी उभे असल्याचे बावणकुळे म्हणाले .राजकीय जीवनात मला ही व्यास यांनी खूप मदत केली असल्याचे उद् गार बावणकुळे यांनी काढले होते.

त्यावेळी बावणकुळे यांचे नाव या शर्यतीत असताना देखील बावणकुळे यांना विधान परिषदे ऐवजी तीन वर्षांनी येणा-या विधान सभेच्या तिकीटाचीच अास जास्त होती,असे बोलल्या जात होते मात्र बावणकुळे हे गडकरी व फडणवीस या दोघांचेही गोटातले ‘खास’असल्यामुळे विधान सभा निवडणूकीत, दिल्लीश्‍वरांनी त्यांच्यावर केलेल्या अन्याय धूवून काढण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांतून होणा-या आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात घालण्याचा निर्णय गडकरी व फडणवीसांनी घेतला.

व्यास यांच्या कार्यक्रमात गडकरी यांनी आता उमेदवारीसाठी फक्त प्रामाणकि राहून चालत नाही तर चतुर असणे देखील खूप महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले होते.याशिवाय निवडणूक म्हटली तर त्यात पाण्यासारखा पैसा ही खर्च करण्याची कूवत असावी लागते.बावणकुळे हे पाच वर्ष मंत्री पदावर असल्यामुळे गडकरी यांनी उमेदवारीसाठी विशद केलेल्या ‘निकषात’ या बावणकुळे हेच एकमेव ‘योग्य’ठरत होते,त्यामुळे उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात पडली.

विशेष म्हणजे नुकतेच जिल्हा परिषदेतील सत्ता भाजपला ओबीसी मतांमुळेच गमवावी लागली. त्यामुळे अगामी निवडणूकीत ओबीसी मतदारांचा रोष पत्करणे भाजपला परवडणारे नव्हतेच.कामठी नगर पंचायतमध्ये बावणकुळे यांनी एकहाती भाजपची सत्ता आणली होती.ग्रामीण भागात बावणकुळे यांचा प्रभावी जनाधार आहे.

२०१९ मध्ये बावणकुळे यांचे विधान सभेचे तिकीट कापल्यामुळे ओबीसी समाज हा भाजपवर नाराज होता.त्याची परिणीती जिल्हा परिषदेची सत्ता गमावण्यात झाली.याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण देखील न्यायालयाच्या निर्णयामुळे संपुष्टात आले आहे.हीच बाब गडकरी व फडणवीस यांनी दिल्लीश्‍वरांच्या नजरेत आणून दिली

पाच वेळा प्रतिनिधित्व केल्यानंतरही पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत भाजपला पराभव पत्करावा लागला,त्याचीच पुनरावृत्ती निदान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणूकीत व्हायला नको म्हणून बावणकुळे यांच्यासारखा तगडा व ओबीसी उमेदवार पक्षातर्फे देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

बावणकुळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मात्र कामठी तसेच ग्रामीण भागात कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे.आपले साहेब पुन्हा ‘आमदार’होणार या आनंदात कोराडी येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी अाज चांगलीच गर्दी केली.साहेबांना ‘सब्र का फल मिठा’मिळाल्याचे समाधान त्यांच्या चाहत्यांच्या चेह-यावरुन ओसंडून वाहत होता.

विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणूकीत फक्त ५६२ मतदार मतदान करणार आहेत यात मनपाचे १५६ जिल्हा परिषदेचे ५८ तसेच नगर पंचायतचे ३ सदस्य मतदानात सहभागी होतील.१० डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी १४ डिसेंबर रोजी होईल.१६ ते २३ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरायचा असून २६ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

मनपात भाजपचे एकूण १०५ सदस्य असून जिल्हा परिषदेचे मिळून ६४ मते भाजपकडे अधिकची आहे त्यामुळे बावणकुळे यांना हा विजय काँग्रेसच्या तुलनेत सहज आणि सोपा ठरणार आहे.काँग्रेसकडून माजी आमदार राजेंद्र मुळक यांचे नाव आघाडीवर आहे.

Latest बातम्या