
दिवाणी याचिका ही केली दाखल
नागपूर, दि. ८ नोव्हेंबर २०२१: भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्या विरोधात नागपूर न्यायालयात आज ॲड.सतीश ऊके यांच्यामार्फत फौजदारी तक्रार व दिवाणी याचिका दाखल करण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत.त्यांना पुरावे मागितले तर पुरावे ते देत नाहीत.
सातत्याने ते काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेवर आरोप करत अाहेत.एक तर ते तथ्यहीन आरोप करतात त्यातच आरोप करताना भान ठेवत नाहीत.किरीट सौमेय्यांनी आजपर्यंत जे-जे आरोप केलेत,त्यातले किती सिद्ध झाले?लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास कमी करण्याचे काम ते करत आहेत त्यामुळेच कुठेतरी शेवटी या गोष्टीला आळा बसला पाहिजे यासाठी त्यांच्या विरोधात आज तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे लोंढे यांनी सांगितले.
तुमच्याकडे पुरावे असले तर भ्रष्टाचाराविरुद्ध जरुर बोला,मग यामध्ये पक्ष ही येत नाही पण हे सगळ्याच पक्षांच्या संदर्भात केलं पाहिजे पण ते तसं करत नाहीत.किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतात असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात आज नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचे चॅनल subscribe करा