

स्वातंत्र्यदिनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी केले उपोषण
विदर्भवादी झाले आक्रमक, आंदोलनाचा दुसरा टप्पा ठरला
नागपूर, १६ ऑगस्ट : विदर्भाच्या नावावर मते मागून महाराष्ट्रात आपले सरकार स्थापन करणा-या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची फसवणूक केली तसेच, कोरोना काळात भरमसाठ वीज बिल आणि दरात वाढ करून जनतेचे आर्थिक कंबरडे मोडणा-या विद्यमान उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना संपूर्ण विदर्भात गावबंदी करण्यात येणार असल्याचा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीने रविवारी दिला.
एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इतवारी येथील शहिद चौकात विदर्भ स्वतंत्र राज्य व्हावे या मागणीसाठी एक दिवसाचे उपोषण केले.
विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे, कोरोना काळातील वीज बिल माफ व्हावे आणि पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ मागे घ्यावी, या मागण्यांसाठी विदर्भवाद्यांचे ठिय्या आंदोलन मागील सात दिवसांपासून सुरू असून आंदोलनाचा पहिला टप्पा स्वातंत्र्य दिनी उपोषणाने पार पडला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अॅड. वामनराव चटप, राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते. १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजताच विदर्भातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहिद चौकात जमले आणि या उपोषणात सहभाग घेतला.
दुस-या टप्प्यातील आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी दुपारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यात राम नेवले यांनी ठराव मांडले. त्याला सर्वांनी सहमती दर्शवली आणि सर्व ठराव पारित करण्यात आले.
यावेळी रंजना मामर्डे, कर्नल चरडे, देविदास लांजेवार, मधुसूदन हरणे, सुदाम राठोड, सुयोग निलदावासर, प्रशांत तागडे, राज ठाकूर, युवराज उपरते, चेतन उमाठे, अजय कडू, राजेंद्र सताई, कपिल इत्ते, सूर्यभान शेंडे, शफिक रंगरेज, प्रियंका दिवटे, राहूल खारकर, संजय हाडोळे, श्वेता शिरस्कर, तात्यासाहेब मते, वसंतकुमार चौरसिया, गोपाल चांदूरकर, संतोष रामटेके, प्रदीप देशपांडे, गुलाब धांडे, अरुण मुनघाटे अमिता मडावी, मनिष फुंडे, रामचंद्र रोकडे इत्यांदीची भाषणे झाली.
……
२६ ऑगस्ट रोजी रास्ता रोको
दुस-या टप्प्यातील आंदोलनाला २६ ऑगस्ट रोजी प्रारंभ होणार असून यादिवशी संपूर्ण विदर्भात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी काटोल येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा घेण्यात येईल. २१ नोव्हेंबर रोजी पूर्व व पश्चिम विदर्भात जनजागृतीसाठी ‘विदर्भ निर्माण जनजागृती यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेचा नागपुरातील विदर्भ चंडिका मंदिर, शहिद चौक येथून प्रारंभ होणार असून विविध गावांमध्ये १०० मोठ्या सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागपुरातच या यात्रेचा समारोप होईल.
डिसेंबर २०२१ मध्ये दिल्लीत लोकसभा अधिवेशन काळात विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत गाव, तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयांवर ‘महाराष्ट्र राज्य’ च्या जागील ‘विदर्भ राज्य’ चे बोर्ड लावण्यात येणार आहेत. याशिवाय, गावस्तरावर संघटन बांधणी केली जाईल.




आमचे चॅनल subscribe करा
