Homeनागपूर न्यूजमुख्यमंत्री साहेब ‘वाझे’नाही ‘माझे’पहा:नागपूरकरांचा टाहो

मुख्यमंत्री साहेब ‘वाझे’नाही ‘माझे’पहा:नागपूरकरांचा टाहो

Advertisements

चार दिवसात बाधितांची संख्या १७ हजार पल्ल्याड: बेड दिलेत पण उपचार कुठे आहेत?

मृत्यूनेही गाठला कळस

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २३ मार्च: महाराष्ट्राच्या उपराजधानीत दररोजचे करोना बाधितांचे आकडे पाहिले की भारतात नागपूर हे सर्वाधिक निकृष्ट का आहे,या प्रश्‍नाचं उत्तर मिळतं,सर्वाधिक बाधित नागपूरमध्ये!त्यामुळे मृत्यू दर ही जास्तच,परवाच निंबाळकर या एकाच कुटुंबातील २ जण करोनामुळे जग सोडून गेले,त्या कुटुंबाची काय अवस्था झाली?एकाने एम्समध्ये प्राण सोडला तर एकाने मेयो रुग्णालयात, त्या कुटुंबाची वेदना शब्दात ही सांगता येणार नाही.म्हणायला प्रशासन आपापली ‘नोकरशाहीची ‘ कामे चोखपणे पार पाडीत आहे मात्र त्याचा ‘प्रभाव ‘जमिनीस्तरावर कुठेच दिसून पडत नाही,परिणामी मुख्यमंत्री साहेब आता तुम्हीच ‘वाझेंना’सोडून ‘माझे’पहा असा टाहो नागपूरकर जनता फोडत आहे.

कुटुंब संकटात असलं की कुटुंबाच्या प्रमुखाकडूनच त्या संकटामधून मार्ग काढण्यासाठी अपेक्षे नी बघितलं जातं.इथं तर संपूर्ण शहरच आजारी झालं आहे,संसर्ग आणि मृत्यशी स्पर्धा करीत आहे. गेल्या एका वर्षापासून करोनाशी झूंज देत नागपूरकरही आता खूप थकले आणि वैद्यकीय व प्रशासकीय यंत्रणाही दमली, तरीही मग, विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सुरु होते उपाययोजनांची सरबत्ती… प्रशासकीयस्तरावरची!

पालकमंत्री,मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त बैठकीत सूझाव देतात,सूचना मांडतात,काहीही करुन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंधही घालतात आणि चक्क ‘लॉक डाऊन’ही लावतात मात्र लॉक डाऊन होऊन देखील बेमुरव्वत करोना याने काही लोकांना सोडले नाही,ऐन लॉक डाऊनच्या काळातच बाधितांची संख्या ही तीन हजारच्या पलीकडे पोहोचली!

लोकं पाॅझिटीव्ह येतात आहे मात्र हातात पॉझिटीव्ह अहवाल आल्यावर नेमकं जावं कुठे?हा प्रश्‍न त्यांना सैरभैर करतो!करोना पॉझिटीव्ह आल्यानंतर कळतच नाही कुठे जावे?मुरलेली नोकरशाही याबाबतीतही कोणताही दिलासा नागपूरकरांना देत नाही.सैरभैर होऊन संसर्गित हे घरीच राहणे पसंद करतात,त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य ही बाधित होत आहेत एवढंच नव्हे तर लक्ष् णे नसल्याने सर्रास दूध,भाजी,औषधे आणण्यासाठी संसर्गित हे बाहेर ही पडत आहेत.आज नागपूर शहरात बाधितांचा आकडा वाढण्यास हाच बेजवाबदारपणा सर्वाधिक कारणीभूत ठरला आहे,हे कळूनसुद्धा आता लोकं हे मुजोर झाले आहेत,मानसिकरित्या ते खूप थकलले आहेत त्यामुळे  कोणतेही धाडस करण्यास मागे पुढे पाहीले जात नाही आहे.

तुम्ही कितीही ‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ किवा ‘मी जवाबदार’धरले तरी गेल्या वर्षभरात भोगलेल्या पराकोटीच्या त्राग्यामुळे लोक खरंच र्निढावले आहेत.ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ब-याच अंशी झालेली अनलॉकची प्रक्रिया याने करोनाची दूसरी लाट महाराष्ट्रात येण्यास चांगलाच हातभार लावला हे सांगायला आता तज्ज्ञाची गरज आहे का?

शाळा,कॉलेज उघडलेत,नागपूरातच छत्तीसगडमधील विद्यार्थी आलेत,अश्‍यांची पण सरमिसळ झाली.सभागृह उघडली,लग्नसराई सुरु झाली,कार्यक्रम सुरु झाले, गर्दी वाढू लागली आणि…करोनाचा नवा स्टेन याने अलगद नागपूरकरांना टिपले,अशी तज्ज्ञांची शंका आहे.विशेष म्हणजे हा नवा स्टेन अख्ख कुटुंबच संसर्गाच्या विळख्यात घेत आहे.घरच नव्हे तर बिल्डींग,अर्पाटमेंट हे करोनाच्या विळख्यात सापडत आहेत.एका एका अर्पाटमेंटमध्ये १९ च्या वर बाधित आढळत आहेत.

मृत्यू दर कमी आहे असा दिलासा दिला तरी १०० पैकी २ टक्के धरल्यास हजारो  रुग्णांचा मृत्यू! हा आकडा धक्कादायकच नाही का?तरीही राजकीय आंदोलने सुरु आहेत.पत्र परिषदा सुरु आहेत.बाजारपेठांमध्ये गर्दीही तशीच आहे.

आता तुम्हीच सांगा मुख्यमंत्री साहेब,एवढं लॉक डाऊन असताना ही मृत्यू दर एवढा का?आर्थिकदृष्टया व्यावारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक हे भयंकर अडचणीत आले मात्र दूसरीकडे संसर्गितांची संख्या ही एका दिवसात ३ हजार पलल्ल्याड का जात आहे?

फक्त आकडे सांगून धूळफेक करु नका,योजिल्या जाणा-या उपयांचा प्रभाव का जाणवत नाही?मागचे संपूर्ण वर्ष तसेच अनलॉक नंतरही मागचे चार महिने नागपूरकरांनी तुम्हाला दिले ना यंत्रणा उभारायला?पालकमंत्री,मनपा आयुक्त,विभागीय आयुक्त,पोलिस आयुक्त सर्व मिळून नागपूरकरांना नेमके या महामारीच्या काळात काय देत आहेत?हे स्पष्टपणे नागपूरकरांनाही कळत नाही,तुम्हीच आता नागपूरात या,११ जिल्ह्यांची बैठक घ्या.

‘लाईन ऑफ एक्शन’समजावून सांगा.बेड दिले तरी उपचार मिळतात आहेत का?विचारा.कोणते औषधोपचार दिले जात आहे?रेमडिसिव्हिर आज ही अनेक रुग्ण हे रुपये ७ हजारातच विकत घेत आहेत,जेव्हा की याचे दर तुम्हीच दोन हजार निर्धारित केले ना!

‘वाझे’ सोडून तुम्ही अाता जनतेचे प्रश्‍न घ्या हो! गोरेवाडाला आला होता वाघ बघायला तसेच आता नागपूरकरांची व्यथा बघायला या.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेनड्राईव्हमध्ये ६ जीबीपेक्ष्ा जास्त डेटा असलेले पुरावे केंद्रीय गृह सचिवांना दिल्लीत देऊन आलेत तुम्ही नागपूरला आलात तर नागपूरकर तुम्हाला ट्रक भर पुरावे देतील करोनाच्या संदर्भात प्रशासकीय निष्काळजीपणाचे!नागपूरकर जनतेच्या मृत्यूचा डेटा दिवसागणिक वाढतोय,त्याची कोणालाही पर्वा नाही,तुम्हीच घ्या बैठक महापौरांसह,पालकमंत्री आणि मुरलेल्या प्रशासकीय अधिका-यांसह,विचारा जाब त्यांना.

जनतेचा आज कोणीच वाली नाही.तुम्हीच चार दिवस राहा आणि महापौरांसह सर्वच प्रशासकीय अधिका-यांची खुली पत्र परिषद घ्या.त्यात हे सर्व योजित असलेल्या उपाययोजनांची पोल स्वत: जनताच खोलेल,याची खात्री देतो.

आज नॉन कोविडच्या रुग्णांनाही खासगी रुग्णालयातही बेड मिळत नाही.नुकतेच न्यूमोनियाच्या रुग्णाला दर-दर भटकावे लागले बेड मिळवण्यासाठी.मग?दुप्पट खर्च करावा लागला,सॅनिटायझरच्या नावाखाली!सॅनिटायझरचेही बिल रुग्णाच्याच खात्यात?बाधितांची संख्या किती?बेडची संख्या किती?तरीही मनपा आयुक्त जिल्हाधिकारी,विभागीय अायुक्त स्वत:ची पाठ थोपटवून घेत आहेत,आज इतके बेड वाढवले,आज तितके बेड वाढवले.आज ही बाधितांच्या संख्येपैकी बेडची संख्या ही ‘नगण्य’नाही का?

आज सर्वाधिक गरज ही ५ हजार खाटांच्या व्यवस्थेची आहे.मागे राधास्वामी सत्संग मंडळातर्फे अशी व्यवस्था निर्माण केली होती.ती कितपत यशस्वी-अयशस्वी झाली याच्या तपशीलात न जाता किमान ती नागपूरकरांसाठी आज,आता तरी खूप दिलासादायक तर होती!लसीकरणाची कुठे व्यवस्था आहे?खासगी आणि सरकारी रुग्णालयात याचे प्रमाण किती वाढवण्यात आले?ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाच्या बाबतीत खूप समस्या आहेत?तुमच्याशिवाय कोण समजून घेणार?

चाचणी केंद्र तुम्ही कुठे देऊन राहीला आहात?किती चाचणी केंद्र उपलब्ध आहेत लोकसंख्येच्या मानाने?मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. हे तर मुरलेल्या नोकरशाहीचे आदर्शवत उदाहरण आहे,अशी आता नागपूरकर जनता मानू लागली आहे!आकड्यांच्या फे-यांमध्ये ते फार प्रभावीरित्या कोविडबाबतच्या प्रश्‍नांना सहज गुंडाळून टाकतात.आम्ही इतके बेड केले,एवढे आयसीयूचे एवढे ऑक्सीजनचे…फक्त आकडेवारीची जगलरी….!रिझल्ट काय?भयावह वाढते आकडे?धक्कादायक मृत्यू?

कोविड पॉझिटिव्ह सर्रास बाहेर फिरतात आहे,प्रशासकीय यंत्रणा काय करत आहे?अद्याप ही झोननिहाय कारवाई का केली जात नाही?झोननिहाय जवाबदारी का निश्‍चित केली जात नाही?नावे घोषित करा ना?भोंगे फिरवा गल्लोगल्ली.जागरुकता तर वाढवा. १६ दिवसात १७ हजार पल्ल्ल्याड बाधितांची संख्या पोहोचली मात्र एक ही भोंगा नागरिकांना जागरुक करण्याकरीता शहरात फिरत नाही.लोकांनाच नुसतं जवाबदार धरुन करोनाच्या महामारीतून सूटका होणार आहे का?

मनपा अायुक्तांना तुम्हीच आता विचारावे संसर्गितांची साखळी शोधण्यासाठी त्यांनी काय व्यवसथा केली आहे?नुसतं फोन नंबर देऊन जवाबदारीमुक्त होता येतं का?लोकं कशाला स्वत:हून तुम्हाला कळविणार आहेत?टेस्टिंग,ट्रॅकिंग,वॅक्सीनेशन कितपत करीत आहात?३० लाख लोकसंख्येच्या शहरात जागरुकता अभियान चालवल्या जात आहे का?हे प्रश्‍न तर प्रशासनालाच सोडवावे लागणार आहेत ना?पालकमंत्री कुठे आहेत?

पालकमंत्री काय बोलतात?हे नागपूरकरांनाच कळत नाही.मुख्यमंत्री साहेब आता तुम्हीच या नागपूरात,एकदाही करोनासाठी बैठक घ्यायला आला नाहीत याची नागपूरकरांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे,फक्त आरोग्यमंत्री राजेश टापेंना पाठवून जवाबदारी झटकता येते का?असा सवाल ज्यांचे कुटुंबिय करोनामुळे रुग्णालयात आहेत,ज्यांची बँक खाती पुरती करोनावरील उपचारांमुळे रिकामी झाली आहेत,ज्यांनी करोनामुळे आपले आप्तस्वकीय अंत्य दर्शनही न घेता श्‍मशानघाटात अंनतात विलीन होताना पाहीले आहेत,त्यांना पडला आहे!
काेणालाही गांर्भीय नाही.तुम्ही संवेदशनशील मनाचे अाहात हे ऐकीव आहे.गोरेवाडाला फोटोग्राफी करायला आला होताच ना,कोविड वार्डमध्ये ही या हो डोकावयाला!

नागपूरकर जनतेला हा ही प्रश्‍न पडला आहे बंगालमध्ये करोना का नाही?केरळ,अासाम,पुड्डूचेरी जिथे जिथे निवडणूका आहेत तिथला करोना कुठे गायब झाला?तिथल्या अफाट गर्दीला करोनाही घाबरला का?मग नागपूरातच एवढा आकडा का?सर्वात महत्वाचे म्हणजे अधिवेशनच्या आधीच नागपूरात बाधितांचा आकडा हा कसा काय वाढतो?मुंबईत अधिवेशन घेतले की करोना वाढत नाही,नागपूरात घेतला की वाढतो,हा ही ‘चमत्कार’ नागपूरकरांना समजावून सांगा हो मुख्यमंत्री साहेब!

सांगा हो, बंगाल सोडून नागपूरवरच कहर बरपवणा-या करोनाला,सलूनवाले,शिंपी,लहान लहान गल्ल्यांमध्ये प्रेसची दूकाने थाटून उपजिविका चालवणारे,चहा-नाश्‍ता ठेलेवाले,फूलवाले,डेकाेरेशनवाले,कॅटरिनवाले,पंचर सुधरवणारे,रद्दी विकणारे,हातावर पोट असणारे मजूर,सभागृह मालक,ऑकेस्ट्रा कलावंत,संगीत वर्ग चालवणारे,वादक,गायक,ध्वनि व्यवस्थापक,प्रकाश व्यवस्थापक,डीजेवाले,हॉकर्स,वेंर्डर्स,व्यवसायिक,मध्यम वर्गीय,निम्न वर्गीय,अगदी उच्च निम्न वर्गीय हे देखील भिखारी झालेत आता,आता पुरे कर हा कहर,मुख्यमंत्री साहेब तुम्हीच सांगा.

सोडा तो वाझे-गाजे,बंगालच्या निवडणूका आटोपल्या की दिल्लीश्‍वरांची नजर ही महाराष्ट्रावर रोखणार आहे,हे सांगायला कोण्याही भविष्यवेत्ताची गरज नाही म्हणूनच, आताच करोनामुळे भरडल्या जाणा-या महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्याचकडून दिलासा हवा आहे.
प्रशासनाचे प्रमुख तुम्हीच आहात.प्रशासनाकडून कोणता मंत्री किती कोटींची खंडणी मागतो,यात ज्यांच्या घरात करोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांना काहीही रस नाही,त्यांना त्यांचा गमावलेला ‘माणूस‘परत हवा आहे..निदान ज्यांच्यावर प्रत्येक माणूस जगवण्याची जवाबदारी आहे त्या प्रशासनाला तरी योग्य शिक्ष्ा व्हाची अशी त्यांची एकच अपेक्ष्ा आहे.

नागपूरातील एका लहान व्यवसायिकाने एका आमदाराने जाहीरातीचे दहा लाख रुपये बुडवले म्हणून आत्महत्येची धमकी दिली त्याची वेदना सोडून ‘डेलकर ’आत्महत्या प्रकरणामागे आपली संपूर्ण यंत्रणा खर्ची घालत असल्याचे बघून नागपूरकरांना आता याचेही वैमनस्य वाटू लागले आहे.जिवंत माणसाच्या समस्या सोडवा मुख्यमंत्री साहेब,या तुमची नागपूरकरांना आतुरतेने वाट आहे….!

Latest बातम्या