
(वेलेंटाईन डे स्पेशल)

‘ती‘ने स्वीकारले ट्रांसमेन भावेशला जसा आहे तसा!
त्यांचा वेलेंटाईन ‘भारतभूमी’
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १४ फेब्रुवारी २०२१: ‘प्रेम’मानवाला परमेश्वराकडून मिळालेली एक पारलौकिक देणगी आहे.प्रेम म्हणजे विश्वास,प्रेम म्हणजे सहवास,प्रेम म्हणजे समर्पण,प्रेम म्हणजे सुखं,प्रेम म्हणजे काळजी,प्रेम म्हणजे आतुरता,प्रेम म्हणजे वाट,प्रेम म्हणजे अश्रू,प्रेम म्हणजे भावनांची गुंतवणूक,प्रेम म्हणजे मनांची जपवणूक,प्रेम म्हणजे विरहाची यातना,प्रेम म्हणजे अश्रूंची वेदना,प्रेम म्हणजे आयुष्याचा श्वास,प्रेम म्हणज तिळ तिळ जळणं,प्रेम म्हणजे सोबतच मरणं….!
प्रेमाला उपमा नाही,असे एक कवि सांगतात.खंर आहे प्रेमाला कोणत्याही उपमांच्या कोंदणात बंदीस्त करु शकत नाही,प्रेम तर बस… प्रेम आहे आणि असं प्रेम कोणावरही केल्या जाऊ शकंत…!
एक कवी म्हणतो ‘मला तूझी आयुष्यभर साथ नकोय तर…तू जोपर्यंत माझ्यासोबत आहेस तोपर्यंतच आयुष्य हवंय’असाच साथ गवसला ट्रांसवूमेन आंचल वर्मा हिला १६ वर्षांपूर्वी.जेव्हा तिच्या जवळ राहायला घर ही नव्हतं.मुंबईत एका चाळीत एका खोलीत चार लोकांच्या शेअरिंगमध्ये ४० रुपये भाडे देऊन फक्त एक खोलीतला एक पलंग मिळत असे.त्याच पलंगाखाली स्टोव,भांडी आणि कपडे ठेवावे लागत असे.आयुष्य म्हणजे फक्त संघर्ष होता आंचलसाठी कारण घरातील सदस्यांनी तिला ती पाचवीत असताना घरातून हकलून दिले होते.
मुलगा म्हणून एका सुखवस्तू कुटुंबात जन्म घेतल्यानंतर ही तिला मुलीसारखं राहायला,जगायला,नृत्य करायला,नटायला आवडत असे.लहाणपनीच आई तिला सोडून परांगदा झाली,सावत्र आई आयुष्यात आली आणि येथूनच तिच्या दु:खाचे फेरे सुरु झाले. वडील सावत्र आईच्या ऐकण्यातले होते.तिला समजून घेणारं ‘घर‘म्हणून घेणा-या त्या चार भिंतीत कोणीही नव्हतंच.शेवटी तो दिवस आलाच…!तिच्यामधले जैविक ,नैसर्गिक संप्रेरकांचे असंतुलन समजून न घेता अश्विन नावाचा हा मुलगा मुलीसारखा वागतो म्हणजे हा ‘तो’आहे असे समजून समाजाच्या भीतीने त्याला घरातून हकलून देण्यात आलं.
आयुष्याची भटकंती करताना दिल्लीत एका रुग्णालयात लिंगपरिवर्तन केल्यानंतर अश्विनची आंचल वर्मा झालेली ‘ती’ मुंबईत पोहोचली.एके दिवशी तिथे अचानक नायर रुग्णालयाच्या बाजूला कच-याच्या ढिगा-यात तिला कापडात गुंडाळलेली ‘ती’सापडली….!तिच्या रडण्याच्या आवाजाने आंचलचे काळीज हेलावले.काळजाशी लावून आंचलने तिला त्या चाळीत आणले.पण?तिला चूप कसे करायचे?दूध कसे पाजायचे?तिला सांभाळायचे कसे?काहीच समजत नव्हते.अश्यावेळी मुंबईसारख्या शहरात चाळीत वसलेली ‘माणूसकी‘ समोर आली.ज्या घरमालकीनीच्या चाळीत ती राहत असते तिने दूध आणून दिले.पाजायला शिकवले.पुढे कामावर जाताना त्या लेकीला सांभाळायला बाई ठेवली आणि हळूहळू परमेश्वराने भेट म्हणून,जगण्याचे ध्येय म्हणून दिलेली ’ती’तिच्या जगण्याचा श्वास बनली.
मोठ्या आस्थेने आंचलने तिचे नाव ’महालक्ष्मी’ठेवले.आज ‘ती’ १६ वर्षांची झाली आहे.नागपूरात एका चांगल्या महाविद्यालयातून ती नुकतीच विज्ञान शाखेतून बारावी झाली.आचंलचे स्वप्न आहेे तिने पोलीस व्हावे किवा डॉक्टर व्हावे.यासोबतच तिने ब्रायडल मेकअप व ब्युटी पार्लरची कला शिकून घ्यावी किमान आपल्या कलेच्या भरवश्यावर तिला कोणासमोरही हात पसरण्याची वेळ येऊ नये.
‘सत्ताधीश‘शी बोलताना आचंल गहीवरते,प्रेम हे फक्त मुला-मुलींमध्येच असते असे नाही….माझी वेलेंटाईन तर माझी महालक्ष्मी आहे जिने माझ्या खडतर आयुष्यात ‘प्रेमच प्रेम भरले’….!मला ख-या अर्थान मातृत्व बहान केले….!
आंचलच्या या माणूसकीने भारलेल्या वेलेंटाईनला ‘सत्ताधीश’चा मानाचा मुजरा.

‘ती’ने स्वीकारले ट्रांसमेन भावेशला जसा आहे तसा!
‘
प्रेम’ही भावना नेमकी आहे तरी काय?हे मोठमोठ्या शास्त्रज्ञांनाही उमजली नाही.प्रेम हे कोणाला,कोणाशी,कधी,कसे होऊन जाईल याबाबत जगात अद्याप एक ही शास्त्रीय ज्ञानावर आधारीत ‘थ्योरी ’निर्माण होऊ शकली नाही.अशीच एक प्रेम कहानि आहे लिंग परिवर्तन करुन मूलगा झालेल्या डॉ.भावेश जैन यांची.
विदर्भातून ट्रांसमेन झालेला तो एकमेव उघडपणे समाजासमोर आलेला धाडसी पुरुष आहे.त्याचेही जिवन अतिशय खडतर होते.सुखवस्तु कुटुंबातील ‘भावना’ ही भावेशमध्ये परिवर्तीत होतानाचा काळ हा अतिशय संघर्षपूण होता.आज मागे वळून त्या संघर्षाची आठवणसुद्धा करावीशी वाटत नसल्याचे भावेश सांगतात.आत्महत्याचा प्रयत्न करणारे भावेश आज त्या हतबलपणाची आठवण ही काढू इच्छित नाहीत.
जन्म नागपूरला,शिक्ष् ण मध्यप्रदेश,घर सोडून मग मुंबईत भटकंती,२० वर्षांपूर्वीचे फूटपाथवरचे ते जिने मात्र भीक कधीही मागितली नाही.पडेल ती कामे केली मात्र आत्मसन्मानाने उदरनिर्वाह केला.एकेदिवशी त्यांना भटकंतीने नाशिकमध्ये पोहोचवले. माहिती नव्हते तिथे त्यांना आयुष्याची जोडीदार भेटणार आहे.एकाच फॉर्मासिटीकलमध्ये एमआर म्हणून काम करताना भावेशला ‘अंजली‘भेटली.
तिला भावेशचा स्वभाव आवडू लागला,त्याचा शांतपणा,त्याच्या प्रामाणिकपणामुळे ती त्याच्याकडे आकर्षित झाली.सत्यवचनी भावेशने तिला कोणत्याही अंधारात न ठेवता मी लिंगपरिवर्तन करुन मूलगा झालो असल्याचे स्पष्टपणे सांगितले मात्र तिचे ‘प्रेम’शरीरावर होतेच कुठे मुळी?ती तर भावेशच्या आत्म्याच्या प्रेमात पडली होती…..!
अर्थातच अंजलीच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोधच होता मात्र अंजली डगमगली नाही. प्रेम असे कोणालाही सहज मिळत नाही त्यासाठी संघर्ष हा अटलच असतो जणू….!अंजलीने कुटुंबियांचा विरोध पत्करुन भावेशसोबत लग्न केले.मध्यप्रेदशमध्ये सोबत राहत असताना चार-चार दिवस उपासमार घडत असे मात्र…त्यांच्यातील प्रेम हे इतकं गहीरं होतं की अतिशय हलाकीच्या काळातही ती दोघे एकमेकांना सांभाळीत आयुष्यातील आव्हांनाना सामारे जात होती…आज त्यांच्या लग्नाला बघता बघता १७ वर्षे झालीत!२३ सा व्या वर्षी केलेलं ते प्रेम मी आता ४० शीत पोहोचलो तरी तसूभर ही कमी झालं नसल्याचं भावेश अभिमानाने सांगतात.ती माझी जगण्यातली प्रेरणा आहे.असे भावेश सांगतो.
दोन बहीणी,दोन भाऊ असा भरलापुरता परिवार सोडून भावेशच्या मागे ठामपणे उभी रहाणा-या अंजलीच्या डोळ्यात आज ही त्याच्याविषयी बोलताना तेवढेच प्रेम दाटून येताना दिसतं.’एक दूसरे पे भरोसा था,विश्वास था’असे अंजली सांगते ‘वैसे भी पीछे मूड के देखने की आदत नही,हम सामने ही देखते है‘अशी आत्मविश्वासाने ती ‘सत्ताधीश’कडे सांगते.‘प्रेम का मतलब शरीर नही ये तो आत्मा का आत्मा से मिलन है’असे भावेश सांगतो.
अंजली तर एक सामान्य मुलगी हाेती.तिच्यात कोणतेही शारिरीक असंतुलन नव्हते.एक सामान्य मुलाशी लग्न करुन ती सुखी संसार करु शकली असती पण…तिने कुटुंबाचा विरोध पत्करुन माझ्यासारख्या ट्रांसमेनशी लग्न केले….!
माझ्यासाठी तिच्यासोबतचा प्रत्येक दिवस हा वेलेंटाईनच असतो असे डॉ.भावेश सांगतो.
त्यांच्या या पारलौकिक प्रेमाला ‘सत्ताधीश’चा मनापासून सलाम.

त्यांच्यासाठी त्यांची वेलेंटाईन आहे ‘भारतमाता’
‘प्रेम’ही एक उदात्त भावना आहे.प्रेम निसर्गावर होऊ शकतं,पर्यावरणावर होऊ शकतं,प्रेम जीव जंतु सजीव सृष्टिवरही होऊ शकतं.असेच प्रेम नागपूरातील ज्येष्ठ व्यवसायिक सी.बी.भरतिया हे आपल्या भारतमातेवर आपल्या मातृभूमीवर करत आले आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून वेलेंटाईन दिनी त्यांनी मातृभूमीवर प्रेम करण्याची एक जनजागृतीपर चळवळच चालवली आहे.प्रेमाला विरोध करु नका त्याची दिशा बदला,असे त्यांचे म्हणने आहे.माझी वेलेंटाईन माझी मातृभूमी असल्याचे ते सांगतात.माझी आई माझ्यावर प्रेम करते त्यामुळे मी तिचा वेलेंटाईन नाही का?असा प्रश्न ते विचारतात?माझ्या बहीणीवर माझे प्रेम आहे,मला तिची काळजी आहे तिचा माझ्यावर जिव्हाळा आहे मग माझी बहीण माझी वेलेंटाईनच आहे.
प्रेमाला विरोध नका करु..प्रेमाला सपोर्ट करा असे ते सांगतात.म्हणूनच दर वर्षी ते ग्रामीण भागातील शाळांमध्ये दर वेलेंटाईंन डे ला जनजागृतीपर कार्यक्रम राबवतात.सुरवातीला त्यांच्या कार्यक्रमावर देखरेखेसाठी पोलीसांच्या गाड्या रहात असे मात्र जेव्हा पोलीसांनाही कळले भरतीया हे तर विद्यार्थ्यांना मातृभूमीवर प्रेम करायला शिकवित आहेत तेव्हा ते देखील या उपक्रमामध्ये सहभागी झालेत.
‘आग लगती है तो फायरब्रिगेडवाले पाणी वहा नही डालते जहां आग लगी है,वहा डालते है जहा आग लगनेवाली है,’आम्हाला देखील आपली पुढील पिढी ही संस्कारक्ष् म करणे गरजेचे आहे.शहरातील तरुणाई तर ऐकणार नाही मात्र किमान ग्रामीण भागात तरी विद्यार्थ्यांमध्ये ‘वेलेंटाईन’हा जागतिक प्रेम दिवस आपल्या मातृभूमीवर प्रेम करुन साजरा करा असा संदेश ते देतात.वेलेंटाईन डे म्हणजे फक्त तरुणाईमध्ये प्रेम फूलणा-या भावनांचा नसून देशप्रेमाचा देखील आहे,हे संस्कार रुजवण्यासाठी दरवर्षी ते भिलगाव येथील पंच कमेटी हनुमान मंदिरात भारतमातेच्या प्रतिमेच्या पूजनाचा उपक्रम राबवितात.
त्यांच्या या महान कार्याला ‘सत्ताधीश’चा प्रमाण.

आमचे चॅनल subscribe करा