Homeनागपूर न्यूजहोमियोपॅथी डॉक्टर लढणार चाळीस कोटींची विधान परिषदेची निवडणूक!

होमियोपॅथी डॉक्टर लढणार चाळीस कोटींची विधान परिषदेची निवडणूक!

Advertisements

डॉ.छोटू भाेयर यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशावर भाजप कार्यकर्ते प्रक्षुब्ध

विश्‍वासघाताची बोच सोशल मिडीयावर व्यक्त

कट्टर स्वयंसेवकाला काँग्रेसची विचारधारा पटली हे संघाचे अपयश: विकास ठाकरे

आघाडी म्हूणन काँग्रेसच्या उमेदवारालाच मतदान:अनिल अहिरकर

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२२ नोव्हेंबर:येत्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या १० डिसेंबर रोजी होणा-या निवडणूकीत भारतीय जनता पक्षातर्फे आज माजी उर्जामंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला,तीच ‘अचूक’ वेळ साधून आज भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व संघाचे स्वयंसेवक डॉ. रविंद्र उपाख्य छोटू भोयर यांनी आपल्या ३४ वर्षांच्या भाजपमधील कारर्कीदीला ‘तिलांजली’ देऊन एकाएक देवडीया भवनात शहराध्यक्ष विकास ठाकरे,क्रीडा मंत्री सुनील केदार,उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत,आ.अभिजित वंजारी,आ.राजू पारवे,माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मूळक आदी यांच्या उपस्थितीत आपला ‘पंजा’त्यांच्या ‘हातात ’दिला.

डॉ.छोटू भोयर यांच्या पक्षांतरावर भाजपच्या गोटात तीव्र नाराजी पसरली असून सोशल मिडीयावर यावर कठोर शब्दात प्रतिक्रिया उमटल्या.आजपर्यंत भाेयर हे आपल्या प्रत्येक संभाषणात ते स्वयंसेवक असल्याचा ‘अभिमान’ मिरवित होते,त्यांना पक्षाने तीन वेळा नगरसेवकाचे तिकीट दिले,उपमहापौर पद दिले, ते स्थायी समितीचे अध्यक्ष देखील राहीले,पक्षाने त्यांना नागपूर सुधार प्रन्यासचे विश्‍वस्त पद ही बहाल केले,एवढं देऊन ही एका आमदारकीच्या तिकीटासाठी त्यांनी पक्षाच्या विचारधारेला तिलांजली देऊन चक्क, भाजपचा स्थानिक पातळीवरच नव्हे तर देशपातळीवर,टोकाचा विरोध असणा-या काँग्रेसची विचारधारा ‘इंन्स्टंट’ आत्मसात केली आणि काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला,यावर आता नागपूरचे राजकीय वातावरण पार ढवळून निघाले आहे.

स्वत:ला कायम स्वयंसेवक म्हणवून घेत ‘खंडणी’गोळा करणारा नगरसेवक, अशी त्यांच्यावर आता समाज माध्यमात चौफेर टिका होत आहे.नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्‍वस्त पदी असताना त्यांनी सेवन स्टार रुग्णालयाला त्या जागेची लीज मिळण्यासाठी नियमांना धाब्यावर बसवले,याच इमारतीत मंगल कार्यालय,पार्किंगची प्लाझा देखील आहे,या कमर्शियल इमारतीत व सेवन स्टार रुग्णालयात डॉ.भोयर यांचा सांपत्तीक वाटा असल्याचा अारोप दबक्या आवाजात गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेत देखील चर्चिला जात असतो.

एवढंच नव्हे तर मनपाच्या आरोग्य विभागाचे अतिशय वादग्रस्त सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांच्याशी त्यांची ‘अर्थपूर्ण’मैत्रीचे किस्से देखील मनपात चर्चिल्या जाते.धंतोली येथील डॉ.गंटावार दाम्प्त्यांचे खासगी रुग्णालय ‘कोलंबिया’रुग्णालयात देखील डॉ.भोयर यांचे समभाग असल्याची चर्चा रंगली होती.

विशेष म्हणजे ऐन करोनासारख्या अतिशय भयंकर महामारीच्या काळात अनेक खासगी रुग्णालयांनी करोना बाधितांना वेठीस धरुन जी ‘बक्कळ‘ कमाई केली,त्याच संपंत्तीचा उपयोग आता स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणूकीत होणार असल्याची टिका समाज माध्यमात उमटली आहे.२० रुपये शुल्क आकारणा-या एका होमियोपॅथी डॉक्टरकडे विधान परिषदेची निवडणूक लढण्याकरिता चाळीस कोटींची तरतूद कशी झाली?असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

डॉ.भोयर यांनी सक्करदरा येथील मनपाच्या बाजार विभागातर्फे आवंटित चार दूकाने आपल्या वाहन चालक व परिचितांच्या नावावर नोंदणीकृत केल्याची देखील मनपात चांगलीच रंगली होती. आता तेच भोयर हे काँग्रेसमध्ये गेले व ‘पवित्र’झाल्याची टिका समाज माध्यमात उमटली आहे.

३४ वर्षे ज्या पक्षाने महत्वाची पदे दिली त्याच पक्षात कोंडमारा होत असल्याचा आरोप डॉ.भोयर यांनी माध्यमांशी बोलताना केला मात्र हा कोंडमारा एका आमदारकीच्या तिकीटासाठी असल्याची टिका त्यांच्यावर भाजप समर्थक करीत आहेत.‘स्वयंसेवक नापास झाला‘अशी बोचरी टिका देखील माध्यमात उमटली आहे.

एकीकडे स्वत:ला स्वयंसेवक म्हणून ‘मिरवायचे ‘ दूसरीकडे पदाची लालसा ठेवायची आणि विचारधारेलाच तिलांजली द्यायची, अश्‍या दुटप्पी राजकीय नेत्याची पक्षाला देखील गरज नसल्याची वेदना समाज माध्यमांत उमटली.संघ हे एक कुटूंब आहे आणि याच संघाने भोयर यांना देखील मोठं केलं.संघात हूकूमशाही नसते तशीच ती भाजपमध्ये देखील नाही,या पक्षाने जुने-नवे सर्वांना सामावून घेण्याची नीती अवलंबली.डॉ.भोयर यांच्यासोबतच्याच अनेक नगरसेवकांना तर पक्षाने काहीच दिले नाही मग त्यांनी काय करावं?पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जावं?असा प्रश्‍न समाज-माध्यमात उमटला.

भोयर यांच्यासोबतच माजी आमदार सुधाकर कोहळे,दक्षीण मधल्या नगरसेविका मंगला खेकडे,रमेश सिंगारे हे देखील नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी भेटले असल्याची चर्चा आज रंगली होती.भोयर हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या ‘विशेष‘संपर्कात असल्याचे बोलल्या जात आहे तर दूसरीकडे ज्याप्रमाणे दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीला प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली ती बिनविरोध व्हावी यासाठी राज्यातील कॉंग्रेस श्रेष्ठीनी भाजप श्रेष्ठींकडे साकडे घातले असून, नागपूरमधील उमेदवारीवर काँग्रेस त्या मोबदल्यात उमेदवार देणार नसल्याची चर्चा आहे.असे जर घडले तर डॉ.भोयर यांचे राजकीय भवितव्य काय असेल?यावर देखील चर्चेला उधाण आले आहे.

काेहळे यांच्या देखील बंडखोरीची चर्चा असून त्यांनी मात्र ते गांधी परिवाराच्या उपस्थितीतच पक्ष प्रवेश करतील अशी अट त्यांनी घातली असल्याची माहिती समोर आली आहे.यावर ‘सत्ताधीश’ने कोहळे यांच्याशी संपर्क साधला असता,ही निव्वळ अफवाह असल्याचे सांगितले.डॉ.भोयर यांचे मात्र पक्षांतर करने हे दू:खद असल्याचेही ते म्हणाले.३४ वर्ष पक्षासाठी काम करणा-या नगरसेवकाने अश्‍यारितीने पक्ष सोडणे हे निंदनीय असल्याची टिका त्यांनी केली.भोयर यांनी पक्ष सोडताना त्यांच्याकडे दूर्लक्ष करण्याचा आरोप केला,प्रत्येकाला पक्षामध्ये सन्मान हवा असतो,तिकीट मागितल्यावर ते नाकारल्या जाणे हे कोणाच्याही स्वाभिमानाला आहत करणारेच असते.मी स्वत: या वेदनेतून गेलो आहे.माझ्याच मतदारसंघात पक्षाशी बेईमानी करणा-याला तिकिट देण्यात आले,ज्यांनी गडकरी,फडणवीस यांना उघडपणे शिव्याश्राप दिले,पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे केले, त्यांचीच बंडखोरी ही पक्षनिष्ठेपेक्षा ‘श्रेष्ठ‘ठरली.आज डॉ.भोयर यांनी जे काही केले अश्‍या घटना पक्षात वारंवार घडण्याची शक्याता नाकारता येत नाही,असा सूचक इशारा कोहळे यांनी दिला.

विशेष म्हणजे या निवडणूकीत एकूण ५६२ मतदार आहेत,ग्रामीण मधले ४०० तर १६२ शहरी मतदार आहेत.ग्रामीण भागावर  क्रीडा मंत्री सुनील केदार यांचा अत्याधिक प्रभाव बघता या निवडणूकीचा कल कोणत्या दिशेने झूकणार,याबाबत चर्चेला उधाण आले असून बावणकुळे यांना ही निवडणूक वाटते तेवढी साेपी जाणार नसल्याचे कळतेय.दूसरकीडे हल्लीच्या निवडणूका या आता प्रामाणिकपणेच्या ‘गूणा’वर नाही जिंकता येत असे गडकरी यांनीच नुकतेच आ.गिरीश व्यास यांच्या अहवाल पुस्तिकेच्या विमोचनाप्रसंगी खुलासा केला होता.चातुर्य आणि पैसा खर्च करण्याची क्षमता हे देखील निवडणूकीत महत्वाचे असल्याचे ते म्हणाले होते.

त्यामुळे देखील या निवडणूकीत फक्त ‘लक्ष्मी दर्शनाने’ काम भागणार नसून ‘कुबेराचा खजिनाच‘रिकामा होणार असल्याची चर्चा समाज माध्यमात उमटली आहे.डॉ.भोयर यांची संभावित उमेदवारी यामुळेच टिकेचे लक्ष्य झाली आहे.

मोदी,गडकरींवर देखील टिका-
डाॅ.भोयर हे गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीकेंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर देखील रोष व्यक्त करीत होते,अशी माहिती समोर आली आहे.आज जरी त्यांनी माध्यमांकडे त्यांचा श्रेष्ठींवर रोष नसल्याचे व त्यांच्यावर कोणतीही टिका करणार नसल्याचे सांगितले असले तरी पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता ही आटली असून गडकरी यांची देखील प्रतिमा बरीच मलीन झाली असल्याचे वादग्रस्त वक्तव्य खासगीत केले असल्याचे बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करण्याची रुढी डॉ.भोयर यांनी अंगिकारली व काळाची पावले ओळखत, भाजपमध्ये त्यांना ‘गटबाजीतून’आमदारकी कधीही मिळणार नसल्याची जाणीव झाल्याने, त्यांनी चक्क विद्यमान सत्तारुढ काँग्रेस पक्षाच्या पंजात आपला पंजा दिला.

ज्या मोदी,गडकरी यांच्या करिष्म्यावर डॉ.भोयर यांनी आतापर्यंत राजकीय यश मिळवलं,सत्तेची फळे चाखली ते देशाचा ‘नूर’बदलताच मोदी,गडकरी यांच्यावर टिका करीत सत्तांतर करतात,याची बोच भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आज खोलवर रुजली.भोयर यांच्याकडे स्वत:चा कोणताही करिष्मा नाही,स्वत:च्या कर्तृत्वावर त्यांना नगरसेवक पद ही जिंकता आले नसल्याची खरमरीत टिका आता केली जात आहे.

डॉ.भोयर यांचे असे विधान म्हणजे पक्ष नावाच्या ज्या आई-वडीलांनी त्यांना सर्वस्व दिलं ते आई-वडीलच चुकीचे असल्याचे ते सांगत असल्याची भावना भाजप कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.पक्षाने भोयर यांच्या पोटात जाऊन आधी बघायला हवे होते त्यानंतरच त्यांना महत्वाची पदे भूषवायला द्यायला हवी होती,अशी देखील वेदना एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.

बावकुळे कार्यकर्त्यांशी खोटे बोलले:डॉ.रविंद्र भोयर
मी पक्षाकडे स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची आमदारकी मागितली होती,याबाबत बावणकुळेंशीही बोललो असता त्यांनी,त्यांना या निवडणूकीत कोणताही रस नसल्याचे सांगितले मात्र त्यांनी देखील पक्ष श्रेष्ठींकडे प्रबळ दावेदारीतून उमेदवारी मागितली असल्याचे समोर आले,याचा अर्थ बावणकुळे हे कार्यकर्त्यांशी खोटे बोलले.त्यांनी खरे बोलायला हवे होते.बावणकुळे कार्यकर्त्यांसोबत खोटे का बोलले?त्यामुळेच ही निवडणूक वेगळ्या दृष्टिकोणातून बघणे गरजेचे आहे.ही निवडणूक धनशक्ती बनाम जनशक्तीची असणार आहे.

२०१९ च्या विधान सभेच्या निवडणूकीत बावणकुळे यांना केंद्रिय श्रेष्ठींनी तिकीट नाकारली होती मात्र यावेळी त्यांना तिकीट देण्यास सहमती दर्शवली,याचा अर्थ ज्या कारणाने बावणकुळे यांना पक्षाने २०१९ मध्ये तिकीट नाकारली ते कारण आता २०२१ च्या निवडणूकीत संपले आहे का?
आज जी भाजपा त्यांच्याकडे मताधिक्य जास्त असण्याचा दावा करीत आहे त्याच भाजपकडे मागील निवडणूकीत देखील ५० मतांचे मताधिक्य असताना काँग्रेसचे डॉ.राजेंद्र मूळक यांनी भाजपच्या अशोक मानकर यांचा पराभव केला होता.

त्यामुळे भाजपने त्यांच्याकडे नेमके मताधिक्य किती?याची बेरिज करुन ठेवावी कारण तेवढ्याच मतांनी काँग्रेसचा उमेदवार ही निवडणूक जिंकणार आहे,१४ डिसेंबर रोजीच्या मतमोजणीत गूलाल आम्ही उधळणार आहोत.

निर्णय पक्षश्रेष्ठींचा:प्रवीण दटके(आमदार व भाजप शहराध्यक्ष)
आज सकाळी डॉ.भोयर यांचा राजीनामा त्यांच्या कार्यकर्त्याच्या हस्ते मला प्राप्त झाला.त्यांनी राजीनामा का दिला?हा त्यांचा वैयक्तीक प्रश्‍न आहे.पक्षात कोणतीही गटबाजी नाही.मी फक्त शहराध्यक्ष आहे,माझ्या अधिकारांना मर्यादा आहे,त्यांनी तिकीट मागितली होती हे खरे आहे मात्र शेवटी निर्णय पक्ष श्रेष्ठी करीत असतात.मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.

स्वयंसेवकाला काँग्रेसची विचारधारा मान्य हे संघाचे अपयश:विकास ठाकरे(आमदार व काँग्रेस शहराध्यक्ष)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ज्या भारतीय जनता पक्षाला काँग्रेस ताहयात शिव्याश्राप देत आली त्याच पक्षात एक राष्ट्रीय स्वयंसेवक प्रवेश घेतो हे आम्ही आमचे नाही तर संघाचे अपयश मानतो.३४ वर्षे स्वयंसेवक राहणा-याला काँग्रेसची विचारधारा पटली यातच सर्व काही आले.काँग्रेस पक्ष हा सर्व विचारधारेच्या लोकांना सामावून घेणारा पक्ष आहे.३४ वर्षे संघात जाणा-याला जर काँग्रेसची विचारधारा पटली असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करु.
राहीला प्रश्‍न उमेदवारीचा तर अद्याप ते नाव गुलदस्त्यातच आहे.शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ते जाहीर करणार नाही,उद्या मंगळवारी नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस आहे,त्यामुळे उद्याच काँग्रेसचा उमेदवार कोण असणार हे समोर येईल.राहीला प्रश्‍न डॉ.भोयर यांच्यावर केल्या जाणा-या भ्रष्ट कारभाराचा तर भाजपमध्ये असताना भोयर हे पक्षाला कसे चालले?

आघाडी म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला देणार समर्थन: अनिल अहिरकर(राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष)
राज्यात काँग्रेसच,राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी आहे.स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणूकीत आमचे संख्याबळ ७ मतांचे असले तरी आघाडी म्हणून आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन देऊ.

Latest बातम्या