
(जागतिक महिला दिन विशेष)

निवृत्त न्यायाधीश एच.एम.कामडी यांची मधली सुकन्या म्हणजे स्मिता.दोन्ही भांवडं थोरल्या व धाकट्या भावांमधील एकुल एक कन्या.वडील मुंबई सत्र न्यायालयातून न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले असले तरी घरामधील शिस्त आज देखील कायम आहे.वडीलांची अतुट निष्ठा व श्रद्धा ही माणसाच्या जगण्यातील प्रामाणिकतेवर असल्याने तेच संस्कार तिन्ही भावंडांमध्ये देखील रुजले.स्मिता यांचे शिक्षण मुंबईतील चर्चगेट येथील के.सी. महाविद्यालयात झाले तर कलिना विद्यापीठातून त्या पदव्यूत्तर झाल्या आहेत.नातेवाईकाच्या परिचयातून नागपूरचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यासोबत २००१ मध्ये विवाह झाला.शहर वेगळं,माणसे वेगळी आणि आयुष्य ही वेगळं झाल्याने सुरवातीचे एक वर्ष नागपूर आणि नागपूरची संस्कृती समजण्यास वेळ लागला नंतर मात्र आयुष्य स्थिरावलं..
त्यानंतर २००३ मध्ये सासरे गोविंदराव वंजारी यांनी विधान सभेची निवडणूक लढली.मतदारांची त्यांच्यावरील निष्ठेतून भरघोस मताने ते जिंकून ही आले मात्र अकस्मात त्यांचं निधन झालं.अभिजित हे त्यांच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठीचे प्रबळ दावेदार असतानाही त्यांना तिकीट नाकारण्यात आले.अभिजित मग अपक्ष लढले मात्र त्यांना यश मिळाले नाही.हाच काळ होता जेव्हा राजकारण कळू लागलं,राजकारणातील लोकांचं आयुष्य हे किती तानतनावाचं असतं याचा ही प्रत्यत आला.आज संसाराला १९ वर्ष पूर्ण झाली.१८ वर्षाचा मुलगा व १० वर्षाची मुलगी पदरात आहे मात्र आई म्हूणन भूमिका बजावताना, सासूबाई सुहासिनी वंजारी व आयुष्याचा जोडीदार अभिजित यांच्या कणखरपणातून खूप काही शिकायला मिळालं, तीच अनुभवाची शिदोरी मुलांना माणूस म्हणून घडवताना आज उपयोगी पडत आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे लग्न झाल्यानंतरच अपूर्ण राहीलेले शिक्षण पूर्ण करण्यास सासूबाई व अभिजित यांनी प्रेरित केले त्यामुळेच पदवी,पदव्यूत्तर व आचार्य पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करु शकले.
सासरी शैक्षणिक वातावरण असल्यामुळे शिक्षणाची अधिकच गोडी लागली.२०१७ पासून मग कुटुंबाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशासकीय काम सांभाळण्याची सुरवात केली.यामुळे नोकरी करणा-या महिलांच्या समस्यांची खोलवर जाणीव झाली तर आयुष्याचा जोडीदार राजकारणी असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून अनेक महिला व नागरिक आपापल्या समस्या घेऊन मोठ्या आशेने घरी येत असल्याने त्यांच्या ही जिवनातील संघर्षाशी जुळता आलं.त्यातही महिलांच्या समस्या या जास्त गंभीर असल्याचे लक्षात आलं.महिला या सक्षम असून देखील त्यांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे,बुद्धिमत्तेप्रमाणे काम करु दिले जात नाही.शिक्षण व आर्थिकदृष्यता सबळ असने या दोन गोष्टींवरच जगातील कोणत्याही महिलेचं सुखद् अायुष्य हे उभं राहत असतं.महिला या शिक्षणातून आर्थिक निर्भर झाल्या पाहिजे ही आजच्या काळाची गरज असतानाही शिक्षण पूर्ण होऊ न देताच अनेक पालक हे आपल्या मुलींच्या लग्नाची घाई करतात,मुली देखील याला विरोध करीत नाही,वाईट याचंच वाटतं.ही मानसिकता बदलली पाहीजे.आधी मुलीचे शिक्षण तिचं अर्थाजन मग लग्न हा क्रम भारताची अर्धी लोकसंख्या असणा-या महिलांसाठी महत्वाचा आहे आणि असंच घडलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे.याशिवाय पालकांनी आपल्या मुलींना त्यांच्या आवडीचेच शिक्षण द्यायला हवे त्यातही व्यवसायिककौशल्य आधारित शिक्षण दिल्यास मुली या लवकर आत्मनिर्भर होतील,मुलींना परमेश्वराने सहनशीलता,चिकाटी,महत्वाकांक्षा,आत्मविश्वास हे गुण उपजतच दिले असल्याने मुली कोणत्याही क्षेत्रात मागे राहूच शकत नाही.आयुष्य हे एकदाच मिळत असतं,ते भरभरुन जगण्याचा हक्क पुरुषां ऐवढाच महिलांना देखील आहे.
राजकीय वातावरणात वावरत असताना अनेक महिला या घरगूती समस्या घेऊन देखील येत असल्याने स्त्रियाच याच स्त्रियांच्या उत्थानाच्या,उत्कर्ष व अस्तित्वाच्या वैरी असल्याचे आढळून आले.सासूने सूनेला स्त्री म्हणून सांभाळून घेणे नितांत गरजेचे असून भूमिका कोणतीही असो,स्त्रियांनीच स्त्रियांना सांभाळून घेणे अत्यंत गरजेचे आहे.सासू पण कधी सून होती हे कायम लक्षात ठेवल्यास सून ही सासूची मुलगी होऊन जगू लागेल,असं मला वाटतं.
अनेक स्त्रियांमध्ये मला आत्मविश्वासाची कमतरताही दिसून पडते.कर्तृत्व आहे पण संधी नाही.त्यांच्यातील सुप्त गुणांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मेळावे अत्यंत गरजेचे आहे तर विविध बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ व योग्य मूल्य देखील मिळू शकतं,यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे
राजकारणात महिलांचं भवितव्य याबाबत बोलताना, इतकंच सांगेल खूप चांगलं भवितव्य आहे.स्त्री ही पुरुषांएवढीच सक्षम आहे.स्वर्गीय इंदिरा गांधी याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.काँग्रेसच्या काळातच अगदी ग्रामीणस्तरावर स्त्रियांना सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ५० टक्के महिला आरक्षण लागू करण्यात आलं.महिलांना फक्त घराच्या समस्यांचीच नव्हे तर समाजातील समस्यांची देखील खूप सखोल जाणीव असते,फक्त जाणीवच नव्हे तर त्या समस्या सोडवण्यासाठीची क्षमता देखील असते.इंदिरा गांधीनी सक्षमपणे हा देश चालवून दाखवला.इंदिरा गांधी या माझ्या देखील आदर्श आहेत.
आयुष्यातील एखादे संकट किवा निराशेचा काळ,याबाबत बोलताना मानवी जीवन हे संघर्षाशिवाय घडूच शकत नाही असं त्या सांगतात.मानसिक,वैयक्तिक संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याचाच एक भाग असतो मात्र माझ्या सासरच्या मंडळींनी माझ्या अपूर्ण शिक्षणासाठी जो पुढाकार घेतला,नव्या नवलाईच्या सूनेला मुलीसारखं सांभाळून घेतलं,हे शहर,ती माणसे माझ्यासाठी पूर्णत:अनोळखी होती मात्र माहेरची माया या नागपूर शहराने व नागपूरच्या माणसांनी दिली,ते खूप महत्वाचं होतं.आता मला नागपूरची संस्कृती, येथील आदरातिथ्य खूप भावतं.मी माझ्या नागपूर शहराशी आता पूर्णत:एकरुप झाली आहे.
आमदार पत्नी ही सर्वसामान्य पत्नीपेक्षा वेगळी कशी?याविषयी बोलताना,हो आमदार पत्नी ही सर्वसामान्यांच्या पत्नीपेक्षा वेगळीच असते किंबहूना तिला तसं राहवंच लागतं.आपला कसा ही मूड असो,मानसिक,भावनिक गुंत्यामध्ये असो,कुठल्याही घाईत असो,कुठल्याही परिस्थितीत असो,घरी समस्या घेऊन येणा-यांसोबत आमदारची पत्नी म्हणून चार शब्द प्रेमाचे,आपुलकीचे,जिव्हाळ्याचे आणि आशेचे बोलणे हे गरजेचंच असतं.विदर्भातील सहाही जिल्ह्यातून लोकं खूप आशेने येत असतात.भाऊंशी भेट झाली नाही तरी वैणींशी भेट झाली,आपले म्हणने तिच्या कानावर पडले याचेच खूप मोठे समाधान चेह-यावर घेऊन ते जात असतात,हीच मला माझी पारलौकिक जमापूंजी वाटते.
‘आई’ म्हणून भूमिकेचं मूल्यमापन कसं कराल?यावर बोलताना,ही सर्वात मोठी व सर्वात अवघड बाब आहे असं त्या सांगतात.माझ्या दोन्ही मुलांनी उच्चशिक्षित व्हावे,नैतिक मुल्यांची जपवणूक करावी,आमदाराची मुले व नातवंडे असताना देखील कायम जमिनीवर चालावे,आजोबांचा व वडीलांचा माणूसकीचा वारसा अबाधित ठेवावा,मी स्वत:एका न्यायाधीशांच्या घरी शिस्तीत वाढली आहे त्यामुळे आपल्या दोन्ही अपत्यांकडून मी ‘आई’ म्हणून हीच अपेक्षा ठेवते व याच ध्येयाने त्यांचे संगोपन व संवर्धन करीत आहे.
‘लेखिका’ म्हणून शब्दांवरील प्रेम याबाबत काय सांगाल?यावर बोलताना माझं पहिलं पुस्तक ‘voices from the indian diaspora’हे प्रसिद्ध झालं असून यात ९ लेखकांचे संकलन दिले आहे जे मूळ भारतीय आहेत मात्र परदेशात राहून ते भारतावर लिखाण करीत असतात.माझं हे पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट झाले असून पाश्चात्य पेन्सलिवेना या विद्यापीठात देखील संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यातप्राप्त झाले आहे.मी इंग्रजी साहित्याची प्राध्यापिका असून इंग्रजी साहित्याच्या पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना अध्यापन करते.कौटूंबिक शिक्षण संस्थांमध्ये मी जरी कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असले तरी माझं पुस्तके,शब्द व लिखाणावरही विशेष प्रेम आहे.लवकरच करोना संकटकाळावर माझं दूसरं ही पुस्तक प्रसिद्ध होणार आहे.
(शब्द संकलन-डॉ.ममता खांडेकर)

आमचे चॅनल subscribe करा