

नागपूर,ता. २४ डिसेंबर : नवनवीन संशोधन, माहिती व आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचले तर देशातील शेतकरी सुखी, संपन्न व शक्तिशाली होईल. हेच काम अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून केले जात असे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, १३ वर्षाचा या प्रदर्शनीचा इतिहास आहे. ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्या पूर्णत्वाकडे जात आहेत. ३ लाख शेतक-यांना ४० कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून ज्या शेतक-यांना प्रशिक्षण दिले जाते, त्याचा फायदा शेतक-यांना होतो.
शेतकरी हा लखोपती व्हावा हे आपले स्वप्न आहे, ते पूर्णत्वाकडे जात आहे. ज्ञान, विज्ञान, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाशी शेतकरी जोडला जात आहे. ज्ञान ही शक्ती आहे. याचा उपयोग करून शेतकरी आता अन्नदाताच नव्हे तर ऊर्जा दाताही झाला पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न आहेत.
ऊसापासून इथेनॉल, तणस, कचरा, यापासून सीएनजी शेतकर्याने बनवला आहे. इथेनॉलवर सर्व वाहने चालत आहे. इथेनॉलचे पंपही सुरु होत आहे. वाहनांना इथेनॉल व पेट्रोलवर चालणारे फ्लेक्स इंजिन लावले जाणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा प्रश्न संपणार आहे. आज ४ हजार कोटी लिटर इथेनॉलची देशाला गरज आहे, असेही गडकरी म्हणाले.
शेतक-यांनी आता ड्रोनच्या साह्याने पिकावर फवारणी करावी असे सांगताना गडकरी म्हणाले- ड्रोनला आता लिथियम ऑयन बॅटरीची गरज नाही. फ्लेक्स इंजिन लावून इथेनॉलवरही ड्रोन चालवता येते. तसेच नॅनो युरियाचा उपयोग शेतकर्यांनी करावा. बांबूपासून इंधन निर्मितीसाठी शेतकर्यांनी बांबूची लागवड करावी. खडकाळ जमिनीवर बांबू लागवड शक्य आहे. बांबूपासून इथेनॉल निर्मिती झाली आहे. ट्रॅक्टर आता सीएनजीवर चालविणे यशस्वी झाले आहे. यामुळे शेतकर्याला वर्षाकाठी इंधनात एक ते सव्वा लाख रुपये बचत होणार आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी गडकरी यांनी सिंदी ड्रायपोर्ट, किसान रेल्वे गाडी, शेतक-यांकडून उत्पादित वस्तूंची निर्यात, कृषी ग्रामीण व आदिवासी भागाचा विकास, फार्मर प्रोड्युस कंपन्यांची निर्मिती अशा विविध मुद्यांना स्पर्श करीत सविस्तर विवेचन आपल्या भाषणातून केले.
कार्यक्रमाचे आभार अॅगो व्हिजनचे संचालक रमेश मानकर यांनी मानले.

आमचे चॅनल subscribe करा