Homeनागपूर न्यूजविधान परिषद निवडणूक आणि बसपचे ‘तळ्यात-मळ्यात!’

विधान परिषद निवडणूक आणि बसपचे ‘तळ्यात-मळ्यात!’

Advertisements

बावणकुळे ४०० पेक्षा जास्त मते घेतील दटके यांचा दावा

नागपूर,ता. ६ डिसेंबर २०२१: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना बहूजन समाजवादी पक्षाची भूमिका निश्‍चित करण्यासाठी आज सकाळी साढे आठ वाजता रवि भवन येथील क्वार्टर क्रमांक १५ मध्ये पक्ष श्रेष्ठींची बैठक पार पडली.बैठकीत पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी धर्मराज सिंह,प्रमोद रैना,प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे ,शहराध्यक्ष महेश सहारे यांच्या उपस्थितीत नागपूर महानगरपालिकेतील ११ तसेच ग्रामीण मधील ३ असे एकूण १४ मतदार सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत मनपाचे बसप गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी या निवडणूकीत पक्ष सदस्यांनी ‘तटस्थ‘राहण्याची भूमिका स्वीकारावी असा प्रस्ताव मांडला.या निवडणूकीवर बहीष्कार घालावा,असे त्यांचे मत होते.या निवडणूकीत एकीकडे परंपरांगत शत्रू भाजप आहे तर दूसरीकडे काँग्रेसने राष्ट्रीय स्वयं संघाच्या स्वयंसेवकाला उमेदवारी दिली असल्याने पक्षाने तटस्थ भूमिका स्वीकारावी,असा प्रस्ताव समोर आला.

यावर अशीच भूमिका घ्यायची होती तर पक्षाचा उमेदवार का नाही उभा केला?असा आक्षेप बैठकीत काहींनी घेतला.एकीकडे बसपच्या मतदारांवर घोडेबाजारचा आरोप होईल,दोनच महिन्यात पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत त्यावेळी नागपूरकर मतदार हे बसपच्या नगरसेवकांकडे,पैश्‍यांसाठी विकल्या गेलेले जनप्रतिनिधी म्हणून बघतील, त्यामुळेच या निवडणूकीत बसपच्या मतदारांना तटस्थ राहण्याचा आदेश श्रेष्ठींनी द्यावा,अशी भूमिका गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी रेटून धरली.

याच मुद्दावर त्यांनी आज मनपा मुख्यालयात तातडीची पत्र परिषद ही भरवली मात्र या पत्र परिषदेला बसपचेच मतदार सदस्य यांनी दांडी मारली!जितेंद्र घोडेस्वार यांच्यावर बसपच्याच काही पदाधिका-यांनी आज घेतलेल्या भूमिकेविषयी ‘खासगीत’ तीव्र नाराजी व्यक्त केली.

घोडेस्वार यांचे हे नेहमीचेच झाले आहे,असा त्रागा व्यक्त करीत, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत ही घोडेस्वार यांनी हा असाच,आपला घोडा दामटला,लोकसभेची निवडणूक असो,विधान सभेची असो किवा आताची विधान परिषदेची निवडणूक असो त्यात कशी ‘खराबी’करायची,आणि फक्त स्वत:चे ‘अर्थ गणित’साधायचे हेच त्यांना जमतं,अशी कठोर टिका बसपच्या काही पदाधिका-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केली.सगळा पैश्‍यांचा खेळ असतो आव मात्र साधूपणाचा,असा त्यांचा कटाक्ष होता.

याच बैठकीत सदस्यांना पक्षातर्फे व्हीप जारी करण्याची देखील मागणी पुढे आली मात्र पक्ष श्रेष्ठींनी ‘मौखिक’आदेश देऊन आपली मतं कोणाला द्यायचे हे त्यांच्यावरच सोपवून निघून गेलेत.

घोडेस्वार यांनी मात्र आपली मागणी शेवटपर्यंत रेटून धरली.बसपचे नगरसेवक हे स्वबळावर महानगरपालिकेत निवडून आले आहेत.ना काँग्रेसच्या बळावर ना भाजपच्या आर्शिवादावर.त्यामुळेच आम्हाला ‘चोरांना’मत द्यायचे नाही,असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

दोन महिन्यांनी पुन्हा मनपाच्या निवडणूका आहेत .त्यावेळी हेच दोन्ही पक्ष दोन लाख,पाच लाख,पंचवीस लाख घेतल्याची आव उठवतील व पक्षाची बदनामी करतील असे घोडेस्वार यांचे म्हणने आहे.

बसप ही एक विचारधारा आहे,चळवळ आहे त्यामुळेच बसपाचे सदस्य या निवडणूकीत तटस्थ राहणार असल्याचा घोडेस्वार यांचा दावा आहे.

मात्र घोडेस्वार यांच्या या मागणीला आजच्या बैठकीत यश आले नाही.पक्ष श्रेष्ठींनी कोणतेही व्हिप जारी करण्याचे नाकारुन, निर्णय बसप मतदारांवरच सोडून दिला आहे.मतदान करने हा सर्वस्वी मतदारांचा अधिकार आहे ,त्यामुळे त्यांनीच कोणती भूमिका घ्यायची,हे त्यांच्यावर सोडून श्रेष्ठींनी आपापले विमान पकडले.

परिणामी विधान परिषदेच्या निवडणूकीत बसपाचे अद्याप तरी ‘तळ्यात-मळ्यात’सुरु आहे.१० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.भाजपतर्फे चंद्रशेखर बावणकुळे तर काँग्रेसने भाजप बंडखोर डॉ.सुरेश भोयर यांना मैदानात उतरवले आहे.

ग्रामीण व शहराचे मिळून एकूण ५६० मतदार असून भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी, बावणकुळे हे प्रत्येक मतदारांची वैयक्तिक भेट घेत असून या निवडणूकीत बावणकुळे यांना ४०० मते मिळणार असल्याचा दावा केला आहे.

Latest बातम्या