
नागपूर,ता.१४ डिसेंबर २०२१: बचत भवन येथे आज सकाळी८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्राँग रूम उघडण्यात आली. मतपत्रिकांची सरमिसळ, गठ्ठे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार टेबलवर मतमोजणी करण्यात आली. यामध्ये ५५४ पैकी ५४९ मते वैध, तर ५ मते अवैध ठरली. त्यामुळे विजयासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मते प्राप्त झाली. विजयासाठी एकूण वैध मतांपैकी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्याच फेरीत विजयासाठी निश्चित मते प्राप्त केल्याने बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले.यानंतर जिल्हाधिकारी कार्यालया बाहेरच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु झाला.
विजयाचे प्रमाणपत्र मिळण्यास काही तासांचा अवधी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर आकाशवाणी चौकातील स्वागत लॉन्सपर्यंत विजयी रॅली काढण्यात आली.ढोल ताशे यांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला.बुंदीचे लाडू वाटण्यात आले.भाजप पक्षाचा झेंडा लहरवत कार्यकर्त्यांनी पायीच जल्लोष करीत स्वागत लॉन्स गाठले.
बावणकुळे यांनी आधी विधान भवन चौकातील गोंड राजे बख्त बुलंदशाह यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले,यावेळी आ.कृष्णा खोपडे,आ.मोहन मते,शहारध्यक्ष प्रवीण दटके,माजी महापौर संदीप जोशी,मा.आ.सुलेखा कुंभारे पिंटू झलके,संदीप गवई,वंदना भगत,वर्षा ठाकरे चेतना टांक आदी समस्त नगरसेवक उपस्थित होते.
यानंतर विजयी रॅलीने स्वागत लॉन्स गाठले.या वेळी स्वागत लॉन्समध्ये कार्यकर्त्यांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
या ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला.कार्यकर्त्यांचा उत्साह आेसंडून वाहत होता.चेह-यावरील विजयाचा आनंद एकमेकांसोबत हास्य विनोदातूनही प्रकट होत होता.शिस्तबद्ध अशी रॅली,ढोल ताश्यांचा गजर विजयाचा उत्साह अभूतपूर्व असा होता.
फडणवीस यांची बावणकुळेंसाेबत ’गळाभेट’ही,हा विजयाचा आनंद, कार्यकर्त्यांसाठी द्विगुणित करुन जाणारी होती.स्वागत लॉन्समधील गळाभेटीनंतर या रॅलीने संविधान चौक गाठले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर बावणकुळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.पोलिस दलही फक्त त्यांच्या प्रमाणपत्रासाठी ताटकळत कर्तव्य बजावत उभे होते.या ठिकाणी निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी बावनकुळे यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले .
यानंतर पुन्हा बावणकुळे यांनी विजयी प्रमाणपत्रासह माध्यमांसोबत संवाद साधला,मतदाराचं मतांचं कर्ज हे निश्चीतच फेडणार असल्याची ग्वाही दिली. यानंतर त्यांनी तडक गडकरी यांचे घर गाठले व गडकरी यांच्या अनुपस्थित, गडकरी यांच्या सुविद्य पत्नी कांचन गडकरी यांच्या आर्शिवाद घेतला.

ही निवडणूक घोषित होताच भाजप पदाधिकारी हे गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीची रणनीती आखण्यास तत्पर झाले होते.बंडखोरीचा झेंडा एक स्वयंसेवक हातात घेईल,याची कल्पना देखील भाजप पदाधिका-यांनी केली नसावी मात्र काँग्रेसने त्यांच्या गोटात अलगद सुरुंग लावण्यात यश मिळवले.
यामुळे भाजपचाच बंडखोर पदाधिकारी भाजपच्याच मतदारांना फोडेल, या आशंकाने भाजपने आपले सर्व मतदार अगदी पर राज्यात सहलीसाठी पाठवले,त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी ‘अधिकृत ’व्यक्तीही नेमण्यात आली,दहा दिवसांच्या पर्यटनानंतर भाजपचे सर्व मतदार एक दिवसाआधी पेंच येथे पाहोचले.
मतदानाच्या दिवशी त्यांना स्वागत लॉन्समध्ये एकत्रित आणण्यात आले. तीन बसेसने त्यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले.रांगेने त्यांनी मतदान केले.भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली,भाजपच्या सर्व ‘योजनांना’मूर्त रुप प्राप्त झाले.
एवढ्या खबरदारीनंतर निश्चितच विजयाचा आनंद हा द्विगुणीतच साजरा होणार होता.राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी, डॉ.रविंद्र उपाख्य छोटू भोयर यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ‘काँग्रेस ही निवडणूका जिंकण्यासाठीच लढत असते’असे जे विधान केले होते,त्यांचे ते ‘विधान’विधानच राहीले या उलट ते विधान सार्थक करण्याची ‘किमया’ भाजपनी साधली व पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावणकुळे यांनी ३६२ मते मिळवून विजयाची माळ गळ्यात घातली.
या सर्व ‘मॅरोथॉन’ उलाढाली नंतर त्यामुळेच ,भाजप कार्यकर्ता व भाजप पदाधिका-यांचा विजयाच्या आनंदाला सीमेत बांधने अशक्य होते.

आमचे चॅनल subscribe करा