Homeनागपूर न्यूजभाजपच्या घटनादुरुस्ती विधेयकात ‘अ’लिखित छूपा अजेंडा

भाजपच्या घटनादुरुस्ती विधेयकात ‘अ’लिखित छूपा अजेंडा

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ॲड.अवनी बंसल यांचा भाजपवर प्रहार
भाजपने लिखित अजेंडा द्यावा: बसंल यांचे आव्हान
नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयक मोदींचे षडयंत्र:बसंल यांचा आरोप
महिलांचा पुळका असलेल्या भाजपच्या मातृसंस्थेतील संघात महिलांना प्रतिनिधित्व का नाही?
‘एपस्टीन’ फाईल्स वरुन लक्ष विचलित करण्यासाठी मोदींची खेळी
नागपूरात पत्रकार परिषदेत भाजपवर बंसल यांची परखड टिका
नागपूर,ता.२१ एप्रिल २०२६: मोदी सरकारने संसदेच्या तीन दिवसीय विशेष सत्रात सादर केलेल्या ‘नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयक-२०२६’या विधेयकात कुठेही लिखितमध्ये लोकसभा मतदारसंघ फेररचनेचा मसुदा मांडला नाही.या विधेयकात मोदी सरकारचा छूपा अजेंडा होता,भाजपसोबत आता, ही सर्वात मोठी समस्या झाली आहे की त्यांच्या खोटारडेपणाला कोणतीही सीमा राहीली नाही,मोदी सरकार दावा करते हे विधेयक पारित झाल्यानंतर ५० टक्के सर्व राज्यांमध्ये जागा वाढतील मात्र,असे ना देशाच्या संविधानात लिहले आहे,ना तर मोदी सरकारने जे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले त्यात लिखित स्वरुपात लिहले आहे,जेव्हा लिखितमध्येच विधेयकात काहीच उल्लेख नाही तर देशातील नागरिकांसमोर ते असा दावा कसे करु शकतात?नागरिकांनीच भाजपला हा प्रश्‍न विचारावा,त्यांच्या विधेयकात कोणता छूपा अजेंडा होता,असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ॲड.अवनी बसंल यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
याप्रसंगी त्यांनी भाजप व केंद्र सरकारवर परखड टिका केली.काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या २७ महत्वपूर्ण शहरात काँग्रेस एकसाथ पत्रकार परिषद घेऊन महिला आरक्षण विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले.आमचा उद्देश्‍य हा महिला आरक्षणावर भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा आहे,असे त्या म्हणाल्या.१६ ते १८ एप्रिल रोजी संसदेचे विशेष सत्र जे पार पडले त्यात नेमके काय झाले,हे संपूर्ण देशाने पाहिले.संपूर्ण देशाने विविध राजकीय पक्षांच्या खासदारांची भाषणे ऐकली,भूमिका समजून घेतली मात्र,महिला आरक्षणाच्या बाबतीत नेमकं काय घडतंय ते सोप्या शब्दात सांगावयाचे झाल्यास,एखाद्या कुटूंबातील मुलीला असं सांगण्यात आलं की तुला आता या घरात वेगळी खोली असणार आहे,यामुळे ती मुलगी फार खुश होते ,मात्र,यानंतर एक अट टाकली जाते की जेव्हा हे घर नवीन बनेल तेव्हा तुझ्यासाठी वेगळी खोली राहील,मुलगी विचारते हे नवे घर नेमके कधी बनेल?याचे उत्तर मात्र भाजप देत नाही,आज भाजपने देशातील कोट्यावधी महिलांसोबत नेमके हेच केले,अशी टिका बसंल यांनी केली.
याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की,काँग्रेस पक्ष सुरवातीपासून महिला आरक्षणाच्या बाजूने राहीली आहे,आमची मागणी हीच आहे की भाजप, जी महिलांची इतकी मोठी कैवारी बनत आहे तर ते महिला आरक्षण देशात आज का लागू करत नाही?२०२३ मध्ये संसदेत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षाने महिला आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले आहे.याचा अर्थ  आज लोकसभेत जेवढे ५४३ खासदार आहेत,त्या ५४३ मध्ये ३३ टक्के आरक्षण हे महिलांना देण्यात आले आहेत.मग ९०० दिवस उलटून गेल्यावरही भाजपने महिला आरक्षण देशात का लागू केले नाही?
आता अचानक संसदेचे विशेष सत्र बोलावून भाजपने नवे घटना दुरुस्ती विधेयक संसदेत आणले आणि सांगितले की,संसदेच्या जागा वाढल्या,त्या ५४३ वरुन ८४० झाल्या तरच आम्ही महिला आरक्षण देशात लागू करु!महिला आरक्षण व संसदेच्या जागा वाढवणे यामध्ये काय तारतम्य आहे?असा सवाल त्या करतात.
दर दहा वर्षांनी जनगणना व्हावी असे संविधानात लिहले असताना मोदी सरकारने २०२१ मध्ये कराेनाचे कारण देऊन जनगणना केली नाही,यानंतर ६ वर्षे उलटून गेली तरी जनगणनेचा मुर्हूत मोदी सरकारला सापडला नाही.जनगणना न करण्या मागे भाजपचा स्वत:चा छूपा अजेंडा आहे का? काँग्रेसने त्यांच्या सत्ता काळात २०११ मध्ये शेवटची जनगणना केली.काँग्रेसची ही मागणी सुरवातीपासून राहीली आहे की ३३ टक्के महिला आरक्षणात एक तृतीयांश वाटा ओबीसींसाठी आरक्षीत असावा.यासाठी जनगणनाची गरज आहे,त्यामुळेच भाजप सरकार ओबीसी महिलांना त्यांचा अधिकार देऊ इच्छित नाही का?त्यामुळेच मुद्दामुन ते जनगणनेसाठी विलंब करत आहे का?असा प्रश्‍न त्या विचारतात.
मूळात मतदारसंघ फेरचनेबाबत संविधानात, वेळोवेळी देशातील विविध राज्यात जितक्या लोकसभेच्या जागा आहेत त्याचे लोकसंख्येच्या आधारावार पुर्नपरिक्षण करायला हवे असे नमूद आहे,मात्र,भाजपने जनगणना न करताच मतदारसंघ फेररचनाचे विधेयक संसदेत मांडले,ते ही जेव्हा देशातील सर्वात मोठी दोन राज्ये पं.बंगाल व तमिळनाडूच्या निवडणूका सुरु आहे,त्या निवडणूकांच्या मध्येच संसदेचे विशेष सत्र मोदी सरकारने बोलावले व मतदारसंघांची फेररचना करण्याचे घटनादुरुस्तीचे विधेयक पटलावर मांडले.ही फेररचना जनगणनेचा आकडा समोर नसताना कोणत्या आधारावर करणार?याचे कोणतेही उत्तर भाजप सरकार देत नाही.जितके पण दाक्षिणात्य राज्य आहेत,कर्नाटक,आंध्र प्रदेश,तेलांगण,तमिळनाडू,केरला सारख्या राज्यांचे म्हणने आहे की,गेल्या १५ ते २० वर्षात आम्ही आमच्या राज्यातील लोकसंख्येला मर्यादित ठेवले आहे मात्र,उत्तर भारतात लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे.परिणामी,लोकसंख्येचा कोणताही अभ्यास न करता,संसदेत जागा वाढवतील तर उत्तरप्रदेशसारख्या राज्यात ८० ऐवजी १६० जागा होतील व केरलामध्ये २० जागा असून त्या फक्त ३० होतील.मोदी सरकारची ही नीती संविधानातील संघराज्याची संकल्पनाच मोडीत काढणारी असल्याची टिका याप्रसंगी ॲड.बंसल यांनी केली.
त्यामुळेच महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना या दोन वेगवेगळ्या बाबी असून, मतदारसंघ फेररचनेसाठी सर्व राजकीय पक्षांची चर्चा करुन,एक संवैधानिक स्वरुप ठरवून ते संसदेत आणण्याचे आवाहन याप्रसंगी ॲड.बसंल यांनी केले.मूळात भाजपला हे आधीपासूनच माहिती होते त्यांचे हे घटनादुरुस्ती विधेयक-२०२६ त्यांच्याकडे दोन तृतीयांश मते नसल्यामुळे पडणार आहे, ते मंजूर होणार नाही,तरी देखील त्यांनी ही मुद्दामून खेळी केली.त्यांना देशासमोर फक्त एक राजकीय नॅरेटीव्ह सेट करायचं होतं.त्यांना फक्त एक कहाणी गढायची होती की देशभरातील महिलांचे हिरो फक्त मोदी आहेत आणि खलनायक काँग्रेस पक्ष आहे.मोदींना त्यांच्या इतक्या चांगल्या अभिनयाचं श्रेय तर मिळायलाच हवे,ते फार चांगल्या कहाण्या निर्माण करतात.ते काम करीत नाहीत,पण राजकारण चांगलं करतात,असा टोला त्यांनी हाणला.
जे मोदी महिलांसाठी आज अश्रू गाळत आहेत, ते संसदे समोर देशातील सुवर्ण पदक विजेत्या कुश्‍तीपटू महिला आंदोलन करतात,आपली सुवर्ण पदके रस्त्यावर ठेऊन ढसाढसा रडतात ते त्यांच्यासाठी उभे राहत नाहीत.हाथरसमध्ये मध्यरात्री उत्तरप्रदेशची पोलिस एका बलात्कारपिडीत दलित बेटीचे शव तिच्या कुटूंबियांच्या परवानगीशिवाय जबरदस्ती अग्निमध्ये जाळते,तेव्हा मोदींच्या तोंडातून त्या दलित बेटीसाठी वेदेनेचा एक शब्द ही निघत नाही.जेव्हा बिल्किस बानो प्रकरणात गुजरात दंगलीतील ११ हिंदू बलात्कारी व दंगलखोर आराेपींना देशाच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी गुजरात मधील भाजप सरकार आरोपींची शिक्षा माफ करुन मोकाट सोडते,तेव्हा हीच भाजपा त्यांना हार घालून त्यांचा जाहीर सत्कार करताना देशवासियांना दिसून पडतं.मोदींचा महिलांविषयीचा पुळका हा फक्त जेव्हा-जेव्हा देशात निवडणूका येतात तेव्हाच उफाळून येतो,अशी जहाल टिका बंसल करतात.
नागपूरमध्ये भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे मुख्यालय आहे मात्र,देशभर महिलांसाठी राग आवळणा-या भाजपच्या मातृसंस्था असणा-या राष्ट्रीय स्वयंसेवकसंघात शंभर वर्षांचा इतिहास लोटला तरी महिलांना प्रतिनिधित्व का नाही?असा सवाल त्या करतात.तोच संघ आणि तोच भाजप आज देशामसमोर महिला आरक्षण व त्यांच्या कल्याणासाठी अश्रू ढाळतोय?काँग्रेस तर गेल्या तीन दशकांपासून महिला आरक्षणाला आपले समर्थन देत आली आहे.पहील्यांदा संसदेत एच.डी.दैविगोडा पंतप्रधान असताना १९९६ मध्ये महिला आरक्षण विधेयक आले होते,काँग्रेसने त्याचे समर्थन केले होते,ते विधेयक मंजूर होऊ शकले नाही.२०१० मध्ये सोनिया गांधींनी स्वत:च्या कर्तुत्वावर महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर करुन घेतले मात्र,ते लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही.त्यावेळी याच भाजपाने महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिले नाही.२०२३ मध्ये भाजपने तेच विधेयक संसदेत आणले त्यावेळी काँग्रेसने त्याचे समर्थन केले व ते विधेयक एकमताने संसदेत मंजूर झाले.
मग मोदी सरकार आता ५४३ जागांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी का मागे हटतेय?याच मोदींनी २०२४ च्या निवडणूकीत महिलांना आरक्षण लागू न करता ते २०२९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी प्रलंबित ठेवले.मात्र,२०२४ च्या लोकसभा निवडणूकीतील प्रत्येक भाषणात त्यांनी महिला आरक्षण विधेयकाचे भरपूर श्रेय लाटले.टाळ्या वाजवून घेतल्या.आरक्षण दिले नव्हते फक्त ते आरक्षण देण्याचे वचन दिले.आता पुन्हा तमिळनाडू व पं.बंगालच्या निवडणूका डाेळ्या समोर ठेऊन भाजपने ही खेळी खेळली.आता ते देशभर रडगाणे गात आहेत की आम्हाला तर महिलांना आरक्षण द्यायचे होते पण,काँग्रेसने असे होऊ दिले नाही.
आता हीच भाजपा व मोदी हे २०२९ च्या निवडणूकीत पुन्हा याच महिला आरक्षण विधेयकाचे पुराण बाहेर काढतील.मोदींनी आता तरी महिलांना ‘लॉलिपॉप’देणे बंद करावे,या देशातील महिला खूप समजूतदार असून त्यांना माहिती आहे त्यांच्या हक्कासाठी कोण काम करतोय.
ही तीच काँग्रेस आहे जिने नोकरदार महिलांसाठी गरोदर-बाळंतपण सुटीची योजना अमलात आणली.हूंडा प्रथे विरोधात कठोर कायदे लागू केले.ग्राम व नगर पंचायत निवडणूकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करुन पंधरा लाख महिलांना राजकारणात आणणारी काँसेचच होती.मात्र,मोदी यांनी फक्त एक असे विधेयक सांगावे जे त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी मंजूर करुन घेतले?असे आव्हान करीत,मोदी यांना फक्त ’जुमलेबाजी’जमते,असा टोला त्यांनी हाणला.
मोदींना महिलांची इतकीच चिंता आहे तर त्यांनी महिलांना त्यांच्या राजकारणाचा मुद्दा बनवू नये,त्या त्यांच्या राजकारणातील युद्ध क्षेत्राचा विषय नाहीत,महिलांचे मुद्दे हे खूप गंभीर आहेत,ते मुद्दे देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचे आहेत,मोदींना महिलांच्या कल्याणाचे जितके श्रेय घ्यायचे आहे ते त्यांनी घ्यावे परंतू सर्वात आधी महिलांना त्यांचा हक्क द्यावा,तो ही आज द्यावा यासाठी संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत उभा दिसेल.आधी पण काँग्रेस महिला आरक्षणासोबत होती,आज ही आहे व उद्या पण महिला आरक्षणाचे समर्थन करतानाच दिसेल.आता तर मोदी सरकार जोपर्यंत महिला आरक्षण लागू करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,असा इशाराही ॲड.बंसल यांनी दिला.
२० सप्टेंबर २०१७ रोजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र दिले ज्यात त्यांनी महिला आरक्षण विधेयक जे १९ मार्च २०१० रोजी राज्यसभेत पारित झाले ते लोकसभेत पारित करण्याची विनंती केली.याचा अर्थ काँग्रेस २०१७ पासून महिला आरक्षण मागत आहे परंतु,मोदी यांनी या पत्राचे कोणतेही उत्तर दिले नाही,ते गप्प बसले.याशिवाय राहूल गांधींनी १६ जुलै २०१८ रोजी मोदींना पुन्हा पत्र लिहले व महिला आरक्षणावर पुर्ण काँग्रेस पक्ष व विरोधी पक्ष तुमच्यासोबत आहे,तुम्ही लकवरात लवकर हे विधेयक लोकसभेत आणा व पारित करा.अशी मागणी केली मात्र,केवळ ‘जुमलेबाजी’ करणारे मोदी जे निवडणूका बघूनच जागे होतात त्यांना महिला आरक्षणाची आठवण तेव्हाच होते,अशी टिका त्यांनी केली.
मूळात,संविधानानुसार देशाचे पंतप्रधान राष्ट्राला केवळ काही विशेष परिस्थितीतच संबोधित करु शकतात परंतू,काल त्यांनी देशाला संबाेधित करताना काँग्रेसचे नाव ५८ वेळा घेतले.महिला आरक्षणाच्या आडून एक संपूर्ण राजकीय माहोल तयार करण्यासाठी मोदी एक असे विधेयक संसदेत आणतात जे त्यांनाही माहिती असतं की ते पारित होणार नाही.त्यांनी महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना विधेयक एकसाथ जोडले ,जेणेकरुन महिला आरक्षणावरुन फक्त चर्चा घडावी,ते विधेयक पडावे व यानंतर देशासमोर मगरमच्छचे अश्रू ते ढाळू शकतील.काँग्रेसलाच त्यांनी महिला विरोधी ठरवले,संपूर्ण देशात मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस विरोधात ते वातावरण तयार करु पाहत आहेत,ते हे विसरतात या देशाचा नाराच ’सत्यमेव जयते’आहे.
महिला आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा नसून राजकीय पक्षांच्याही पलीकडचा असल्याचा त्या म्हणाल्या.भाजपचा हा गर्वच आहे की ते कोणताही अजेंडा कोणत्याही पद्धतीने राबवतील तरी देशातील मिडीया तो त्यांच्या अनुषंगानेच जनतेसमोर आणतील,मिडीयाने देखील जनतेसमोर विरोधी पक्ष,काँग्रेसची बाजू सोडा, पण महिलांची जी खरी बाजू आहे ती जनतेसमोर आणावी,असे आवाहन त्यांनी केले.
एकीकडे मोदी हे नारी वंदन विधेयक सादर करतात मात्र,दुसरीकडे केरळमधील शबरीमाला मंदिरात वय वर्षे १० ते ५० दरम्यान महिलांना मंदिर प्रवेश देऊ नये कारण ही धार्मिक बाब आहे,असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करते,मग हा देशातील महिलांना अपवित्र ठरवून त्यांचा अपमान नाही का?असा प्रश्‍न केला असता,यावर बोलताना,शबरीमालामध्ये महिलांच्या मंदिर प्रवेशावर सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी एक निर्णय जाहीर केला होता व त्यात त्यांनी महिलांना मंदिर प्रवेशाचा अधिकार बहाल केला होता,त्या विरोधात मंदिर व्यवस्थापनाने पुर्ननिरीक्षण याचिका दाखल केली असून यावर सध्या सुनावणी सुरु आहे,फक्त शबरीमाला नव्हे तर विविध धर्मातील काही प्रथा यावर देखील सुनावणी सुरु असून,एक वकील म्हणून मलाही माहिती आहे की यावर टिपण्णी करता येत नाही मात्र,या प्रश्‍नाच्या मागे दडलेला संदर्भ ही दूर्लक्षीत करता येणार नाही,एकीकडे महिलांना देवीचा दर्जा देऊन पुजले जाते दूसरीकडे त्यांनाच अपवित्र ठरवून मंदिर प्रवेश नाकारला जातो.महिलांना देवीचा दर्जा नको मात्र,मानवाधिकार तर द्या.महिलांची मूलभूत मागणी ही फक्त सुरक्षेची आहे.उत्तर प्रदेशात तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद गेल्या चार वर्षांपासून योगी सरकारने भरले देखील नाही,महिलांची सुरक्षा इतका मोठा मुद्दा असून भाजप यावर काहीच बोलत नाही.भाजपाने तर राजकारणाची दिशाच बदलून टाकली आहे.ते नारी वंदन करतात पण कृती त्यांची अगदी विरुद्ध असते.महिलांच्या अधिकारांची गोष्ट येते तेव्हा भाजप अगदी गप्प बसते.उलट महिलांविरोधात जे गुन्हे करतात त्यांचे संरक्षण भाजप करते.कर्नाटकात साढे तीन हजार महिलांचे लैंगिक शोषण करणा-या प्रज्जवल  रेवण्णावर मोदींच्या तोंडातून एक शब्द तरी ऐकला का?
जगभर गाजणा-या ’एपस्टीन’ फाईल्सवर मोदी एक शब्द तरी बोलले का?त्यात महिलांचे शोषण नाही का?एपस्टीनच्या प्रकरणात तर मोदींच्या पेट्रोलियम मंत्र्यांची हरदिपसिंह पुरींची संपूर्ण जगात छि-थू होत आहे,त्यावर मोदी एक शब्द ही बोलले नाही उलट एपस्टीन फाईल्स वरुन देशाचे लक्ष विचलित करण्यासाठीच मोदींनी मतदारसंघ फेररचनेची ही खेळी खेळली,असा खळबळजनक आरोप याप्रसंगी ॲड.बंसल यांनी केला.त्यांना महिला,त्यांचे अधिकार,अल्पसंख्यांक.अनुसूचित जाती-जमाती,ओबीसींशी काहीही घेणे- देणे नाही, त्यांना फक्त राजकारण खेळायचं असतं.त्यांचा एकमेव अजेंडा हा ‘कुर्सी बची रहनी चाहिये’हाच असल्याचा प्रहार ॲड.बंसल यांनी केला.
राहूल गांधीना बिहारचे बाहूबली पप्पू यादव खूप मानतात.त्याच पप्पू यादव यांनी महिलांविषयी बोलताना,‘राजकारणात महिलांना पदे अनेकांच्या खोलीतून बाहेर पडल्यावर मिळतात,’असे वादग्रस्त विधान केले.यावर काँग्रेसची काय भूमिका आहे?असा सवाल केला असता,काँग्रेस असा एक राजकीय पक्ष आहे जो कार्यकर्ता कोणीही असो त्याच्या कर्तृत्व व प्रतिभेच्या आधारावर संधी देतो.मला सुद्धा खूप प्राथमिकस्तरापासून पक्षात काम करावे लागले आणि आज मी काँग्रेसची राष्ट्रीय प्रवक्ता बनले.‘भारत जोडो ’यात्रेत अनेक महिला राहूल गांधींसोबत खूप सहज होत्या,एकमेव कंगना रनौत यांना संसदेत राहूल गांधींसोबत सहज वाटत नाही,असा टोला त्यांनी हाणला.
असं असलं तरी महिलांना राजकारणात शिरणे आजही खूप सोपे नाही,त्यामुळेच महिला आरक्षणाची गरज आहे.जर देशाची अर्धी लोकसंख्या ही ५० टक्के आहे तर ३३ टक्केच का?आम्हाला ५० टक्के राजकीय आरक्षण मिळावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत ,राजीव गांधींनी जेव्हा ७३-७४ वे संशोधन संविधानात करुन ग्राम व नगर पंयाचतमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले,त्यानंतर आज ३३ टक्के आरक्षण असतानाही ग्रामीण व नगर पंचायतमध्ये ४० टक्के महिला दिसून पडत आहेत,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.
पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष व काँग्रेसच्या ग्रामीण महिला अध्यक्ष कुंदा राऊत,मनपा विरोधी पक्ष नेते संजय महाकालकर,दिनेश बानबाकोडे,संदेश सिंगलकर,महिला शहराध्यक्ष संगीता तलमले,अतुल कोटेजा,मुजीब पठाण आदी उपस्थित होते.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
Advertisements

Latest बातम्या