Homeराजकारणभाजपचे दहा नगरसेवक आधीच फूटले:काँग्रेस आमदाराचा दावा

भाजपचे दहा नगरसेवक आधीच फूटले:काँग्रेस आमदाराचा दावा

Advertisements


भाजप घाबरलेली म्हणून नगरसेवकांची परराज्यवारी:पटोले यांचा घणाघात

निवडणूकीनंतर भाजपमधून अनेकांची काँग्रेसमध्ये होणार ’इनकमिंग’’आ.अभिजित वंजारी यांचा दावा

पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच रंगणार विधान परिषदेची लढत:अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपली

काँग्रेस नेत्यांच्या बैठकांवर बैठका:पदवीधर निवडणूकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास सर्व नेते एकजूट

५६० ‘मतदार’ मात्र सतराशे साठ ‘भानगडी’

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २६ नोव्हेंबर:विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक नागपूरातही धुळे,नंदूरबार व मुंबईप्रमाणेच बिनविरोध होणार असल्याची वावटळ आज सकाळीच उडाली व मतदार व माध्यमे यांच्यात खरी माहिती मिळवण्याची धडपड सुरु झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सहापैकी चार जागांवर बिनविरोध निवडणूक होणार असल्याची प्रतिक्रिया दिल्यामु,ळे नागपूरात ही बिनविरोध निवडणूक होण्यासाठी तडजोड झाली असल्याची चर्चा चांगलीच रंगली व काँग्रेसचे आमदार ॲड.अभिजित वंजारी यांच्या सक्करदरा येथील कमला नेहरु महाविद्यालयात काँग्रेस नेत्यांच्या बैठकीकडे माध्यमांनी धाव घेतली. मात्र बैठकीनंतर नाना पटोले यांनी नागपूरची निवडणूक होणारच,यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर संभ्रमाचा हा तिढा सूटला.

बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशिवाय क्रीडा मंत्री सुनील केदार,उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत,शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे,आ.अभिजित वंजारी,काँग्रेसचे उमेदवार डॉ.रविंद्र (छोटू)भोयर आदी उपस्थित होते.याच प्रसंगी छोटू भोयर यांना,नागपूरची निवडणूक देखील बिनविरोधत झाली असती तर तुमचे राजकीय भवितव्य काय असते?असा प्रश्‍न विचारला असता,मी अश्‍या कपोलकल्पित प्रश्‍नावर उत्तर देऊ इच्छित नसल्याचे ते म्हणाले.

नाना पटोले यांच्या विधानामुळे नागपूरची देखील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचा समज झाला असल्याचे सांगितले असता त्यांनी माध्यमांवरच खापर फोडत, नाना पटोले यांनी फक्त चार जागेचाच उल्लेख केला असून, त्यात त्यांनी नागपूरच्या जागेचा उल्लेख केला नव्हता,तरीही माध्यमांनी हीच बातमी लावून धरली,अशी पुश्‍ती जोडत माध्यमांवरच भडास काढली.

भाजपचे १०५ नगरसेवक यांची भाजप श्रेष्ठी परराज्यवारी घडवणार असल्याने, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भोयर यांनी अनेक नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता,परिणामी त्यांच्याशी आता कसा संपर्क साधणार?भाजपची मते फूटतील का?या प्रश्‍नावर एका काँग्रेस आमदारांनी ‘आधीच दहा मते फूटली’असल्याचे धक्कादायक विधान केले.

नाना पटोले यांनी भाजप ही निवडणूकीला घाबरली असून त्यामुळेच आपल्या नगरसेवकांना परराज्यवारी घडवत असल्याची जहाल टिका केली.भाजपला आपल्याच पक्षातील नेत्यांवर विश्‍वास नाही,याच नगरसेवकांमधून भावी आमदार,खासदार घडत असतात,त्यांच्यावर अविश्‍वास दाखवण्याचे घृणास्तपद कृत्य भाजप करीत असल्याचे पटोले म्हणाले.

आ.अभिजित वंजारी यांनी या ही निवडणूकीत शतप्रतिशत महाविकासआघाडीचा उमेदवारच जिंकणार असून पदवीधर निवडणूकीच्या निकालांचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे ते म्हणाले.एवढंच नव्हे तर या निवडणूकीनंतर भाजपमधील अनेक नेते हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा त्यांनी केला.

आज शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रफुल्ल विनोदराव गुडधे, सुरेश दौलत रेवतकर या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे नागपूर स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे- भारतीय जनता पार्टी, रवींद्र प्रभाकर भोयर- भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी, मंगेश सुधाकर देशमुख अपक्ष हे उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

परिणामी,काँग्रेस पक्षाच्या आज दिवसभर बैठकांवर बैठका पार पडल्या.दुपारी १२ ते ३ कमला नेहरु महाविद्यालय,३ वाजता काँग्रेस नगरसेवकांसोबत हॉटेल सेंटर पॉईंट तर दूपारी ४ वाजता जिल्हा परिषदेतील काँग्रेस सदस्यांना रिर्झव्ह बँक चौकातील सरपंच भवनात नाना पटोले, मंत्री सुनील केदार व मंत्री नितीन राऊत यांनी मार्गदर्शन केले.

सकाळच्या बिनविरोध निवडणूकीची चर्चा कानी पडताच धडकी भरली होती,अशी कबुली केदार यांच्यासमोर जि.प.सदस्यांनी दिली मात्र आता निवडणूका होणार असल्याने पुन्हा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीतील यश खेचून आणण्यासाठी कामाला लागू असे आश्‍वासन जि.प.सदस्यांनी केदार व पटोले यांना दिले.याच बैठकीत निवडणूक व मतांच्या गोळाबेरजेची रणनीती देखील ठरवण्यात आली.

या निवडणूकीत एकूण ५६० मतदार आहेत मात्र सतराशे साठ भानगडी असणार अाहेत याचीच चूणूक बहूजन समाज पक्षाचे निलंबित नगरसेवक मोहम्मद जमाल यांच्या सरपंच भवनातील उपस्थितीने दाखवली.पटोले यांची ‘इनडोर’बैठक संपेपर्यंत ते बाहेरच प्रतिक्षा करीत बसले, नाना पटोले बाहरे येताच मो.जमाल यांनी त्यांच्या ‘कानाशी’ संवाद साधला.

याविषयी त्यांना छेडले असता ‘मै तो आजाद परिंदा हूं’असे म्हणत,मी येथे काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांच्यासोबत आलो असल्याची मखलाशी त्यांनी जोडली.या निवडणूकीत प्रत्येक ‘मत’हे ‘लाखमोलाचं’असणार आहे, त्यामुळेच भाजप व काँग्रेस हे दाेन्ही पक्ष आपापले मतदार हे परराज्यवारीसाठी पाठवणार असल्याची चर्चा आहे.

भाजपच्या अनेक नगरसेवकांना विविध कौटूंबिक अडचणी असल्याने त्यांनी ही परराज्यवारी ऐच्छिक ठेवण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली असल्याचे समोर आले आहे.अनेक नगरसेविकांना तरुण मुली आहेत तर कोणाच्या घरी तुळसीचे लग्न आटोपल्यामुळे लग्नकार्य आहे मात्र पक्ष श्रेष्ठींना कोणतीही जोखिम पत्करायची नसल्यामुळे अनेक भाजप नगरसेवक हे सहकुटुंब ’व-हाड निघालं दाै-याला’चा अंक २८ नोव्हेंबर रोजी गाजवणार आहेत.

भाजप नगरसेविका उषा पॅलेट या केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितील नगरसेवकांच्या बैठकीत हजर नव्हत्या.आज मेडीकल भागातील त्यांच्या घराखाली विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावणकुळे उभे असल्याचा व्हिडीयो व्हायरल झाला.उषा पॅलेट या आजारी असल्यामुळे येण्यास असमर्थ असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र काँग्रेस आमदाराने ‘भाजपचे दहा नगरसेवक कधीचेच फूटले’असे विधान करुन खळबळ निर्माण केली आहे.मनपात शिवसेनेची दोन तर जि.प.२५ मते आहेत,गडकरी यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध बघता हे सदस्य १० डिसेंबर रोजी नेमके कोणाला मतदान करतील?आघाडी धर्म पाळतील का?या कडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.

बहूजन समाज पक्षाकडे देखील मनपात ११ मते आहेत,मो.जमाल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून नगर पंचायतीत १ सदस्य आहे.अाज हॉटेल सेंटर पॉईंट येथील बैठकीत या पक्षाच्या नगरसेवकांना देखील आमंत्रित करण्यात आल्याचे बोलले जात आहे मात्र नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत या पक्षाचे एक ही नगरसेवक सहभागी झाले नसल्याची माहिती आहे.

थोडक्यात काँग्रेसने त्यांचे उमेदवार डॉ.छोटू भोयर यांना विजयी करण्याचा चंग बांधला असून, पदवीधर मतदारसंघाच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे,राष्ट्रवादी, बसप व शिवसेनेची मते मात्र त्यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी गरजेचीच आहे.१४ डिसेंबर रोजीच या सर्व ५६० मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे.

काँग्रेस आमदाराच्या विधानावर भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी मत प्रकट करताना, १४ डिसेंबर रोजीच खरं ते काय कळेल,अशी प्रतिक्रिया दिली.कोण फूटले,कोण-कोण फूटले हे मतमोजणीत काँग्रेसला कळेलच असे ते म्हणाले.काँग्रेसच्या विचित्र बोलण्याला १४ डिसेंबर रोजी आपोआपच उत्तर मिळेल,१४ डिसेंबरची वाट काँग्रेसने बघावी,असे आव्हान दटके यांनी दिले.

बावणकुळे यांचा पराभव होणे शक्य नसल्याचीच चर्चा जास्त आहे तर दूसरीकडे डॉ.छोटू भोयर यांनी पक्षांतर करुन आपल्या ३४ वर्षांचे राजकीय जीवनच दाव वर लावले आहेत.गडकरी यांची प्रतिष्ठा या निवडणूकीशी खोलवर जुळल्या गेली असल्याने, निवडणूकीत आणखी रंगत वाढली आहे.हा आता केदार आणि गडकरी दोघांच्याही ‘नाकाचा’प्रश्‍न झाला आहे.

 

Latest बातम्या