
(रणधुमाळी विधान परिषदेची भाग-१)
आघाडीची ४४ मते फूटल्याचा दावा
आमची संपूर्ण मते आम्हालाच:पटोले यांचा दावा
पटोले यांनी आघाडीतील पक्षांवर शंका जाहीर करने योग्य नाही:दुनेश्वर पेठे
निवडणूक संपताच आघाडीत ‘बिघाडीचे’ अासार
एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष सोबत असताना निकाल अनपेक्षीत:मंगेश देशमुख यांची हताशा
भाजपच्या देखील ५ ते ६ मतांना सुरुंग
नागपूर ,ता.१४ डिसेंबर: विधान परिषदेच्या नागपूर व अकोला स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी पार पडलेल्या निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले.नागपूरात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावणकुळे यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपच्या हक्काच्या ३१७ मतांच्या वर मते खेचली. या निवडणूकीत भाजपकडे ३१७ मतांची आघाडी होती,याच्या वर जेवढी मते मिळतील ते ‘बोनस’असणार असल्याचे ते म्हणाले होते.आज त्यांनी ३६२ मते मिळवून तो दावा खरा ठरवला.
काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांनी १८६ मते मिळवली तर काँग्रेसचे अधिकृत मात्र नंतर ‘बा’द झालेले उमेदवार डॉ.छोटू भोयर यांना फक्त एक मत मिळाले.एकूण ५५४ मतापैकी पहील्या पसंतीचे ३६२ मते बावणकुळे यांना मिळाली तर ५ मते अवैध ठरली.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात ही मतमोजणी पार पडली.
१० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील १५ केंद्रांवर मतदार पार पडले होते.या निवडणूकीत ५५९ मतदारांपैकी ५५४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.एकूण ९८.९२ टक्के मतदान झाले होते.५५४ पैकी ५४९ मते वैध तर ५ मते अवैध ठरली त्यामुळे विजयासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.पहील्या फेरीत विजयासाठी निश्चित मते प्राप्त केल्याने बावणकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले.
आपल्या विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना बावणकुळे म्हणाले की,या निवडणूकीत काँग्रेसची ४४ मते फूटली.काँग्रेसच्या नेत्यांच्या हूकूमशाही,मोगलशाही वागण्यावरुन दोन मंत्र्यांनी दबाव टाकला आणि काँग्रेसप्रदेशाध्यक्ष हे नमले,हतबल झाले.हतबल प्रदेशाध्यक्ष कधीही काँग्रेसला न्याय मिळवून देऊ शकत नाही,३१८ मते भाजपकडे असताना ३६२ मते आम्हाला मिळाली आहे हा मोठा विजय भारतीय जनता पक्षाला मिळाली आहे.
आता नाना पटोले यांनी नैतिकतेच्या कारणाने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही,कुठल्याही राजकीय पक्षाने आपला उमेदवार बदलला नाही.,एकीकडे उमेदवारी द्यायची दूसरीकडे उमेदवार बदलवयाचे,ही हतबलता जी प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्या पक्षात होती ते पाहता ही नाचक्कीच झाली आहे.
(व्हिडीयो: विययानंतर संविधान चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विजयी उमेदवार चंद्रशेखर बावणकुळे यांनी माल्यार्पण केले.तत्पूर्वी त्यांनी विधान भवन चौकातील बख्त बुलंदशहा गोंड राजे यांना देखील माल्यार्पण केले)
आपल्या यशाच्या श्रेयाबाबत बोलताना,पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा,गृहमंत्री अमित शहा,गडकरी,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सर्वांनी माझ्या उमेदवारीला मंजूरी दिली आणि ग्रामीणमध्ये डॉ.राजीव पोद्दार आणि नागपूर शहरात निवडणूक प्रमुख म्हणून प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात प्रचंड मेहनत दटके व कार्यकर्त्यांनी घेतली असे ते म्हणाले. हा जो विजय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे.मतदारांचा आहे. त्यांच्या मतांचं कर्ज मला योग्यपणे काम करुन परत करायचं आहे,मतांचं जे कर्ज असतं, त्याची जाणीव मला आहे.मी निश्चितपणे नागपूर जिल्हयाला व माझ्या उमेदवारीला न्याय देईल असे ते म्हणाले.
या निवडणूकीतील काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी मात्र या निकालाबाबत असमाधान व्यक्त करीत, जरी अपक्ष म्हणून मला १८६ मते मिळाली असली तरी मला ‘विजयच’अपेक्षीत होता असे त्यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना सांगितले.एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष आणि आघाडी माझ्या बाजूने उभी होती तर मला यशच अपेक्षीत होतं त्यामुळे मी १८६ मतांवर समाधान मानू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मी महादूला ग्राम पंचायतमध्ये २०१० मध्ये आधी सदस्य म्हणून निवडून आलो यानंतर महादूला ही नगर परिषद झाली तेव्हा देखील मी २०१४ मध्ये सदस्य म्हणून निवडून आलो २०२१ मध्ये मी अपक्ष म्हणून जिंकलो,कामठी विधान सभेचा अर्ज ही मी २०१९ साली भरला होता,विधान परिषदेचा स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा अर्ज मी अपक्ष म्हणूनच लढणार होतो,या मागे माझा उद्देश्य फक्त, गेल्या वेळी २०१७ साली ही निवडणूक बिनविरोध झाली आणि भाजपचे गिरीश व्यास हे निवडून विधान परिषदेत गेले होते,ते बघता, यावेळी देखील ऐन वेळी भाजपला बिनविरोध ही आमदारकी मिळू नये म्हणून मी निवडणूकीला उभा झालो.
मात्र काँग्रेसने मला समर्थन जाहीर केले,मला इतर पक्षांचा पाठींबा मिळवून दिला त्यामुळे माझा आत्मविश्वास दूणावला होता मात्र मी या निकालामुळे मुळीच समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निकाला संदर्भात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत,निकालाचे मी स्वागत करतो मात्र या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचा ‘नैतिक’ पराभव झाला असल्याची खरपूस टिका केली.काँग्रेसकडे ९० मते कमी होती.उलट आम्ही या निवडणूकीत सामान्य उमेदवाराला उभे केले तर भाजपने आपल्या मतदारांना थेट देश-पर्यटनाला पाठवले,घोडेबाजार केला,हा नैतिकतेचा पराभवच आहे.
मतांची संख्या बघता आमची मते आम्हाला मिळाली आहेत.आमची कोणतीही मते फूटली नाही,भाजपसारख्या व्यापारी वृत्तीची लोक राजकीय व्यवस्थेत येतात तेव्हा ते हेच म्हणणार आहेत.माझा राजीनामा मागणा-यांचे डोके खाली असून आम्ही नागपूर जिल्हा परिषद जिंकलो,पदवीधर मतदासंघ आम्ही खेचून आणला,पदवीधर मतदारसंघ आम्ही जिंकला तेव्हा त्या निवडणूकीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण जोर लावला होता,त्यावेळी बावणकुळेंनी फडणवीस किवा गडकरींचा राजीनामा का नाही मागितला?आमच्या पक्षात आम्ही कोणाला उमेदवारी द्यावी,कोणाची मागे घ्यावी हा त्यांच्या बोलण्याचा विषय नाही.
काँग्रेसची मते फूटली नाहीत याचा अर्थ आघाडीतील घटक पक्षाची मते फूटली असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना म्हणायचे आहे का?असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे करतात. पटोले यांनी आघाडीतील पक्षांवर शंका जाहीर करने योग्य नाही.जे सत्य आहे ते दिसून पडतंय.आघाडी म्हणून आम्ही हा पराभव स्वीकारतो.
ऐन वेळी काँग्रेसने उमेदवाराची अदलाबदली केली त्यामुळे देखील अडचणी निर्माण झाल्या हे सत्य त्यांनी स्वीकारले पाहिजे.कशावरुन राष्ट्रवादीने आपली संपूर्ण २५ मते काँग्रेसच्या पारड्यात टाकली नाही?कशावरुन काँग्रेसची संपूर्ण मते काँग्रेसच्याच उमेदवाराला मिळली?हे कसे ओळखायचे?त्यांची ही मते फूटू शकली असतील.
आमच्या मतदारांनी इमानदारीने काँग्रेसच्या उमेदवारालाच मत दिले आहे.याच निवडणूकीत नाही तर लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकीत देखील आम्ही आघाडी म्हणूनच सोबत राहीलो आहोत.पटोले यांनी अशी शंका जाहीर करने योग्य नाही.येत्या महानगरपालिकेत देखील ही आघाडी टिकणार का?यावर बोलताना ही नेत्यांची निवडणूक होती,ती कार्यकर्त्यांची निवडणूक असणार आहे.वरिष्ठांनी आघाडीचा आदेश दिल्यास आम्ही आघाडीच्या उमेदवारांंच्याच पाठीशी राहू.
बसप,शिवसेना,भाजपचीही मते फूटली!
या निवडणूकीत बहूजन समाजवादी पक्षाची तीन मते ही भाजपच्या पारड्यात तर पाच मते ही काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली असल्याची चर्चा आहे.बसपच्या एकूण १२ मतदारांपैकी ८ मतदारांनी पक्षाच्या ‘तटस्थेचा’ विचार धुडकावून मतदान केले हे विशेष!
या निवडणूकीत शिवसेनेने भाजपची साथ दिली असल्याची देखील जोरदार चर्चा आहे.गडकरी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध बघता, शिवसेनेने आघाडी ऐवजी भाजपला साथ दिली असल्याचे खासगीत बोलले जात आहे.
या निवडणूकीत ‘अभेद्य’अश्या भाजपची देखील ५ ते ६ मते फूटली असल्याचे समाेर आले आहे.यावर आता पक्षात चांगलेच ‘मंथन’होणार असून,पक्षादेश मोडणा-यांवर भाजप कठोर कारवाई करण्याच्या ‘मूड’मध्ये आहे.शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी निकालाचे विश्लेषण केल्यानंतर मतमोजणीस्थळावरच चर्चेदरम्यान तसा इशारा दिला.

आमचे चॅनल subscribe करा