

पोलिस विभागाचा राज्यात होतो आहे दुरुपयोग
वारांगणांविषयी माझ्या विधानाचा विपर्यास
नागपूूूूूूूूूूूूूूर,ता. ९ मार्च २०२२ : महाराष्ट्र राज्यात ’न भूतो ना भविष्यती’असले प्रकार राजकीय पटलावर दररोज घडत असून महाराष्ट्राची जनता ही ‘सुन्न’ झाली आहे.विधीमंडळात असे-असे नगिने जनतेने पाठवले आहेत जे लोकशाहीची लक्तरे दररोज वेशीवर टांगतात आहेत.काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत पोलिस विभागाबाबत जे विधान केले आहे त्याच्याशी मी शंभर टक्के सहमत आहे.पोलिसांचे काम आता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे नसून राजकीय षडयंत्र शिजवायचे व नेत्यांच्या सांगण्यावरुन टार्गेटवर असणा-यांना कायद्याच्या कलमांमध्ये अडकवायचे हेच काम राहीले असून,नागपूरात देखील तेच घडत असून एका ६० वर्षाच्या वारांगणेला तडीपार करण्याची कारवाई करुन नागपूर पोलिसांनी फडणवीस यांचे म्हणने खरे केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी केला.
मंगळवारी ज्वाला धोटे यांनी आजमशहा चौकात वारांगणेवर पोलिसांनी केलेल्या तडीपारच्या कारवाई विराेधात आंदोलन केले होते.यावेळी नागपूर शहरात दररोज बलात्काराच्या घटनेत होणारी वाढ बघता ’अत्याचार करायचा असेल तर वारांगणांवर करा’असे विधान मी केले नसून माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.नुकतेच अंबाझरी हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सलग दोन दिवस एमडीच्या नशेत बलात्कार झाला,बलात्काराच्या घटना या सभ्य समजल्या जाणा-या महिलांवर,लहान-लहान मुलींवर देखील होत असल्याने, गंगा जमुना हे गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे,यामुळे शहरात बलात्काराच्या घटना वाढत आहेत,नराधमांना आपली शारिरीक भूक भागवायचीच असेल तर त्यांनी गंगा जमुनात यावे,यामुळे त्यांची ही भूक भागेल आणि आमच्याही लेकरांच्या तोंडात घास पडेल,असे वारांगणांचे म्हणने होते,असा खुलासा ज्वाला धोटे यांनी केला.वारांगणांच्या या आवाहनाचं तर महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासनाने स्वागत करायला हवं होतं,गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या मुलांची शाळा सुटली आहे,घरात दूध नाही,गटार तुंबले,घराच्या आत संपूर्ण घाण येते,लोकप्रतिनिधीकडे समस्या घेऊन जातात तर त्यांना सांगितलं जातं ’जा ज्वाला धोटेकडे तिला सांगा गटार तुंबले म्हणून!’
या देशात महात्मा गांधीं,तुकडोजी महाराज,गाडगे महाराज यांनी हरिजनांच्या सेवेसाठी खराटा हातात घेतला,ज्वाला धोटेला आव्हान केले असल्याने मी पण हातात खराटा घेऊन तुंबलेले गटार साफ करण्यास मागे पुढे पाहणार नाही मात्र मनपा प्रशासन मग कशाचा पगार घेत आहे?
भाजपचे नगरसेवक हे येथील वारांगणांना ज्वाला धोटेकडे जा,तिला सांगा गटार तुंबले असे म्हणतात ते ही योग्यच आहे कारण, त्यांचा या शहरातला आका,खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हेच म्हणाले ’आमचे नगरसेवक हे तुमच्या बापाचे नोकर आहेत का रस्त्यावर दिसायला?’शेवटी हे नगरसेवक आपल्या आकाचेच ऐकतील ना?असा घणाघाती टोला धोटे यांनी हाणला.
नागपूर शहरात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या छत्रछायेखाली मकोकाचे आरोपी फरार असतात,त्यांना राजाश्रय देणा-यांवर कारवाई होत नाही,नागपूर शहर हे एमडीचे हब बनले आहे,तरुणाईच्या हातात ते सहज उपलब्ध होत आहे,दररोज खून,दरोडे,चो-यांच्या घटना घडत आहेत,महिलांवरील अत्याचाराच्या घटना यांना तर अंतच नाही,यावर गुन्हेगारांना सोडून पोलिस आयुक्त मात्र एका ६० वर्षाच्या महिलेवर, जिला धड चालता ही येत नाही,जिचे दोन्ही घुडगे वाकले आहेत तिच्यावर तडीपारची कारवाई करतात?गेल्या आठ महिन्यांपासून तिच्याच नेतेृत्वाखाली गंगा जमुनामधील वारांगणा या चिवटपणे आपला न्याय हक्काचा लढा लढत आहेत,तिच्या एका हाकेवर शंभर वारांगणा एकत्रित होतात,यामुळेच त्यांचा एकसंघपणा तोडण्यासाठीच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही खेळी केल्याचा आरोप धोटे यांनी केला.
आंदोलनप्रसंगी अनेक वारांगणांच्या डोळ्यात अगतिकतेचे अश्रू अनावर झाले होते,त्यांच्या अश्रूंचं मोल हे सभ्य समाजाला कळणार नाही मात्र ते शासन,प्रशासन व माध्यमांनाही कळू नये यासारखं दूसरं दूर्देव माझ्या लेखी नाही,असे त्या म्हणाल्या.

आमचे चॅनल subscribe करा