Homeनागपूर न्यूजफक्त रझा अकादमीवर नाही बजरंग दल,विश्‍व हिंदू परिषदेवरही बंदी घाला

फक्त रझा अकादमीवर नाही बजरंग दल,विश्‍व हिंदू परिषदेवरही बंदी घाला

Advertisements


तारिक अनवर यांचे विधान

प्रत्येक निवडणूकींच्या पार्श्वभूमीवरच हिंदू-मुस्लिम दंगे:नाना पटोले यांचा भाजपवर घणाघाती आरोप

नागपूर,ता. १४ नाेव्हेंबर: त्रिपूरामध्ये कोणत्या पक्षाचं शासन आहे?तिथेच दंगली कश्‍या भडकल्या?देशात दंगली करा आणि मते मिळवा हेच धाेरण २०१३ पासून देशाची जनता बघत आहेत,२०१३ मध्ये आधी उत्तरप्रदेशात हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता देशात आली,आता देखील त्रिपुरात जे काही घडले ते उत्तर प्रदेशाच्या निवडणूका बघून सुनियोजितपणेे घडवण्यात आले आहे,अमरावतीमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आणि यात रझा अकादमीचे नाव घेण्यात येत असेल तर निश्‍चितच रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी मात्र त्यासाेबतच बजरंग दल,विश्‍व हिंदू परिषदेवर देखील बंदी घालण्यात यावी,असे विधान काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तारिक अनवर यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केले.

याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,आमदार विकास ठाकरे,महासचिव विशाल मुत्तेमवार,माजी आमदार अनिस अहमद,उमाकांत अग्निहोत्री, डॉ.हेमंत सोनारे आदी उपस्थित होते.माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेस तसेच शहर समितीतर्फे संपूर्ण देशात जनजागृतीपर उपक्रम सुरु करण्यात आला असून यात वाढती महागाई,शेतक-यांची दैना,वाढती बेरोजगारी इ.यासारखे प्रश्‍न घेण्यात आले अाहे. हा १५ दिवसांचा जनजागृतीपर उपक्रम असणार आहे.काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ग्रामीण भागात देखील घरोघरी जाऊन काँग्रेसची धोरणे तसेच देशातील विद्यमान वस्तुस्थिती सांगण्याचा या उपक्रमात प्रयत्न राहणार असून एक जनआंदोलन सुरु करण्याचा निर्णय झाला अाहे. याची सूरवात नागपूरपासून झाली .‘मंथन‘अंतर्गत नागपूरच्या पदाधिका-यांसोबत ही बैठक आज पार पडली,याशिवाय काँग्रेस पक्षाच्या कौमि तन्जीम शाखेतर्फे दर वर्षी १४ नोव्हेंबर रोजी ‘सेव्ह डेमोक्रेसी’हा उपक्रम राबवला जातो त्यात संपूर्ण विदर्भातील प्रतिनिधी सहभाग घेतात,या कार्यक्रमांनिमित्त तारिक अन्वर हे आज नागपूरात उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना तारिक अनवर म्हणाले की,काँग्रेसची विचारधारा ही ‘सर्वधर्म समभावाची‘राहीली आहे.भारतीय जनता पक्ष हा देशात जे काही घडवून आणते आहे ते निंदनीय व शर्मनाक असून देशाच्या हिताचे नाही.अमरावतीमधील दंगलीसाठी रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी केली जात असेल तर बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेवरही बंदी घातली पाहिजे.

भाजप राजकीय लाभासाठी देशात धृवीकरणाचे राजकारण करीत आहे.या विरोधात काँग्रेस पक्ष देशातील जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.भाजपच्या केंद्रातील सरकारकडे जनतेला सांगण्यासारखी कोणतीच उपलब्धी नाही,योगी सरकारकडे देखील आपल्या ५ वर्षाच्या शासनकाळात उत्तर प्रदेशच्या जनतेला सांगण्यासारखी कोणतीच कामगिरी नाही,करोना काळात तर उत्तर प्रदेशच्या जनतेने भिषण परिस्थिती अनुभवली,गंगेच्या काठांवर करोना बाधित मृतकांचा खच पडला होता,उत्तर प्रदेश सरकार ही आरोग्य सेवा पुरविण्यास पूर्णपणे अपयशी ठरली असून योगी सरकार ही भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेली सरकार अाहे. येत्या निवडणूकीत उत्तर प्रदेशची जनताच भाजपला धडा शिकवणार असल्याचा घणाघात त्यांनी केला.

भाजपतर्फे व्हॅट कमी करण्यासाठी राज्य सरकारविरोधात उद्यापासून जे आंदोलन होणार आहे ,या संबधी प्रश्‍न विचारला असता भाजपला आंदोलन करण्याचा अधिकारच नाही कारण केंद्र सरकारनेच गेल्या ७ वर्षांत पेट्रोल,डिजेल,गॅसचे भाव सातत्याने वाढवले असल्याचे तारिक अनवर म्हणाले .आता देखील केंद्राने पेट्रोल ५ रुपये व डिजेल १० रुपयांनी कमी केले असले तरी हा नुकतेच देशात पार पडलेल्या उप निवडणूकांचा परिणाम आहे,या निवडणूकांमध्ये भाजपने सपाटून मार खालला.त्याचीच धास्ती घेऊन मोदी सरकारने हे दर कमी केलेत,सामान्य जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्राने हे भाव कमी केले नसल्याचा आरोप अनवर यांनी केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या वादग्रस्त पुस्तकावर प्रश्‍न विचारला असता,याचे उत्तर त्यांनीच आधीच दिले असल्याचे सांगून यावर बोलण्याचे टाळले.

प्रत्येक निवडणूकींच्या पार्श्वभूमीवरच हिंदू-मुस्लिम दंगे:नाना पटोले
राज्यांच्या निवडणूका येतात तेव्हा हिंदू-मुस्लिम दंगे होतात,देशाची निवडणूक येते तेव्हा अचानक ‘पुलवामा‘घडतो,मी स्वत: पुलवामाला भेट दिली आहे.त्या ठिकाणी कुठलाही घातपात होऊ शकत नाही.घटनास्थळाच्या अगदी जवळच सैन्याचे दोन कॅम्प आहेत.दूसरी गाडी त्या रहदारीत विना चौकशीची घूसूच शकत नाही.त्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेली गाडी पोहोचलीच कशी?याचा तपास अद्याप इतका काळ लोटून देखील ५६ इंचच्या छातीच्या नेत्याकडून देशासमोर आलाच नाही.

त्रिपूरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटणे ही समाज विघातक कृती महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठीचेच षडयंत्र आहे मात्र उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत यावेळी कितीही षडयंत्र रचले तरी त्या राज्यातून भाजप ही ‘ सुपडासाफ‘होणार आहे.मागे ही बिहारची निवडणूक बघून सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला मात्र महाराष्ट्राची जनता ही इतकी ही दूधखूळी नाही,जनतेला भाजपच्या कट-कारस्थानांची चांगल्याने माहिती आहे.

उत्तरप्रदेशात भाजप येत्या निवडणूकीत सुपडासाफ होणार तरीही काँग्रेसच्या किती जागा येणार?या प्रश्‍नावर बोलताना जे महाराष्ट्रात झाले तेच भाजपला थांबवण्यासाठी उत्तर प्रदेशात देखील होणार असल्याचे सूचक विधान नाना पटोेले यांनी केले.महाराष्ट्रात भाजपला सत्तेत येण्यापासून थांबवण्यासाठी जे केले,उत्तर प्रदेशातही याच पद्धतीने काँग्रेसची सरकार येईल.

रेशन धान्य वाटपावर बोलताना यावर केंद्राचेच संपूर्ण नियंत्रण आहे.उज्जवला गॅस घरोघरी पोहोचवण्याची घोषणा झाली व गरिबांना, श्रीमंतांच्या श्रेणीत बसवण्यात आले व सबसिडी असणारे रॉकेल गरिबांना मिळणे बंद झाले,आता तीच खेळी रेशन धान्य वितरणाबाबत ही केंद्र सरकार खेळत आहे.‘स्वत: पाप करायचं‘ आणि जनेतेचं लक्ष दूसरीकडे विचलित करायचं,अशी खेळी भाजप खेळत असल्याची टिका पटोले यांनी केली.

भाजपचे आंदोलक भाडोत्री-
राज्य सरकार पेट्रोल,डीजेलवर व्हॅट कमी करत नसल्यामुळे भाजप २५ हजार लोकांना घेऊन मोर्चा- आंदोलन करणार असली तरी ते आंदोलक भाडोत्री असतात.भाजपला आंदोलनासाठी जनतेचा पाठिंबा मिळत नाही.भाजपकडे भरपूर पैसा आहे खर्च करण्यासाठी,ते २५ हजार आंदोलकही पैसे देऊन आणू शकतात.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव हे अद्यापही फार कमी असताना देखील केंद्र सरकारने देशात तेलाचे जे दर कायम ठेवले आहेत तो एक प्रकारचा जनतेच्या खिश्‍यावर ‘डाकाच’असल्याचा घणाघात पटोले यांनी केला.नुसते ५ रुपये आणि १० रुपये कमी केलेत पण केंद्राने ६० रुपये कमी केले पाहिजे,असे ते म्हणाले.

एसटी कर्मचा-यांचा संप हा भाजपचाच-
एसटी कर्मचा-यांचा संप हा भाजपचाचा असून आधी ते कर्मचा-यांच्या मागे दडले हाेते,आता समाेर आले आहेत.एसटी कर्मचा-यांच्या मागणीबाबत भाजपचे धोरण दुटप्पीपणाचे आहे.फडणवीस सरकार असतानाच तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारांनीच एसटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत घेता येणार नाही असे विधान केले होते.त्यांचा तो व्हिडीयोही समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.वातावरण खराब करुन सत्तेच्या पोळ्या शेकण्याचा उद्योग भाजप करीत अाहे,नुकसान मात्र जनतेचे होत आहे.ऐन दिवाळीत सर्वसामान्य जनता या संपामुळे चांगलीच होरपळली. ‘भाजपचे राजकारण जनतेते मात्र मरण’ही भाजपची कृती असल्याची टिका पटोले यांनी केली. आहे एसटी महामंडळाचे विलगीकरण शासकीय सेवेत करण्यात यावे, काँग्रेसच्यावतीने आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा निवडणूक स्वबळावरच-
गेल्या १५ वर्षांच्या भाजपच्या सत्ताकाळात नागपूर महानगरपालिकेची काय परिस्थिती आहे?माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर सुधार प्रन्यासचे विलणीकरण मनपात केले होते,याचे काय परिणाम झाले?आता चहा प्यायला देखील नासुप्रजवळ पैसा नाही,हे भाजपच्या पापांचं परिणाम आहे.

मनपा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?या प्रश्‍नावर बोलताना कोणी सांगितलं?असा प्रतिप्रश्‍न पटोले यांनी केला.मी मागेच बोललो होतो,काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका या स्वबळावरच लढणार,असा खुलासा त्यांनी केला.

Latest बातम्या