

(रणधुमाळी विधान परिषद निवडणूकीची भाग-५)
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१४ डिसेंबर २०२१: नागपूर,अमरावतीसह राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदासंघातील विधान परिषदेच्या जागांसाठी गेल्या वर्षी १ डिसेंबर २०२० रोजी निवडणूक जाहीर झाली.केंद्रिय निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबर रोजी या निवडणूका जाहीर केल्या होत्या.भाजपतर्फे प्रा.अनिल सोले यांचे नाव निश्चित असताना, माजी महापौर संदीप जोशी यांच्या नावाची घोषणा झाली तर काँग्रेसतर्फे अॅड.अभिजित वंजारी यांना रिंगणात उतरवण्यात आले, विदर्भवाद्यांकडून नितीन रोंघे रिंगणात होते.या निवडणूकीत महाविकासआघाडी ही एकजूट होऊन एकदिलाने लढली, त्यामुळे संदीप जोशी यांनी ४२ हजार मते घेऊन देखील, त्यांचा पराभव झाला,स्थानिक स्वराज्य मतदासंघाच्या निवडणूकीच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा ‘पदवीधर’ मतदारसंघाच्या निवडणूकीच्या चर्चेला उधाण आले.
कारण ही निवडणूक देखील काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध, भाजपच्या उमेदवारामध्ये रंगली.या निवडणूकीत देखील काँग्रेस व भाजप हे दोनच पक्ष आमने सामने होते.पदवीधर प्रमाणेच ही निवडणूक काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षाने ‘आघाडी ’म्हणूनच लढली ,एवढंच नव्हे तर पदवीधरसारखे यश, या वेळी देखील खेचून आणू असा विश्वास उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवशी काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला होता.
पदवीधर निवडणूकीचा अनुभव बघता,आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित आल्यास, भाजपच्या उमेदवारासाठी ही निवडणूक, त्यांच्या जवळील मताधिक्यामुळे सोपी असली तरी, सहज ठरणार नव्हती.त्यामुळेच भाजपने आपले मतदार फूटू नये म्हणून पराकोटीची खबरदारी आधीच घेतली होती.या मागे ‘पदवीधरचीच’ धास्ती होती.
काँग्रेसला मात्र पदवीधर निवडणूकीची पुनरावृत्ती, या निवडणूकीत देखील सहज होईल असा आत्मविश्वास नडला,केदार यांच्या देहबोलीतून तो वारंवार व्यक्त ही होत होता.जरी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणूकीत, भाजपकडे मतदाराचे पुरेसे संख्याबळ होते ,तरी देखील केदार हे भाजपच्या मतदारांमध्ये सहज सुरुंग लाऊ शकतात,याची जाणीव भाजपला ही होती.
मात्र उमेदवाराला घेऊन काँग्रेसमध्ये चांगलाच घोळ झाला किंबहूना पटोले यांच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास चांगलाच घोळ हेतुपुरस्सर निर्माण करण्यात आला.ऐन शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार बदलून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्या मागे आपले संख्याबळ उभे केले मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.
केदार यांनी ही निवडणूक नंतरच्या टप्प्यात ‘मनावर’घेतलीच नसल्याची चर्चा आहे,त्यांची संपूर्ण ‘स्ट्रेटेजी’ फक्त स्वयंसेवक असणारे डॉ.भोयर हे काँग्रेसच्या मतांवर जिंकून येऊ नये, यावरच भर देणारी होती,त्यांच्या या स्ट्रेटेजीने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना देखील ‘भूरळ’ घातली आणि ते काँग्रेसच्या मतांवर विधान परिषदेत जाण्याचे स्वप्न बघू लागले मात्र केदार यांनी‘ एकाच बॉलवर एकसाथ दोन विकेट घेण्याची किमया’ लिलया साधली.
परिणामी निराश होऊन पवेलियनमध्ये परतण्याशिवाय भोयर आणि देशमुख यांना पर्याय उरला नाही आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ भाजपचे उमेदवार आणि गडकरी यांचे ‘खास’चंद्रशेखर बावणकुळे ठरले.
पदवीधरमध्ये मात्र गडकरी हे कुठेच नव्हते,शेवटच्या दिवशी त्यांनी अनिच्छेेने भट सभागृहात संदीप जोशी यांच्यासाठी, शहर व ग्रामीण कार्यकर्त्यांसाठी सभा घेतली मात्र अनिल सोले यांचे तिकीट कापून फडणवीस यांच्या गोटातील समजले जाणारे संदीप जोशी यांना तिकीट मिळाल्याने ते मनातून नाराजच होते, हे त्यांच्या भाषणावरुनही सुज्ञांना कळले होते.
त्यामुळेच आज स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणूकीचे परिणाम बघता,गडकरी यांनी संदीप जोशी यांच्यासाठी देखील जोर लावला असता तर पदवीधरचा निकाल ही बहूदा वेगळा लागला असता,अशी चर्चा या निकालानंतर रंगली.अवघ्या दहा हजार मतांनी संदीप जोशी यांचा त्या निवडणूकीत पराभव झाला होता,हे विशेष!
स्थानिक स्वराज्य निवडणूकीत तिन्ही पक्षांमध्ये आघाडी असून पडद्या मागे ‘अर्थ’कारणाची बिघाडी होती तर पदवीधर निवडणूकीत भाजपमध्ये ‘एकी’असून देखील पडद्यामागील ‘नाराजी’ होती,त्यामुळेच या दोन्ही निवडणूकीचे परिणाम दोन्ही पक्षांसाठी अपेक्षेप्रमाणे येऊ शकले नाहीत.
संदीप जोशी यांच्यासाठी त्यांचा विजय हा ‘नियती ची ईच्छाच’राहीली तर डॉ.भोयर आणि मंगेश देशमुख यांच्यासाठी देखील ‘आमदार‘ म्हणून विधान परिषदेतील ‘प्रवेश’हा कपोल कल्पनाविलासच ठरला,असेच आता म्हणावे लागेल.

आमचे चॅनल subscribe करा