Homeनागपूर न्यूजनागपूरातील व्यापारिक संघटनांचेही फक्त अजनीवन प्रकल्पाच्या फेज-१ ला समर्थन

नागपूरातील व्यापारिक संघटनांचेही फक्त अजनीवन प्रकल्पाच्या फेज-१ ला समर्थन

Advertisements

फेज-२ कमर्शियलला आमचा ही विरोध:खापरीला इंटर मॉडल स्टेशन नको

‘सिटीझन’शब्दावर वाद

नागपूर,ता.१८ फेब्रुवारी २०२२:नुकतेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना नागपूरकर नागरिकांनाच अजनीवन प्रकल्प नको हवा आहे तर मी काय करु शकतो?अशी उद्वीग्नता व्यक्त केली.यानंतर लगेच हा प्रकल्पच आता रद्द होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले,हे वृत्त पसरताच शहरातील काही नामांकित व्यापारी संघटनांनी अजनीवन प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी पुढाकार घेतला.अजनी येथील इंटर मॉडेल स्टेशन व्हावे व शहरातील व्यापारी वर्गाला याचा लाभ मिळावा यासाठी शहरातील अनेक व्यवसायिक संस्थांनी मिळून आज शुक्रवार दि.१८ फेब्रुवारी रोजी प्रेस क्लब येथे पत्र परिषद आयोजित करुन त्यांच्या संघटनेचा अजनीवन प्रकल्पातील फेज-१ ला पाठींबा असल्याचे जाहीर केले मात्र याच वेळी फेज-२ च्या कमर्शियल प्रकल्पाला आमचा देखील विरोध राहणार असल्याचे स्पष्ट केले.आम्ही देखील याच शहरातील नागरिक असून पर्यावरणाची आम्हाला देखील काळजी असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी मंचावर बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(बीएमए),एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन(एमआयए),नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स लि.(एनसीसीएल),नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स(एनवीसीसी),विदर्भ इकॉनोमिक डेव्हलपमेंट काऊंसिल(वेद),विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन(वीआयए) तसेच विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशन(व्हीटीए)चे प्रतिनिधी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना या व्यवसायिक संघटनेचे म्हणने होते की,अजनी इंटर मॉडल(आयएमएस) हे एक प्रवासी टर्मिनल प्रकल्प आहे जी रेल्वे,रस्ता,मास रॅपिड ट्रांजिट सिस्टम(एमआरटीएस)बस रॅपिड ट्रांजिट(बीआरटी) तसेच पॅरा-मॉडलला एकत्रित करते.इंटर मॉडल स्टेशन हे यात्रेकरुंना स्टेशन परिसरातून बाहेर न पाडताच ट्रांजिटच्या वेळी आपले परिवहन बदलण्याची संधी प्रदान करते.आएमएसचा उद्देश्‍यच आहे की शहरातील विविध परिवहन व्यवस्थांना एकत्रित करुन शहरातून बाहेर जाणारे तसेच बाहेरुन शहरात येणा-यांमुळे होणा-या गर्दीवर नियंत्रण आणने.या प्रकल्पामुळे विविध परिवहन साधन एकाच परिसरात संचालित होणार असल्याने प्रवाश्‍यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आयएमएसचे हे वैशिष्ठ आहे की दर दिवशी ३ लाख २४ हजार प्रवाशी याचा लाभ घेणार असून हा प्रकल्प २०५० सालची दूरदृष्टि ठेऊन नियोजित करण्यात आला आहे.आएमएसच्या पहील्या टप्प्यात ४४.४ एकर तसेच दूसर-या टप्प्पयात भविष्यातील व्यवसायिक विकासाचे लक्ष्य ठेऊन १४९ एकर जमिनीवर हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे.

आयएमएसच्या आत १.१ लाख वर्ग फूटाचा विकास नियोजित केला गेला आहे ज्यात टर्मिनल इमारत,प्रतिक्षालय क्षेत्र,शौचालय,लाऊंज,फूड कोर्ट,बस आणि रेल्वे सुविधांसाठी तिकीट काऊंटर,क्लॉक रुम,व्हीआयपी रुम,राजस्व कार्यालय,छात्रावास,रखरखाव कक्ष इ.राहतील तसेच आएमएसच्या बाहेरील क्षेत्रात २.६ लाख वर्ग फूट जागेवर बस स्टॉप,ट्रांसिट प्लॅटफॉर्म,पार्किंग इ.राहतील.याशिवाय अजनी स्टेशनच्या तीन प्लॅटफॉर्मचा देखील विस्तार होणार असून आता ७ प्लॅटफॉर्म होतील,१४० बस बे प्रकल्पात असणार आहे.या सर्व बाबी शहरातील व्यवसायांना पूरक ठरणार आहेत.

खापरीला व्यापा-्यांची’ना‘-
अजनीचा प्रकल्प हा खापरी येथे राबविण्याला विरोध करीत खापरी येथे हा प्रकल्प झाल्यास या प्रकल्पाचा उद्देश्‍यच साध्य होणार नसल्याचे मत व्यवसायिकांने मांडले.रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्यास प्रदुषणात ही कमी होईल व दूर्घटना देखील टाळता येतील असे मत त्यांनी व्यक्त केले.कोणत्याही राष्ट्राचा विकास तेव्हाच होतो जेव्हा शहरातील वाहतूक व लॉजिस्टीक सांभाळणारी प्रभावी संसाधन असतात.शहरातील नागरिकांसाठी असणा-या या प्रकल्पाला शहराच्या दूर विकसित केल्या जाऊ शकत नाही.कॉनकोर रन मल्टीमॉडल लॉजिस्टीक पार्क(आयसीडी)खापरी स्टेशनच्या जवळ आहे व त्या भागात दर महिन्याला किमान ६ ते ८ हजार ट्रेलर चालत असतात.त्या क्षेत्रातील जड वाहतूक ही खापरीमध्ये इंटर मॉडल स्टेशनला विकसित करण्याला अव्यवहारिक बनवते,त्यामुळे हा प्रकल्प खापरीत स्थानांतरित करने हे समस्येचे समाधान ठरु शकत नाही.इंटर सिटी ट्रेन किवा बसचा उपयोग करणा-या नागरिकांना शहरातील विविध भागांपासून किमान ८ ते १० किलोमीटरचा प्रवास यामुळे करावा लागेल.यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण व वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल.

याप्रसंगी व्यवसायिक अशोक पटेल यांनी सांगितले,की आम्ही अमेरिकेच्या स्पाय सॅटेलाईटद्वारे कोरोना महामारीच्या काळात घेतलेल्या अजनीचे छायाचित्र घेतले आहे,जे १९६० च्या पासून घेणे सुरु आहे.त्या छायाचित्रांचे आता वर्गीकरण करण्यात आले असून ते आता जनतेसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.ही छायाचित्रे हे सिद्ध करतात की अजनीवन हे जंगल क्षेत्र नाही,तत्कालीन नागरिकांनी आपापल्या घरासमोर जी झाडे लावलीत त्यांनाच आता अजनीवन करुन प्रपोगंडा केला जात आहे.

या पत्र परिषदेच्या माध्यमातून आम्ही केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करतोय की त्यांनी हा प्रकल्प रद्द करु नये मात्र त्याच वेळी या प्रकल्पात कापण्यात येणारी वृक्षे यांचे पुर्नरोपण अत्यधिक सावधगिरी बाळगून करण्यात यावे.आपल्याकडे आधीच अमरावती रोड येथील कमला नगरजवळ मेट्रोतर्फे ‘लिटील वूड’येथे लावण्यात आलेले रोप हे यशस्वीपणे जिवंत राहीले आहेत,ती चमू चांगली काम करतेय त्यामुळेच अजनी येथील वृक्षांना देखील पुर्नरोपित करण्याचे काम त्यांच्याचकडे सोपविण्यात येऊ शकेल.या ठिकाणी ४५ एकर जागेत आकडेवारीनुसार फक्त ४ हजार ९३० झाडेच असून यात अनेक झाडे ही लहान आकाराची आहे मात्र या प्रकल्पात ४० हजार झाडे कापली जाणार असल्याची अफवाह पसरविली जात आहे.

आपल्या शहरातील मुले ही नागपूर शहरात याेग्य संसाधनांच्या अभावी शहराचा विकास होत नसल्यानेच विविध शहरात नोकरीसाठी जात असतात.जोपर्यंत आपल्या शहरात मजबुत बुनियादी ढांचा नसणार तोपर्यंत आपण विविध उद्योजकांना आपल्या शहरात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करु शकणार नाही.आपल्या शहराला जागतिक दर्जाच्या मूलभूत ढांचेची गरज आहे व अजनीचा इंटर मॉडल प्रकल्प हा, हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठीची एक मजबुत कडी आहे.

म्हणूनच शहरातील पर्यावरणवाद्यांना ससन्मान ही विनंती आहे की शहराच्या विकासात त्यांनी कोणतीही बाधा निर्माण करु नये व फक्त वृक्षांची हानि होणार म्हणून प्रकल्पाची हानि होऊ देऊ नये.विकास आणि पर्यावरण दोन्ही एकमेकासोबत चालणे अपरिहार्य असल्यानेच आम्ही या प्रकल्पाच्या फेज-१ च्या योजनेला पाठींबा देत आहोत.

याप्रसंगी मंचावर उपस्थित तसेच अजनीवन प्रकल्पाचे समर्थन करणा-यांपैकी किती व्यवसायिकांनी अजनीवनला प्रत्यक्ष भेट दिली?या प्रश्‍नावर फक्त नाग विदर्भ चेंबरचे अध्यक्ष अश्‍विन मेहाडीया यांनी ते प्रत्यक्ष पाहणीसाठी गेल्याची कबूली दिली.एवढंच नव्हे तर पत्रकारांना देखील ते व्यवसायिकांची बाजू समजून घेण्यासाठी अजनीवनला लवकरच घेऊन जाणार असल्याचे म्हणाले.राज्याच्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी अर्बन ट्री प्रोटेक्शन कायदा राज्यात लागू केला आहे,या कायद्यानुसार आता जुनी हॅरिटेज झाडे कोणत्याही प्रकल्पासाठी कापता येणार नाही मग अजनीवन प्रकल्पात अशी हजारो झाडे हॅरिटेज असून राज्यातील कायद्याचे काय?या प्रश्‍नावर बोलताना,आम्ही कायद्याच्या विरोधात नाही हॅरिटेज वृक्षांबाबत जे काही कायद्यात असेल,त्याचा आम्ही सन्मान करु असे उत्तर विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनचे सचिव तेजिंदर सिंग रेणू यांनी सांगितले.हा लोकशाही मानणारा देश आहे त्यामुळे कायद्याचे सर्वच पालन करतील.विरोधकांनाही विरोधाचा हक्क आहे.आम्ही भारत वनच्या प्रकल्पाला त्यांच्याच बरोबरीने विरोध केला होता व ती परियोजना रद्द करायला लावली होती मात्र अजनीवनचा विषय वेगळा आहे,असे ते म्हणाले

वृत्तपत्रात बातमी झळकताच एवढ्या सा-या संघटना या एकत्रित आल्या,या पूर्वी तुम्ही आपापल्या संघटनांच्या आमसभेतील बैठकीत हा मुद्दा चर्चिला गेला होता का?यावर तुमच्या दाव्याप्रमाणे सर्व संघटना मिळून १३ लाख सभासदांचे मत घेतले होते का?या प्रश्‍नावर बोलताना आमची कोणत्याही राजकीय पक्षासोबत बांधिलकी नाही] हा मुद्दा आम सभेत चर्चेत घेतला नसल्याचे उत्तर त्यांनी दिले..खापरी येथे हा प्रकल्प विकसित झाल्यास याचा मिहानला फायदा होईल,अजनी स्टेशनचे खापरी स्टेशन हा विकास घडून येईल,खापरी येथे आधीच सर्व संसाधने उपलब्ध आहेत याशिवाय १०० एकर जमीन देखील उपलब्ध आहे त्यातील २० एकर जमीनीवर हा प्रकल्प त्या ठिकाणी उभारल्यास मिहानचा रखडलेला विकास झपाट्याने होईल,असे तुम्हाला वाटत नाही का?या प्रश्‍नावर बोलताना त्यांनी हा प्रकल्प शहराच्या मध्यभागी व अजनीतच होणे गरजेचे असून हा प्रकल्प शहराच्या १५ ते २० किलोमीटर दूर नेणे सोयीस्कर होणार नाही,असे उत्तर मिळाले.
या देशात इंटर मॉडल स्टेशनसाठी एकूण १५ प्रस्ताव आले त्यापैकी फक्त वाराणसी व नागपूरचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.वाराणसीत हा प्रकल्प फक्त ३५ एकरवर उभारला गेला त्यातही वाराणसीत हा प्रकल्प किमान ३५ किलोमीटर दूर आहे मग नागपूरात १९६ एकर जागा प्रकल्पासाठी का हवी?असा प्रश्‍न विचारला असता,आमचा देखील फेज-२ च्या कमर्शियल वापरासाठी अतिरिक्त जमीन संपादित करण्याचा विरोध असल्याचे पुश्‍ती त्यांनी जोडली.

गडकरी यांनी अजनीवन येथील एका झाडा ऐवजी ६ झाडे लावण्याची घोषणा केली मात्र ही योजना अत्यंत अव्यवहारी असून प्रत्यक्षात गडकरी घोषित योजना जर राबवण्यात आली तर अजनी वन प्रकल्पाच्या दुप्पट रक्कम वृक्षांच्या रोपणावरच खर्च होतील त्याचे काय?असा प्रश्‍न करता ही वस्तूस्थिती असल्याचे त्यांनी मान्य केले.इस्त्राेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नागपूरात गेल्या दहा वर्षात ३५ टक्के हिरवळ नष्ट झाली असल्याचे नमूद केले आहे,याचे काय?यावर त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते.

अजनीवन हा आता शहरातील एकमेव हरित पट्टा उरला असून त्याच्या संरक्षणासाठी पर्यावरणवाद्यांनी एक मोहिमच उघडली असून ४० हजार लोकांच्या स्वाक्ष-या झाल्या असल्याकडे लक्ष वेधले असता आम्ही कोणत्याही स्पर्धेत नसल्याचे मत त्यांनी मांडले.आमच्याकडे देखील अजनीवनचा प्रकल्प झाला पाहिजे या बाजूने ७ हजार स्वाक्ष-या असल्याचे त्यांनी सांगितले.

अजनीवनचे आंदोलन दोन वर्षांपासून सुरु असताना व्यवसायिक संघटना आताच अचानक असे पुढे का आले?यावर उत्तर देताना आम्ही वृत्तपत्रात गडकरी यांची बातमी वाचली की ते आता हा प्रकल्प रद्द करणार आहेत त्यामुळेच त्यांनी हा प्रकल्प रद्द करु नये हे सांगण्यासाठी व त्यांना पाठींबा दर्शवण्यासाठी आम्ही संघठीत झालो असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

अश्‍विन मेहाडीया यांनी प्रारंभी या प्रकल्पाला नागरिकांचे समर्थन आहे,नागरिकांची ईच्छा आहे असे विधान केले,नागरिक म्हणजे मंचावरील व्यवसायिक का?सिटीझन म्हणजे नेमके कोण?असा प्रश्‍न विचारला असता मेहाडीया यांना उत्तर देता आले नाही.याप्रसंगी पत्रकरांच्या मधोमध बसलेल्या एक व्यवसायिकाने पत्रकारालाच जोरात बोलून गप्प करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही काळ तनाव देखील निर्माण झाला.व्यवसायिक आपली बाजू मंचावरुन मांडत असताना पत्रकरांच्या मधोमधही काही व्यवसायिक बसवले व व्यवसायिकांना अडचणीचे प्रश्‍न विचारले जात असताना पत्रकारांच्या मध्ये बसणा-या काही व्यवसायिकांनी तसेच त्यांचे व्हिडीयो घेणा-या मुलींनी देखील अपरिपक्वतेचा परिचय देत पत्रकारांनाच गप्प बसविण्याचा प्रयत्न केल्याने शहरातील ही व्यवसायिकांची पत्र परिषद ‘गडकरी-प्रायोजित’होती का?या चर्चेला ही उधाण आले.

एवढंच नव्हे तर पत्र परिषदेदरम्यान ‘मंत्री मिडीया’मधील काही पत्रकारांनी देखील इतर पत्रकार, व्यवसायिकांना अडचणीत आणनारे प्रश्‍न विचारत असताना जोरजाेरात बोलून,हातवारे करुन,त्रागा व्यक्त करुन,प्रश्‍न विचारणा-या पत्रकारांचे प्रश्‍न मध्येच कापून,दुस-या दिवशी सोयीस्कर ‘हेड-लाईनला’ साजेल असे शब्द पत्र परिषद घेणा-यांच्या तोंडी घालून आपल्या पत्रकारितेची इतिश्री मान्यात धन्यता मानली,यावर काही पत्रकारांमध्येच आपापसात वादावादी देखील झाली.

माय-मराठीचे उपराजधानीतील व्यवसायिकांना देखील वावडे!
या पत्र परिषदेत व्यवसायकांच्या संघटनांतर्फे फक्त इंग्रजी व हिंदी भाषेतील प्रेस नाेट वाटण्यात आले.यावर काही मराठी पत्रकारांनी तीव्र आक्षेप नोंदवला. यावर ही पत्र परिषद खूप घाईने आयोजित केली असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त इंग्रजी व हिंदी भाषेतच प्रेस नोट तयार केल्याचे आयोजकांनी सांगितले.एवढी घाईच होती तरी सर्वात आधी महाराष्ट्राच्या उपराजधानीत माय मराठी भाषेत शहरातील व्यवसायिकांना प्रेस नोट तयार करण्याची सुबुद्धि का नाही सूचली?आधी मराठी व हिंदी भाषेत करायची नंतर इंग्रजी भाषेत करता आली असती मात्र आपले ‘म्हणने’ठलक अक्षरात या शहरातील इंग्रजी व हिंदी दैनिकेच ‘हमखास’मांडणार, जणू याची शाश्‍वतीच असल्याने शहरातील विविध व्यवसायिक संघटनांनीही मायमराठीला दुय्यम लेखले असा सूर पत्र परिषदेनंतर उमटला.

पत्र परिषदेला प्रदीप खंडेलवाल,शशिकांत खंडेलवाल,सी.जी.शेगांवकर,सचिन जैन,कैलास जोगानी,तरुण निर्बाण,अश्‍विन मेहाडिया,रामअवतार तोतला,शिवकुमार राव,वरुण विजयवर्गी,सुरेश राठी,गौरव सारडा,श्रवणकुमार मालू,तेजिंदर सिंग रेणू आदी उपस्थित होते.

Latest बातम्या