आभा पांडे यांचा आक्षेप:महापौरांना लिहले पत्र
स्थायी समितीच्या बैठकीत ५ कोटींचा प्रस्ताव मंजूर!
नागपूर,ता.११ मे २०२६: ‘नदी स्वच्छता अभियान २०२६’अंतर्गत नाग नदी,पिवळी नदी व पोहरा नदी स्वच्छतेसंदर्भातील मुद्दा, २२ एप्रिल रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला होता.यावर महापौर नीता ठाकरे यांनी या संबंधित कामाचे संपूर्ण ऑडिट केल्यानंतर ठेकेदारांना देयके देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा,असे निर्देश दिले होते मात्र,स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवाणी दाणी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत, ठेकेदारांना देयके देण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला,यावर ज्येष्ठ नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सत्तापक्ष नेता आभा पांडे यांनी महापौरांना पत्र लिहून त कृतीचा तीव्र निषेध नोंदवला.
सभागृहात महापौरांचे स्पष्ट निर्देश अस्तित्वात असतानाही जाणीवपूर्वक ठेकेदाराला लाभ मिळावा या उद्देशाने नदी स्वच्छतेच्या कामांचे ऑडिट पूर्ण होण्या पूर्वीच, संबंधित विषय स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आणणारे ते अधिकारी कोण?असा सरळ प्रश्न त्यांनी पत्रात केला.ही बाब केवळ सभागृहाच्या अधिकाराचा अवमान नसून मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याचे त्या पत्रात नमूद करतात.
नदी व नाल्यांच्या स्वच्छतेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.त्यामुळे प्रत्यक्ष किती किलोमीटर नदी व नाले स्वच्छ झाले?यासाठी किती व कोणकोणती यंत्रे वापरण्यात आली?किती दिवस काम झाले?किती गाळ उपसा झाला?कामाची गुणवत्ता काय?याचे स्वतंत्र व पारदर्शक ऑडिट होणे अत्यावश्यक असून,ऑडिट पूर्वीच देयके मंजूर करणे म्हणजे आर्थिक अनियमिततेला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याची टिका त्यांनी केली.
महापौर हे पद अत्यंत जबाबदारीचे व सर्वोच्च असून, त्यांनी दिलेल्या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.नदी व नाला स्वच्छता कामांचे स्वतंत्र आणि निष्पक्ष ऑडिट पूर्ण होईपर्यंत कोणतेही देयक मंजूर करण्यात येऊ नये.ऑडिट अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात यावा.ऑडिटनुसार प्रत्यक्ष कामाची पडताळणी करुनच संबंधित ठेकेदारास देयके अदा करण्यात यावीत तसेच महापौरांच्या रुलिंगकडे दूर्लक्ष करुन विषय स्थायी समितीत आणणा-या संबंधित अधिका-यांची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.
जनतेच्या कराच्या पैशाचा विनियोग, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने होणे ही महापौरांचीच जबाबदारी असून,या गंभीर विषयात महापौरांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी आभा पांडे यांनी केली.
थोडक्यात,नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत नाग,पिवळी आणि पोहरा नद्यांसह नाले स्वच्छता अभियानाचे काम सुरु आहे.तिन्ही नद्यांची जवळपास ४९.१६ किलोमीटरच्या पात्राची स्वच्छता करण्यात येत असून, अातापर्यंत केवळ २६.२८ किलोमीटर म्हणजे ५३.४५ टक्के भागाचीच स्वच्छता पूर्ण झाली असल्याचा अहवाल असताना,ठेकेदाराला देयके देण्याची जी घाई स्थायी समितीला झाली आहे,ते बघता मनपाच्या या पदाधिका-यांना जनतेची चिंता आहे की ठेकेदारांची?असा संताप व्यक्त होत आहे.

नाले सफाईच्या नावाखाली दर वर्षी केवळ दिखाऊ कामे होत आहेत.नदी तसेच नाल्यांमधून काढलेला गाळ तिथेच बाजूला सोडून दिला जातो,जेणेकरुन पावसाळय्ात ताे वाहून पुन्हा नदीतच जमा होऊ शकेल तसेच,पुन्हा पुढील वर्षी गाळ काढण्यासाठी नव्याने निविदा व काही सत्ताधा-यांच्या ठेकेदारांचे भरणपोषण होऊ शकेल.नदी व नालेस्वच्छतेसाठी संयुक्त समितीची स्थापना करुन प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी देखील धुडकावून लावली जाते.मनपा प्रशासन सीएसआर निधी किंवा यंत्रसामग्री मिळविण्याचा कोणताही प्रयत्न करीत नाही.मनपाचे अधिकारी वारंवार खासगी कंत्राटदारांवरच नाले सफाईसाठी अवलंबून असते व जनतेचा कोट्यावधी पैसा यात दरवर्षी ओतत असते.आता पर्यंत मनपाने जितका निधी या यंत्र सामग्रीच्या भाडेतत्वावर खर्च केला,तेवढ्या निधीत मनपाला स्वत:ची यंत्रसामग्री खरेदी करता आली असती,असा आक्षेप मनपातील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही घेतला आहे.

अद्याप २२.८८ किलोमीटरचे पात्र स्वच्छ झाले नाहीत.ठेकेदाराने जी पात्रे स्वच्छ झाली केल्याचा दावा केला आहे,त्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे.१५ मे पर्यंत या तिन्ही नद्यांचे तसेच नाल्यांच्या स्वच्छतेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.या कामाला गती देण्यासाठी महापालिकेने २१ यंत्रे तैनात केली असल्याचा दावा करीत त्यामध्ये २० पोकलेन एक्सकॅव्हेटर आणि एक लॉग बूम मशिनचा समावेश असल्याची माहिती दिली आहे..१ मार्च २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत होणा-या या कामासाठी एकूण ४.९८ म्हणजेच पाच कोटींच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
ही यंत्र सामग्री एका सत्ताधारी पदाधिका-याचीच असल्याची चर्चा महापालिकेत चांगलीच रंगली असून,दर वर्षी पावसाळ्या पूर्वी नाग नदी व नाल्यांच्या स्वच्छतेचे बजेट, हे काही सत्ताधारी पदाधिका-यांची आर्थिक भरभराट करणारी असली तरी सामान्य नागपूरकर जनतेच्या डोळ्यात दर वर्षी धो-धो कोसळणा-या पावसासोबत, त्यांचे सर्वस्व वाहून नेणारी कृती ठरते,त्यामुळेच नदी स्वच्छतेच्या नावाखाली दर वर्षी कोटयावधींची होणारी जनतेच्या पैशांची लयलृट,सत्ताधा-यांच्या अश्या कृतींतून संताप व्यक्त करणारी ठरत आहे.
……………………………………
Advertisements
