जागतिक महिला दिन विशेष
नागपूर,८ मार्च २०२६: २२ जानेवारी २०२४ रोजी “दान पावलं हो फाउंडेशन”ची स्थापना करण्यात आली. “लोककलेतून जनजागृती” ही या संस्थेची टॅगलाईन असून देहदान, अवयवदान आणि नेत्रदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी “दान पावलं हो” हा भारूड कार्यक्रम सादर केला जातो.आजपर्यंत या उपक्रमाचे १४२ हून अधिक कार्यक्रम झाले असून जवळपास १९ हजार लोकांपर्यंत या चळवळीचा संदेश पोहोचला आहे. यापैकी सुमारे ८०० नागरिकांनी देहदान व नेत्रदानासाठी संमतीपत्र भरून दिले आहे. या लोकोपयोगी उपक्रमाच्या उद्गगात्री आहेत अनघा वेखंडे.मुख्याधिपिका पदवरुन सेवानिवृत्त झाल्यानंतरही या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाने विविध उपक्रमातून समाजाला सतत दिशा दाखवण्याचे कार्य केले,हे विशेष.
नागपूर महानगरपालिकेत तब्बल ३८ वर्षे शिक्षक म्हणून सेवा बजावून मुख्याध्यापक पदावरून २०१९ मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या. सेवा निवृत्तीनंतर समाजसेवेची दिशा त्यांनी निवडली . शिक्षण क्षेत्रात काम करत असताना प्रतिनियुक्तीवर सर्व शिक्षा अभियानामध्ये कार्य केले. त्याअंतर्गत ४६ सेतू शाळा तसेच मदरसा-मक्ताब अंतर्गत महात्मा फुले हमी योजनेच्या २६ शाळां काढून संचालन केले.
महानगरपालिकेतल्या एक ते चार मधील बालविद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्या कार्यक्रमांचे नागपूर दूरदर्शनवर सहा-सहा भागांमध्ये प्रसारणही झाले.
मराठी संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपण्यासाठी आणि लोप पावत असलेल्या आपल्या संस्कृतीचा वसा जपला जावा म्हणून “मराठीचा सांस्कृतिक वारसा” हा कार्यक्रम तयार केला. यात मराठी महिन्यात येणारे सण उत्सव याला निवेदनात बांधून त्या त्याप्रमाणे दृश्य देखावे रंगमंचावर सादर केले. मराठी महिन्यांतील सण-परंपरांवर आधारित या कार्यक्रमाचे नागपूर व परिसरात १९ प्रयोग झाले. विशेष म्हणजे ५ मे २०२४ रोजी दुबई येथेही या कार्यक्रमाचे यशस्वी सादरीकरण झाले. या कार्यक्रमांमध्ये ४० महिला आणि ५ पुरुष यांचा सहभाग असून २७ महिला या ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी प्रथमच रंगमंचावर काम केले.नागपूर दूरदर्शन ने मराठी संस्कृतीचा वारसा या कार्यक्रमाचे सहा एपिसोड मध्ये प्रसारणही केले
कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून त्यांनी नवीन सामाजिक उपक्रम सुरू केला. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहदान, अवयवदान आणि नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याच्या आवाहनाने प्रेरित होऊन त्यांनी या विषयावर काम करण्याचा निर्धार केला. या विषयावर फक्त भाषण न करता लोककलेच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती व्हावी या हेतू ने “दान पावलं हो” हे भारूड त्यांनी लिहिले.
या कार्यात ब्रदर रॉबर्ट आनंद, डॉ. रवी वानखेडे, डॉ. उदय बोधनकर, डॉ. देशमुख, डॉ. विकास महात्मे, डॉ. संजय कोलते, डॉ. संदीप पारसकर, सौ स्वप्ना कुळकर्णी राठोड, ज्योतिष्य रत्न जयंत पारधी , बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांच्या कुटुंबियांची विशेषत: पती अरुण वेखंडे, मुली, सायली अबोली ,भाऊ-भावजय यांची मोलाची साथ मिळाली. सहकारी म्हणून शोभा बावनकर, अंजली पारधी, रेखा भारद्वाज, नीलिमा देशपांडे,अबोली कुलकर्णी, पलाश पारधी , अनिरुद्ध ढोरे यांनीही या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.त्यांच्या संस्थेद्वारे चार देहदान आणि दोन नेत्रदान प्रत्यक्षात झाले आहे.
नागपूर, चंद्रपूर, आदासा, धापेवाडा, उमरेड, भिवापूर, पाटणसावंगी, पारशिवनी आदी ठिकाणी त्यांचे देहदानासाठी जनजागृतीपर कार्यक्रम सादर झाले. तसेच खारघर येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत ‘हिंद दी चादर’ आयोजित या कार्यक्रमातही या चळवळीचा विशेष स्टॉल लावला गेला होता व कार्यक्रमही सादर करण्यात आला. त्यांच्या या अनोख्या स्टॉलला जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांनी भेट दिली. तिथे येणाऱ्या वेगवेगळ्या गावातल्या दहा लोकांनी देहदानाचे फॉर्म भरून दिले.
या जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन शाळा, महाविद्यालये, मंदिरे, वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिक मंडळ तसेच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातही करण्यात आले आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, असा संस्थेचा मानस आहे. कारण शाळा आणि महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबद्दल संवेदनशीलता व संस्कार निर्माण व्हावेत आणि पुढे देहदान, अवयवदान व नेत्रदानासारख्या महान चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्या सांगतात.अनघा यांनी त्यांच्या आईच्या इच्छेप्रमाणे ,आईच्या मृत्यूनंतर देहदान केले मात्र,हिंदू संस्कृतीतील संस्कारानुसार मृत्यूपश्चात सर्व विधी मात्र त्यांनी शास्त्राप्रमाणे पार पाडले.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचे सर्व कार्यक्रम स्वखर्चाने आयोजित केले जातात. कार्यक्रमासाठी साउंड सिस्टीम, प्रोजेक्टर त्यांनी स्वखर्चाने घेतले आहे तसेच प्रवास खर्चही त्या स्वतः करतात. कोणाकडूनही मानधनाची अपेक्षा नसून, स्वेच्छेने दिलेले मानधनच स्वीकारले जाते. नागपूरबाहेरील कार्यक्रमांसाठी केवळ प्रवास खर्च घेतला जातो.
लोककलेच्या माध्यमातून देहदान, अवयवदान आणि नेत्रदान याबाबत समाजात सकारात्मक विचार रुजवण्याचे काम “दान पावलं हो फाउंडेशन” करीत असून, ही जनजागृतीपर चळवळ महाराष्ट्रभर आणि पुढे संपूर्ण भारतभर पोहोचवण्याचा संस्थेचा मानस आहे.
अनघा वेखंडे यांचा संपर्क क्रमांक – 8975731697
………………………………………..
Advertisements
